तोतया वारसदार
पात्र रचना
बबन - सारंग सरांचा चपराशी
सुभाष -बबनचा मित्र. कटातला भागीदार.
निशांत - शोधकर्ता
नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर
विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी.
साताऱ्याला स्थायिक.
विनय - अनिलचा मुलगा सातारा.
भाग ६७
भाग ६६ वरुन पुढे वाचा .......
निशांत विचार करत होता की हा परका देश, हॉटेलचे फोन ट्रेस होत असतील तर? आपल्याला माहीत नाही. ही रिस्क घ्यायची का? आपल्या चुकी मुळे काका संकटात सापडले तर काय करायचं? नकोच ते. त्याच्या मनाने कौल दिला की रिस्क नाही घ्यायची. मग त्याने मनी पर्स काढली आणि शोधल्या सारखं केलं, आणि मग म्हणाला की नंबर सापडत नाहीये. तेंव्हा राहू द्या. त्याला अविनाश काकांना न भेटता जावं लागणार, याचं खूप वाईट वाटत होतं. पण इलाज नव्हता.
दुसऱ्याच दिवशी त्याने कलकत्ता फ्लाइट पकडली.
कलकत्याला निशांत पोचला तेंव्हा दुपार टळून गेली होती. त्यामुळे, त्याने हॉटेल वर जाऊन आरामच करायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी तो कलकत्याच्या हिंद मोटर उपनगरात असलेल्या कंपनीत गेला. तिथे त्याला रजिस्टर मधे आश्विन चा फोटो मिळाला. आश्विन गोखले यांच्या बरोबर काम करत असलेले एक दोन जण पण भेटले. त्यांनी सांगीतलं की अपघात झाला तेंव्हा आश्विन त्यांच्या शेजारीच कंपनी च्या क्वार्टर मधे रहात होता. मग निशांत त्यांच्या बरोबर त्यांच्या घरी गेला. तिथे एक ग्रुप फोटो पण मिळाला, ज्यात आश्विन, त्याची बायको आणि खाली बसलेला सुभाष पण होता. निशांतचं काम झालं होतं. दुसऱ्याच दिवशी निशांतने नागपूरची फ्लाइट घेतली.
नागपूरला निशांत संध्याकाळी पोचला पण घरी कोणीच नव्हतं. बहुतेक विश्रामकाका सुद्धा वाड्यावर गेले असावेत असा विचार त्याने केला,
थोडं उशीराच पण सगळेच म्हणजे सारंग, विश्राम विनय आणि नयना आले. निशांतला पाहून सर्वच खुश झाले. उत्सुकता सर्वांनाच होती. सगळे फ्रेश झाल्यावर, नयनाने चहा आणि नाश्ता बनवला, मग बैठक भरली.
“हं बोल, कसा झाला तुझा टुर?” सारंग सर म्हणाले.
“मला जी शंका होती तीच खरी ठरली. सुभाषच्या वडिलांच नाव आश्विन आहे. त्याने कुठून तरी खोटं सर्टिफिकेट बनवलं आहे.” – निशांत.
“अरे, ही फोर्जरी आहे. बघच आता त्याला मी कसं उलटा टांगतो ते.” सारंग सर सॉलिड चिडले होते. मग निशांतने बांग्लादेशच्या शाळेने दिलेले कागदपत्र समोर ठेवले. सर्वांनी ते पाहीले, एक तिरस्काराची रेषा सर्वांच्या चेहऱ्यावर उमटून गेली.
“मग मी हिंदमोटर मधल्या कंपनीत गेलो तिथे मला हा अश्विनचा फोटो मिळाला.” निशांतने फोटो दाखवला.
“हा तर एकदम वेगळाच माणूस आहे. सुभाषच्या चेहऱ्याशी त्याचं भरपूर साम्य आहे. सुभाषचं धारिष्ट मात्र वाखाणण्या सारखं आहे. तो आणि अविनाश मधे बिलकुल साम्य नाहीये.” – विश्राम.
“बरोबर आहे. अजून एक पुरावा मिळाला आहे.” निशांतने आश्विन, त्यांची बायको आणि सुभाष असलेला ग्रुप फोटो समोर ठेवला. या फोटोत बाकीचे जे लोकं आहेत, ते त्यावेळेसचे अश्विनचे शेजारी आहेत.
“पक्का बेरकी माणूस आहे हा सुभाष.” विनय प्रथमच बोलला.
“अगदी बरोबर. सारंग सर, याला जबरी शिक्षा व्हायला पाहिजे.” – नयना
“हो हो, सारंग सर खरंच जबरी शिक्षा करा त्याला, आयुष्य भर लक्षात राहील अशी.” विश्राम म्हणाला आणि सर्वांनी माना डोलावल्या.
“ निशांत, मग आता पुढचा कार्यक्रम काय?” – सारंग.
“आता चंद्रपूरची शाळा. आणि बोर्ड. दोन्ही सर्टिफिकेट सुभाषने खोटी दिली आहेत. त्यांची शहानिशा करावीच लागेल. आपल्याला चारी बाजूने बंधन करत आणावं लागणार आहे. त्याला निसटण्यासाठी एवढीशी फट सुद्धा राहता कामा नये. अगदी फूल प्रूफ.” – निशांत.
“बरं विनय, नयना, वाडा केंव्हा तयार होतो आहे?” – सारंग.
“साधारण २० एक दिवस लागतील. काम जवळ जवळ पूर्ण होतच आलं आहे.” – नयना.
“म्हणजे आता सर्वांना कळवायला लागेल. तयारी आणि तिकीट बूकिंग साठी वेळ लागतो. रोहन सारखे असतील तर व्हिसा लागेल.” – सारंग.
रोहन लंडन ला परत गेल्यामुळे मला जरा चुकल्या चुकल्या सारखं होतं आहे.” निशांत.
“खरं आहे, निशांत, मला सुद्धा तसंच वाटतंय. सारंग सर तुम्ही जेंव्हा लंडनला फोन कराल तेंव्हा रोहनला सांगा आम्हाला त्यांची खूप आठवण येते म्हणून.” – विश्राम
“हो जरूर सांगेन.” सारंग सर म्हणाले. मीटिंग संपली आणि सारंग सर निघाले.
दूसरा दिवस रविवार होता, त्यामुळे सर्वांनीच तो दिवस वाड्यावर घालवला.
“संध्याकाळी सारंग सर आल्यावर वाड्याच्या कामाचा आढावा घेण्याव्यतिरिक्त काहीच काम नव्हतं.
“सारंग सर, मला असं वाटतं की माझं इथलं काम आता संपलं आहे. तसंही सगळे जमल्यावरच सुभाषला बोलावणार असाल न? मग मी आता आज साताऱ्याला जायचं ठरवतो. काय म्हणता?” – विश्राम.
“ठीकच आहे. तुमचा तिथे व्यवसाय आहे, जास्त दिवस बाहेर राहून चालणार नाही. आणि मुख्य म्हणजे, मी ज्या कारणा साठी तुम्हाला बोलावलं होतं त्याचा निकाल लागला आहे. निशांतने अत्यंत हुशारीने प्रकरणाचा निपटारा केला आहे.”
“ठीक आहे मग मी आज संध्याकाळच्या फ्लाइटने मुंबईला जातो, तिथून सातारा बाय रोड.” – विश्राम.
दुसऱ्या दिवशी निशांत बोर्डात गेला. तिथे त्याचा एक मित्र होता, त्याला भेटला.
“काय रे निशांत, अचानक मला भेटायला आलास, आणि ते ही ऑफिस मधे?” – मित्र
“अरे बोर्डातच काम आहे, आमच्या सारख्या बाहेरच्या लोकांना, नेमकं कोणाला भेटायचं हे कळे पर्यन्त दिवस निघून जातो. भूल भुलभूलय्या आहे तुमचं ऑफिस म्हणजे. म्हणून तुला भेटलो.” – निशांत.
“चल टपरी वर जाऊन चहा पिऊ. तिथे मला सांग कशा साठी आला आहेस ते?- मित्र.
मग निशांत ने त्याला सुभाषने दिलेलं सर्टिफिकेट दिलं. पाहिल्यावर तो म्हणाला,
“ठीकच तर आहे. प्रॉब्लेम काय आहे?”- मित्र.
“आमच्या माहिती प्रमाणे हे सर्टिफिकेट ज्याचं आहे, त्यांच्या वडिलांचं नाव आश्विन आहे. सर्टिफिकेट मधे अविनाश लिहिलं आहे. याचीच शहानिशा करायची आहे.”– निशांत
“तुम्ही एवढी चौकशी का करता आहात? तुमचा काय संबंध?” – मित्र.
“तुला सारंग वकील माहीत आहेत, विनायकराव गोखले नावाचे त्यांचे क्लायंट होते, इस्टेट त्यांच्या वारसदारांमधे वाटायची आहे. विनायकरावांचा एक मुलगा, अविनाश ७१ च्या युद्धात बेपत्ता झाला. हा सुभाष गोखले त्यांचा मुलगा आहे अशी बतावणी करतो आहे. याच्या वडिलांचं नाव, आमच्या माहिती प्रमाणे, आश्विन आहे. आता तू हे सर्टिफिकेट तपासून खरं काय आहे ते सांगीतलं, म्हणजे आम्हाला काय अॅक्शन घ्यायची ते कळेल.
“ओके. मला उद्याचा दिवस दे. मी सगळी माहिती काढून ठेवतो. तू परवा ये.” – मित्र.
संध्याकाळी, सारंग सर आले, त्यांना निशांतने बोर्डात काय झालं यांचा वृत्तान्त दिला.
