स्वप्नद्वार ...भाग 12
भाग 11 पुढे
" ती अमानवी शक्ती आहे तरी कोण ? " निशांतने परत तोच प्रश्न विचारला . त्याचा तो प्रश्न ऐकुन राजा वीरवर्धनच्या मनाचा उहापोह झाला . चेहऱ्यावर असलेल तेज क्षणातच कुठेतरी विरून गेल . निराशेचे ढग त्याच्या चेहऱ्यावर जमले होते. मनमंदिरात धुमसत असलेल्या भावना शेवटी अश्रुरूपी बाहेर आल्या . मृदू स्वरात राजा वीरवर्धन म्हणाला
" ती अमानवी शक्ती आहे वर्धन घराण्यातील प्रचंड पराक्रम गाजवणारा...मायाजाल युद्धनीतीचा निर्माता ..माझा धाकटा बंधू म्हणजेच शक्तिवर्धन ".वीरवर्धनच्या आवाजाच्या लहरी खोलीत घुमू लागल्या होत्या .
" काय ....पण हे कसं शक्य आहे ? " निशांत आश्चर्याने म्हणाला .त्याच्या कपाळावर आठ्यांचं जाळ पसरलं आणी मनात प्रश्नचक्र वेगाने फिरू लागलं होत .
" मी वाचलेल्या पुस्तकात शक्तिवर्धनबद्दल कुठेही दीर्घ असा उल्लेख नव्हता .हलकाच एक दोन जागी शक्तिवर्धनचा उल्लेख आढळतो " निशांत म्हणाला .
" इतिहास जेवढं तुम्हाला वाचायला देत तेवढीच माहिती तुम्हाला ज्ञात होते .कधी इतिहास कुणाचं अस्तित्व उंच हिमायला एवढं रेखाटत तर कुणाचं अस्तित्व अगदी निरागस लेकराच्या लहान मुठीएवढं रेखाटत. माझे पिताश्री महाराजाधिराज अजिंक्यवर्धन ,माझी माता उपाली, मी आणी माझा धाकटा बंधू शक्तिवर्धन असे आमचं संपन्न कुटुंब होत . काळाची ओली सुकी पाने जलद गतीने गळून गेली .माझे पिताश्री आता वयोवृद होऊ लागले होते. या राज्याचा राज्यकारभार उत्तमपणे कोण चालवेल तसेच वर्धन घराण्यातील पुढचा शासक कोण असेल हा एकच प्रश्न सर्वांच्या ओठावर रेंगाळू लागला होता .वयाने जरी मी जेष्ठ असलो तरीही शक्तिवर्धन पराक्रमात , गुणसंपनन्यात माझ्यापेक्षा तसूभरही कमी नव्हता. वर्धन घराण्यात आता गुप्त असे दोन पक्ष निर्माण झाले होते. वरवर कुणाला काहीही कळत नाही असे दिसत असले तरीही सत्तेसाठी किंवा एक प्रकारे सिंहासनासाठी ते षडयंत्रच होत. शेवटी माझे पिताश्री अजिंक्यवर्धन यांनी वर्धन घराण्यातील पुढचा राजा म्हणून माझं नाव घोषित केल. सिंहासनासाठी सुरु असलेल्या आंतर कलहला जबरदस्त असा लगाम बसला . अतिमहत्वकांक्षा ज्यापुढे कुणाचीही हयगय केली जाणार हा एकच दुर्गुण शक्तिवर्धनकडे होता. ज्यामुळे त्याला डावलून मला वर्धन घराण्याचा राजा बनविल असावं असं मला वाटत . एकदा जर देहाच्या आणी मनाच्या रथाला तृष्णेचे अश्व जुंपले कि मनाचा रथ अंधकारात सैरभैर धावू लागतो .शक्तिवर्धन बरोबरही तेच झालं. सिंहासनाच्या तृष्णेमुळे तो सदैव माझ्याविषयी मनात द्वेष , ईर्ष्या निर्माण करीत गेला .ईर्ष्या ही एका वणव्यासारखी असते त्याला जर अपमानाचा आणी तुच्छतेचा वारा लागत गेला कि वनवाग्नी अधिकच विराट होऊ लागते .शक्तिवर्धनही याला अपवाद ठरला नाही .
