झपाटलेला वाडा - भाग 10 kalyan mhaslekar द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

झपाटलेला वाडा - भाग 10

झपाटलेला वाडा - भाग 10: देवीच्या वाड्यात नवीन सुरुवात

मंदिर बनलं होतं. जिथे शंभर वर्षांपासून झपाटलेला वाडा उभा होता, तिथे आता सोन्याची देवी उभी होती. चार फूट उंच, चमकणारी, त्रिशूळ हातात घेतलेली. ज्या सोन्यासाठी वीस खून झाले होते, तेच सोनं आता देवी झालं होतं. लोक आता त्या मैदानाला घाबरत नव्हते, तिथे पाया पडत होते. माळशेत गावात जत्रा भरली होती.

आर्यनने पुण्याचं घर सोडलं होतं. तो आता तिथेच राहत होता. मंदिराच्या बाजूला छोटी खोली, एक खाट, एक टेबल, लॅपटॉप. सकाळी मंदिर झाडायचा, दिवा लावायचा, आणि दिवसभर लिहायचा. त्याची दुसरी कादंबरी - देवीचा वाडा.

पण गोष्ट संपली नव्हती. कारण शाप संपला होता, पण हिशेब बाकी होता.

एके रात्री त्याला परत स्वप्न पडलं. मंदिरात तो झोपला होता. देवीच्या मूर्तीतून प्रकाश आला आणि सावित्री बाहेर आली. पण आता ती रडत नव्हती. देवीच्या रूपात, सोन्याचा मुकुट घालून.

आर्यन, तू आम्हाला मुक्त केलंस. पण माझी दोन लेकरं अजूनही भटकत आहेत. त्यांना पण घे. तरच माझा जीव खरंच शांत होईल.

आर्यन दचकून उठला. सावित्रीला दोन मुलं होती? इतिहासात लिहिलं होतं - भैरवनाथला दोन मुलं. एक मोठा, विठ्ठल. आणि एक लहान, नथू. पाच वर्षांचा.

सकाळी त्याने हरिभाऊला विचारलं. हरिभाऊचा चेहरा पांढरा पडला.

हो साहेब. विठ्ठल म्हणजे रघुनाथचा बाप. आणि नथू... तो पाच वर्षांचा होता. विहिरीत पडून मेला. लोक म्हणाले खेळताना पडला. पण...

पण काय?

पण त्याला ढकललं होतं. भैरवनाथनेच. मांत्रिकाने सांगितलं होतं - दुसरा बळी लागेल. वाडा अजून मजबूत व्हावा म्हणून. म्हणून त्याने आपल्या लहान पोरालाच विहिरीत ढकललं. आणि विठ्ठल... विठ्ठलला जेव्हा कळलं की आईला आणि भावाला बापाने मारलं, तो भांडायला गेला. शेतात. तिथेच भैरवनाथने त्याचा गळा दाबला आणि वडाच्या झाडाखाली पुरलं. सोन्यासाठी. सगळं सोन्यासाठी.

म्हणजे अजून दोन आत्मे. दहा आत्मे. आठ मुक्त झाले, दोन बाकी.

रात्री आर्यन देवीसमोर बसला. डोळे बंद केले.

आई, अजून दोन बाकी आहेत का?

देवीच्या डोळ्यातून दोन थेंब पाणी आले. सोन्याच्या मूर्तीच्या डोळ्यातून खरं पाणी. आणि समोर दोन सावल्या आल्या. एक वीस वर्षांचा तरुण, गळ्यावर काळे डाग. आणि एक पाच वर्षांचा लहान मुलगा, हातात लाकडी घोडा. दोघेही रडत होते.

मोठा म्हणाला, मी विठ्ठल. माझ्या बापाने मला मारलं. मी फक्त विचारलं होतं - आई कुठे आहे? लहान भाऊ कुठे आहे? तर त्याने माझा गळा दाबला. म्हणाला, तुला जास्त कळतंय. आणि शेतात पुरलं. वडाच्या झाडाखाली.

लहान म्हणाला, मी नथू. मी विहिरीजवळ खेळत होतो. बाबाने मला हाक मारली. ये बेटा, मासा दाखवतो. मी गेलो. त्याने मला ढकललं. मला पोहता येत नव्हतं. मी 'आई... आई...' म्हणत बुडालो. आई तर आधीच खांबात होती, ती कशी येणार.

आर्यनच्या डोळ्यातून धारा लागल्या. पाच वर्षांच्या पोराला बापानेच मारलं.

तुमची हाडं कुठे आहेत?

