झपाटलेला वाडा - भाग 3: भिंतीतली बाई
विहिरीतली दोन प्रेतं बाहेर आली. सकाळ झाली.
आर्यनने गावातून चार माणसं बोलावली. हरिभाऊने रॉकेल आणलं. कोणाच्याच अंगात हिम्मत नव्हती त्या दोन पांढऱ्या फुगलेल्या बॉडींना हात लावायची. वीस वर्ष पाण्यात होत्या, पण कुजल्या नव्हत्या. सुनिताने श्रुतीला अजूनही घट्ट धरलं होतं. आईची मिठी सुटलीच नव्हती.
हरिभाऊ रडत रडत बोलला, "साहेब, वीस वर्ष. वीस वर्ष ही लेकरं थंड पाण्यात होती. तुम्ही पुण्य केलं."
चिता जळली. दोन चिता. एक मोठी, एक छोटी. जशी आग लागली तसा विहिरीतला काळा रंग एकदम कमी झाला. पाणी पहिल्यांदा निळं दिसलं. आणि त्या ज्वाळेत आर्यनला दोन सावल्या वर जाताना दिसल्या. एक मोठी, एक छोटी. हातात हात घालून. श्रुतीने मागे वळून बाय केलं.
आर्यनला वाटलं, संपलं. आता वाडा शांत होईल.
पण त्या रात्री वाडा शांत नव्हता.
रात्री बारा वाजता परत आवाज सुरु झाला. पण हा पैंजणाचा नव्हता. हा आवाज भिंत खरवडल्याचा होता. *खर... खर... खर...* नखांनी. अगदी हॉलच्या वरच्या खोलीतून. जिथे पहिल्या दिवशी तो झोपला होता आणि लॅपटॉपवर "तीन प्रेतं" टाईप झालं होतं.
आर्यनने टॉर्च घेतली. वर गेला. खोली रिकामी होती. पण भिंत रिकामी नव्हती.
भिंतीवर ताजे ओरखडे होते. चार बोटांचे. आतून बाहेर येण्याचा प्रयत्न केलेले. आणि त्या ओरखड्यांमधून रक्त येत होतं. गरम रक्त. भिंतीतून. थेंब थेंब खाली पडत होतं. भिंत थंड होती, रक्त गरम.
त्याने कान भिंतीला लावला. आतून आवाज आला. एकदम बारीक, म्हाताऱ्या बाईचा.
"मला बाहेर काढ बाळा... वीस वर्ष झाली... या भिंतीत खूप घुसमटते रे माझा श्वास गुदमरतो इथे ..."
आर्यनचा श्वास थांबला. भिंतीत कोणीतरी जिवंत गाडलंय.
त्याने हरिभाऊला फोन केला. हरिभाऊ रात्रीच धावत आला. टॉर्च मारून भिंत बघताच त्याचे पाय लटपटले.
"या खोलीत कमला राहायची. रघुनाथची आई." हरिभाऊ कुजबुजला. "खूप देवभोळी बाई. सुनिता मेल्यावर तिने रघुनाथला सांगितलं - मी पोलिसात जाणार. माझ्या सुनेला मारलंस तू. रघुनाथला राग आला. त्याच रात्री त्याने आईला या खोलीत बोलावलं. आणि... आणि बाहेरून वीट लावून भिंत बंद करून टाकली. जिवंत. मी गावाला गेलो होतो. आलो तेव्हा रघुनाथ म्हणाला - आई काशीला गेली. पण त्या रात्रीपासून या खोलीतून रडण्याचा आवाज यायचा. आम्ही समजायचो वारा आहे."
आर्यनच्या अंगावर सरसर काटा आला. एका आईला तिच्याच मुलाने भिंतीत चिणून टाकलं.
"पाडायची का भिंत?" आर्यनने हातोडा आणला.
"ही मुख्य भिंत आहे साहेब, पाडली तर वाडा पडेल." हरिभाऊ म्हणाला.
"पडू दे. पण ती आत अडकून राहता कामा नये."
पहिला घाव मारला - *धाड!*
भिंतीतून किंकाळी आली. बाईच्या किंकाळीचा आवाज. जणू भिंतीलाच मार लागला.
दुसरा घाव - रक्ताची पिचकारी उडाली. भिंतीतून. ताजं रक्त.
तिसरा घाव - एक वीट निघाली. विटेमागे पांढरे केस दिसले. गुंता झालेला केसांचा पुंजका.
आर्यनने हाताने विटा काढायला सुरुवात केली. प्रत्येक वीट काढताना आतून हुंकार येत होता. पाच वीट निघाल्यावर आत एक छोटी पोकळी दिसली. बसायला पण जागा नाही इतकी छोटी.
आणि त्या पोकळीत एक सांगाडा बसलेल्या अवस्थेत होता. मान वाकलेली. हात मागे बांधलेले दोरीने. तोंडात अजूनही कापडाचा बोळा. डोळ्याच्या खोबण्या उघड्या. जिवंतपणी गाडल्यामुळे ती तडफडली होती. भिंत ओरबाडली होती. नखं तुटली होती.
हरिभाऊ जमिनीवर बसला आणि मोठ्याने रडला, "कमलामाई... तुझ्याच पोटच्या पोराने तुला..."
आर्यनने तो सांगाडा बाहेर काढला. अंगणात आणला. पौर्णिमेची रात्र होती. त्याने चिता रचली.
जशी आगीची पहिली ठिणगी पडली, तसा वरच्या खोलीतला खरवडण्याचा आवाज एकदम बंद झाला. वाडा एकदम शांत.
आणि चितेच्या धुरात एक म्हातारी बाई उभी राहिली. पांढरी साडी. कपाळावर मोठं कुंकू. चेहऱ्यावर हसू. पण डोळ्यात पाणी.
"धन्यवाद बाळा. माझी सून आणि नात मला बोलवायला आल्या होत्या, पण मी या भिंतीत अडकले होते. त्यांना जाऊन सांग, मी पण आले."
तिच्या मागे धुरात सुनिता आणि श्रुती पण दिसल्या. तिघींनी एकमेकींचा हात धरला. आणि तिघी वर आकाशात गेल्या. हळू हळू. प्रकाश होऊन.
आर्यन हसला. तीन आत्मे मुक्त. आता वाडा खरंच शांत होईल.
तो खोलीत आला. लॅपटॉप उघडला. लिहायचं म्हणून. पण लॅपटॉप आपोआप सुरु झाला. आणि त्यावर आपोआप टाईप होऊ लागलं. त्यान टाईप केलंच नाही.
*"अजून एक आहे. गच्चीवर. तो पडला नाही. त्याला पाडलं. त्याची राख अजूनही तिथेच आहे."*
आर्यनचं रक्त गोठलं. म्हणजे रघुनाथचा मृत्यू अपघात नव्हता. खून होता.
तो धावत गच्चीवर गेला. गच्चीची छोटी भिंत. तिथूनच रघुनाथ पडून मेला असं गाव सांगत होतं. पण गच्चीच्या कोपऱ्यात त्याला काहीतरी दिसलं. जमिनीवर घासल्याचे निशाण. दोन पाय घसरल्याचे नाही, एका माणसाला फरफटत नेल्याचे.
आणि त्या कोपऱ्यात, पाण्याच्या टाकीच्या मागे एक बिडीचं थोटूक पडलं होतं. वीस वर्ष जुनं. पावसाने धुतलं नाही. आणि त्याच्या बाजूला राखेचा छोटा ढीग. जणू कोणीतरी मुद्दाम लपवून ठेवलाय.
हरिभाऊ वर आला. ते थोटूक बघून म्हणाला, "हे दत्ताचं आहे. रघुनाथचा मित्र. दारूड्या. रघुनाथने त्याचे पैसे बुडवले होते. रघुनाथ मेल्याच्या रात्री दत्ता इथेच होता. दुसऱ्या दिवशी गाव सोडून गेला. आणि एका वर्षाने तो पण विहिरीत पडून मेला."
आर्यनला सगळी साखळी दिसली - रघुनाथने सुनिता, श्रुती आणि आईला मारलं. दत्ताने रघुनाथला मारलं. आणि दत्ताला कोणीतरी मारलं.
रात्री तो झोपला तेव्हा गच्चीवरून आवाज आला. एका पुरुषाचा. दारू प्यायलेल्या माणसाचा.
"आर्यन... वर ये... मला पण बाहेर काढ... मी पण तिथेच अडकलोय... टाकीच्या मागे..."
आर्यनने वर बघितलं. गच्चीवर एक माणूस उभा होता. डोकं फुटलेलं. रक्त गळत होतं. तोच रघुनाथ. पण तो रडत होता ओरडत होता आणि सुटके साठी अर्त हाका मारत होता.
क्रमश: