तोतया वारसदार
पात्र रचना
बबन - सारंग सरांचा चपराशी
सुभाष -बबनचा मित्र. कटातला भागीदार.
निशांत - शोधकर्ता
नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर
विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी.
साताऱ्याला स्थायिक.
विनय - अनिलचा मुलगा सातारा.
श्रीरंग -महादेवराव - सखारामपंत – रंगनाथ – कावेरी –
श्रीरंग
शंकरन - श्रीरंगचा दुसऱ्या बायको पासून झालेला मुलगा.
भाग ६८
भाग ६७ वरुन पुढे वाचा .......
“जवळ कवळ सगळं काम पूर्ण होत आलं आहे. सर्व खोल्या मधे सगळ्या सोई करून झाल्या आहेत. एकदा तुम्ही वाडा नजरे खालून घातला, तर अजून काही तुमच्या मनात असेल, तर ते पण करता येईल. हॉटेल मॅनेजमेंट शी बोलणं चालू आहे. १५ दिवस आपलं घर पूर्णं पणे त्यांच्या ताब्यात देणार आहोत. १५ दिवस ५ स्टार सर्विस देण्यासाठी कॉंट्रॅक्ट साठी बोलणी चालू आहेत. कोणालाही कसलीही तोशीस पडणार नाही. फूल टू एंजॉयमेंट. एक स्विमिंग पूल सोडला, तर सगळी व्यवस्था झालीय.” – नयना.
“वंडरफूल नयना, उड्या मला कोर्टात काही काम नाहीये, मी उद्याच येतो, तिथेच आपण एक एके गोष्ट बघून चर्चा करू. चालेल ना?” – सारंग.
“सर, एक गोष्ट सांगायची राहिली, विश्राम सरांना ते इथे असतांना मी विचारलं होतं की त्यांच्या वंशामद्धे कोणी राहिलं आहे का?” -निशांत.
“मग कोणी आहे का?” – सारंग.
“हो, विश्वनाथ रावांना दोन मुलं होती, पैकी गंगाधर रावांचा वंश म्हणजे विश्रामकाका आणि अनिलकाका पण दूसरा मुलगा विश्वंभर, विश्राम काकांजवळ यांच्या बद्दल नावा खेरीज कुठलीच माहिती नाहीये. मग आता काय करायचं? म्हणजे शोध करण्यासाठी आपल्या हातात काहीच नाहीये.” – निशांत.
“हूं, पेच आहे खरं. आपण जाहिरात दिलीच आहे, बघूया काही उत्तर येते का ते.”- सारंग
“अजून एक सांगायचं राहिलं. ते म्हणजे मी सुभाषच्या मागे राव साहेबांची माणसं लावली आहेत. त्याची पूर्ण कुंडली आपल्याला मिळाली पाहिजे. त्याच्या कडे बघितल्यावर, तो सराईत बदमाश असेल असं मुळीच वाटत नाही. पण तरी सुद्धा तो एवढा मोठा गुन्हा करायला तयार झाला, याच्या मागचं कारण आपल्याला शोधणं जरुरीचं आहे. म्हणून ही व्यवस्था केली आहे.” – निशांत.
“एकदम बरोबर. जे जे तुझ्या दृष्टीने आवश्यक आहे, ते ते सर्व कर, माझी परवानगी आहे.” – सारंग म्हणाला, आणि निघाला.
वाड्याच्या रिनोव्हेशन चं काम जोरात सुरू होतं. १५ दिवसांत काम पूर्ण व्हायलाच हवं होतं. काम त्याच प्रमाणे चालू होतं. सर्वांना कळवून झालं होतं. आणि सगळ्यांनी तयारी पण सुरू केली होती. रोजच्या रोज सारंग सर अपडेट घेत होते. असेच ८-१० दिवस झाले, अजून काही दिवस लागणार होते, पण सगळ्यांचं आगमन व्हायला अजून १५ दिवस होते. सर्वांच्या तारखा ठरल्या होत्या. अशातच एक दिवस, दुपारी, एक चाळीस – पंचेचाळीस वयाचा गृहस्थ पत्ता विचारत विचारत वाड्यावर आला.
“ये गोखले साब का घर हैं क्या?” त्या माणसाने हॉल मधे काम करत असलेल्या माणसाला विचारलं. तो म्हणाला एक मिनिट रुको.” आणि त्याने नयनाला बोलावून आणलं.
“कोण पाहिजे आपल्याला?” नयनाने मराठीत विचारलं.
“ये गोखले साब का घर हैं क्या?” – गृहस्थ.
“जी हाँ, लेकिन आप कौन हैं? और क्या काम हैं?” – नयना म्हणाली आणि तिने विनयला बोलवा म्हणून एका कामगाराला सांगीतलं.
विनय आणि निशांत एका कामा बद्दल बोलत होते, ते दोघेही खाली आले.
