तोतया वारसदार - भाग 61 Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तोतया वारसदार - भाग 61

 तोतया वारसदार

पात्र रचना

बबन                       - सारंग सरांचा चपराशी

सुभाष                      -बबनचा मित्र. कटातला भागीदार.

निशांत                      - शोधकर्ता

नयना                      - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर  

अनिल                      - विश्रामचा चुलत भाऊ. सातारा.

विनय                       - अनिलचा मुलगा सातारा.

 

भाग  ६१            

भाग ६०  वरून पुढे  वाचा....

“बबनराव, खरंच सारंग सरांच्या तालमीत चांगले तयार झाले आहात तुम्ही. ठीक आहे तुम्हीच ताल माल बघा आणि मला सांगा, त्या प्रमाणे मी प्रगट होईन.”

दोन दिवसांनी बबनने सुभाषला फोन करून संध्याकाळी भेटायला बोलावलं. संध्याकाळी कॉफी हाऊस मधे दोघं भेटले.

“ठरलं का मी केंव्हा भेटायचं ते?” – सुभाषने विचारलं. तो आता अगदी अधीर झाला होता. १० करोंडची संपत्ती त्याला खुणावत होती, आणि तो अजून प्रेक्षकच होता.

“हो तू उद्या सकाळी दहा च्या सुमारास ये. सर साडे दहा वाजता कोर्टात जायला निघतात. तू पण भराभर काही बोलू नकोस, मुद्दाम अगदी सावकाश बोल. सकाळच्या घाई गर्दीत ते तुझ्याशी फार बोलणार नाहीत. तुझं बोलणं ऐकून घेतील, आणि संध्याकाळी यायला सांगतील. त्यांच्या बॉडी लँग्वेज वरुन तुला थोडा फार अंदाज येईल की संध्याकाळी कशी बॅटिंग करायची ते. सकाळी फार काही बोलू नकोस. फक्त क्लेम समोर ठेव. बाकी काही विचारलं तर त्यांची उत्तरं संध्याकाळी दे. दिवसभर विचार कर आणि मगच दे.” बबनने योजना सांगितली. “अजून एक, मी सारंग सरांच्या टीम मधे आहे, हे लक्षात असू दे.”

“ठीक आहे. आलं माझ्या लक्षात. तुम्ही चिंताच करू नका. मिळणाऱ्या संपत्तीच नियोजन करायला घ्या.” – सुभाष.

दूसरा दिवस, सारंग वकिलांचं ऑफिस. सुभाष प्रथमच जात होता ऑफिस मधे. तो आत  शिरल्यावर समोरच्या टेबल वर जो माणूस बसला होता, त्याला सुभाषने विचारलं,

“मला सारंग सरांना भेटायचं आहे. महत्वाचं काम आहे.”

त्या माणसाने बबनला आवाज दिला आणि सुभाष कडे बोट दाखवलं.

“बोला साहेब, मी काय करू शकतो तुमच्या साठी?” – बबन.

“मला वकील साहेबांना भेटायचं आहे.” – सुभाष.

“काय काम आहे? सरांना सांगावं लागेल.” – बबन.

“नाही असं नाही सांगता येणार. खाजगी आहे.” – सुभाष.

“ठीक आहे कोण आलं आहे म्हणून सांगू?” – बबन.

“सुभाष गोखले.” सुभाषने आपलं नाव सांगीतलं. नाटकाचा पहिला अंक सुरू झाला होता. बबन सारंगच्या केबिन मधे डोकावला. आतमधे नयना आणि विनय सारंगला अपडेट देत होते. बबनला डोकावतांना सारंगने पाहिलं आणि विचारलं, ”काय रे काय झालं?”

“सर बाहेर कोणी सुभाष गोखले आले आहेत, तुम्हाला भेटायचं आहे त्यांना. महत्वाचं काम आहे असं म्हणताहेत.”

“काय काम आहे, विचारलं का? आत्ता मी घाईत आहे, संध्याकाळी सांग यायला.”-सारंग

“सर मला वाटतं की जाहिरातीच्या संदर्भात असावं कारण त्यांच्या हातात टाइम्स चा  अंक आहे.” – बबन.

“बापरे, काय नाव म्हणालास?” – सारंग.

“सुभाष गोखले.” – बबन.

“पाठव त्यांना” – सारंग. नयना आणि विनय जाण्या साठी उठले.

“अरे तुम्ही कुठे जाता आहात? गोखलेच येत आहेत. बसा. तुम्ही पण बघा तुमच्या नवीन नातेवाईकाला. बसा, फक्त बोलू नका.” – सारंग.

बबनने दरवाजा उघडला आणि सुभाष आत आला. सारंगने त्याला बसायला सांगीतलं.

“बोला काय काम आहे?” – सारंग.

“साहेब, मी सुभाष गोखले. मी तुमची टाइम्स ऑफ इंडिया मधे दिलेली जाहिरात वाचून आलो आहे. मी पण गोखल्यांच्या संपत्तीत वारसदार आहे का हे मला बघायचय.”

“काय म्हणताय काय? तुम्ही क्लेम करता आहात का?” – सारंग सर आश्चर्याने म्हणाले.

“मला माहीत नाही. साहेब, मी महापालिकेत जलप्रदाय कार्यालयात काम करतो आणि इतर वेळी जितकं जमेल तितकं समाज कार्य करतो. मला जर संपत्तीत वाटा मिळाला तर माझ्या समाजकार्यात मला मदतच  होईल, म्हणून ही शक्यता पडताळून पाहायला मी आलो आहे.” – सुभाष गोखले.

“अहो काय बोलता आहात तुम्ही? निव्वळ तुमचं आडनाव गोखले आहे म्हणून तुम्हाला वाटा हवाय? अहो कसं शक्य आहे हे? असे बरेच गोखले असतील. तुम्हाला तुमचा  वारसा पुरावा देऊन सिद्ध करावा लागेल.” सारंग सर एक निष्णात वकील होते, पण आत्ता या क्षणी त्यांची पण मती गुंग झाली होती त्यांना कळेच ना की हे सर्व काय चाललंय ते.

“हे बघा, गोखले,” सारंग सर म्हणाले, “मी आत्ता खूप कामात आहे, तुम्ही मला संध्याकाळी ७ वाजल्यानंतर भेटा. तेंव्हा आपण शांत पणे बोलू.”

“ठीक आहे साहेब. मी संध्याकाळी येईन.” असं म्हणून गोखले गेले.

“काय  विनय, काय म्हणतोस? कोणी ओळखीचे आहेत का?” – सारंग.

“आम्हालाच तुम्ही शोधून काढलं, आम्ही काय सांगणार? तुम्हीच बघा” – विनय.

सारंगने विश्रामला फोन लावला.

“सारंग आत्ता या वेळी? काही अर्जंट आहे का?” – विश्राम.

“हो, एक बातमी द्यायची आहे. कोणी सुभाष गोखले नावाचा माणूस आला आहे आणि तो क्लेम करतो आहे.” – सारंग.

“कोण आहे, तुम्हाला माहीत आहे का?” – विश्राम.

“नाही तुम्हाला कोणाला जर काही कल्पना असेल तर सांगा.” – सारंग.

“काय म्हणत होता तो? काही डिटेल्स तर दिले असतील ना?” – विश्राम.

“नाही, सकाळची घाई गडबड असते म्हणून मी त्याला संध्याकाळी बोलावलं आहे. तुमच्या कानावर टाकावं  म्हणून फोन केला.” – सारंग.

“तुमच्या मनात काय आहे? मी किंवा अनिल कोणी यावं असं तुमच्या मनात आहे का?” – विश्राम.  

“हो म्हणजे तसंच, येऊ शकता का? ही भानगड वेगळी आहे, म्हणजे असं होऊ शकतं याची कल्पना होती, पण या केस मधे होईल असं वाटलं नव्हतं. त्यामुळे जर गोखल्यांचा कोणी प्रतिनिधी प्रत्यक्ष हजर असला तर बरं होईल असं मला वाटतं. तसा विनय आहेच, आणि सकाळी जेंव्हा त्या सुभाष गोखलेने क्लेम समोर ठेवला, तेंव्हा तो माझ्या  सोबतच होता, पण कोणी मोठं असेल तर बरं.” – सारंग.

“हो येऊ शकेन. अनिलशी आणि दिनेशशी बोलून प्रोग्राम सेट करतो आणि दोन-तीन दिवसांत येतो. तुम्ही आज संध्याकाळी त्यांच्याकडे काय प्रमाण आहे ते बघून घ्या. मग सविस्तर चर्चा मी आल्यावर करू.” – विश्राम.

“चालेल. मी वाट पाहतो.” - सारंग. एवढं झाल्यावर सारंग कोर्टात गेला.

तो गेल्यावर बबनने सुभाषला फोन करून लेटेस्ट अपडेट दिलं. त्यासाठी त्याला PCO वर जावं लागलं. बाकी कर्मचाऱ्यांसामोर ऑफिस मधून फोन करण्याचा धोका तो पत्करू शकत नव्हता.

“विनय ही काय भानगड आहे?” – नयना विचारत होती. विनयचा चेहरा जरा गंभीर होता.

“तू जे पाहीलंस तेच मी पाहिलं. समस्त गोखले इस्टेट नाकारताहेत आणि हा उपटसुंभ कुठून आला? समजत नाहीये. सारंग सरांना पण अपेक्षा नव्हती. तू ऐकलच ते काकांशी बोलत होते तेंव्हा.

“हे भयंकर आहे. म्हणजे हा खोटा माणूस आहे. इतके दिवस सर, इस्टेट तुम्ही घ्या म्हणून प्रत्येकाच्या मागे लागले होते, आणि आता मला द्या म्हणणारा आला आहे तर प्रश्नचिन्ह लागलं आहे.” – नयना उद्वेगाने म्हणाली.

“खरं आहे तुझं म्हणणं. बघू आता संध्याकाळी त्याला बोलावलं आहे तेंव्हा काय  स्टँड आहे त्याचा.” – विनय.

विनय आणि नयना साइट वर जातांना बोलत होते, त्यामुळे बबनला त्यांचं बोलणं कळलं नाही, नाहीतर हे सुद्धा त्याने सुभाषला कळवलं असतं.

संध्याकाळी बरोबर ७ वाजता सुभाष गोखले सारंग सरांच्या ऑफिस मधे आला. बबनने सारंग सरांना गोखले आल्याचं सांगितलं.

ऐन वेळेवर जरूर पडली तर निशांत कडून माहितीची शहानिशा करता यावी म्हणून, सारंग सरांनी निशांतला बोलावून घेतलं होतं. निशांत आल्यावर त्याला सांगितलं की “या कोपर्‍या मधलया टेबलावर माझा मदतनीस बसतो. तू इथे बस, दोन चार फायली घे  पुढ्यात आणि कामात गर्क आहे असं दिसलं पाहिजे, पण आमच्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष्य ठेव.” निशांतने मान डोलावली आणि तो फायली घेऊन बसला. मग बबनने गोखल्यांना बोलावलं.

“या गोखले या. अगदी ७ म्हणजे ७ च्या ठोक्याला आलात.” – सारंग

“साहेब, वेळ पाळायची सवयच आहे मला. पालिकेत सुद्धा मी जेंव्हा पोचतो, तेंव्हा कोणीच आलेलं नसतं. माझ्या बाबांनी लावलेली सवय आहे ही.” - गोखले.

“बरं आपण आता सरळ विषयावर येऊ. सांगा तुमचं काय म्हणण आहे ते.” – सारंग

“साहेब, मी पालिकेत काम करतो, तेवढा पैसा मला माझ्या घरासाठी पुरेसा आहे. पालिकेतलं काम सांभाळून बाकी वेळेत मी समाज कार्य करतो. मला या कार्यासाठी पैसा कमी पडतो. लोकं देतात, पण माझ्या सारख्या कोणतंही वलय नसलेल्या माणसाला असे कितीसे पैसे देणगी म्हणून मिळतील? तुमची जाहिरात बघितल्यावर मला आशेचा किरण दिसला. म्हणून मी इथे आलो.” गोखल्यांनी त्यांची अपेक्षा सांगितली.

“हूं, गोखले, तुमची अडचण आणि अपेक्षा दोन्ही मला समजली. तुम्ही असं करा, तुम्ही नेमकं काय सोशल वर्क करता, त्याची व्याप्ती किती आहे, आणि भविष्यात काय करण्याचा विचार आहे, ग्रँट किती हवी आहे, हे सगळं मला नीट लिहून द्या. मी ट्रस्ट कडे तुमची फाइल पाठवून देईन, त्यांनी मंजूरी दिली तर तुम्हाला आमची ग्रँट मिळून जाईल.” – सारंगला आता सुटल्या सारखं वाटत होतं. “मला असं वाटतं की तुम्ही एखादी NGO जॉइन करायला हवी.” – सारंग.

 

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com