झपाटलेला वाडा - भाग 5 kalyan mhaslekar द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

झपाटलेला वाडा - भाग 5

झपाटलेला वाडा - भाग 5: दोन आत्म्यांची कहाणी

सकाळ झाली. पण आर्यनसाठी सकाळ झालीच नव्हती. रात्रभर त्याने डायरीत एकच ओळ लिहिली होती - "उद्या तळघरात जाणार." पण सकाळी उठल्यावर त्याच्या डोक्यात दुसराच विचार आला.

रघुनाथ म्हणाला होता - "दत्ताला मी मारलं." म्हणजे दत्ताचा आत्मा कुठे गेला? त्याची बॉडी तर जाळली होती, पण आत्मा? तो तर इथेच असणार. विहिरीत.

त्याने हरिभाऊला विचारलं, "काका, दत्ताची राख कुठे आहे?"

हरिभाऊ म्हणाला, "त्याची बॉडी विहिरीतच सापडली होती. दोन वर्षांपूर्वी. फुगलेली. आम्हीच काढली. त्याच्या घरच्यांनी घाटावर जाळलं. पण साहेब... त्याला मुक्ती मिळाली नाही. लोक अजूनही सांगतात, पौर्णिमेला तो विहिरीच्या काठावर रडत बसलेला दिसतो विचित्र आवाज करतो शेवटी बिडी ओढतो आणि विहिरीत उडी मारतो.पण गावकरी म्हणतात की तो विहिरीच्या काठावर बसून राखण करत असतो.हे ऐकून दत्ता चमकला आणि त्याने विचारले

"कशाची राखण?"

"सोन्याची."

आर्यन दुपारी विहिरीच्या काठावर जाऊन बसला. डोळे बंद केले. वारा नव्हता. पण तरीही बिडीचा उग्र वास आला. जळक्या तंबाखूचा.

त्याने डोळे उघडले. समोर एक माणूस बसला होता. सावळा, दाढी वाढलेली, डोळे लाल. हातात जळती बिडी. पण बिडीतून धूर येत नव्हता. राख खाली पडत नव्हती.

"कोण तू? इथे का बसलायस? ही विहीर माझी आहे. इथे सोनं आहे. मी राखण करतोय."

"तू दत्ता?"

तो हसला.  दात काळे.

"हो. रघु माझा लंगोटी यार होता. पण त्याने माझे पन्नास हजार बुडवले. मी त्याला गच्चीवरून ढकललं. पण मी सुखी झालो का? त्याच्याच आत्म्याने मला इथे ढकललं. आता मी इथेच आहे. या विहिरीचा कुत्रा झालोय. सोन्याची राखण करतोय. जो कोणी सोनं घ्यायला येईल, त्याला मी मारणार."

आर्यन म्हणाला, "कसलं सोनं? तळघरातलं?"

"हो. पाच हंडा. भोसले घराण्याचं. इंग्रजांनी पुरलं. भैरवनाथला माहित होतं. म्हणून त्याचा खून झाला. त्याच्या बायकोला मारलं. सगळं सोन्यासाठी. आणि मी... मी पण त्याच सोन्यासाठी मेलो. पण आता ते सोनं माझं आहे. कोणालाच घेऊन जाऊ देणार नाही. तुला पण नाही."

हरिभाऊ लांबूनच ओरडला, "दत्ता! तू मेलायस! जा इथून! तुझी बायको-पोरं रस्त्यावर आली तुझ्या लोभामुळे!"

दत्ता उठला. त्याचा चेहरा रागाने काळा झाला.

"माझं सोनं आहे! माझं!" असं म्हणून त्याने विहिरीत उडी मारली. पण पाणी उडालं नाही. आवाज झाला नाही. तो पाण्यात विरघळून गेला.

आर्यनला कळलं - हा लोभी आत्मा आहे. याला मुक्ती नको, याला सोनं हवंय. अशा आत्म्याला मंत्राने नाही, त्याचा मोह तोडून मुक्त करावं लागतं.

रात्री त्याने एक शक्कल लढवली. बाजारातून एक पितळेची हंडी आणली. आत दगड भरले. वरून सोनेरी रंग मारला. चमकायला लागली. ती हंडी विहिरीच्या काठावर ठेवली आणि मोठ्याने ओरडला.

"हरिभाऊ! बघा! सोनं सापडलं! पाच हंडा नाही, एक हंडी तरी सापडली! आपण श्रीमंत झालो!"

आवाज विहिरीत घुमला. आणि पाण्यातून दत्ता धावत बाहेर आला. डोळे चमकत होते.

"कुठे आहे? कुठे आहे सोनं? ते माझं आहे! मला दे!"

आर्यन म्हणाला, "ही घे. उघड."

दत्ताने थरथरत्या हाताने हंडी उघडली. आत... फक्त काळे दगड. नदीतले गुळगुळीत दगड.

"फसवलंस! दगड आहेत हे!"

आर्यन म्हणाला, "हो. हेच आहे सोनं. ज्यासाठी तू तुझ्या मित्राला मारलंस, ज्यासाठी तू जीव दिलास, शेवटी ते दगडच निघालं. बघ, हातात घे. काय मिळालं तुला? मित्र गेला, बायको गेली, पोरं गेली, जीव गेला. हातात काय राहिलं? दगड. सोनं कधीच नसतं, मोह असतो. आणि मोह नेहमी दगडच देतो."

दत्ता त्या दगडांकडे बघत राहिला. त्याच्या हातातली बिडी आपोआप विझली. तो रडू लागला. लहान मुलासारखा.

"मी... मी माझ्या मित्राला... पन्नास हजारासाठी मारलं... माझी पोरं..."

त्याच वेळी विहिरीतून दुसरा आवाज आला. खोल, म्हातारा आवाज.

"तू एकटा नाहीस दत्ता. मी पण आहे. मी पण त्याच दगडासाठी मेलो."

पाण्यातून दुसरा माणूस वर आला. पांढरी दाढी, अंगावर फाटलेलं धोतर, हातात काठी. अंगावर सापाच्या दोन दातांचे निशाण. काळे पडलेले.

"मी किसन. या वाड्याचा नोकर होतो. भैरवनाथचा. त्याने मला सांगितलं होतं - तळघरात सोनं आहे. मी रात्री चोरायला गेलो. तळघरात अंधारात साप होता. चावला. तिथेच तडफडून मेलो. तेव्हापासून... शंभर वर्ष झाली... मी तिथेच आहे. सोन्याच्या पेटीजवळ."

आर्यनला धक्का बसला. म्हणजे विहिरीत एक नाही, दोन लोभी आत्मे अडकले आहेत.

"तुमची हाडं कुठे आहेत?"

किसन म्हणाला, "तळघरात. पेटी शेजारी. कोणीच बाहेर काढली नाहीत. आम्हाला कोणीच जाळलं नाही."

आर्यनने दोर घेतला. टॉर्च घेतली. हरिभाऊला म्हणाला, "काका, आजच तळघरात जायचं."

दोघे विहिरीत उतरले. पन्नास फूट खाली तो दगडी दरवाजा होता. ओलसर, शेवाळलेला. ढकलला तर किर्र आवाज करत उघडला. आतून सडका वास आला त्या वासाने आर्यांनच डोक भनभनलं. शंभर वर्ष बंद असलेला वास.

बोगदा होता. सरपटत जावं लागेल इतका छोटा. बोगद्यातून रांगत गेले. समोर एक खोली. तळघर.

तळघरात एकच गोष्ट होती - मध्ये एक मोठी लोखंडी पेटी. गंजलेली. पाच हंडा बसेल इतकी मोठी. कुलूप अजूनही लागलेलं. आणि त्या पेटीच्या दोन्ही बाजूला दोन सांगाडे. एकाच्या हातात अजूनही बिडी, दुसऱ्याच्या हातात काठी. दोघे पेटीकडे तोंड करून मेले होते. सोन्याकडे बघत बघत.

आर्यनने दोन्ही सांगाडे उचलले. बाहेर आणले. वर अंगणात आणले. एकत्र चिता रचली.

जशी आग लागली, तशी दोन सावल्या चितेवर उभ्या राहिल्या. दत्ता आणि किसन.

दत्ता हसत म्हणाला, "साहेब धन्यवाद. आता कळलं, सोन्यापेक्षा माणूस मोठा असतो. मी माझ्या पोरांकडे जातो."

किसन म्हणाला, "शंभर वर्ष... शंभर वर्ष मी त्या पेटीकडे बघत होतो. आज सुटलो."

दोघे प्रकाशात गेले. पण जाताना दत्ता थांबला आणि म्हणाला, "साहेब, एक सांगू? त्या पेटीला हात लावू नका. ते सोनं शापित आहे. जो हात लावेल, तो मरेल. ते तिथेच राहू द्या. तळघर बंद करून टाका. नाहीतर सातवा, आठवा आत्मा पण होईल."

आर्यनने मान हलवली. आता सहा आत्मे मुक्त झाले होते - सुनिता, श्रुती, कमला, रघुनाथ, दत्ता, किसन.

तो आत आला. लॅपटॉप उघडला. लॅपटॉपवर आपोआप लिहिलं आलं -

*"सहा गेले. आता खरा मालक बाकी आहे. तोच या शापाचं मूळ आहे. भैरवनाथ. त्याची बायको सावित्री. त्यांना मारलं नसतं तर आम्ही मेलोच नसतो."*

क्रमश: