एक प्रेम कथा अशीही.... भाग 8
भाग 7 वरून पुढे
" मग तुला तर ती दुसऱ्याच दिवशी भेटली असेल ना? "
अनिकेतच्या त्या प्रश्नांनी हिरव्यागार बांबूच्या बनात काही काळ तरी अंधारात बुडून गेलेला अभिमन्यू भानावर आला.
" नाही नंतर तिचा काही थांगपत्ताच लागला नाही. दुसऱ्या दिवशी माझे पाय आपोआपच तिच्या घराकडे वळले पण समोरच दृष्य पाहून माझा हिरमोड झाला. तिच्या घराला भलंमोठं कुलूप लावलं होत. अचानकपणे ती कुठे गायब झाली याच उत्तर तर फक्त तिच्याकडेच आहे. तिच्या प्रत्येक मैत्रिणीच्या घरी जाऊन ती कुठे गेली आहे या प्रश्नांनी मी त्यांना भांडावून सोडल पण कुणालाच या प्रश्नाचं उत्तर माहित नव्हतं. कितीतरी रात्र तिच्या आठवणींमुळे मी जागून काढल्या.
एप्रिल- मे महिन्याच्या उष्णतेमुळे धरणी तप्त होऊन पावसाच्या सरी अंगावर घेण्यासाठी ज्याप्रमाणे व्याकुळ झालेली असते त्याचप्रमाणे आमची परीक्षा झाल्यावर सुट्टीच्या दिवसात म्हणजेच एप्रिल मे महिन्यात तिचे गोड शब्द ऐकण्यासाठी माझे कर्ण मोरप्रतीक्षा करीत होते, तिची एक झलक पाहण्यासाठी माझे नेत्र आसुसले होते. शेवटी एकच आशा माझ्या मनात तेवत होती ती म्हणजे निकाल लागल्यावर गुणपत्रिका घ्यायला तरी ती नक्की येईल.
तिच्या आठवणीत एप्रिल - मे महिना कसा सरला हे कळलंच नाही. याकाळात मी कित्येक वेळ तरी त्या बांबूच्या बनात जाऊन तिच्या आठवणीत हरवून जात होतो. आता त्या बनाचीही दुर्दशा झाली होती. तप्त उन्हामुळे बांबूचे बन सुकायला लागले होते. तिथलं एक दृष्य पाहून तर माझ काळीजच पाझरल . तिथे असलेल एक रोपट जळून बेचिराख झाल्यामुळे त्याला आधार घेत फोफावलेली वेलही पिवळी पडून सुकायला लागली होती. माझ्या आयुष्यातही असच सुरु आहे ना... माझ आधाररूपी श्रुती नावाच रोपट कोणत्या स्थितीत असेल या काळजीने माझ मन हेलकावे घेऊ लागल होत.
जुन महिना उजाळला आमचा दहावीचा निकाल लागला. मी चांगल्या गुणांनी पास झालो होतो. ज्यादिवशी आमच्या शाळेत गुणपत्रिकेचे वाटप होते त्यादिवशी पूर्ण दिवस मी शाळेतच थांबून तिची वाट पाहत होतो पण निराशेचा प्रवास काही थांबतच नव्हता. एका सप्ताहानंतर मला कुणीतरी सांगितलं कि तिच्या मामांनी तिचे गुणपत्रक घेऊन तिचे सरकारी घर खाली केले आहे. मी परत आमच्या वर्गशिक्षिकेला याबद्दल विचारणा केली. कुठूनतरी तिचा फोन नंबर मिळविण्याचा शेवटचा प्रयत्न मी करू लागलो. परंतु पदरी निराशाच पडली.
जून महिन्यात तप्त धरणीला पावसाच्या सरी ओथंबून ओल्याचिंब करीत होत्या. मातीचा सुगंध सर्वत्र पसरला होता. भूतकाळाच्या पाऊलखुणा मला परत त्याच वाटेवर घेऊन आल्या होत्या. माझ्या नजरेत भरलं होत ते जांभळाच झाड. मागच्या वर्षी अश्याच वेळेस ती माझ्या जीवनात आली होती आणि या वर्षी त्याच वेगाने ती परतही गेली. खरंच जीवनात कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्यानंतर ते जांभळाच झाड आणि कितीतरी आठवणी असलेल्या त्या बांबूच्या बनात परत कधीच भटकायचं नाही अशी खूणगाठ मी माझ्या मनाशी बांधली. श्रुती नावाच पान माझ्या आयुष्याच्या पुस्तकातून फाडून नवीन सुरवात करण्याचा मी निर्णय घेतला.
11 वीत विज्ञान शाखेला मी प्रवेश घेतला. महाविद्यालयीन अकरावी आणि बारावीचे वर्ष कधी संपले कळालेसुद्धा नाही. तिच्या आठवणीही आता माझ्या मनातून धूसर व्हायला लागल्या होत्या. मधेच कधीतरी फेसबुकवर तिच नाव टाकून तिला शोधण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत होतो. NO Result Found असं फेबूकन मोठ्या अक्षरात दाखवल्यावर माझ्या भाबड्या आशेचा फुगा परत फुटत होता पण आता मला त्याचीही सवयच झाली होती.
प्रथम वर्षाला इथे B.Sc ला प्रवेश घेतला. सर्वकाही नवीन होत माझ्यासाठी. तुझ्यासारखे नवीन मित्र भेटले, मैत्रिणीही भेटल्या. त्या आठवणीपासून कित्येक मैल मी दूर आलो होतो. माझ्या जीवनात एक नवीन मैत्रीणही मला भेटली होती ऋतुजा. खरंतर मलाही तिच्याविषयी आकर्षण वाटतच होत पण श्रुतीला परत बघण्याची आस मनात धुसमटत होती. अजूनही मी तिला पूर्णपणे विसरू शकलो नव्हतो. फ्रेशर्स पार्टी झाल्यावर माझ ऋतुजाकडे आकर्षण तीव्र होत होतं. तिचा सहवास मनाला हवाहवासा वाटत होता. एकदा असाच माझ्या वर्गमित्राचा मला फोन आला आणि नकळतपणे तो म्हणाला
" अरे श्रुती तर इथेच आहे. कालच मी ज्ञानभारती महाविद्यालयात प्रवेशाची चौकशी करायला गेलो असतांना ती भेटली. तिने तिथेच B.com प्रथम वर्षाला प्रवेश घेतला आहे ".
" काय? " एवढा वेळ शांत असलेल्या अनिकेतने प्रश्न विचारला. त्याच्या कपाळावरच्या शिरा सरळ रेषेत जमा झाल्या होत्या.
" ज्ञानभारती विद्यालय हे तर आपल्या कॉलेजच्या बिल्कुल समोरच आहे ना " अनिकेत म्हणाला.
" हो... त्याचे शब्द अजूनही माझ्या कानात झूमत होते. श्रुती इथेच आहे आणि समोर तिच्या कितीतरी सावल्या उभ्या ठाकल्या. पहिल्यांदा जांभूळाच्या झाडाखाली शेंदूर फासल्यासारखा चेहरा झालेली श्रुती, शाळेत निखळपणे हसणारी श्रुती. बांबूच्या बनात अभ्यासात मग्न झालेली श्रुती, माझ्या खोड्या काढणारी श्रुती, शेवटच्या पेपरला मला All the best म्हणणारी श्रुती. कित्येक दिवसानंतर उद्या डोळेभरून पहिल मी तिला ".
" अरे पण अभिमन्यू मग ऋतुजाच काय? तीही तुझ्यावर प्रेम करतेच ना " अनिकेत म्हणाला.
" मला या प्रश्नाचं उत्तर नाही माहित मित्रा ".
" उत्तर माहित नाही कि माहित करून घ्यायचं नाही. समजा जर तुला कधी श्रुतीबद्दल माहित पडलंच नसतं तर ऋतुजाच्या प्रश्नाच तू उत्तर तरी काय दिल असतं? "
अभिमन्यू काही काळ शांत होऊन फक्त अनिकेत कडे एकटक पाहत होता.
" तुझी शांतता बरीच काही सांगून जात आहे मित्रा आणि उद्या जर तुला माहित पडलं कि ती श्रुती नसून दुसरीच कुणीतरी आहे तर ऋतुजाच्या प्रेमरंगाला रंग तरी कुठला दिला असता तू हिरवा कि लाल? ".
" अनिकेत तुझ्या कुठल्याही प्रश्नाच उत्तर सध्या तरी माझ्याकडे नाही आहे ".
" अभिमन्यू भूतकाळात हरवलेल्या मृगजळाला शोधण्याच्या नादात तू ऋतुजाला गमावून बसशील. अरे ज्या श्रुतीने दोन वर्षात तू कुठे आहेस? कसा आहेस जाणून घेण्याचा साधा प्रयत्नही केला नाही तिच्यासाठी तू एवढा कासावीस होत आहेस " अनिकेत म्हणाला.
" तुझ सर्व बरोबर आहे अनिकेत पण तू कधी कुणावर प्रेम केलंय का?? "
" नाही ".
" मित्रा पहिलं प्रेम विसरण खूपच कठीण असतं रे आणि जर ते अल्लड वयात झाल असेल तर कित्येक तरी वर्ष त्या प्रेमासाठी मन झुरत असतं".
" अजूनही मला तुझी भूमिका योग्य वाटत नाही " अनिकेत म्हणाला.
"उद्या कित्येक दिवसानंतर तिला बघून माझे नेत्र सुखावणार, तिचा तो गोड आवाज परत माझ्या कानात घुमणार. किती तरी प्रश्न तिला विचारायचे आहे"
या कल्पनेनं अभिमन्यू सुखावला होता आणि एकटाच मनात खुदुखुदू हसू लागला होता.
क्रमश...
---निखिल देवरे