काळाच्या वृक्ष अधीकच फोफावू लागला होता. आता मी सांसारिक सुखात रमू लागलो होतो. जीवन अगदी नव्याने फुलत होत. वाऱ्यासारखं , टवटवीत उमलेल्या पुष्पासारखं , चांदण्यासारखं , पहाटे उगवणारा सूर्य , माथ्यावर चढणारा सूर्य आणी अस्ताला जाणारा सूर्य , काळे मेघ पाहून नाचणारे मयूर तर नाचणारे मयूर पाहून गाणारे ढग . जीवनाचा सर्वात रम्य सुखमय असा तो काळ होता. माझ्या आयुष्यात माझ्या दोन भूजा आणखी निर्माण झाल्या ते म्हणजे माझे पुत्र प्रतापवर्धन आणी अमोघवर्धन. शक्तिवर्धनने अविवाहित राहण्याच्या निर्णय घेतला होता याच नक्की कारण काय असावं हे अजूनदेखील मला उमगलं नाही. याच काळात विलक्षण अशी घटना घडली ....जर त्या घटनेचा उलगडा तेव्हाच झाला असता तर भविष्यातला बरंच अनर्थ टळला असता.
माझ्या राज्यात दक्षिणेकडील प्रख्यात लेखक प्रसेनजीत आले होते .जे त्यांच्या लिहणासाठी ओळखले जात असे. वर्धन घराण्याच्या कुळवंशांचा तसेच वर्धन राज्याची
राज्यव्यवस्था ,समाजव्यवस्था ,न्यायव्यवस्था , सैन्यव्यवस्था यांचा तौलनात्मक अभ्यास करून वर्धन राज्यांचा इतिहास लिहण्याचा त्यांनी निर्णय घेतला . बरेच वर्ष त्यांनी राज्यात वेळ घालविला आणी " वर्धन घराणे " हा ऐतहासिक ग्रंथ लिहायला सुरवात केली पण काही काळातच ते राज्यातून कुठे निघून गेले कुणास ठावून. मी त्यांना बराच शोधण्याचा प्रयत्न केला. माझे गुप्तचरही सर्व दिशांना त्यांना ढुंढाळत होते पण त्यांचा ठावठिकाणा कुणालाही कळला नाही . नंतर याच गोष्टींचा भयानक असा उलगडा झाला .
परकीय शत्रूंनी आता राज्यात तोंड वर काढायला सुरवात केली होती. ठग ,पेंढारी यांनी सामान्य जनतेची लूटमार करून त्यांचा जीव मेटाकुटीला आणला होता. राज्यात सर्वीकडे एक अस्थिरता पसरली होती . ठगांचा सरदार चेतनसिंघ आणी त्याचा मुलगा अलोकसिंग यांनी अतिशय क्रूरपणे जनतेचा छळ करायला सुरवात केली . या समस्येचा पुरता बंदोबस्त करावा म्हणून ठगांविरुद्ध एकापाठोपाठ मोहिमा काढल्या. शक्तिवर्धन , प्रतापवर्धन , अमोघवर्धन सर्वजण ठगांविरुद्ध निकाराने लढत होते .शेवटी तो दिवस उजाडला जेव्हा उभ्या रणांगणावर सरदार चेतनसिंघ आणी माझा रणसंग्राम झाला. माझ्या तळपत्या तलवारीने चेतनसिंघ आणी अलोकसिंघ यांना कायमच यमसदनी धाडल. पण आपल्या पुत्राला आपल्या समोर प्राण सोडतांनी पाहून सरदार चेतनसिंघ यांनी प्रण घेतला कि तो मेल्यानंतरही आपला बदला घेण्यासाठी परतेल आणी वर्धन घराण्याचा कुळवंश संपवेल. याच घटनेचा फायदा शक्तिवर्धनने घ्यायचा ठरवला. सरदार चेतनसिंघ याची आत्मा आपला कुळवंश संपवेल या भीतीमुळे मी ललाटमय असे पंडित बाहुभद्र यांच्या मदतीने सरदार चेतनसिंघ यांच्या मृत शरीराला या गुहेत पुरलं आणी तिथेच ते तळघर बनवलं . त्याची आत्मा कुठेही भटकू नये म्हणून पंडित बाहुभद्र यांच्या मंत्रसार क्रियेने त्याला तिथेच जखडून ठेवलं. मंत्रासार ही अशी एक क्रिया आहे ज्यामुळे कुठलीही आत्मा बाहेर कधीच भटकू शकत नाही. ज्याला कायमच शांत केलं जात आणखी काळजी घेऊन ते भव्य असं द्वार बनवलं ज्याला दिव्य अभिमंत्रित धाग्याच्या घेराव घातला. सरदार चेतनसिंघ आता कधीच मुक्त होऊ शकत नव्हता ही अटळ गोष्ट फक्त मी आणी बाहूभद्र यांच्यातच गुपित होती.
सरदार चेतनसिंघने घेतलेल्या प्रतिशोधाचा फायदा शक्तिवर्धनने घ्यायचा ठरवला .माझ्या दोन्ही भूजा संपवुन राज्याच्या सिंहासनावर कब्जा करावा हाच त्याचा मनसुबा असावा . या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी रात्रीच्या जीवघेण्या शांततेत जेव्हा माझे दोन्ही पुत्र निद्राअवस्थेत होते तेव्हा शक्तिवर्धने त्यांना कायमच संपविले. सुदैवाने ही गोष्ट माझ्या दृष्टीक्षेपात आली पण शक्तिवर्धनला मी रोखू शकलो नाही यांची खंत माझ्या मनात अजूनही आहे. परत एकदा मी माझी समशेर उपसली आणी सुरु झाली रक्ताची जोरदार लढाई .ही लढाई होती माझी आणी शक्तिवर्धनची .आमच्या दोघा भावना असं लढतांना पाहून किती वेदना झाल्या असेल माझ्या माता पित्यांना . तलवारी खणाणू लागल्या होत्या. शेवटच्या जोरदार प्रहरात मी शक्तिवर्धनला कायमच मृत्यशैय्येवर निजवल. मृत्यूच्या शेवटच्या घटकात तो एवढंच म्हणाला कि ...आयुष्यभर त्याच्या नशिबात फक्त हेळसांडणीच आली..सर्वात शूर पराक्रमी, गुणसंपन्न असूनदेखील सिंहासन मात्र मला मिळाले हा त्याच्यावर झालेला अन्याय आहे.जिवंतपणी तर त्याच्या नशिबी तुच्छतेचि वागणूक आलीच आहे. पण मेल्यावर जेव्हाही भविष्यात वर्धन घराण्याचा इतिहास लिहला जाईल तेव्हा वीरवर्धनपेक्षा शक्तिवर्धन हा महानच होता असं लिहलं जाईल आणी जी लेखणी माझा असा उल्लेख करणार नाही त्यांच्यासाठी त्याचे परिणाम वाईट होईल. माझ्यासाठी दुतर्फा संकट होत
राज्यात कुणालाही शक्तिवर्धन , प्रतापवर्धन ,अमोघवर्धन यांचा मृत्यूचं खरं सत्य सांगू शकत नव्हतो कारण ज्या वर्धन घराण्याची ख्याती शीलसंपन्न , दानवीर ,त्यागाची होती .त्याच वर्धन घराण्यात सिंहासनासाठी , सम्मानासाठी रक्ताच्या नात्यावरच तलवार चालली ह्या भावना मी कुठेही व्यक्त करू शकत नव्हतो. शिवाय शक्तिवर्धनची आत्माही भटकेल हे माझ्या लक्षात आलं होत म्हणून मी एक योजना आखली. शक्तिवर्धनच्या शरीराला त्याच तळघरात पुरलं पण पंडित बाहूभद्र हे अचानकपणे समाधीसाठी कायमचे हिमायलात गेल्यामुळे मंत्रसार ही क्रिया पूर्ण होऊ शकली नाही . एवढं मात्र नक्की ते द्वार जोपर्यंत कुणी उघडणार नाही तोपर्यंत त्याची आत्मा तिथेच कैद राहील हे शतप्रतिशत खरं होत .दुसऱ्या दिवशी राज्यात शक्तिवर्धन आणी माझ्या पुत्रांच्या मृत्यूचं रहस्य काय हे सर्व विचारू लागले . तेव्हा त्या दोघानांही सरदार चेतनसिंघ याच्या आत्म्याने संपवले असे मी सांगितले .तेव्हापासून सरदार चेतनसिंघच्या भयकथेची आख्यायिका राज्यात प्रसिद्ध झाली .
शक्तिवर्धनची आत्मा कधीही मुक्त होऊ नये म्हणून मी नेहमी शक्तिवर्धनचा उल्लेख महान सेनानी म्हणून करू लागलो . ज्याप्रमाणे पाण्याचा प्रबळ प्रवाह आपण आपल्या लहानस्या दोन हातांनी थोपवू शकत नाही त्याचप्रमाणे शक्तिवर्धनबद्दलही तेच झालं .एक पक्ष जो नेहमी शक्तिवर्धनचा द्वेष करीत असे त्यांनी शक्तिवर्धनबद्दल सत्य लिहायला सुरवात केली. त्याच्या अतिमहत्वकांक्षामुळे त्याची छवी काहींच्या नजरेत खराब होती. माझ्या जीवनकाळात मी बऱ्याच लेखकांच्या तोंडून ऐकलंय कि जेव्हाही त्यांनी वर्धन घराण्याच्या इतिहास लिहायला सुरवात केली तेव्हा त्यांना एका अमानवी शक्तीच वास्तव स्वप्नात किंवा ध्वनिस्वरूपात दिसायचं .सगळ्यांना वाटायचं कि ती अमानवी शक्ती म्हणजे सरदार चेतनसिंघ आहे पण त्यामागचं जळजळीत सत्य मलाच ठाऊक होत.
या घटनेनं माझ्या शरीराने साथ तर सोडलीच होती पण मनही खंगून खंगून दुर्धर झालं होत .आपल्या लहान भावावर केलेला तो वार मला सदैव आठवायचा . मनाच्या हिमगरात स्वतःविषयी रागाच्या आणी पच्छातापच्या भावना झिंज्या पसरून जायच्या. माझं शारीरिक आणी मानसिक संतुलन खालावलं होत. जीवनाच्या अंतसमयी असतांनी मी त्या तळघरात जाऊन शक्तिवर्धनपासून वाचण्याचा उपाय लिहून ठेवला . त्यामागेही दीर्घ अशी योजना होती .मंत्रसार क्रिया करणं शक्य नव्हतं कारण मृत्यूनंतर 48 तासाच्या आत ही क्रिया करणं अनिवार्य असतं. म्हणून मंत्रासार क्रियाही आता उपयोगाची नव्हती .मी मृत्यूच्या उंबरठ्यावर असतांनी काही गोष्टींचा उलगडा झाला .लेखक प्रसेनजीत यांनी जेव्हा वर्धन घराण्याचा इतिहास लिहायला सुरवात केली तेव्हा त्यांनी शक्तिवर्धनच्या बाबत बऱ्याच नकारात्मक गोष्टी लिहल्या होत्या .त्याचाच परिणाम म्हणून शक्तिवर्धने त्यांचा खून घडवून आणला होता. माझ्या जीवनाची ज्योत मालवणाराच तेव्हा मी काही आध्यत्मिक शक्तीच्या मदतीने मेल्यावरही माझी आत्मा याच प्रकाशमय खोलीत अडकून राहील असा प्रबंध केला. यामागे उद्देश एकच शक्तिवर्धनच्या आत्म्याला कायमयच शांत करायचं . भविष्यात ते द्वार कधी ना कधी उघडणारच याची मला खात्री होतीच म्हणून एवढी प्रदीर्घ योजना आखावी लागली .माझ्या मृत्यनंतर कितीतरी राज्यांनी , विविध घराण्यांनी इथे राज्य केले पण ही खोली कुणालाही उघडता आली नाही .कितीतरी नैसर्गिक आपत्ती येऊन गेली पण या खोलीचं अस्तित्व अटळ राहील ".
निशांतला ह्या सर्व गोष्टींचा उलगडा झाल्यामुळे तो फारच शांत झाला होता.
" हे सर्व ठीक आहे पण मला स्वप्नात ते स्वप्नद्वार का दिसायचं ...त्याच काय रहस्य असावं ?
" कुठल्याही अमानवी शक्तीविरुद्ध जर काही गोष्टी घडल्या तर सरळ त्या अमानवी शक्तीला आव्हान होत. अश्या अमानवी शक्ती वेगवेगळ्या माध्यमातून जसे कि स्वप्न , ध्वनी ,भास या माध्यमातून आपलं अस्तित्व दर्शवित असतात. तुला ते स्वप्नद्वार दिसायचं कारण म्हणजे शक्तिवर्धन तुला अप्रत्यक्षपणे ते द्वार उघडण्यासाठी भीतीदायक संवाद साधित होता आणी शेवटी तू ते द्वार उघडलंच ".
निशांतच्या चेहऱ्यावर असलेली सर्व प्रश्नरूपी वलय शांत झाली होती .
" आता या शक्तिवर्धनला कायमच शांत करण्याचा काय उपाय आहे राजन "
" हा अग्नीपरशु घे. पंचमहाभूत तत्वांपैकी पवित्र अग्नी हा शक्तिशाली तत्व या परशूत आहे. याचा वार होताच कुठलीही नकारात्मक ,अमानवी शक्ती कायमची संपून जाते . माझा समकालीन राजा....राजा रुद्रसेन यांच सेन साम्राज्य जेव्हा तिमीरांगणात अडकलं होत .तेव्हा राजा रुद्रसेनने ही आपल्या साधनेने अग्नीपरशु प्राप्त केली होती. काळशक्तीचा कर्दनकाळ म्हणजे अग्नीपरशु. या अग्नीपरशुचा स्पर्श होताच शक्तिवर्धनचा अंत होईल आणी या अग्नीपरशुची जी जागा आहे तिथे तो परतेल कारण याचा उत्तराधिकारी अजूनपर्यंत तरी कुणी भेटला नाही .भविष्यात या अग्नीपरशूचा साधक लवकर मिळो हीच इच्छा आहे .
राजा वीरवर्धने तो अग्नीपरशु निशांतला दिला. तांबूस रंगाचा तो अग्नीपरशु लख्ख चमकू लागला होता . त्याला स्पर्श करताच एक वेगळीच ऊर्जा निशांतच्या शरीरात संचारली होती .
" लक्षात ठेव तुझं युद्ध शक्तिवर्धन बरोबर आहे .शक्तिवर्धन हा मायाजाल युद्धनीतीत फार निपुण होता म्हणून त्याला संपवणं एवढंही सोपं काम नाही आहे .आता तर तो एक अमानवी शक्ती झाला आहे तेव्हा तो आपल्या सर्व राक्षसी शक्तींचा वापर करेल "कणखर शब्दात राजा वीरवर्धन म्हणाले .
" मायाजाल युद्धनीती म्हणजे नक्की काय असतं ? "
" मायाजाल म्हणजे जे दिसत ते नसतंच ...ते केवळ एक मृगजळ असतं . विजयी भव..या युद्धात तुझाच विजय होवो ."
" एक प्रश्न आहे फक्त ...राजन तुम्हीच ही अग्नीपरशु घेऊन शक्तिवर्धनचा शेवट का नाही करत ?" निशांत विचारू लागला .
" जिवंतपणी मी माझ्या भावावर वार केले हीच सल माझ्या मनात अजूनही कायम आहे .आता परत त्याच्या आत्म्यावरही वार करण जमणार नाही मला . जो कुणी या द्वाराला उघडेल त्याचाच हातून शक्तिवर्धनच्या आत्म्याला मुक्ती मिळेल हा निर्णय मृत्यूच्या उंबरठ्यावर असतांनीच मी घेतला होता. माझ काम फक्त मार्ग दाखवणं होत ते आता पूर्णत्वास गेलंय .जा आता लवकर तू तुझ्याकडे वेळ फारच कमी आहे . ...या खोलीच्या मागच्या दाराकडून जेव्हा जाशील तेव्हा सरळ त्या गुहेजवळ पोहोचशील .यशवंत हो . माझं काम झालं आता मलाही या खोलीतून मुक्त व्हायचंय " बारिकश्या हास्याने राजा वीरवर्धन म्हणाले.
निशांत तेथून जायला निघाला राजा वीरवर्धनही काही क्षणातच मुक्त झाले होते .
निशांत त्या काळ समुद्री गुहेजवळ पोहचला .हातात असलेला अग्नीपरशु विजेसारखा लख्ख चमकू लागला होता . दूरदूरपर्यंत गर्द अंधःकाराचे राज्य होते . रातकिड्यांचा किर्रर्र ....किर्रर्र ...स्वर निशांतच्या कानाला टोचू लागला होता .
" जर हा अग्नीपरशु आपण स्वप्नदुनियेतुन वास्तविक जगात नेऊ शकलो तर शक्तिवर्धनला संपवण्यासाठी आपल्याला बराचसा वेळ मिळेल. पण नक्की स्वप्नदुनियेतुन काही वस्तू वास्तविक जगात नेऊ शकतो का .या प्रश्नाचं उत्तर तर फक्त डॉक्टर देऊ शकतात . जर उत्तर हो असेल तर सर्व चिंताच मिटल्या आणी जर उत्तर नाही असेल तर ....उत्तर स्पष्ट आहे मृत्यू .या प्रश्नांच उत्तर नाहीच आहे असं समजून आपण कृती करायला हवी .शक्तिवर्धनला काहीही करून इथे बोलवायला हवे .पण कसे ?" निशांत स्वतःशीच बोलत होता . एवढ्यात त्याला एक युक्ती सुचली . आपल्या शरीरातील समस्त शक्ती एकवटून तो ओरडला
" शक्तिवर्धन तू कधीही राजा वीरवर्धनपेक्षा महान नव्हता ना आहेस ..तू अतिशय कपटी ,धूर्त आणी मनात ईर्ष्या ठेवणारा भेकड योद्धा होतास" .त्याची ती गर्जना संपूर्ण आसमंतात घुमली .
एवढ्यात जोरदार सोसाट्याचा वारा सुटला . धुळीचे कण सर्वत्र चारही दिशेला घुमू लागले होते .तिमिराचे रूप अधिकच उग्र होऊ लागले होते .अतिशय भयाण अशी कर्कश्य मृत्यकिंचाळी निशांतच्या कानात खणाणली ....त्या एका किंचाळीच्या पाठोपाठ अगणित कर्णकर्कश्य किंचाळ्या निशांतच्या कानात भीषणपणे खणाणू लागल्या . त्यांचा जोरही क्षणाक्षणाला वाढतच होता. निशांतच्या मागे असंख्य काळसावल्या परत उभ्या ठाकल्या होत्या. यावेळेस त्या मागच्यावेळेस पेक्षा कितीतरी पटीने अधिक होत्या. विचित्र रूपे धारण करून त्या घोगऱ्या स्वरात ईव्हळत होत्या.
अचानपणे दूर त्याला विचित्र सरपटणारी आकृती दिसली . त्या सरपटणाऱ्या आकृतीच्या अर्ध्या चेहऱ्यावर काळी माती चिकटली होती तर अर्ध्या चेहऱ्यावर खोल विद्रुप अश्या जखमा होत्या, लांबसडक पांढरे कुरतळलेले केस , लालभडक आरक्त नेत्र . ती सरपटणारी आकृती विजवेगाने निशांतकडेच येत होती . गर्द काळोखाच्या काळ समुद्रात त्या आकृतीचे लालभडक आरक्त नेत्र कमालीचे भयाण वाटत होते .वाऱ्याचा घो ...घो आवाज कानाला छेदून जात होता .ते आरक्त लालभडक नेत्र अगदीच जवळ जवळ येत होते .कर्णकर्कश्य मृत्यूकिंचाळ्या निशांतच्या कानात धुमाकूळ घालीत होत्या. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच ती सरपटणारी आकृती अगदी समोर येऊन उभी राहिली होती. निशांतच्या हातातील अग्नीपरशु लख्ख चकमला...त्याने प्रकाशवेगाने तो अग्नीपरशु त्या सरपटणाऱ्या आकृतीवर उचलला . अग्नीपरशूचा स्पर्श त्या सरपटणाऱ्या आकृतीला होणारच एवढ्यात ती आकृती अचानकपणे कुठेतरी अदृश्य झाली . आता निशांतला वर आकाशात अनामिक हालचाल जाणवली काळंकुट्ट आकाश आता ज्वालामुखी सारखे लालबुंद झाले होते . समग्र धरतीवर लालबुंद प्रकाशाचा सडा पसरला होता . त्या लालबुंद आकाशातून काही अग्नीगोळे निशांतच्या दिशेला येत होते. त्यातला एक गोळा कशालाही न जुमानता सरळ त्याच्याकडेच येत होता . निशांतच्या मानेवरून घर्मबिंदु सरळ रेषेत ओघळत होते . तो अग्नीगोळा अगदी जवळ येऊन ठेपला होता. निशांतने आपल्या चेहऱ्यावर हात ठेवून त्यापासुन बचावाचा भाबडा प्रयत्न करीत होता . नेत्र आपोआपच मिटले गेले .त्या अग्नीगोळ्याची उष्णताही जाणवतं होती. खाडकन त्याने नेत्र उघडले समोर बघतो तर सर्वकाही अधिसारखच. तोच गर्द काळंकुट्ट तिमिर.... स्वप्न , वास्तव , भ्रम आणी सत्य यांच्या कचाट्यात निशांत अधिकच अडकू लागला होता . जोरदार सुटलेल्या वाऱ्याने सर्वत्र धुळीची चादर पसरली. निशांत डोळे चोळत सर्व परिसर पाहण्याचा अपुरा प्रयत्न करीत होता. इतक्यात एका रक्तपिपासू जनावरावर तो हिरवा राक्षस बसला होता. ते रक्तपिपासू जनावर या समग्र भूतलावर किंवा कुठल्याही माध्यमावर वर कधीच पहिलं नव्हतं. त्या राक्षसाच्या हातात धारदार चाकू होता. त्या चाकूंनी तो स्वतःच्या शरीरावर खोल घाव करीत होता. प्रत्येक घाव केल्यावर त्या जखमेतून हिरवा तरल द्रव्य बाहेर पडायचा. ते रक्तपिपासू जनावर आणी त्यावर बसलेला तो हिरवा राक्षस अतिशय वेगाने निशांतकडेच येत होत . त्या रक्तपिपासू जनावराच्या तोंडातून टप टप ..करीत रक्तबिंदू टपकत होते . निशांतच्या अस्थिर मनात भीतीचे काळपट ढग जमले . आपल्या कणखर हाताने अग्नीपरशुवरील पकड अधिकच घट्ट केली . ते रक्तपिपासू जनावर आणी तो राक्षस अतिशय तीव्र वेगाने जवळ येताच परत एक प्रहार त्यांच्यावर केला पण ते रक्तपिपासू जनावर आणी तो राक्षस तितक्याच वेगाने कुठेतरी अदृश्य झाला.