तिसऱ्या दिवशी, निशांतच्या मित्राने त्याला सांगीतलं की चंद्रपूरच्या शाळेने दुरुस्ती बद्दल पत्र दिलं आहे, आणि त्या प्रमाणे आश्विन हे नाव बदलून अविनाश केलं आहे. त्याने त्या पात्रांची झेरॉक्स पण काढून आणली होती, ती निशांतला दिली. सारंग सरांना त्या दिवशी संध्याकाळी निशांतने अपडेट दिल. आणि सांगीतलं की उद्या तो चंद्रपूरला जाऊन या पत्राची चौकशी करणार आहे, म्हणून.
चंद्रपूरला निशांत प्रिन्सिपलच्या समोर बसला होता. स्वत:बद्दल सगळी संबंधित माहिती दिल्यावर निशांतने पात्रांची कॉपी सरांना दिली. त्यांनी बडेबाबूंना बोलावलं,
“बडे बाबू, आपण हे पत्र बोर्डाला पाठवल्याचं मला काही आठवत नाहीये, केंव्हा पाठवलं आपण? जरा बघा बरं.” – प्रिन्सिपल.
बडे बाबूंनी ते पत्र वाचलं आणि म्हणाले, “नाही सर, आपण हे पत्र पाठवलं नाही. हा काही तर घोळ दिसतो आहे. मी जरा रजिस्टर चेक करून सांगतो.”
थोड्या वेळाने बडे बाबू आले. म्हणाले, “सर रजिस्टर मधे कसलीच नोंद नाहीये. आपण जे सर्टिफिकेट १२-१२ वर्षा पूर्वी दिलं होतं त्यावर आश्विन हेच नाव आहे.” – बडे बाबू.
मग निशांतने त्यांना खरी परिस्थिती काय आहे हे सविस्तर सांगीतलं. आणि तुमच्या रेकॉर्डस प्रमाणे या सुभाष गोखल्यांच्या वडीलांतचं नाव आश्विन आहे असं पत्र देऊ शकता का? असं विचारलं.
“नाही, त्यांनी शाळेकडून नाव बदलून घेतल्याची कसलीच नोंद नाहीये, त्यामुळे असं पत्र नाही देता येणार. पण एक करू शकतो, ओरिजिनल सर्टिफिकेटची डूप्लिकेट कॉपी, तुमचं काम होणार असेल, तर आजच्या तारखेत देऊ शकतो.” – प्रिन्सिपल.
“चालेल. माझ्या मते त्याला उघडं पाडण्यासाठी हे नक्कीच पुरेसं आहे. द्या तुम्ही. आणि खूप खूप आभार सर तुमचे.” – निशांत.
संध्याकाळी निशांतने सारंग सरांना शाळेचं पत्र दिलं. आता सारंग सर जरा रीलॅक्स झाले. सर्व तिढा सुटला होता. आता फक्त सुभाषला गजा आड करायचं बाकी होतं. पण ते सारंग सरांचं काम होतं. ते म्हणाले,
“निशांत, तुझी आयडिया काम करते आहे. आपण इथे मीटिंग करत असल्याने, बबनला काही अपडेटस मिळत नाहीयेत. त्यामुळे जेंव्हा सुभाष फायनल भेटी साठी येईल, तेंव्हा आपल्याला ही जी माहिती मिळत आहे, त्या बद्दल तो पूर्णपणे अनभिज्ञ असणार आहे. चांगलाच फसणार आहे. बघतोच त्याला आता.” – सारंग.
“आता सर्व लक्ष वाड्यावर केंद्रित करावं लागणार आहे. विनय, नयना, आता तुमची कसोटी आहे. निशांतने आपलं काम चोख केलं आहे. सर्व गोखल्यांना पत्र गेली आहेत.”
“सर, जवळ कवळ सगळं काम पूर्ण होत आलं आहे. सर्व खोल्या मधे सगळ्या सोई करून झाल्या आहेत. एकदा तुम्ही वाडा नजरे खालून घातला, तर अजून काही तुमच्या मनात असेल, तर ते पण करता येईल. हॉटेल मॅनेजमेंट शी बोलणं चालू आहे. १५ दिवस आपलं घर पूर्णं पणे त्यांच्या ताब्यात देणार आहोत. १५ दिवस ५ स्टार सर्विस देण्यासाठी कॉंट्रॅक्ट साठी बोलणी चालू आहेत. कोणालाही कसलीही तोशीस पडणार नाही. फूल टू एंजॉयमेंट. एक स्विमिंग पूल सोडला, तर सगळी व्यवस्था झालीय.” – नयना.
“वंडरफूल नयना, उद्या मला कोर्टात काही काम नाहीये, मी उद्याच येतो, तिथेच आपण एक एक गोष्ट बघून चर्चा करू. चालेल ना?” – सारंग.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com