विठ्ठल म्हणाला, वडाच्या झाडाखाली. शेतात. जिथे बापाने पुरलं.

नथू म्हणाला, विहिरीत. तळाशी. जिथे तुम्ही माती टाकली.

सकाळी आर्यनने जेसीबी बोलावला. शेतातल्या वडाच्या झाडाखाली खणलं. पाच फूट खणल्यावर एक सांगाडा. तरुण मुलाचा. गळ्याची हाडं तुटलेली. स्पष्ट दिसत होतं - गळा दाबून खून.

आणि विहीर. जी मातीने भरली होती, ती परत खणली. तळाशी चिखलात एक छोटा सांगाडा. पाच वर्षांच्या मुलाचा. हातात अजूनही तो लाकडी घोडा घट्ट धरलेला. तो घोडा कुजला नव्हता.

दोन्ही सांगाडे आणले. मंदिरासमोर एकत्र चिता रचली. देवीसमोर.

जशी आग लागली, तशी दोघे समोर आले. आता रडत नव्हते. हसत होते. त्यांच्या मागे सावित्री धावत आली. तिने दोघांना घट्ट मिठी मारली. शंभर वर्षांनी आई मुलांना भेटत होती.

माझी बाळं... माझी बाळं... शंभर वर्ष झाली मी तुमची वाट पाहतेय...

भैरवनाथ पण आला. त्याने विठ्ठलच्या पाया पडला. मला माफ कर बाळा... सोन्याच्या मोहाने मी आंधळा झालो होतो... मी माझ्याच पोटच्या पोरांना मारलं...

विठ्ठल म्हणाला, मी माफ केलं बाबा. आता सगळं संपलं. लोभ संपला.

त्याच वेळी आकाशात आठ प्रकाश आले. कमला, सुनिता, श्रुती, रघुनाथ, दत्ता, किसन, आणि मागे भैरवनाथ, सावित्री. आता दहा प्रकाश एकत्र झाले. मंदिराभोवती तीन प्रदक्षिणा घातल्या आणि सोन्याच्या देवीत विलीन झाले.

मूर्ती इतकी चमकू लागली की डोळे दिपत होते. मंदिराच्या घंटा आपोआप वाजू लागल्या. जोरात. वाऱ्याशिवाय.

गावकरी हात जोडून म्हणाले, दहा आत्मे मुक्त झाले! शाप पूर्ण संपला! भोसले घराण्याचा शंभर वर्षांचा शाप संपला!

आर्यनने डायरीत शेवटचं लिहिलं - आज दहा आत्मे मुक्त झाले. आज भोसले वाड्याचा शाप खरंच संपला. लोभाचा शाप. सोन्याचा शाप. रक्ताचा शाप. आज या सोन्याच्या देवीने सगळं संपवलं. इथे आता फक्त शांती आहे.

रात्री मंदिरात कोणीच नव्हतं. आर्यन एकटा देवीसमोर बसला होता. दिवा जळत होता. तेवढ्यात मंदिराचा दरवाजा आपोआप उघडला. थंड वारा नाही, गरम, सुगंधी वारा आला.

दहा जण आत आले. पांढऱ्या कपड्यात. प्रकाशात. पुढे सावित्री, तिच्या कुशीत नथू, हातात विठ्ठलचा हात. मागे कमला, सुनिता, श्रुती, रघुनाथ, दत्ता, किसन, भैरवनाथ. दहा जण. पण आता ते भूत नव्हते. देवासारखे दिसत होते.

सावित्री म्हणाली, आर्यन, आम्ही जातो. आता खरंच जातो. आमचा शाप संपला. आम्ही या देवीत विलीन झालो. पण तू इथेच राहा. या मंदिराची राखण कर. आणि लोकांना सांग - लोभ वाईट असतो. सोनं माणसाला खातं. माणूस मोठा असतो, सोनं नाही. जोपर्यंत तू आमची कथा सांगशील, तोपर्यंत आम्ही जिवंत राहू.

आर्यनने हात जोडले. हो आई. मी इथेच राहणार. आणि तुमची कथा जगाला सांगणार.

दहा प्रकाश हळू हळू देवीत गेले. मंदिर शांत झालं. फक्त दिवा जळत होता. सोन्याच्या देवीसमोर.

आर्यनने लॅपटॉप उघडला. त्याची दुसरी कादंबरी पण पूर्ण झाली होती. नाव - देवीचा वाडा.

त्याने आकाशाकडे पाहिलं. आकाशात दहा तारे एका रेषेत चमकत होते. जणू दहा आत्मे तारे झाले होते. आणि त्यांच्याकडे पाहून हसत होते

क्रमश: