तोतया वारसदार
पात्र रचना
बबन - सारंग सरांचा चपराशी
सुभाष -बबनचा मित्र. कटातला भागीदार.
निशांत - शोधकर्ता
नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर
विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी.
साताऱ्याला स्थायिक.
विनय - अनिलचा मुलगा सातारा.
भाग ६४
भाग ६३ वरून पुढे वाचा....
“करेक्ट आहे, तो जर अविनाशचा मुलगा म्हणून क्लेम करतो आहे, तर ते खोटं आहे हे आपल्याला सिद्ध करावं लागेल. आणि त्याच्या करता त्याची संपूर्ण कुंडली आपल्याला माहीत पाहिजे.” – विश्राम.
“आणि हे सर्व होई पर्यन्त, सर तुम्ही बबनला हात लावू नका आणि त्याला कसलाही संशय पण येणार नाही असं बघा.” – निशांत.
“सारंग सर, एक बोलू का?” – विश्राम
“बोला न” – सारंग.
“आपण वंशावळी प्रमाणे सर्वाना शोधलं, सगळेच आले आहेत, मग हा उपटसुंभ कुठून आला? मला तर काहीच कळत नाहीये.” विश्राम म्हणाला.
“मला दाट संशय आहे की हा संपत्ती लाटण्यासाठी कोणी तोतया आला असावा. पण त्याला हे माहीत नाही की गाठ माझ्याशी आहे. मी इथे एवढ्याच साठी आलो, की न जाणो खरंच कोणी राहिला असेल, आणि कदाचित तुम्हाला आठवेल. म्हणून ही शक्यता पडताळून पाहण्यासाठीच मी आलो.
पुन्हा हॉल मधे शांतता झाली. सर्व विचारच करत होते. सर्व पुन्हा पुन्हा वंशावळी पाहत होते. शेवटी सर्वांनीच नकारार्थी मान हलवली. मग विश्राम काका पुन्हा सारंग सरांना म्हणाले,
“सारंग सर, तुम्ही सरळ त्या तोतयाला पोलिसात द्या. चार दंडे पडले, की अक्कल ठिकाणांवर येईल त्याची.”
“नाही, विश्राम काका, असं नाही करता येणार. आपण पेपर मधे जाहिरात दिली होती, तेंव्हा त्याची आधी चौकशी करणं आवश्यक आहे. तो जर पुरावे देवू शकला नाही, तर पोलिस आहेतच.” सारंग सर म्हणाले.
“पण मग आता काय करण्याचा विचार आहे तुमचा? त्याला तुम्ही संध्याकाळी बोलावलं आहे. काही योजना आहे का तुमच्या मनात?” – विश्राम काका.
“आम्ही जेंव्हा एखादी केस लढवतो, तेंव्हा त्या केस मधली एक बाजू नक्की माहीत असते आणि दुसरीचा अंदाज असतो. त्याप्रमाणे डाव पेच आखता येतात. आता इथे त्यांची बाजू प्रथम आपल्याला समजून घ्यावी लागेल, मग बघू त्याच्याशी कसा व्यवहार करायचा ते. आता मी निघतो, डायरी आणि वंशावळी पुन्हा वाचतो आणि जेवढी तयारी करता येईल तेवढी करतो. रात्री येऊन तुम्हाला अपडेट देतो.”
“आमच्या पैकी कोणी आलं तर तुम्हाला मदत होईल का? व्यंकटेश किंवा सौमित्राला बोलवायचं का?” – दिनेश.
“इतकं धाडस हा माणूस करतोय याचा अर्थ, एक तर याच्या मागे कोणी तरी उभा आहे, आणि त्याच्याच इशाऱ्यावर हा माणूस काम करतो आहे. किंवा हा एक अत्यंत निर्ढावलेला आणि धूर्त बदमाश आहे. त्यामुळे तुमच्या पैकी कोणीही त्याच्या नजरेला पडू नये असं मला वाटतं. संपत्ती करोडोची आहे, त्यामुळे तुमच्या जीवाला पण धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.” सारंग सरांनी समजावलं, आणि ते तिथून निघाले.
सारंग सरांना वाटलं होतं तसंच झालं. सुभाष दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आलाच. सारंग सरांनी निशांतला पण बोलावून घेतलं होतं. निशांतच्या टेबलाच्या ड्रॅावर मधे टेप रेकॉर्डर ठेवला होता.
सुभाष आला. पांच मिनिटं तो जरा चुळबुळत बसला होता, बहुधा काय काय बोलायचं याची योजना करत होता.
“हूं, आज काय नवीन सांगायला आला आहात?” – सारंग.
“साहेब, सत्य एकच असतं. जे मी तुम्हाला कालच सांगितलं. वाटल्यास पुन्हा सांगतो. माझे वडील अविनाश विनायक गोखले. माझे वडील नागपुरातच शिकले, मग ते सैन्यात भरती झाले, आणि मग त्यांचं पोस्टिंग बांग्लादेशात झालं.” – सुभाष.
सारंगला सुभाषचं कौतुक करावंसं वाटलं. होम वर्क चांगलं केलं होतं. यांचा अर्थ फाइल बऱ्याच वेळा वाचली असणार. पण उघड पणे ते म्हणाले “पण तुमचे वडील याच विनायक रावांचे पुत्र असतील कशावरून? याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे? काही सपोर्टिंग कागद पत्र वगैरे?”
“साहेब, याचा पुरावा माझ्याकडे नाही, पण तुम्ही मिलिटरी ऑफिस मधे चौकशी केली, तर ते तुम्हाला अविनाश गोखल्यांची माहिती देतील, त्यात पत्ता पण असेल, मी काही सांगण्या पेक्षा त्यांनीच तुम्हाला माहिती दिली, तर तुमचं काम होऊन जाईल.” -सुभाष
“तुम्ही भारतात येण्याच्या आधी गोपालगंजला होते ना?” – सारंग सरांनी एकदम ट्रॅक बदलला.
“हो साहेब.” – सुभाष.
“वडील जिवंत होते का त्या वेळेला?” -सारंग.
“हो साहेब.” – सुभाष.
“गोपालगंजला मिलिटरी बेस आहे का?” – सारंग.
“माहीत नाही.”- सुभाष.
“जर तिथे मिलिटरी बेस नाहीये, तर तिथे तुमचे वडील काय करत होते?” – सारंग
“जुट मिल मधे नोकरी करत होते.” सुभाष म्हणाला.
“अविनाशला सैन्यात कोणता हुद्दा होता?” – सारंग.
फाइल मधे अविनाश बद्दल कुठलीच माहिती उपलब्ध नव्हती. ती सगळी माहिती निशांतने नंतर मिळवली होती, आणि ती सगळी निशांत जवळच होती, मग नंतर निशांत बांग्लादेशला जाऊन आल्या नंतर, ती सारंगच्या फाइल मधे गेलीच नाही. म्हणून बबनला त्यांच्या बद्दल काहीच कल्पना नव्हती. पण सुभाषने ती सगळी माहिती गोळा केली होती. त्याच्या साठी त्याने खास एका प्रायवेट डिटेक्टिव एजन्सी ची मदत घेतली होती. त्यामुळे न अडखळता तो म्हणाला-
“साहेब, युद्धाचे दिवस होते ते. माझ्या बाबांना आधी पासूनच सैन्यात जायचं होतं. माझ्या आजोबांना म्हणजे विनायक रावांना ते मान्य नव्हतं त्यांच्यात नेहमी वाद व्हायचे. शॉर्ट सर्विस मधे सिलेक्शन झाल्यावर बाबांनी सरळ आर्मी जॉइन केली. पॅरा रेजिमेंट मधे होते ते. लगेच त्यांना बंगला देशला जावं लागलं. सेकंड लेफ्टनंट म्हणून ते जॉइन झाले होते.” सुभाषने एका दमात सर्व सांगितलं.
हे सर्व ऐकल्यावर सारंग सर बॅक फुट वर आले, सुभाषने तयारी खरंच मजबूत केली होती, याचा प्रत्यय आला होता.
“सैन्यात होते, तर लढाई संपल्यावर वापस यायला हवे होते. तिथेच कसे राहिले? असं करता येत नाही.” -सारंग
“साहेब, बाबा, माझ्या आईच्या प्रेमात पडले होते, म्हणून ते तिथेच राहिले.” सुभाष.
“माझ्या माहिती प्रमाणे सैन्यातली नोकरी अशी सोडता येत नाही.” – सारंग.
“साहेब, बाबा शॉर्ट सर्विस कमिशन घेऊन गेले होते.” सुभाष.
“सुभाष, एक तर शॉर्ट सर्विस कमिशन मधून जे अधिकारी भरती केले जायचे, त्यांचा म्हणजे या कमिशन चा अवधी ५ वर्षांचा असतो, लढाई तर १५ दिवसांतच संपली. तुझे वडील वापस यायला हवेच होते, ते आले नाही यांचा अर्थ ते पळून गेले असा होतो. तर नक्की काय आहे?” – सारंग वकील.
