ती वस्ती आणि समाज Vrishali Gotkhindikar द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ती वस्ती आणि समाज

ती वस्ती ..

आमच्या वस्तीच्या जवळच होती ती वस्ती

पलीकडे गाव होते त्यामुळे गावात जायचे म्हणले की त्या वस्ती वरून जावेच लागे

माझ्या तर या ना त्या कारणाने चार पाच चकरा गावात होत असत

त्यामुळे साहजिकच त्या वस्ती शी माझा सारखाच संबंध येत असे

दोन दोन खोल्या आणी बाहेर थोडा प्यासेज असे त्या वस्तीचे स्वरूप असे

संध्याकाळ ची वेळ होत आली की तिथे एकच गडबड सुरु होत असे

वय सतरा ते वय साठ अशा अनेक वयाच्या बायका तिथे असतात

प्रत्येकाची जात धर्म इतकेच नाही तर प्रांत पण वेगवेगळे असत ..

पण संध्याकाळची गडबड मात्र एकच ..प्रत्येकीच्या खोलीबाहेर एक एक खुर्ची असे

लवकर लवकर आवरून गडद मेकप करून सर्वांची तयारीची एकच धांदल चालू असे

कुणी बेल बॉटम ..कुणी सलवार कुडता ..कुणी मिनी स्कर्ट तर कुणी साडीत ..कुणी तर अर्धवस्त्र पण असे

प्रत्येकीची स्टाइल वेगळी ,रूप वेगळे बांधा वेगळा ..

या सर्व जणी मध्ये एकच गोष्ट कॉमन असे ती म्हणजे त्यांचा भडक मेकअप आणी उत्तांन कपडे ..!

रस्त्यावरून येणारे जाणारे त्या वस्तीकडे बारकाईने पाहत असत ..

ते लोक उगाचच अचकट विचकट खुणा करीत ..

त्या बायका पण त्यांच्या कडे पाहून फिदी फिदी हसत असत

तसे त्या वस्तीचे दर्शन दिवसातून तीन वेळा वेगवेगळ्या प्रकारे घडत असे

तिन्ही वेळचा त्यांचा एकंदर दिवस क्रम पहिला की थक्क व्हायला होत असे

खरेच काय वाटत असेल ना त्यांना असे जगताना ..असे वाटे !!

खरेतर प्रत्येक च बाईला सुखी संसार प्रेम करणारा नवरा मुळे बाळे यांची ओढ आणी आस असतेच

कोणती बाई अशी सुखासुखी हा व्यवसाय पत्करेल ?

याचा अर्थ नक्कीच त्यांची पण काहीतरी अशीच मजबुरी असणार .

जी त्यांना इकडे घेवुन आली आहे ..नशिबाचे फेरे दुसरे काय ..

असे उलट सुलटविचार नेहेमी माझ्या मनात येत असत ,

सकाळी त्यांचा दिवस बराच उशिरा उगवत असे

सात वाजुन् गेले तरी वस्तीला जाग अशी नसे मग मात्र हळू हळू एक एक दरवाजा उघडत असे

मग अत्यंत गबाळ्या आणी अस्ताव्यस्त अवतारात त्या प्रकट होत असत

हातात मशेरी घेवून लावत लावत एकमेकांशी बहुधा कालच्या रात्री बद्दल बोलत असाव्यात ..

कुणीतरी अगदी खुष .कदाचित कमाई भरपुर झाली असावी ..!!

दुसरी एखादी काही वेगळ्याच विवंचनेत ..काय काही समजत नसते .

एखादीला रात्र भर खुप च त्रास झालेला असतो ..मग कालच्या त्या व्यक्तीला शिव्याची लाखोली

वहात दात घासणे चालू असे ..

दुसरी कोणीतरी तिची समजूत घालत उद्या काळजी घे असे समजावत असावी

चहा समोरच गाडी वर उकळत असतो ..त्याची ऑर्डर आधीच झालेली असते

मग चांगले तास भार चहा पान...आणी एकमेकीशी गप्पा चालू असतात

या वेळी मात्र त्यांचे बाहेरच्या जगा कडे त्यांचे अजिबात लक्ष नसते ..