“बोलीये” – निशांत म्हणाला.
“मी, विनायक गोखल्यांना भेटायला आलो आहे. आहेत का ते?” – गृहस्थ.
“नाही, ते नाहीयेत, पण आपण कोण? आणि काय काम आहे?” – निशांत.
मी, शंकरन गोखले. विनायकरावांची भेट झाली असती तर आनंद झाला असता.”
“गोखले आणि शंकरन हे गणित काही समजलं नाही. तुम्ही विनायकरावांना कसे ओळखता?” – निशांत.
“मी विनायक रावांना ओळखत नाही. माझे वडील आणि विनायकराव हे चुलत भाऊ. माझे वडील आता हयात नाहीत.” शंकरन म्हणाले. “त्यांची इच्छा होती की मी एकदा नागपूरला जाऊन विनायकरावांना भेटावं. पण हे सांगा न की विनायकराव कुठे गेले आहेत? तुम्ही कोण त्यांचे?” – शंकरन
आता विनय समोर आला. “मी विनय गोखले. विनायकरावांचा पुतण्या. विनायकरावांचं चार महिन्यांपूर्वी निधन झालं. तुम्ही आमच्याशी बोलू शकता.”
शंकरन गप्प बसला, बहुधा या लोकांशी काय बोलावं यांचा विचार करत होता. शेवटी म्हणाला,
“माझ्या वडिलांची शेवटची इच्छा होती, नागपूरला यायची. विनायकरावांची भेट घ्यायची खूप इच्छा होती त्यांची.” – शंकरन.
“तुम्ही म्हणाला की, तुमचे वडील आणि विनायकराव चुलत भाऊ होते म्हणून. तर तुमच्या वडिलांचं नाव काय? आणि त्यांचं नेमकं नातं कसं आहे ही ही जरा सांगाल का?”- निशांत.
“हो सांगतो न. माझे वडील श्रीरंग गोखले. आम्ही केनया मधे होतो. त्यांचं निधन झाल्यावर माझ्या आईच्या वडिलांनी आम्हाला भारतात बोलावून घेतलं.” – शंकरन
एवढी ओळख सांगितल्यावर निशांतने त्यांना बसायला सांगितल. एका कामगाराला बोलाऊन पाणी आणि चहा आणायला सांगीतला.
“तुम्ही सध्या कुठे असता? आणि काय करता?” निशांत.
“आमचं गाव कोझीकोड म्हणजे आधीचं कालिकत. तिथे आमची बरीच मोठी नारळाची बाग आहे. आणि आमचा मासाल्याच्या विविध गोष्टींचा मोठा व्यापार आहे. पण आता विनायकराव जर हयात नाहीत, तर त्यांची मुलं कुठे आहेत?” – शंकरन
“तुम्ही आमची जाहिरात वाचून इथे आला आहात का?” – निशांतने विचारले. त्याला कुठे तरी मनाच्या कोपऱ्यात सुभाषची आठवण येत होती, की न जाणो हा ही तसलाच असेल तर?
“कसली अॅड? त्याचा माझ्या इथे येण्याशी काय संबंध? भलते प्रश्न विचारू नका. विनायकरावांच्या मुलाला बोलवा, मी त्यांच्याशीच बोलेन.” – शंकरन जरा त्रासिक स्वरात बोलला. तेवढ्यात चहा घेऊन मुलगा आला.
“घ्या चहा घ्या. गैरसमज नको. मी सांगतो आम्ही असे प्रश्न का विचारतो आहोत त्याचं कारण आहे.” – निशांत.
“नको, मला चहा नको. मी जातो. तुमची इच्छा दिसत नाही माझ्याशी सरळ बोलण्याची. मी इथून गेलेलंच बरं. विनायकरावांच्या मुलाला सांगा, की मी, श्रीरंग गोखल्यांचा मुलगा, माझ्या सावत्र बहीणींची चौकशी करण्याकरता आलो होतो. आणि हा निरोप माझ्या तिन्ही बहीणींकडे पोचवा. हे माझं कार्ड. त्यांना वाटलं तर त्या मला कॉनटॅक्ट करू शकतात.” – शंकरन
“एक शेवटचा प्रश्न, लास्ट, त्यानंतर तुम्ही कॅप्टन. विचारू?” – निशांत.
“नॉनसेन्स, काय चाललंय काय इथे? सॉरी मी उत्तर देणार नाही. बाय.” – शंकरन
“तुमच्या बहीणींची नावं काय?” – निशांत.
“सीता सरिता आणि जान्हवी. हॅप्पी नाऊ? गुड बाय”- शंकरन म्हणाला आणि उठलेच जाण्यासाठी. पण आता निशांत आडवा आला. हात जोडून म्हणाला,
“रागवू नका. आता आमची खात्री पटली आहे की तुम्ही गोखलेच आहात म्हणून. प्लीज बसा. काय भानगड झाली आहे ते नीट सांगतो. प्लीज बसा.” – निशांत.
