झपाटलेला वाडा - भाग 4: शेकोटीतलं सत्य
गच्चीच्या कोपऱ्यात जे पडलं होतं, ते सांगाडा नव्हताच. वीस वर्ष पावसात, उन्हात वाऱ्यात राहून त्याचा एक गोळा तयार झाला होता, वेलींनी त्याला गिळून टाकलं होतं. पिंपळाच्या मुळांनी त्याच्या बरगड्यांमध्ये घर केलं होतं. कवटीवर एक मोठा खड्डा होता. हा पडून झालेला खड्डा नव्हता. हा कोणीतरी जड दगडाने हाणून पाडलेला खड्डा होता. खूनाचा पुरावा.
आर्यनने हरिभाऊला हाक मारली. हरिभाऊ वर आला आणि त्या सांगाड्याकडे बघतच खाली बसला. त्याच्या डोळ्यातून आपोआप पाणी आलं.
"रघु... लहानपणापासून माझ्या खांद्यावर खेळला रे हा. वाईट नव्हता. पण दारूच्या आहारी जाऊन तो या मार्गाला आला... दारूने याच्याकडून आधी बायको-मुलीचा खून करवला, आणि मग त्याच दारूने याचा पण जीव घेतला."
आर्यन म्हणाला, "काका, यालाही मुक्ती हवी. नाहीतर हा इथेच अडकेल."
पण प्रश्न होता - रघुनाथला मुक्ती द्यायची कशी? त्याने आपल्या बायकोला मारलं, पाच वर्षाच्या मुलीला मारलं, आपल्या आईला भिंतीत जिवंत गाडलं. अशा माणसाला अग्नी मिळतो का?
हरिभाऊ म्हणाला, "पापी असला तरी शेवटी माणूस होता साहेब. त्याला शिक्षा देणारा तो वरचा आहे. आपण फक्त त्याला जाळून मोकळं करू. त्याला मारणाऱ्याला शिक्षा मिळायला हवी."
आर्यनने पोलीस पाटलाला बोलावलं. पाटील म्हातारा, मिशाळ माणूस. त्याने सांगाड्याच्या खिशातलं पाकीट काढलं. आत आधार कार्ड नव्हतं, एक फाटलेलं पाकीट होतं. त्यात एक फोटो - रघुनाथ, सुनिता आणि लहान श्रुती. हसत असलेला फोटो.
पाटील म्हणाला, "हा रघुनाथच. पण हा अपघात नाही. हे खून आहे. आणि गच्चीवर ही बिडी..." पाटीलने ते थोटूक उचललं. "...ही दत्ताची. हाताने वळलेली. दत्ता शिवाय कोणीच अशी बिडी वळत नाही."
"दत्ता?"
"रघुनाथचा सावकार. दत्ताने रघुनाथला पन्नास हजार दिले होते व्याजाने. रघुनाथ देऊ शकला नाही. ज्या रात्री रघुनाथ पडला, त्या रात्री दत्ता इथे आला होता. लोकांनी बघितलं होतं. पण दत्ता पण एका वर्षाने विहिरीत पडून मेला. आम्हाला वाटलं दारू पिऊन पडला. पण आता कळतंय..."
आर्यन कुजबुजला, "या वाड्यात एक खून दुसऱ्या खुनाला जन्म देतोय. ही जागा शापित नाही, ही सूडाची जागा आहे."
पाटील म्हणाला, "साहेब तुम्ही निघून जा इथून. या वाड्याबद्दल लहानपणापासून ऐकतोय. इथे आधी पण लोक मेलेत. सोन्यासाठी."
"सोनं?" आर्यनने विचारलं.
पाटील काहीच बोलला नाही. सांगाडा तिथेच ठेवून निघून गेला. पण जाताना म्हणाला, "रात्री चिता जाळू नका. आत्मे रात्रीच मोकळे होतात."
पण आर्यन ऐकणार नव्हता. त्याला रात्रच हवी होती. सत्य रात्रीच बाहेर येतं.
बारा वाजता चिता रचली. अंगणात. फक्त आर्यन आणि हरिभाऊ. वारा अजिबात नव्हता. सगळी झाडं शांत होती जसे त्यांनाही भीती वाटत होती वाराही घाबरून कुठे तरी लपून बसला होता . जशी काडी लावली, तसा एकदम जोरात वारा सुटला. अंगणातली सगळी लाईट बंद झाली आणि सगळीकडे अंधार झाला. फक्त चितेचा अग्नी. तो पण निळा जळत होता.
आणि तेवढ्यात जिन्यावरून आवाज आला. *धप... धप... धप...* कोणीतरी वरून खाली धावत येत आहे. जोरात. अनवाणी पायांचा आवाज.
आर्यनने टॉर्च मारली. जिन्यावर रघुनाथ उभा होता. पण आता तो घाबरवणारा नव्हता. त्याचे कपडे फाटलेले, डोक्यातून अजूनही रक्त येत होतं, पण त्याच्या डोळ्यात राग नव्हता. पश्चाताप होता. वीस वर्षांचा पश्चाताप.
"मला माफ करा... मी पापी आहे. मी माझ्या हाताने माझं घर संपवलं. बायकोला मारलं, मुलीला मारलं, आईला भिंतीत गाडलं... मला नरकात पण जागा नाही."
आर्यन ओरडला, "मग तुला कोणी मारलं?"
"दत्ताने. पैशासाठी. त्याने मला गच्चीवर बोलावलं. दारू पाजली. मी नशेत होतो. त्याने मागून ढकललं. मी पडलो नाही, मला पाडलं. आणि खाली पडल्यावर पण मी जिवंत होतो. त्याने वरून मोठा दगड माझ्या डोक्यात मारला. इथेच... याच जागी..."
हरिभाऊने विचारलं, "मग दत्ताला कोणी मारलं?"
रघुनाथ हसला.विचित्र आवाजात त्या आवाजाने झाडावरचे पक्षी आकाशात उडाले आणि सगळीकडे शांतता पसरली.
"मी. माझ्या आत्म्याने. तो एका रात्री विहिरीवर दारू प्यायला बसला होता. मी त्याला मागून ढकललं. जसं त्याने मला ढकललं होतं. एक सूड दुसऱ्या सूडाला जन्म देतो. ही साखळी कधीच संपत नाही."
त्याच वेळी अंगणात तीन प्रकाश आले. अचानक. वाऱ्याशिवाय. कमला, सुनिता आणि लहान श्रुती. तिघीही पांढऱ्या साडीत. हसत होत्या.
सुनिता म्हणाली, "चला रघु. झालं. आम्ही तुम्हाला माफ केलं. तुमचा सूड पण संपला. आता चला. एकत्र जाऊ."
रघुनाथ रडत रडत त्यांच्याजवळ गेला. श्रुतीने त्याचा हात धरला. चौघांनी एकमेकांचा हात धरला आणि ते प्रकाशात वर गेले. चितेचा निळा अग्नी एकदम भगवा झाला आणि काही मिनिटात फक्त राख उरली.
चार आत्मे मुक्त. वाडा आता खरंच शांत वाटत होता. क्रिकेटचा आवाज परत आला.
आर्यन आत गेला. घाम पुसला. लॅपटॉप उघडला. पण लॅपटॉपवर त्याने लिहिलेलं नव्हतं. आपोआप काहीतरी टाईप होत होतं.
*"धन्यवाद... पण अजून एक आहे. विहिरीच्या खाली. तळघरात. तो सगळ्यांचा बाप आहे. त्याच्यामुळे आम्ही मेलो. सोन्यासाठी..."*
आर्यन गोठला. पाचवा आत्मा. सगळ्यात जुना.
हरिभाऊ आत आला. लॅपटॉपवरचं वाचून त्याचा चेहरा पांढरा पडला.
"तळघर? या वाड्याला तळघर आहे हे मला पण माहित नव्हतं. पण माझा आजोबा सांगायचा... या वाड्याखाली पाच हंडा सोनं आहे. भोसले घराण्याचं. इंग्रजांच्या काळात पुरलंय. जो ते शोधायला जातो, तो परत येत नाही. माझा बाप पण तिथेच मेला."
आर्यन विहिरीकडे गेला. टॉर्च मारली. आता पाणी खूप कमी झालं होतं. चार आत्मे गेल्यामुळे पाणी आटत होतं. आणि तळाशी... तळाशी पाण्याच्या वर एक दगडी दरवाजा दिसत होता. आजपर्यंत पाण्याखाली होता म्हणून कोणीच पाहिला नव्हता. दरवाजावर गंजलेलं कुलूप आणि आतून कोणीतरी खरवडल्याचे निशाण.
विहिरीतून अजूनही थंड हवा येत होती आणि एक आवाज येत होता.
"खाली ये... सोनं घे... पण जीव दे..."
आर्यनने डायरीत लिहिलं, "उद्या सकाळी मी तळघरात जाणार. जर परत आलो नाही, तर ही डायरी गावकऱ्यांना द्या."
क्रमश: