तोतया वारसदार - भाग 62 Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तोतया वारसदार - भाग 62

 तोतया वारसदार

पात्र रचना

बबन                       - सारंग सरांचा चपराशी

सुभाष                      -बबनचा मित्र. कटातला भागीदार.

निशांत                      - शोधकर्ता

नयना                      - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर  

अनिल                      - विश्रामचा चुलत भाऊ. सातारा.

विनय                       - अनिलचा मुलगा सातारा.

 

भाग  ६२             

भाग ६१   वरून पुढे  वाचा....

“हूं, गोखले, तुमची अडचण आणि अपेक्षा दोन्ही मला समजली. तुम्ही असं करा, तुम्ही नेमकं काय सोशल वर्क करता, त्याची व्याप्ती किती आहे, आणि भविष्यात काय करण्याचा विचार आहे, ग्रँट किती हवी आहे, हे सगळं मला नीट लिहून द्या. मी ट्रस्ट कडे तुमची फाइल पाठवून देईन, त्यांनी मंजूरी दिली तर तुम्हाला आमची ग्रँट मिळून जाईल.” – सारंगला आता सुटल्या सारखं वाटत होतं. “मला असं वाटतं की तुम्ही एखादी NGO जॉइन करायला हवी.” – सारंग.

“साहेब, मी पालिकेत नोकरी करतो, मी दुसरीकडे कशी नोकरी करणार? पण साहेब, ते सोडून द्या ना, माझ्या क्लेम बद्दल काय विचार केला तुम्ही?” – सुभाष गोखले आता मुद्द्यावर आले.

“असं बघा गोखले साहेब, केवळ तुमचं आडनाव गोखले आहे, म्हणून तुम्ही वारसदार आहात हे सिद्ध होत नाही. ते करण्यासाठी तुम्ही काहीच पेपर दिले नाहीत, मग आम्ही कशाच्या जोरावर तुमचा क्लेम मान्य करायचा?” -सारंग

“सांगतो न साहेब.” सुभाष थोडा थांबला, आणि पुन्हा सुरवात केली.

“मी सुभाष अविनाश गोखले. माझे वडील अविनाश विनायक गोखले. आई पूर्बी बंदोपाध्याय, आम्ही गोपालगंज बांग्लादेश मधे होतो. परिस्थिती खूप खराब झाली म्हणून भारतात आलो. माझ्या वडीलांनी हिंद मोटर या कलकत्याच्या उपनगरामधे असलेल्या एका कंपनीत नोकरी पकडली. तिथेच त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मग आम्ही चंद्रपूरला बंगला कॅम्प  मधे आलो. आणि डिग्री घेतल्या वर आता महापालिकेत नोकरीला लागलो.” एवढं बोलून गोखले थांबले.

त्यावर सारंग सर म्हणाले, “ठीक आहे, पण तुम्ही वारसदार कसे? ह्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीये.”.

“माझ्या वडिलांचं नाव अविनाश आणि आजोबांचं नाव विनायक आहे एवढं पुरेसं नाही का?” – गोखले.

“नाही.” सारंग सर ठाम स्वरात बोलले. “तुमच्या वडिलांचं नाव अविनाश आहे, हे सांगून तुम्ही काय सिद्ध करू पाहता आहात?”

“माझे वडील विनायकरावांचे  चिरंजीव होते.” – सुभाष गोखले.

“बरं मग?” सारंग.

“म्हणून माझा क्लेम आहे.” सुभाष म्हणाला. आता जरा तो चिरडीला आला होता.

सारंग सर हसायला लागले.

“तुम्ही हसताय का?” सुभाष.

“गोखले, सकाळी तुम्ही भेटलात, तेंव्हा मला वाटलं होतं की तुमच्या जवळ काही सपोर्टिंग कागद पत्र असतील, पण तसं काही दिसत नाहीये, तेंव्हा तुमची वायफळ बडबड ऐकायला माझ्या जवळ वेळ नाहीये, मला बरीच महत्वाची कामं असतात. या आता तुम्ही.” असं बोलून सारंग सर उठले. सारंग गेल्यावर निशांत पण बाहेर पडला, बाहेर पडल्यावर समोरच्या पान ठेल्या वर त्याला सुभाष दिसला. बहुधा पानवाल्याला पान कसं हवंय हे सांगत होता. निशांत, थोडा दूर जाऊन एका दुकानासमोर उभा राहिला. थोड्याच वेळात, ऑफिस बंद करून, बबन आला आणि थेट सुभाष जिथे होता तिथे गेला. मग दोघं जण जवळच्या हॉटेल मधे गेले. थोड्या वेळाने बाहेर आले आणि आपापल्या वाटेने निघून गेले. निशांतने जवळच्या PCO वरून सारंग सरांना फोन लावला.

“सर, मी निशांत. मला एका महत्वाच्या बाबी बद्दल तुमच्याशी आत्ताच अर्जंट बोलायचं आहे. येऊ का घरी आत्ता? निशांत ने विचारलं.

सारंग सरांना त्यांच्या स्वरातली कळकळ जाणवली. ते म्हणाले.

“येऊ शकतोस, अडचण काही नाही. पण आत्ता दहा मिनिटांपूर्वी, आपण बरोबर होतो, दहा मिनिटांत असं काय घडलं की ताबडतोब मीटिंग करायची आहे?”

“सर फोन वर नाही सांगता येणार नीट., आणि सकाळ पर्यन्त पण माझी थांबण्याची इच्छा नाहीये.” निशांतने निक्षून सांगितले.

निशांत सारंग सरांकडे पोचला तेंव्हा सर त्याची वाटच पहात होते. म्हणाले,

“निशांत माझ्या बरोबर जेवायला बस. नाही तरी तू याच्या नंतर मेस मधेच जाणार असशील ना, मग आपण जेवता जेवता बोलायचं का?”

“नको सर, विनय पोचला असेल घरी, माझी  वाट पहात असेल, मी घरी गेल्यावर दोघंही जाऊ मेस मधे, आणि मेस बंद झाली असेल, तर हॉटेल आहेच ना.” निशांतने तो का जेवणार नाही याचं स्पष्टीकरण दिलं.

“ठीक आहे. बोल मी ऐकतो आहे.” – सारंग

“आपण बाहेर पडल्यावर, तुम्ही तर निघून गेलात, पण मी पान खायच्या विचारात होतो. समोरच पान ठेला होता, तिकडे जात होतो, पण थांबलो आणि बाजूच्या दुकानाच्या कोपऱ्यात उभा राहिलो, कारण पान ठेल्यांवर मला सुभाष दिसला.” – निशांत.

“अरे, मला कळत नाही, की जसा तू, तसाच तो पण पान खाण्या साठी ठेल्यावर गेला असेल, त्यात एवढं तातडीने येऊन सांगण्या सारखं काय आहे?” – सारंग.

“ते बरोबर आहे,” निशांत म्हणाला, ”पण पांच मिनिटांनी ऑफिस बंद करून बबन बाहेर पडला, आणि सरळ ठेल्यावर गेला. मग ते दोघं जवळच्या एका छोट्या हॉटेल मधे चहा प्यायला गेले. त्यांच्यात काय बोलणं झालं ते कळलं नाही पण दहा मिनिटा नंतर दोघंही आपापल्या घरी गेले.”

“माय गॉड, काय सांगतोस काय?” – निशांत.

“म्हणून तर एवढ्या तातडीने तुमच्याकडे आलो.” – निशांत.

थोडा वेळ शांततेत गेला. सारंग सर विचारात गढले होते. निशांत त्यांच्या कडे बघत शांत बसला होता. त्यांच्या प्रतिक्रियेची वाट बघत होता.

“मी विचार करतो आहे, की हे नेमकं काय असावं याचा. कदाचित सुभाषने बबनला ओळखलं असेल, आणि त्याला मस्का मारण्यासाठी चहा प्यायला घेऊन गेला असेल. हां असंच असू शकतं. तुला काय वाटतं निशांत?” सारंग सर म्हणाले.

“सर, माझी नजर वेगळी आहे. ती वेगळ्याच गोष्टी टिपते, जे बाकी लोकं बघू शकत नाहीत. म्हणून मला तुम्ही म्हणता तसं वाटत नाही.” – निशांत.

“असं काय बघितलं तुझ्या नजरेने?” – सारंग.

“सांगतो, आपण सारा प्रसंग सिम्युलेट करू. चालेल?” – निशांत.

“चालेल. बोल.” – सारंग.

“सर समजा सुभाषच्या जागी मी आहे, आणि बबनच्या जागी तुम्ही. तुम्हाला पान खायची इच्छा आहे, ठेला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आहे. तुम्ही डावीकडे उजवीकडे पहात पहात  रस्ता क्रॉस कराल. ऑफिसला किंवा मिटिंगला खूप उशीर झाल्यासारखा घाई घाईत रस्ता ओलांडणार नाही. बरोबर? – निशांत.

“हो, बरोबर. पण तू एवढं निरिक्षण केलंस? कमाल आहे. ” – सारंग.

“पानठेल्यावर  आपण भेटलो. आपण एकमेकांकडे बघून हसलो असतो. म्हणजे अगदी थोड्या ओळखीचं जे हलकं स्मित असतं ते. बरोबर?” निशांत.

“हो बरोबर.” – सारंग.

“मग तुम्ही सारंग वकिलांच्या ऑफिस मधले आहात हा विचार करून, मी पान वाल्याला म्हंटलं असतं की साब का भी पान लगाव” बरोबर?” – निशांत.

“हो बरोबर.” – सारंग.

“मग पानवाला पान लावे पर्यन्त थोडा वेळ तसाच गेला असता, आणि मग बाय बाय करून आपण आपापल्या मार्गाला लागलो असतो. बरोबर?” – निशांत.

“हो बरोबर, पण हे सगळं मला ऐकवून, तुला नेमकं काय म्हणायचं आहे ते माझ्या लक्षात येत नाहीये.” – सारंग.

“या सगळ्या घडामोडीत किमान पांच ते दहा मिनिटं जातात. पण असं काही झालं नाही, बबनने अत्यंत घाईघाईत रास्ता ओलांडला. बबन तिथे पोचल्यावर लगेचच दोघंही चहा प्यायला दुसरीकडे गेले. सुभाषने आल्यावर तुमची चौकशी केली एवढ्याच ओळखीवर, एका क्षणात बबनने त्याच्या बरोबर चहा प्यायला जाणं हे काय दर्शवतं आहे? त्यांची आधी पासून ओळख आहे हेच. आणि सुभाषला समोर करण्यामागे बबनचाच हात असण्याची दाट शक्यता असू शकते, हे. बबनने गोखल्यांची फाइल निश्चितच वाचली असणार.” – निशांत.

“निशांत तू जे अनॅलिसिस केलंस ते आता मला शंभर टक्के पटतं आहे. पण मला सांग, तोतया उभा करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. बबनला तेवढी बुद्धी असेल असं मला वाटत नाही. कदाचित हा तुझा अंदाज पण असू शकेल.” – सारंग.

“सर सुरवातीला आमचे अंदाजच असतात. नंतरच त्यात रंग भरतात. काय करू, या फील्ड मधे आल्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची दृष्टीच बदलून गेली आहे. तुम्हाला ती कॉपर ट्यूब चोरीची कथा सांगितली आहे. भलत्याच ठिकाणी लावलेले दोन बोल्ट कोणाच्याच नजरेत आले नव्हते. माझ्या आले म्हणून चोरी सापडली.”- निशांत.

“मग आता काय करायचं? बबनला नोकरीवरून काढून टाकतो. उद्याच्या उद्या. मग तो सुभाष काय करतो ते बघू.” – सारंग.

“नाही सर, बबनला आपण काय विचार करतो आहे हे मुळीच कळायला नको. तुम्ही ऑफिस मधे अगदी नेहमी सारखे वागा. आपल्याला त्यांच्या हालचाली समजायला हव्यात.– निशांत.

“मग काय आता तू बबनच्या पाळती वर राहणार आहेस का?” - सारंग

“नाही, बबन मला ओळखतो. त्यामुळे मी राव साहेबांना तीन  चांगली माणसं पाठवायला सांगणार आहे. एक तुमच्या ऑफिस मधे न्यू अपॉईंटमेंट असेल आणि दोघं आळीपाळीने ऑफिस च्या बाहेर असतील. बबन जेंव्हा जेंव्हा बाहेर पडेल, ह्यांच्या पैकी एक माणूस त्याच्या मागे असेल.” -निशांत.

“अरे तू पाहीलच की ऑफिस मधे जास्तीच्या माणसाला बसण्यासाठी आजिबात जागा नाहीये.” – सारंग.

“ही तर फारच चांगली गोष्ट आहे. त्याला तात्पुरतं, या प्रकरणाचा निकाल लागे पर्यन्त, तुमच्याच केबिन मधे बसू द्या. म्हणजे बबन तुमच्या केबिन मधे काय उपद्व्याप करतो हे ही कळून येईल.” – निशांत.

“निशांत, तू हाडाचा डिटेक्टिव आहेस यात कुठलाही वाद नाही. तुझ्या ऐवजी मी जर सुभाष आणि बबनला ठेल्यांवर पाहीलं असतं तर मी दुर्लक्ष करून निघून गेलो असतो. माझ्या डोक्यातही आलं नसतं, जे तुला कळलं.” – सारंग.

“नाही सर, तुमच्या सारख्या अनुभवी क्रिमिनल लॉंयर च्या नजरेतून हे सुटणं शक्यच नव्हतं. नॉट सीन नॉट फाऊंड, तुम्ही बघितलंच नाही. पाहिलं असतं तर तुम्हालाही तेच दिसलं असतं जे मला दिसलं. तुम्ही उगाच माझं कौतुक करता आहात.” – निशांत.

“ठीक आहे उद्या तू राव साहेबांशी बोल. मी ऑफिस मधे सकाळीच जाहीर करतो की, एक शिकावू उमेदवार येणार आहे. आणि त्याला  मीच शिकवणार आहे म्हणून. म्हणजे त्याला काही आलं नाही तरी चालेल. आणि माझ्या केबिन मधे बसला तरी कोणाला काही वाटणार नाही.” – सारंग.

हे ठरल्यावर निशांत घरी जायला निघाला. पण जाता जाता थांबला. म्हणाला,

“सर तुम्ही गोखल्यांची एक फाइल घरीच बनवा. ऑफिसच्या फाइल मधे यापुढे कुठलीच नोंद करू नका. बबनला त्या बाबतीतली  कुठलीही प्रगती कळायला नको. दुसरं आता तुमच्या ऑफिस मधे आपण फक्त जनरल बोलणार आहोत. विशिष्ट काही बोलायचं असेल तर ऑफिस च्या बाहेर, वाड्यावर किंवा तुमच्या घरी. फोन वर सुद्धा बोलायचं नाही.” – निशांत.

सारंग सर त्यांच्या कडे आश्चर्याने बघत राहिले. निशांत इतक्या अधिकारवाणीने बोलू शकतो याचं त्यांना नवल वाटलं. त्यांनी होकारार्थी मान डोलावली आणि म्हणाल,

“ओके बॉस. हुकूम की तामिल हो जाएगी।“

 

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com