तोतया वारसदार
पात्र रचना
बबन - सारंग सरांचा चपराशी
सुभाष - बबनचा मित्र. कटातला भागीदार.
निशांत - शोधकर्ता
नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर
विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी.
साताऱ्याला स्थायिक.
विनय - अनिलचा मुलगा सातारा.
भाग ६६
भाग ६५ वरुन पुढे वाचा .......
ऑफिस बंद करून, बबन पानठेलयावर गेला आणि मग तिथून ते दोघं एका हॉटेल मधे चहा प्यायला गेले.
“अभिनंदन सुभाष, सारंग सरांची खात्री झालेली दिसतेय तुझ्या बद्दल.” – बबन.
“तुला पण असंच वाटतंय ना! मी पण तसाच विचार करतो आहे. आज सारंग सर खूप छान बोलले माझ्याशी. आधीच्या भेटीत ते जरा ताठरपणे बोलत होते, तसं काही आज वाटलं नाही.” – सुभाष.
“आता तू उद्या सुट्टी घे आणि सर्व कागद पत्र प्रमाणित करून घे. आणि संध्याकाळी सरांना दे. म्हणजे एक टप्पा यशस्वी रित्या पार पडला असं समजू. बाकी मग एकदा ट्रस्टी समोर आणि एकदा कोर्टा समोर जावं लागेल. पण सारंग सरांच्या कडून पास झालं म्हंटल्यांवर पुढे काही अडचण येईल असं वाटत नाही.” – बबन.
“यस सर, उद्याच सर्व करून टाकतो.” सुभाष. मीटिंग संपली.
दुसऱ्या दिवशी सकाळी सुभाषच्या मागावर असलेल्या माणसाने निशांतला फोन करून सर्व वृत्तान्त दिला. निशांतने लगेच सारंग सरांना फोन करून कळवलं. आणि तो वाड्यावर गेला.
वाड्यावर विनय आणि नयनाची कथा बरीच पुढे गेली होती. आता ते दोघं भविष्याचे प्लॅन्स करत होते. त्यांचं गुटूर्गू पाहून निशांतला वर्षांची आठवण झाली, आणि तो वर्षांच्या आठवणीत गुंगून गेला. त्याने ठरवलं की आज संध्याकाळी वर्षाला फोन करायचा.
मग वाड्यावर एक चक्कर टाकून नयना आणि विनयशी वाड्याच्या कामांच्या प्रगती बद्दल बोलून तो पासपोर्ट ऑफिस मधे गेला. तिथे त्याने त्यांच्या एजंटला शोधलं आणि त्याला बांग्लादेशचा व्हिसा आणि तिकीट काढायला सांगीतलं. एवढं झाल्यावर तो राव साहेबांना भेटायला त्यांच्या ऑफिस मधे गेला.
संध्याकाळी सारंग ऑफिस मधून निशांतच्या फ्लॅट वर आले. चहा पाणी झाल्यावर मीटिंग बसली.
सारंग सरांनी सुभाष येऊन सहा कॉपीज देऊन गेल्याचं सांगीतलं. एक सेट त्यांनी आणला होता, निशांतला द्यायला.
निशांतने पण सांगीतलं की त्याने व्हिसा आणि तिकीट साठी सांगीतलं आहे म्हणून.
“एक साधारण ५ -६ दिवसांत दोन्ही येऊन जातील, मग मी बांग्लादेशला जाईन आणि या शाळेत चौकशी करेन. मुळात मला डाऊट आहे की सुभाषच्या वडिलांचं नाव खरच अविनाश आहे का याचा? जर असेल, तर आपलं काम कठीण होणार आहे, कारण त्यांनी जो फोटो लावला आहे तो अविनाश काकांचाच आहे. पण ही नंतरची गोष्ट झाली. आधी जाऊन खात्री करून घेतो.” – निशांत.
“तू सध्या काही काम नसल्याने आठ दिवसांच्या सुट्टीवर घरी अमरावतीला गेला आहेस असं मी ऑफिस मधे गेल्यावर सांगतो. त्या साठी विश्राम, तुम्ही मला मी ऑफिस मधे गेल्यावर फोन करा. बबन पर्यन्त ही बातमी पोहोचायला हवी. आणि विनय, तू आणि नयना आज ऑफिस मधे आल्यावर बोलतांना मधेच निशांत सुट्टीवर गेला असल्याची गोष्ट करा. म्हणजे बबनला पक्की न्यूज मिळाली असं वाटेल.”- सारंग
“तू जर तिथे गेल्यावर अविनाशला पुन्हा भेटणार आहेस?” – विश्राम.
“ते तर मी करणारच आहे, पण ती सदिच्छा भेट असणार आहे. खरं खोटं करण्यासाठी आपण त्यांचं नाव उघड करू शकत नाही.” – निशांत.
“हे ही बरोबरच आहे. तू तुझ्या विचारानुसार काय करायचं ते कर. या बाबतीत तुला जास्त अनुभव आहे.” सारंग सरांनी चॅप्टर बंद केला. मीटिंग संपली.
बाहेर निशांत सारंग सरांना सोडायला आला होता, त्याने विनय आणि नयना चा सारंग सरांजवळ विषय काढला. सारंग सरांना प्रकरण किती पुढे गेलं आहे त्यांची कल्पना दिली,
“सर तुम्हाला काय वाटतं?” – निशांत.
“हूं माझ्याही लक्षात आलं आहे. अजून एक महिन्याने सर्व जमतील, तेंव्हा हा विषय काढू आपण. नयनाचा आणि तुझा पण.” आणि सारंग सर हसले आणि चालू पडले.
आठवड्याने निशांत दिल्लीच्या फ्लाइट मधे बसला. डाक्क्याला पोचला तेंव्हा संध्याकाळ झाली होती, म्हणून त्या दिवशी त्याने आरामच केला. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व आटोपून तो हॉल मधे आला. समोरच रीसेप्शन वर तो जुनाच माणूस दिसला. निशांत हसून त्याच्याशी बोलला.
“काय साहेब, झालं का पुस्तक लिहून?” – डेस्क ऑफिसर.
“अजून नाही, काही गोष्टी अपूर्ण राहिल्या आहेत, त्या बद्दल अजून काही माहिती मिळते का ते बघायला आलो आहे.” – निशांत म्हणाला
“ऑल द बेस्ट” – डेस्क ऑफिसर.
“इथून गोपालगंज किती दूर आहे?” – निशांत.
“तीन साडे तीन तास. जायचं आहे का?” – डेस्क ऑफिसर
“हो, टॅक्सी अरेंज करता येईल का?” – निशांत.
निशांत टॅक्सीने गोपालगंजला एक वाजता पोचला. तिथे त्याने टॅक्सी ड्रायव्हरला शाळेचा पत्ता शोधायला सांगितलं. १५ – २० मिनिटांत शाळेचा पत्ता मिळाला. पंधरा मिनिटांनी निशांत, प्रिन्सिपल समोर बसला होता.
“तुम्ही इथले दिसत नाही, कुठून आलात? आणि काय काम आहे?” – प्रिन्सिपल
“मी भारतातून आलो आहे. आणि इथे एका सर्टिफिकेट ची शहानिशा करण्यासाठी आलो आहे.” निशांत म्हणाला आणि त्याने सर्टिफिकेट ची कॉपी दाखवली.
“हे २० वर्षांपूर्वीचं सर्टिफिकेट आहे. याचं काय करायचं?” – प्रिन्सिपल.
“आमची लॉं फर्म आहे. आणि एका मालमत्तेची वारसदारांमद्धे वाटणी करायची आहे. मालमत्ता करोडो रुपयांची आहे. आम्हाला या माणसा बद्दलच डाऊट आहे, कारण प्राथमिक शाळेचं सर्टिफिकेट कोणीच पुरावा म्हणून देत नाही. नेहमीच मॅट्रिकचं सर्टिफिकेट देतो. म्हणूनच या सर्टिफिकेट बद्दल पण डाऊट आला आहे. म्हणून हे सर्टिफिकेट खरं आहे का हे बघण्यासाठी आलो आहे.” – निशांत म्हणाला आणि त्याने सारंग सरांच्या फर्म चं कार्ड दाखवलं.
“ठीक आहे. पण हे इतक्या वर्षांपूर्वीचं असल्याने जरा वेळ लागेल.” – प्रिन्सिपल म्हणाले. आणि त्यांनी एका क्लार्कला बोलावलं. त्याला सर्टिफिकेटची कॉपी दिली आणि रेकॉर्डस काढायला सांगीतलं. तासाभराने तो क्लार्क एक रजिस्टर घेऊन आला.
“सर, या सर्टिफिकेट वरच्या तारखे प्रमाणे रेकॉर्ड मिळालं. पण यांच्या कडे असलेल्या सर्टिफिकेट वर वडिलांचं नाव अविनाश असं आहे, आणि आपल्या रेकॉर्डस वर आश्विन आहे.” – क्लार्क.
“म्हणजे आम्हाला जो संशय आला होता, तो खरा ठरला. खरं म्हणजे आम्हाला सर्टिफिकेट वर संशय नव्हता, पण माणूस खोटा आहे असा संशय होता. तो आता खरा ठरला आहे.” – निशांत.
“मग आता काय म्हणण आहे तुमचं?” - प्रिन्सिपल.
“एक तर तुम्ही रेकॉर्डस प्रमाणे हे सर्टिफिकेट नवीन बनवून द्या, आणि जे सर्टिफिकेट आम्ही आणलं आहे त्यावरचे वडिलांचं नाव जे अविनाश आहे ते रेकॉर्डस प्रमाणे जुळत नाही, रेकॉर्डस प्रमाणे वडिलांचं नाव आश्विन आहे. असं लेटर द्या.” – निशांत.
“एवढं दिल्यावर, तुमचं काम होईल?” – प्रिन्सिपल.
“हो, म्हणजे मला वाटतं होईल.” – निशांत.
“तुम्ही म्हणाला की कोर्टा समोर हे डॉक्युमेंट ठेवायचे आहेत, मग जर कोर्टाने विचारलं की हे तरी खरे कशावरून? मग तुम्ही काय करणार?” – प्रिन्सिपल.
“अरे बापरे, मग काय करायचं?” – निशांत.
“मला असं म्हणायचं आहे की जो माणूस हा कागद तंतोतंत बनवू शकतो, त्याला आम्ही दिलेल्या लेटर सारखं दुसरं लेटर आणणं काही कठीण नाही. एवढंच.”- प्रिन्सिपल.
निशांत विचारात पडला. करोडो रुपयांच्या संपत्ती साठी माणूस कुठल्याही थराला जाण्याची शक्यता होती.
“मी एक सुचवू का?” – प्रिन्सिपल.
“जरूर.” – निशांत.
“आमच्या रेकॉर्डस व असलेल्या माहिती प्रमाणे लेटर द्यायला आमची काहीच हरकत नाहीये. ड्यूप्लिकेट सर्टिफिकेट पण आम्ही देऊ शकतो. तुम्ही असं करा, फक्त आम्ही दिलेलं सर्टिफिकेट कोर्टा समोर ठेवा. त्यावर दुसऱ्या पार्टीचं काय म्हणण आहे ते बघा, आणि अगदी लास्ट मिनिटला आमचं लेटर दाखवा. म्हणजे या माणसाला इतक्या ताबडतोब या लेटरची कॉपी करता येणार नाही.” – प्रिन्सिपल.
“हां हे ठीक आहे. साहेब, एक विचारू?” – निशांत.
“काय?” – प्रिन्सिपल.
“माझी खात्री आहे, की एवढ्यांवर आमचं काम होऊन जाईल ९९ टक्के वेळ येणार नाही पण एक टक्का जर कोर्टाने तुम्हाला पत्र पाठवून विचारलं तर उत्तर द्याल?” – निशांत.
“आत्ता तुम्हाला मी देतो आहे ते नॉर्मल आहे. कोणी ड्यूप्लिकेट मागीतलं तर आम्ही देतो. पण दुसऱ्या केस मधे, संस्थेची इंटरनॅशनल भानगडीत पडण्याची इच्छा नसेल, तर मी काही करू शकणार नाही.” – प्रिन्सिपल.
“माझ्या मते हे पुरेसं होईल, तुमची साक्ष काढण्याची वेळ येणारच नाही, अशी आम्ही काळजी घेऊ. धन्यवाद.” – निशांत तेथून निघाला, त्याला सुभाष चे वडील ज्या जुट मिल मधे काम करत होता, तिथे जायचं होतं पण सुभाष त्या वेळेस खूप लहान असल्याने त्याला नाव माहीत नव्हतं. त्यामुळे निशांत डाक्क्याच्या वाटेला लागला.
निशांत वापस डाक्क्याला पोचला तेंव्हा संध्याकाळ उलटून गेली होती. मग फ्रेश होऊन कॉफी पिता पिता तो अविनाशकाकांचा विचार करत होता. मागच्या वेळेस त्यांनी निक्षून सांगीतलं होतं की पुन्हा संपर्क करू नकोस म्हणून. त्यावेळेस पुन्हा बांग्लादेशला येण्याचा काहीच चान्स नव्हता. म्हणून निशांतने पण कबूल केलं होतं. पण आता तो एवी तेवी इथे डाक्क्याला आलाच आहे तर भेट नाही, पण फोन करायला काय हरकत आहे, असा विचार करून तो खाली रीसेप्शन डेस्क वर गेला.
“मला एकतरपूरला फोन लावायचा आहे. सोय आहे का?” – निशांत.
“हो आहे, तुम्ही मला नंबर द्या, तुम्ही तुमच्या रूम मधे जा, मी कॉल ट्रान्सफर करतो.” – ऑफिसर
निशांत विचार करत होता की हा परका देश, हॉटेलचे फोन ट्रेस होत असतील की नाही, आपल्याला माहीत नाही. ही रिस्क घ्यायची का? आपल्या चुकी मुळे काका संकटात सापडले तर काय करायचं? नकोच ते. त्याच्या मनाने कौल दिला की रिस्क नाही घ्यायची. मग त्याने मनी पर्स काढली आणि शोधल्या सारखं केलं, आणि मग म्हणाला की नंबर सापडत नाहीये. तेंव्हा राहू द्या. त्याला अविनाश काकांना न भेटता जावं लागणार, याचं खूप वाईट वाटत होतं. पण इलाज नव्हता.
दुसऱ्याच दिवशी त्याने कलकत्ता फ्लाइट पकडली.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com