झपाटलेला वाडा - भाग 2 kalyan mhaslekar द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

झपाटलेला वाडा - भाग 2

---

झपाटलेला वाडा - भाग 2: विहिरीत कोणीतरी पोहतंय

आर्यन झोपला नाही. त्याने प्रयत्न केला, पण डोळे बंद केले की त्याच्या तोंडात चिखल भरायचा. तोच काळा, चिकट चिखल जो विहिरीत होता. त्याला उलटी येत होती, पण तोंडातून फक्त पाणी येत होतं. विहिरीतलं पाणी.

सकाळी सहा वाजता त्याने हाताची मूठ उघडली. रात्री जे केस हातात आले होते ते अजूनही होते. आश्चर्य म्हणजे ते वाळलेच नव्हते. रात्रभर त्याच्या मुठीत होते तरी ओलेच होते. आणि त्यांचा वास बदलला होता. काल रात्री फक्त शेवाळाचा वास होता, आज सकाळी त्यातून ताज्या रक्ताचा वास येत होता. जणू आत्ताच सांडलेले रक्त

जमिनीवर राख तशीच होती. रात्री त्याने पायाने पुसण्याचा प्रयत्न केला होता, पण राख पुसली गेली नाही. उलट अधिक गडद झाली होती. "आम्हाला न्याय हवा आहे - सुनिता + श्रुती 2004"

त्याने रागाने ते केस उचलून सरळ विहिरीत फेकून दिले. केस हवेतच होते आणि खालून आवाज आला.

*छपाक.*

एखाद्या माणसाने हात वर करून झेलावा तसा आवाज. खाली कोणीतरी उभं होतं आणि वाटच बघत होतं.

आर्यन अंगणात आला. बाहेर कडक ऊन होतं. ऑगस्टचं ऊन. पण विहिरीच्या तीन फुटाच्या आत ऊन येतच नव्हतं. तिथे एक वेगळीच थंडी होती धडकी भरवणारी हाड गोठवणारी थंडी. श्वास सोडला तर धुकं दिसत होतं. विहीर शंभर फूट खोल. वरून बघितलं तर आत फक्त काळी काच वाटायची. पाणी हलत नव्हतं. पण त्यातून सारखे बुडबुडे वर येत होते. बुड... बुड... बुड... जणू खाली कोणीतरी श्वास रोखून बसलंय आणि आता सोडतंय.

त्याने धीर करून आत डोकावलं. त्याचं स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. घाबरलेलं. पण त्याच्या खांद्यावर काल रात्री उमटलेला काळा हाताचा ठसा पाण्यात दिसत नव्हता. आरशात होता, पाण्यात नव्हता. म्हणजे आरशात जे दिसतं ते खरं नाही, पाण्यात जे दिसतं ते खरं आहे.

आणि पाण्यात त्याच्या मागे दोन जणी उभ्या होत्या. एक बाई, केसांनी चेहरा पूर्ण झाकलेला, फक्त पांढरे डोळे दिसत होते. आणि तिच्या खांद्यावर एक पाच वर्षांची लहान मुलगी. दोघींचे केस एकमेकांत गुंतलेले. दोघीही एकटक आर्यनकडेच बघत होत्या. त्यांच्या अंगातून पाणी  आणि शेवाळ गळत होतं .

आर्यनने दचकून मागे मान वळवली. मागे कोणीच नव्हतं. फक्त रिकामं अंगण. परत विहिरीत बघितलं तर आता फक्त त्याचं एकट्याचं प्रतिबिंब.

"कोण आहे खाली?" तो जोरात ओरडला. त्याचा आवाज विहिरीत घुमला पाहिजे होता, पण घुमलाच नाही. विहिरीने त्याचा आवाज जागेवरच गिळून टाकला. आतून काहीच परत आलं नाही.

मग पाच सेकंद शांतता. आणि आतून आवाज आला. रडण्याचा नाही. पाण्यात कोणीतरी पोहत असल्याचा. जोरात हात-पाय मारत असल्याचा. छपाक... छपाक... छपाक... पाणी भिंतीवर आपटत होतं. काळं पाणी वरपर्यंत उडत होतं. त्याचे थेंब आर्यनच्या चेहऱ्यावर पडले. बर्फापेक्षाही थंड. आणि वास? सडलेल्या साडीचा आणि कुजलेल्या मांसाचा.

"आई... मला बाहेर काढ ना ग... इथे बाबा अजूनही मारतोय..."

एकदम बारीक आवाज. लहान मुलीचा. अगदी विहिरीच्या तळातून.

आर्यनच्या डोक्यात सनक गेली. त्याला वाटलं कोणीतरी खरंच पडलंय. त्याने दोर आणला. जाड दोर. पिंपळाच्या झाडाला घट्ट बांधला. दुसरं टोक स्वतःच्या कमरेला बांधलं. टॉर्च तोंडात पकडली. खिशात छोटा कटर.

"मी येतोय... घाबरू नका..."

तो हळू हळू उतरू लागला.

दहा फूट खाली गेला - विहिरीच्या भिंतीवर नखांचे ओरखडे होते. खोलवर. आतून बाहेर येण्यासाठी कोणीतरी वर्षानुवर्षे ओरबाडलं होतं. त्या ओरखड्यांमध्ये अजूनही ओले केस अडकले होते.

वीस फूट - थंडी इतकी वाढली  त्याचे हाड गोठतायत अस त्याला वाटू लागलं उन्हाळ्यातही त्याचा श्वास धुक्यासारखा दिसू लागला. टॉर्चचा प्रकाश अंधार गिळून टाकत होता.

तीस फूट - पाणी आता जोरात हलत होतं. भोवरा तयार झाला होता. आणि पाण्यावर आता दोन साड्या तरंगत नव्हत्या. दोन शरीरं तरंगत होती. पांढरी, फुगलेली, पाण्याने फुगलेली. एकमेकांना घट्ट मिठी मारून. मोठी सुनिता आणि लहान श्रुती. दोघींचे केस पाण्यावर जाळ्यासारखे पसरले होते. डोळे उघडे, पूर्ण पांढरे, बुबुळच नव्हतं. आणि त्या दोघींच्या मध्ये तिसरं शरीर. पुरुषाचं. रघुनाथचं. पण त्याला मुंडकं नव्हतं. धडच तरंगत होतं. तिघेही मान वर करून आर्यनकडेच बघत होते.

पन्नास फूट - आर्यन आता पाण्यापासून फक्त पाच फूट लांब. त्याला त्यांच्या अंगाचा वास येत होता. प्रेताचा गोडसर वास.

तेवढ्यात श्रुतीने मान वर केली. तिच्या तोंडातून काळं पाणी आणि छोटे मासे बाहेर पडले.

"दादा, तू आला? माझी बाहुली आणलीस? बाबाने पाण्यात फेकली..."

तिने आपला छोटा, पांढरा, फुगलेला हात वर केला आणि आर्यनचा पाय घट्ट पकडला. हात नव्हता तो, बर्फाचा गोळा होता. आर्यनचा पूर्ण पाय सुन्न झाला. त्याला हलताही येईना.

सुनिताने पण हात वर केला. तिच्या हातात केसांचा पुंजका होता. काळे, ओले केस. आर्यनचेच. रात्री उशाशी ठेवलेले.

"तू आता आमचाच आहेस. तू आम्हाला न्याय देणार ना?"

दोर आपोआप वर ओढला जाऊ लागला. वर कोणीच नव्हतं. आर्यनने वर बघितलं. दोर हवेतच हलत होता, जणू कोणी अदृश्य हात ओढतंय. त्याचं डोकं दोन वेळा भिंतीवर आपटलं. कपाळ फुटलं. रक्त पाण्यात पडलं. पण दोर थांबला नाही.

तो वर फेकला गेला. अंगणात. पाठीवर. त्याच्या छातीवर तीच जळलेली बाहुली पडली होती. जिने रात्री हसून बघितलं होतं. ती पूर्ण ओली होती. तिचा एकच डोळा शिल्लक होता, तो आर्यनकडेच बघत होता.

विहिरीतलं पाणी आता वर येत होतं. काठापर्यंत. काळं, गढूळ पाणी. आणि पाण्यावर तीन सावल्या नव्हत्या. चार सावल्या होत्या. तीन ओळखीच्या आणि चौथी... चौथी सावली आर्यनचीच होती. पण ती पाण्यात उभी होती, बाहेर नाही. ती हात हलवत होती.

आणि विहिरीतून आता सुनिताचा आवाज नाही, रघुनाथचा आवाज आला. मुंडकं नसलेल्या प्रेताचा आवाज, पाण्यातून.

"तू तिघांना बघितलंस. आता चौथ्याला पण बघ. तो तुझ्या मागे उभा आहे. वळून बघ..."

आर्यनने मागे वळून बघितलं नाही. कारण त्याला माहित होतं, एकदा मागे बघितलं की तो चौथा त्याला दिसेल. आणि एकदा दिसला की तो त्याच्यासोबतच राहील. कायमचा.

पण त्याच्या खांद्यावर पडलेला थंड पाण्याचा थेंब सांगत होता, चौथा आता अंगणातच उभा आहे. अगदी त्याच्या मागे.

क्रमश: