तोतया वारसदार - भाग 63 Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तोतया वारसदार - भाग 63

 तोतया वारसदार

पात्र रचना

बबन                       - सारंग सरांचा चपराशी

सुभाष                      -बबनचा मित्र. कटातला भागीदार.

निशांत                      - शोधकर्ता

नयना                      - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर  

विश्राम आणि अनिल           - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी.

  साताऱ्याला  स्थायिक.

विनय                       - अनिलचा मुलगा सातारा.

 

भाग  ६३              

भाग ६२    वरून पुढे  वाचा....

सारंग सर त्याच्या कडे आश्चर्याने बघत राहिले. निशांत इतक्या अधिकारवाणीने बोलू शकतो याचंच त्यांना नवल वाटलं. त्यांनी होकारार्थी मान डोलावली आणि म्हणाले,

“ओके बॉस. हुकूम की तामिल हो जाएगी।“

निशांतने घरी गेल्यावर विनयला सर्व गोष्टी खुलासेवार सांगितल्या. त्याला ऐकून धक्काच बसला. “इतका जुना आणि विश्वासू माणूस कसा काय बदलला? निशांत निष्कर्ष काढण्यात तुझी काही चूक तर झाली नाही ना? कारण प्रसंग एकदम नेहमीचा आणि साधा आहे, म्हणून विचारतो आहे.” – विनय.

“विनय अनोळखी  माणसांनी जर तुला चहा प्यायला चल म्हंटलं तर तू जाशील त्यांच्या बरोबर? – निशांत.

विनयने थोडा विचार केला आणि मग म्हणाला “तू म्हणतो आहेस त्यात तथ्य आहे. आम्ही साधी माणसं आहोत, त्यामुळे आमच्या डोक्यात असलं काही येत नाही. तुझं डोकं वेगळ्याच लेवल वर चालतं.”- विनय.

“बरं अजून एक, गोखल्यांचा विषय ऑफिस मधे काढायचा नाही. बाहेर जाऊन बोलायचं किंवा वाड्यावर, किंवा सारंग सरांशी बोलायचं असेल तर घरी आल्यावर फोन करायचा. ऑफिस मधे फक्त जनरल टॉपिक.

दुसऱ्या दिवशी राव साहेबांचा एक माणूस सारंग सरांच्या ऑफिस मधे आला. सारंगसरांनी सांगीतलं, हा एक शिकाऊ उमेदवार आला आहे, आणि माझ्याच अन्डर मधे राहणार आहे.

“बबन त्याच्या साठी माझ्याच केबिन मधे टेबल लाव.” – सारंग.

ऑफिस मधली अरेंजमेंट सगळी झाली होती. आणि बाहेर दूसरा माणूस हजर झाला होता. सगळी जय्यत तयारी झाली होती.

दूसरा दिवस शांततेत काही न घडतं गेला. तिसऱ्या दिवशी विश्राम येऊन पोचला. त्यांची व्यवस्था एका हॉटेल वर करणार होते, पण त्याने सांगीतलं की तो निशांतच्यांच घरी राहणार म्हणून. निशांतचं घर २ BHK असल्याने काहीच अडचण नव्हती. निशांतच्याच घरी मग मीटिंग भरली. निशांत, सारंग विश्राम आणि विनय चहा च्या बरोबर निशांतने विश्रामला अपडेट द्यायला सुरवात केली. सर्व ऐकल्यावर विश्राम चक्रावून गेला. म्हणाला

“सारंग सर, हा बबन कितीतरी वर्ष तुमच्याकडे आहे ना? तुमचा विश्वासू असायला हवा होता. असं कसं केलं त्याने?”

“नाही, पैसा माणसाला काहीही करायला लावतो. बुद्धी भ्रष्ट होते. बबनचंही असंच झालं असावं. पण आता निशांतची माणसं त्याच्या मागे आहेत.” – सारंग.

मग सारंगनी सुभाष कशाच्या जोरावर क्लेम मागत होता ते सांगीतलं. आता विश्राम चकित झाला. “अरे, एवढी माहिती त्याला कुठून मिळाली असणार? हा माणूस तर सर्व तयारीनिशी मैदानात उतरला आहे. आता सारंग सर सर्व काही तुम्ही त्याला कसं वाटेला लावता, यावर अवलंबून आहे.” – विश्राम.

“अविनाशचा मुलगा, असा स्टँड सुभाषने त्याचा क्लेम सादर करतांना घेतला. ते लोकं बांग्ला देश मधून आले वगैरे सांगत होता. तोच विनायकरावांचा नातू आहे म्हणून वारसदार आहे असं म्हणत होता.” – सारंग.

“आणि ते खोटं आहे हे आपल्याला माहीत आहे. पण ही सगळी माहिती त्याला कुठून मिळाली? बबनने दिली?” – विश्राम.

“नक्कीच. सारंग सर सर्व घडामोडी एका फाइल मधे रोजच्या रोज लिहून ठेवत होते. बबनचं काम फायली लावण्याचं, त्याने फाइल वाचली आणि सर्व माहिती सुभाषला पुरवली. त्यामुळे आपल्या फाइल मधली सर्व माहिती सुभाष कडे असणार. फक्त इतकंच नाही, तर फोनवर काय बोलणं झालं आणि केबिन मधे काय बोलणं झालं हे सर्व सुभाष पर्यन्त नक्कीच पोचलं असणार. आता प्रश्न हा आहे की बबन आणि सुभाष यांची ओळख आत्ता इतक्यांतच झाली, की ती दोघ पूर्वीपासूनच मित्र आहेत? आता हे शोधून काढावंच लागेल.” निशांत. म्हणाला.

“म्हणून आता असं ठरलं आहे की याच्या पुढच्या सर्व मिटिंगा निशांतच्या घरीच होतील. म्हणजे बबनला याच्या पुढची आपली हालचाल कळणारच नाही. मी रोज संध्याकाळी इथे येत जाईन. इथेच आपण रोजच्या रोज प्लॅनिंग करत जाऊ.” -सारंग.

“ठीक आहे, मग उद्याचा प्रोग्राम काय?” – विश्राम.

“उद्या तो अजून तयारीनिशी येण्याची शक्यता आहे. मी त्याचं बोलणं ऐकून घेईन, चेंडू टोलवता आला तर ठीक नाही तर वेळ काढण्या साठी सांगेन की ट्रस्टी समोर ठेवावं लागेल, तू चार दिवसांनी ये म्हणून. त्यांच्या जवळ नेमकी किती माहिती आहे हे आपल्याला माहीत नाही. ते आधी काढून घ्यावं लागेल.” – सारंग.

“उद्या कशाला? सुभाष आजही येऊ शकतो.” – विश्राम.

“हो, पण मी आज ऑफिस मधे जाणारच नाहीये. आज कोर्टात भरपूर कामं आहेत, एक दोन जणांना भेटायचं पण आहे, त्यामुळे त्याला, आला तर उद्याच यावं लागेल. तो पर्यन्त बबन आणि तो पुन्हा भेटतात का हेही आपल्याला समजून जाईल. आणि त्याप्रमाणे विचार करता येईल. चला, मी संध्याकाळी येतो.” असं म्हणून सारंग निघाला.

सारंग गेल्यावर निशांत पण निघाला, पण तितक्यात निशांतला काही आठवलं. तो विश्राम कडे वळून म्हणाला,

“काका, बऱ्याच दिवसांपासून एक विचारायचं होतं पण काही ना काही कारणांमुळे राहून गेलं. आता आठवण झाली आहे तर विचारू का?”

“अरे विचार न, एवढी प्रस्तावना कशाला?” – विश्राम.

“आपण सर्वांची माहिती घेतली, पण खुद्द तुमच्याच वंशाची लाइन कळली नाहीये, ती जरा सांगा न. म्हणजे जर कुठे शाखा, उपशाखा असतील तर त्याही शोधता येतील.

“बरोबर आहे. बघ घे लिहून. माझे वडील आणि अनिलचे वडील सख्खे भाऊ. आजोबा सदाशिव, पणजोबा गंगाधर. या गंगाधर रावांना एक भाऊ पण होता. नाव विश्वंभर. पणजोबांचे वडील ओंकार. आणि ओंकार हा विश्वनाथरावांचा मुलगा.” – विश्राम

“तुम्हाला एवढंच माहीत आहे? गंगाधर रावांचा भाऊ कोण कुठे काहीच माहीत नाही? असं कसं?” – निशांत.

“दर वर्षी श्राद्धाला पूर्वजांची नावं घ्यावी लागतात, म्हणून एवढं तरी माहीत आहे. आणि गंगाधररावांना  भाऊ होता, हे माहीत आहे, पण त्यांच्या नावा व्यतिरिक्त काहीच माहिती नाही श्राद्धाला फक्त नावच लागतात.” -विश्राम.

****

दुपारी सुभाषने बबनला फोन केला. “आज संध्याकाळी मी पुन्हा येतो. काल तर सारंग सरांनी सरळ  मला बाहेरचा रस्ता दाखवला. तू सांगितल्या प्रमाणे मी तयारी केली आहे. आता आज भेटतो पुन्हा.”

“आज सर ऑफिसला नाहीयेत.” बबन. तो अगदी तोलून मापून बोलत होता कारण आज बाहेर स्टाफ आणि केबिन मधे नवीन माणूस होता. बबनला रिस्क घ्यायची नव्हती.

“मग आपण कॉफी हाऊस ला भेटू.” – सुभाष.

“हो.” – बबनने फोन ठेवला.

संध्याकाळी बबन आणि सुभाष कॉफी हाऊस मधे. त्यांच्या टेबलाच्या मागच्या टेबल वर राव साहेबांचा माणूस.

“बोला बबनराव काय म्हणता, मी येऊन गेल्यावर आज काय घडलं?” – सुभाष.

“सर त्या दिवशी आपल्या मागोमागच बाहेर पडले, आणि आज दिवस भर ते ऑफिस मधे नव्हते. ते नव्हते म्हणून निशांत आणि विनय दोघेही ऑफिस कडे फिरकले नाहीत. त्यामुळे सांगण्यासारखं काहीच नाही.”-बबन

“मग आता?” -सुभाष.

असं रोज नाही होत, तू उद्या ये. पण बरोबर सर्व सपोर्टिंग कागद घेऊन ये. त्या दिवशी हात हलवत आलास आणि सरांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या तुला. या वेळेस काळजी घे. इतका फूल प्रूफ प्लॅन बनवला आणि परवा माती खाल्लीस. अश्याने आपण दोघेही धुळीस मिळू.” – बबन.

“नाही, आता अशी चूक होणार नाही. मी पूर्ण तयारीनिशी येतो उद्या संध्याकाळी. फक्त तू फोन कर आणि  सर आहेत की नाही हे सांग.” – सुभाष.

“ओके” – बबन. मग दोघे पांगले. बबनने थंबस् अप करून सुभाषला शुभेच्छा दिल्या.

ते लोकं गेल्यावर निशांतचा माणूस पण बाहेर पडला आणि त्याने निशांतला PCO वर जाऊन फोन केला आणि बबन आणि सुभाषच्या मधे काय बोलणं झालं हे अगदी सविस्तर सांगीतलं. ऑफिस मधल्या माणसाने सुद्धा निशांतला फोन केला की बबनला  सुभाषचा फोन आला होता म्हणून.

संध्याकाळी थोडं उशिरा सारंग निशांतच्या घरी आले. मग चौघांची मीटिंग भरली.

निशांतने मग सर्वांना अपडेट दिलं. ऐकून झाल्यावर विश्राम म्हणाला,

“निशांतची शंका बरोबरच होती म्हणायचं. सारंग, या बबनने सगळ्या सीमा पार केल्या आहेत. सुभाषला तर तू पाहून घेशीलच पण बबनला पण शिक्षा व्हायलाच पाहिजे. खरं म्हणजे तोच या सगळ्यांचा सूत्रधार दिसतो आहे मला.”

“खरं आहे, मी तर त्याला परवाच काढून टाकणार होतो, पण या निशांतने थांबवलं मला. निशांतचा या फील्ड मधला अनुभव पाहता, त्याचा सल्ला ऐकावा असं मला वाटलं. निशांत, आता तूच सांग पुढे काय ?” – सारंग.

“सर तुम्हाला मीच सापडलो का चेष्टा करायला? मी तुम्हाला काय सांगणार? हा तुमचा प्रांत आहे.” – निशांत.

“अरे नाही, मी सगळ्यांनाच विचारतो आहे. प्रत्येकाने आपलं मत द्यावं.” – सारंग.

“जी माहिती आपल्याला माझ्या माणसाने दिली आहे, त्यावरून मला असं वाटतं की सुभाष उद्या संध्याकाळी तुम्हाला भेटायला येईल. बहुतेक तो  त्याने जमा केलेले सर्व पुरावे घेऊन येईल. त्यावेळी तुम्ही त्याला त्याचा क्लेम पुराव्यांसह लिखित मधे द्यायला सांगा. मग तो नंतरच्या दिवशी तुम्हाला क्लेम सादर करेल, तेंव्हा तुम्ही त्याला सांगा की “ट्रस्टी च्या मीटिंग मधे त्यांच्या समोर तुमचा क्लेम ठेवतो, मग त्यांच्या समोर तुला यावं लागेल. मगच काय तो निर्णय लागेल.” मधल्या काळात बबन आणि सुभाषच्या भेटी झाल्या, तर आपल्याला डिटेल्स मिळतील. कसंही करून आपल्याला वेळ हवा आहे, कारण आपल्याला त्याची इत्थंभूत माहिती मिळणं गरजेचं आहे.” – निशांत.   

“करेक्ट आहे, तो जर अविनाशचा मुलगा म्हणून क्लेम करतो आहे, तर ते खोटं आहे हे आपल्याला सिद्ध करावं लागेल. आणि त्याच्या करता त्याची संपूर्ण कुंडली आपल्याला माहीत पाहिजे.” – विश्राम.

“आणि हे सर्व होई पर्यन्त, सर तुम्ही बबनला हात लावू नका आणि त्याला कसलाही संशय पण येणार नाही असं बघा.” – निशांत. 

 

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com