" नक्की काय सुरु आहे हे....निशांत स्वतःलाच विचारीत होता. कुठल्या भ्रमाच्या वावटळीत अडकत चाललोय आपण . राजा वीरवर्धने आपल्याला सांगितलं होत शक्तिवर्धन हा मायाजाल युद्धनीतीत निपुण होता .म्हणजे हे सर्व मायाजाल आहे. जे दिसतंय ते फक्त एक भयमृगजळ आहे. आपल्याकडे वेळेची वाळू फारच कमी उरलीय. काहीही करून शक्तिवर्धनला इथे बोलवायला हवं ".
निशांत परत एक किंचाळी फोळून ओरडला .
" शक्तिवर्धन तू नेहमीच पळपुटा योद्धा राहिला आहेस. प्रतापवर्धन ,अमोघवर्धन यांनाही तू निद्रावस्थेत ठार केलेस . मुळात तू कधीही सामोरी येऊन वार करूच शकत नाही आणी स्वतःला महान ,पराक्रमी समजतोस लज्जा वाटायला पाहिजे तुला " निशांतच्या कींचाळीने तो काळ समुद्री परिसर हादरला. वाऱ्याने अधिकच जोर धरला . आकाशातून कुठलीतरी अमानवी शक्ती निशांतच्या पाठीमागे उभी राहिली. डोळे वळवून निशांत तिला पाहणार इतक्यात एक जोरदार वार निशांतच्या पाठीवर झाला. समोर शक्तिवर्धन उभा होता . तेच त्याच बिभीस्त रूप...त्याच्या काळ्या कबिन्न खोबण्या क्रोधाच्या ज्वाळा फेकत होत्या. निशांत कसाबसा उठण्याचा प्रयत्न करीत होता. इतक्यात परत एक वार त्याच्या हातावर झाला.
निशांत शरीरातली संपूर्ण शक्ती जुळवून कसाबसा उभा राहिला. हातातील अग्नीपरशुवरील पकड काहीशी सैल झाली होती , डोळ्यावरील अंधारी त्याच संतुलन बिघडवीत होता. आपल्या थरथरत्या हाताने अग्नीपरशुचा वार शक्तिवर्धनवर करण्याचा त्याने प्रयत्न केला पण शक्तिवर्धन तेथून दूर झाला आणी परत एक वार निशांतच्या बाहुकंटकावर केला. निशांत आता जमिनीवर निपचित पडला होता .शरीरात कुठलंही सामर्थ्य उरलं नव्हतं. हळूहळू नेत्रासमोर काळोख पसरायला लागला होता .
-------------------------------------------------------------------
" त्याच्या शरीरावर प्रचंड वार होत आहे . म्हणजे या युद्ध्यात तो कमजोर होत चालला आहे " आचार्य विष्णुगुप्त काळजीच्या स्वरात म्हणाले .
" हो त्याच्या शरीरावर असलेलं व्रण हेच दर्शवित आहे " डॉक्टर म्हणाले
" देवा तूच निशांतच रक्षण कर रे ...आता फक्त तुझाच आश्रय आहे " प्रार्थना करीत आर्य म्हणाला .
" त्याच्याकडे वेळही फार कमी आहे .काही क्षणात फक्त 30 सेकंदच उरेल "
" आता निशांतच्या नावाचे शक्तिमंत्र म्हणायला सुरवात करायला हवी . जे मंत्र काही प्रमाणात निशांतला सामर्थ्य प्रदान करेल " आचार्य विष्णुगुप्त म्हणाले
आचार्य विष्णुगुप्त आणी आर्य यांनी शक्तिमंत्राचा उच्चार करण्यास सुरवात केली.
---------------------------------------------------------------------
निपचित पडलेल्या निशांतच्या कानावर डॉक्टरांचे स्वर खणाणू लागले .
" निशांत आता तुझ्याकडे फक्त तीस सेकंदच आहे
फक्त". पंख तुटलेल्या पक्ष्याप्रमाणे निशांत उठण्याचा प्रयत्न करीत होता. ओठ हलवून त्याने प्रश्न केला
" डॉक्टर स्वप्नदुनियेतुन काही गोष्टी वास्तविक जगात आणता येतात का ?"
" नाही...आभासी जगातून किंवा मायावी जगातून काही गोष्टी वास्तविक जगात आणता येतात असा हलकासा उल्लेख अनाहतभेदन क्रियेत आहे पण याला कुठलंही प्रमाण नाही. स्वप्नदुनियेतुन तर कुठल्याच गोष्टी वास्तविक जगात आणता येत नाही कारण स्वप्नदुनिया स्वतः पुरतीच मर्यादित असते " डॉक्टर उत्तरले.
वर काळ्याभोर आकाशात निशांतला प्रकाशमय तेज उमटलेलं दिसलं. त्यातला तेजोमय प्रकाश निशांतच्या रोमारोमात ,कणाकणात , प्रत्येक पेशीपेशीत शिरला.
वेगळंच महासामर्थ्य त्याच्या शरीरात संचारल होत.
तो साधा मानसोपचारतज्ञ निशांत नव्हताच , भयग्रस्त स्वप्नांनी ग्रासलेला निशांतही नव्हता , शक्तिवर्धनच्या वाराने घायाळ झालेला निशांतही नव्हताच , पंख तुटलेली अवस्था असलेला निशांतही नव्हताच . तो असाधारण तरुण झाला होता , त्याच्या शरीरात प्रकाशशक्ती भिनली होती , चेहऱ्यावर तेजपुंज कांती होती . प्रचंड शक्तीने तो उभा राहिला .एवढ्यात परत डॉक्टरांचे स्वर त्याच्या कानावर आदळू लागले होते
" आता तुझ्याकडे फक्त शेवटचे दहा सेकंड उरले आहे .10....9..."
आपल्या फुगलेल्या बाहूकंटाने अग्नीपरशुवरील पकड घट्ट केली. लालसर रक्ताची सरळ रेष अग्नीपरशुवर तराळाली . समोर शक्तिवर्धन असुरी हास्याने गर्जना करीत होत्या .
डॉक्टरांचे स्वर निशांतच्या कानावर आदळू लागले होते
" 10....9.....8......7....... "
निशांतने प्रकाशवेगाने हातातील अग्नीपरशु शक्तिवर्धन वर चालविला. अग्नीपरशूचा स्पर्श होताच शक्तिवर्धनचा वेदनामय आवाज सर्वत्र घुमला. पुढच्याच क्षणी त्याच्या देहाचे , आत्म्याचे रूपांतर राखेत झाले . निशांतच्या हातात असलेल्या अग्नीपरशुवर आकाशातून तेजोमय तांबूस प्रकाश पडला .प्रकाश पडताच तो अग्नीपरशू अदृश्य झाला .
डॉक्टरांचे स्वर अधिकच तीव्रतेने निशांतच्या कानावर आदळू लागले होते .
" आता तुझ्याकडे फक्त 5 सेकंदच उरले आहे 5....4....3. "
निशांत आता वास्तविक जगात आला होता . शरीरावर झालेल्या वारांमुळे काहीसा वेदनेने कन्हाळत होता. सर्वांच्या चेहऱ्यावर विजयी हास्य होत.
डॉक्टर आपल्या खुरट्या दाढीवरून हात फिरवत स्वतःशीच म्हणाले
" कुणीतरी स्वप्नदुनियेतुन दुसऱ्यांदा परत आलंय.एवढे वर्ष जो प्रयोग मी करत होतो. तो आता शतप्रतिशत खरा ठरलाय . म्हणजेच अनाहतभेदन क्रियेचे आभासी ,मायावी जगाबद्दल असलेलं नियम ज्याला सर्व आध्यत्मिक गुरु खोटं ठरवतात ते अगदी प्रमाणबद्ध आहे. तरुणपणापासून ज्या आभासी मायावी जगात जाण्याचा अट्टहास मी धरला होता . त्या आभासी मायावी जगात प्रवेश करण्याची वेळ आता आली आहे " डॉक्टरांच्या चेहऱ्यावर नकारात्मक हास्य छटा झडकत होत्या .
आता डॉक्टरांनी कुठल्या आभासी, मायावी जगात प्रवेश करण्यासाठी अनाहतभेदन क्रियेचा वापर करायचं ठरवलंय याचा उलगडा आगामी कथेत होईल.
समाप्त
--- निखिल
आपल्याला ही संपूर्ण कथा कशी वाटली हे अभिप्रायाने कळवा .