तोतया वारसदार
पात्र रचना
बबन - सारंग सरांचा चपराशी
सुभाष -बबनचा मित्र. कटातला भागीदार.
निशांत - शोधकर्ता
नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर
विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी.
साताऱ्याला स्थायिक.
विनय - अनिलचा मुलगा सातारा.
भाग ६५
भाग ६४
“असं कसं? तुम्ही एवढ्या मोठ्या प्रॉपर्टी वर क्लेम सांगता आहात, आणि तुमच्या जवळ काही पुरावा नाही, किंवा तो द्यायची तुमची तयारी दिसत नाहीये.” – सारंग.
“पण साहेब, हा काय प्रकार आहे? माझ्या आईचा संबंध येतोच कुठे या सर्व प्रकरणात? बाबांच्या बद्दल सर्व पुरावे दिलेच आहेत की. साहेब, आपण वकील आहात, असे प्रश्न विचरून तुम्ही मला निरुत्तर करू शकाल, पण माझा नैतिक आणि पैतृक अधिकार तर तुम्हाला मान्य करावाच लागेल.” – सुभाष.
“ठीक आहे, बरोबर आहे, तुमचं म्हणण. समजलं मला. सुभाष तुम्ही एक काम करा, आत्ता जे काही मला सांगितलं ते स्टॅम्प पेपर वर लिहून आणा. सगळी कागद पत्र आणि अविनाशचा फोटो तर लागेलच, त्याशिवाय ट्रस्टी ऐकणार नाहीत. नीट सविस्तर लिहा सगळं. मग त्याचं आपण शपथ पत्र करून घेऊ. मग तुमचा मार्ग मोकळा. आपण लगेच बाकीच्या ट्रस्टी बरोबर मीटिंग करू. चालेल? ” सारंग.
“हो सर उद्याच आणतो.” – सुभाष.
“चालेल, मी सर्व तपासून ट्रस्टीच्या समोर ठेवीन. तसंही जाहिरात दिल्यापासून एक महिना थांबावं लागतं. तुम्ही पालिकेत आहात, तुम्हाला चांगलंच माहीत आहे की प्रोसीजर कशा असतात ते. त्या नंतर ट्रस्टी सगळ्या कागदपत्रांची स्क्रूटिनी करतील. जितक्या लवकर तुम्ही द्याल, तेवढा तुमचा नंबर लवकर लागेल. जातांना बबन जवळ तुमच्या ऑफिसचा फोन नंबर देवून जा.” – सारंग
“साहेब, अजून कोणाचा क्लेम आला आहे का?” – सुभाष.
आत्ताच सर्व गोष्टी उघड करता येणार नाहीत. तुम्ही स्क्रूटिनी मधे पास झालात, तर तुमच्या पासून काहीच लपून राहणार नाही. ठीक आहे? या आता.” – सारंग.
त्या दिवशी संध्याकाळी सारंग निशांतच्या घरी गेला, पण घराला कुलूप होतं. वाड्यावर मंडळी भेटतील या विचाराने सारंग वाड्यावर गेला. वाड्यावर सगळेच भेटले. मग सगळे समोरच्या हॉल मधे बसले. सारंगने मग सगळ्यांना अपडेट दिले. नयना प्रथमच त्यांच्या मीटिंग मधे सामील झाली होती. पण कोणीच आक्षेप घेतला नाही. तिला काहीच माहिती नव्हती, काही प्रश्न विचारलेले निशांतला आवडणार नाही हे माहीत असल्याने ती चुपचाप बसून शांतपणे ऐकत होती. नंतर उद्या विनयला विचारू असा विचार तिने केला.
“म्हणजे सुभाष पूर्ण तयारीनिशी मैदाना उतरलेला दिसतो आहे. सारंग सर तुमच्या घरभेद्याने चांगलाच डाव साधलेला आहे. आता ही गुंतागुंत तुम्ही कशी सोडवणार? काही योजना आहे का तुमच्या मनात?” – विश्राम.
“मी अजूनही विचारच करतो आहे. त्याने त्याच्या चाली इतक्या विचारपूर्वक केल्या आहेत, की त्याला मात देणं फार अवघड आहे. आपल्याला माहीत आहे की तो अविनाशचा मुलगा नाहीये, पण आपण अविनाशची कथा उघड करू शकत नाही, हा एक मोठा पेच आहे. पण बहुतेक निशांत काही सुचवू शकेल.” – सारंग.