“साहेब, लढाई संपली, त्याच सुमारास माझ्या वडिलांचा बॉन्ड संपला. आणि त्यांना बांगला देशातच राहण्याची परवानगी मिळाली.” – सुभाष.
“म्हणजे, ७१ साली बॉन्ड संपला, यांचा अर्थ तुझ्या बाबांनी साधारण १९६५ - ६६ साली सैन्यात प्रवेश घेतला, बरोबर?” – सारंग.
“हो साहेब.” – सुभाष.
“बॉन्ड संपल्यानंतर, निवृत्तीची एक पद्धत असते, ती पूर्ण करण्यासाठी तरी तुझ्या बाबांना भारतात येणं आवश्यक होतं, ती पुरी न करताच ते तिथे कसे राहिले? आणि त्यांना बंगला देश सरकारने राहू तरी कसं दिलं?” - सारंग
“साहेब, हे सगळं बाबांनी काय आणि कसं मॅनेज केलं असेल हे मी कसं सांगू? त्यावेळी तर त्यांचं लग्न पण झालं नव्हतं.” – सुभाष.
म्हणजे “सैन्यातला अविनाश आणि जूट मिल मधला अविनाश एकच आहे हे सिद्ध करण्याचा काहीच पुरावा तुमच्या जवळ नाहीये.”
आता सुभाष बावचळला हा चेंडू कसा टोलवायचा तेच त्याला कळेना. तरी तो नेटाने म्हणाला, “साहेब, मला आईने जे सांगितलं तेच मी तुम्हाला सांगितलं.”
“तुमच्या आईला घेऊन या, त्यांनाच विचारू आपण.” – सारंग.
“साहेब, आईला जाऊन ५ वर्ष झालीत.” – सुभाष.
“तुम्ही अविनाश गोखल्यांचे सुपुत्र आहात हे तुमच्या जवळ असलेल्या सर्टिफिकेट वरुन कळलं. पण दोन्ही अविनाश एकच आहेत हे कसं कळणार?” – सारंग सरांचा हे बोलतांना स्वर अतिशय मृदु झाला होता. जणू काही त्यांना दर्शवायचं होतं की त्यांनी सुभाषचं म्हणणं जवळ जवळ मान्य केलं आहे. सुभाषचाही तसाच समज झाला आणि उत्साहाने तो म्हणाला,
“मग आता मी काय करायचं?”
“तुमच्या जवळ तुमचं मॅरेज सर्टिफिकेट आहे का?” – सारंग.
सुभाष विचारात पडला. मध्येच सारंग सरांनी हे काय काढलं? पण तो म्हणाला,
“हो आहे, पण त्याचं काय?”
“तसंच तुमच्या वडिलांच पण असेल ना, ते पण घेऊन या.” – सारंग. “आणि हो एखादा लग्नातला फोटो असेल, तो ही घेऊन या.”
“बाबांच्या लग्नाचं सर्टिफिकेट तर नाहीये, त्या वेळेला तिथे ही पद्धत नव्हती. आणि फोटो बघावा लागेल.” – सुभाष.
“तुमच्या कडे तुमच्या आई वडिलांचा फोटो नाहीये? आश्चर्य आहे. माझ्या कडे पणजोबांचा पण फोटो आहे.” – सारंग.
“साहेब, आम्ही जागा खूप बदलल्या, त्यामुळे बरचसं सामान हरवलं, सापडला तर घेऊन येईन.” – सुभाष आता अडचणीत सापडला होता.
“तुमची आई पांच वर्षा पूर्वी मृत्यू पावली असं तुम्ही मघाशी सांगितलं. बरोबर नं?”
“हो साहेब. बरोबर.” – सुभाष.
“मग तुमच्या आईचे फोटो असतीलच तुमच्याकडे, ते घेऊन या.” – सारंग.
“माहीत नाही साहेब, बघतो, सापडले तर घेऊन येतो.” – सुभाष.
“असं कसं? तुम्ही एवढ्या मोठ्या प्रॉपर्टी वर क्लेम सांगता आहात, आणि तुमच्या जवळ काही पुरावा नाही, किंवा तो द्यायची तुमची तयारी दिसत नाहीये.” – सारंग.
“पण साहेब, हा काय प्रकार आहे? माझ्या आईचा संबंध येतोच कुठे या सर्व प्रकरणात? बाबांच्या बद्दल सर्व पुरावे दिलेच आहेत की. साहेब, आपण वकील आहात, असे प्रश्न विचारून तुम्ही मला निरुत्तर करू शकाल, पण माझा नैतिक आणि पैतृक अधिकार तर तुम्हाला मान्य करावाच लागेल.” – सुभाष निकरावर येऊन बोलला.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com