“व्हॉट डू यू मीन? गोखले आहे म्हणजे काय? मी गोखलेच आहे. आणि त्याकरता तुमच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाहीये.” शंकरन आता चिडला होता.
“तुमचे सर्व गैरसमज मी दूर करतो. तुम्ही जरा शांतपणे ऐका.” – निशांत.
“बोला” – शंकरन
मग निशांतने पूर्ण कथा अथ पासून इति पर्यन्त सांगितली. तो जेंव्हा थांबला, तेंव्हा शंकरन खूपच गोंधळात पडला होता. काय बोलावं तेच त्याला सुचत नव्हतं.
“म्हणून गोखले साहेब, तुम्ही जाहिरात वाचून आला असाल, तर तुमची चौकशी करणं आम्हाला भाग होतं.” – निशांत.
शंकरन अजूनही गोंधळलेलाच होता, त्याला बरेच प्रश्न पडले होते. मग निशांतने त्यांच्या सर्व शंकांच समाधान कारक उत्तर दिलं. मग तो जरा शांत झाला.
“गोखले साहेब, आता आम्ही तर सर्व सांगीतलं, आता तुम्ही तुमच्या बद्दल जरा डीटेल मधे सांगाल का?” – विनय.
“माझे वडील श्रीरंग गोखले, ब्रिटिशांकडून आफ्रिके मधे लढत होते. एका लढाईत ते जबर जखमी झाले. नैरोबीच्या हॉस्पिटल मधे त्यांच्यावर उपचार चालू होते. त्यांचा एक पाय जायबंदी झाल्यामुळे ते हलके हलके चालू फिरू तर शकत होते, पण सैन्यातल्या मानकांप्रमाणे ते लढू शकत नव्हते. म्हणून त्यांना डिस्चार्ज मिळाला. बाबांना जेंव्हा जखमी अवस्थेत हॉस्पिटल मधे आणलं तेंव्हा त्यांच्या जवळ काहीच नव्हतं. केवळ त्यांच्या हातातल्या ब्रेसलेट वरच्या नंबर मुळे त्यांची ओळख पटली. त्यांच्या शरीरात ११ गोळ्या घुसल्या होत्या. जवळ जवळ ४ महीने ते बेशुद्ध होते. त्या वेळी इजिप्त मधे लढाई चालू होती म्हणून त्यांना केनया मधे शिफ्ट केलं. फील्ड मार्शल रोमेलचा पराभव झाल्यावर, आफ्रिकेतलं युद्ध जवळ जवळ संपलं होतं. केनया मधे आल्यावर त्यांची प्रकृती सुधारू लागली. हा सर्व वेळ त्यांच्या मदती साठी आई त्यांच्या बरोबर होती. तिथेच त्याचं सूत जमलं.” शंकरन थोडा थांबला. नयनानी तत्परतेने त्याला पाणी दिलं.
“त्यांना डिस्चार्ज मिळाला होता, तर ते हिंदुस्थानात परत का नाही आले?” - विनय.
“त्यांना काही आठवतच नव्हतं. ब्रेसलेट वरुन त्यांचं नाव तरी कळलं. नावावरून ते भारतीय आहेत, हे पण कळलं. त्यावेळेस आत्ताच्या सारखे फोन इतके सहज उपलब्ध नव्हत. पत्रो पत्री चालली होती पण तो पर्यन्त तरी काही कळलं नव्हतं. त्यांचा स्वभाव आणि ते मराठी आहेत, यावरच आईने समाधान मानलं. माझ्या आजोबांची केनया मधे इस्टेट होती, तिथेच आई, बाबांना घेऊन गेली. माझी आई क्वालीफाईड नर्स होती. जरूर नव्हती पण तिला आवड होती. वॉर सुरू झाल्यावर ती आर्मी मधे टेंपररी जॉइन झाली होती. तिने राजीनामा दिला आणि दोघेही आजोबांच्या घरी गेले. बाबांना काहीच आठवत नव्हतं म्हणून त्यांनी आईशी लग्न करायला होकार दिला. मग माझा जन्म झाला. बाबांची तब्येत चांगली सुधारली होती आणि ते आता आजोबांना कामात मदत करत होते. असेच आनंदात दिवस जात होते.” शंकरन थांबला, “अजून एक चहा बोलावता येईल का? घशाला कोरड पडलीय.”
विनयनी लगेच एका माणसाला बोलावून चहा आणि समोसा आणायला सांगितला.
“पण तुमच्या वडीलांची स्मृति परत आली नव्हती तर, तुम्हाला इथला पत्ता आणि तुमच्या बहिणींची नावं कशी कळली?” विनयनी उत्सुकतेने विचारलं.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com