थोडा वेळ सर्वच गप्प बसले होते. मग निशांतच बोलला.
“सर, तो सर्व पुराव्यानिशी क्लेम केंव्हा सादर करणार आहे?” – निशांत.
“उद्या, किंवा फार तर परवा. मी त्याला लवकरात लवकर कागदपत्र द्यायला सांगीतलं आहे. पण त्याचं काय करायचं?” – सारंग
“मी दोन चार पॉईंट्स मार्क करून ठेवले आहेत.
नंबर १ : तो गोपालगंज च्या शाळेचं सर्टिफिकेट देणार आहे.
नंबर २ : तो चंद्रपूरच्या शाळेचं सर्टिफिकेट देणार आहे.
नंबर ३ : तो हिंद मोटर च्या शाळेचं सर्टिफिकेट देणार नाहीये.
“मला यात काहीतरी काळं बेरं दिसतं आहे. त्याने शाळांच्या सर्टिफिकेट चा उल्लेख करण्याचं काहीच कारण नव्हतं. फक्त मॅट्रिक चं सर्टिफिकेट जोडलं असतं तरी चाललं असत. तसा तो महापालिकेमधे असल्याने, ओळख पटवण्याची काहीच जरूर नव्हती. मग एवढा घाट का घालावांसा वाटला त्याला, हे समजत नाहीये.” – निशांतने आपल्या मनातल्या शंका बोलून दाखवल्या.
“निशांत, तुझ्या बरं लक्षात आलं? आम्हाला वाटलं सर्टिफिकेट देतो आहे तर बऱच आहे. शहानिशा तरी करता येईल.” – विश्राम.
“मी तेच म्हणतो आहे. फक्त त्याने सर्टिफिकेट सबमिट करायची वाट पाहतो आहे. ती आली, की माझं शहानिशा मिशन सुरू. सारंग सर, तो येईल तेंव्हा बोलता बोलता सहज विचारतो आहे असं दर्शवून, अविनाश गोपालगंज आणि हिंद मोटर च्या कुठल्या कंपनीत कामाला होता, आणि सुभाषची शाळा कोणची, ते काढून घ्या. बाकी मी बघतो.” – निशांत.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी, सुभाष आला.
“या, आणले का सर्व कागदपत्र व्यवस्थित?” – सारंग
“हो सर हे बघा. पण सर्व कागदपत्रांच्या फक्त कॉपीज आहेत. चालेल ना?” – सुभाष.
“नक्कीच चालतील, फक्त त्या सर्व प्रमाणित करून घ्याव्या लागतील.” – सारंग.
“का? प्रमाणित करायच्या म्हणजे तहसीलदारच्या ऑफिस मधे जावं लागेल. हे काही सरकारी ऑफिस नाहीये मग प्रमाणित कशाला?” -सुभाष.
“बरोबर आहे तुमचं म्हणण, पण तुम्हाला सांगतो की प्रोसीजर ही आहे, की सर्व क्लेम आमच्या टिप्पणीसह कोर्टाच्या समोर ठेवाव्या लागणार आहेत. मग कोर्ट जो निर्णय देईल त्या प्रमाणे करावं लागेल. आणि कोर्टाला साध्या कॉपीज चालणार नाहीत.” -सारंग
“का पण असं? इस्टेट तुमची निर्णय तुमचा, कोर्ट कशाला मधे?” – सुभाष.
“जेंव्हा एकापेक्षा अधिक वारसदार असतात, आणि मृत्यूपत्रात स्पष्ट उल्लेख नसतो, तेंव्हा डिसप्यूट होऊ शकतो. जर नंतर कोणी वाटणी बरोबर झाली नाही किंवा प्रोसीजर पाळली गेली नाही असा आक्षेप घेतला, तर आम्ही त्यात अडचणीत येऊ शकतो, म्हणून ही खबरदारी घेणं आवश्यक आहे. तुम्ही समजून घ्याल अशी आशा आहे.” – सारंग सर अतिशय मृदु शब्दांत समजावून सांगत होते. जणू काही त्यांनी सुभाषचा क्लेम स्वीकारलाच आहे. सुभाषला त्यांच्या स्वरातली कळकळ समजली. त्याचा चेहरा उजळला.
“किती वारसदार आहेत?” – सुभाष.
“जाहिरात दिल्या नंतर अजून तरी कोणी समोर आला नाहीये, आपण एक महिना वाट पाहणार आहोत, त्यानंतर ट्रस्टी निर्णय घेतील आणि कोर्टाला तसं कळवतील.” – सारंग.
सुभाषला माहीत होतं की बऱ्याच गोखल्यांचा पत्ता लावून झाला आहे, पण त्याला उघडपणे काही बोलणं शक्य नव्हतं. म्हणाला,
“ठीक आहे, मी सर्व प्रमाणित करून आणतो. पण त्याआधी तुम्ही एकदा नजरे खालून घालता का?” – सुभाष.
मग सुभाषने त्याने केलेला अर्ज दाखवला, त्याला जोडलेली सर्टिफिकेट पण दाखवली. आईचा फोटो दाखवला. अविनाशचा फोटो पण दाखवला. फोटो पाहून सारंग सर जरा चमकले, पण त्यांनी तसं दर्शवलं नाही तो फोटो सारंग सरांच्या फाइल मधे लावलेल्या अविनाशच्या फोटोची कॉपी होती.
“ठीकच दिसतंय सर्व. तुमच्या जवळ या सेट ची दुसरी कॉपी पण असेल ना?” – सारंग.
“नाही, ही एकच आहे.” – सुभाष.
“मग सर्व जोडलेल्या सर्टिफिकेट आणि फोटो सह सहा कॉपीज करून घ्या. आणि सर्व सेट प्रमाणित करून घेऊन या. एका सेट वर आमची सही आणि शिक्का असेल, तुम्ही क्लेम चा अर्ज दिला आहे यांची पोच पावती म्हणून तो आम्ही तुम्हाला देऊ. कारण आम्ही एक महिना थांबू, मग कोर्ट किती वेळ घेईल हे सांगता येत नाही. पण ही पावती असली तर तुमच्या डोक्याला टेंशन येणार नाही.” – सारंग.
सारंग सरांनी ज्या आवाजात कारणं सांगितली, त्याने सुभाष आश्वस्त झाला.
मग सारंग सरांनी ताबा घेतला. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर सारंग सर म्हणाले, तुम्ही बांग्लादेशात होता तेंव्हा साधारण परिस्थिती कशी होती.?”
सुभाष खुश झाला, त्याने याचा अभ्यास केलाच होता, त्यामुळे काही अडचण नव्हती. आता तो मित्रांशी बोलावं तसा रीलॅक्स होऊन बोलत होता. मग सारंग सर फक्त मधून मधून त्याला बोलतं ठेवत होते. बोलता बोलता त्याने सारंग सरांना जी हवी होती, ती सगळी माहिती पुरवली. मग सारंग सरांनी आवरतं घेतलं. त्याला जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर अर्जाचे सर्व सेट घेऊन यायला सांगितलं आणि मीटिंग संपली.
सुभाषने जाता जाता बबनला खूण केली आणि तो बाहेर पडला. त्याच्या पाठोपाठ सारंग आणि निशांत पण निघाले. सारंग सर निशांतला म्हणाले की बरोबरच जाऊ, पण निशांत ने नकार दिला. म्हणाला
“बबनने पाहीलं तर त्याला संशय येऊ शकतो. तुम्ही जा, मी रिक्शाने येईन.”
सारंग आणि निशांत दोघंही निशांतच्या फ्लॅट वर पोचले. विश्राम, विनय आणि नयना त्यांची वाटच पहात होते. सारंग आणि निशांतने सर्वांना अपडेट दिलं.
“अरे वा, तुम्हाला हवी होती ती सर्व माहिती मिळाली की. मग आता काय प्लॅनिंग आहे निशांत?” सर्व ऐकल्यावर विश्रामने विचारलं.
“आता आधी उद्या जाऊन बांग्लादेशाचा व्हिसा आणि तिकीटांची व्यवस्था करायची. मग सुभाषने अर्ज दिला, की त्यांची कॉपी करून, ती घेऊन बांग्लादेशला जायचं. आणि खरं काय आहे ते जाणून घ्यायचं.” – निशांत.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com