आणी बाहेरच्या जगाला पण त्यांच्या “असल्या “रूपाशी काहीच देणे घेणे नसते

यानंतर मात्र त्यांचे घराकडे लक्ष देणे सुरु होते

त्या लहानशा खोलीत संसार असतो त्यांचा .

काहींची मुले पण असतात ..अनौरस अशी .पण त्यांच्या” काळजाचे तुकडे” असलेली ..

काही मोठी मुले शाळेत जाणारी पण असतात त्यांची शाळेची तयारी करून देणे ..

ही कामे सुरु होतात ज्यांची मुले नाहीत त्या असेच इकडे तिकडे मन रमवत असतात

मुले शाळेत गेली ..लहान मुले झोपली की मग याना स्वताचे भान येते

मग स्वत केलेले चार घास खावुन काही औषध गोळ्या खावून त्या थोड्या विश्रांती घेवु पाहतात

औषध गोळ्या हा त्या जीवनाचा एक अविभाज्य घटक असतो

त्या शिवाय संध्याकाळी उभे राहणे केवळ अशक्य असते ..!

दुपार मग सारी अशी तशीच जाते ..

कधी तरी कुणी दलाल किंवा हेडे भेटायला येत असतात ,मग वाद घासाघीस वगैरे चलते

चार च्या सुमारास परत मग सारा कोलाहाल चालु होतो ..

त्यांचे आवरणे सावरणे वेणी फणी कपड्यांचा चोइस हे सारे सुरु होते

एकमेकींच्या बरोबर सारे आवरताना सारा एकच गोधळ सुरु असतो .

कपडे त्यावरचे दागिने सिलेक्ट करणे एकमेकींना मदत करणे

कपडे शक्यतो आपल्या गिऱ्हाईकाला आवडतील तेच घालणे .तोच तो रोजचा “भडक” मेकअप करणे

यात दिवस कलतीला लागू लागतो

आता त्यांची मुले शाळेतून येऊ लागतात .

त्यांच्या खाण्या पिण्याची तजवीज झालेलीच असते ..

त्यामुळे त्यांच्या कडे विशेष लक्ष द्यावे असे काहीच नसते

दुपार पर्यंत प्रेमाने वागणारी त्यांच्यातली “आई “आता लुप्त झालेली असते

मुलांना पण या गोष्टींची सवय असते ..रोजचेच असल्याने मुले आई कडे न पाहता आत जात असतात

पण काही अगदी छोटी मुले मात्र आईकडे जायचा .ठेका घेतात

त्या मुलाकडे अथवा त्यांच्या रडण्या कडे आता आईची लक्ष पण देण्याची इच्छा नसते

त्यांना सांभाळायला “मावशी :असतेच ..

अशा वेळी कदाचित आईच्या मनाला वेदना होत असतील ..पण काय करणार ..बिचारी !!!

मुलाकडे “लक्षपूर्वक ‘दुर्लक्ष करणे भाग असते

आता संध्याकाळ ऐन भरात येते

वस्तीच्या बाहेर सर्वजणी मिळेल त्या ठिकाणी खुर्च्या घालून बसत.

आणी मग सुरु होत असे गिऱ्हाईका ना पटवणे हा प्रकार .

अशा वेळी त्या वस्तीत अशी काही धूम चालत असे

की आमच्या सारख्या “पांढर पेशा लोकांना त्या वेळी तिकडून जायला लागणे

म्हणजे महा कर्म कठीण वाटत असे !!

यांनतर मात्र त्या वस्तीत काय चालते हे आम्ही पाहू शकत नसे

पण कल्पने वरून नक्की जाणत असू तिथे काय काय चालत असेल

कधी विचार आला तर एक स्त्री म्हणुन मला वाटत असे

की कोणती.. बाई आपल्या संमतीने या व्यवसायात शिरत असेल ?

शक्यच नाही ..

कदाचीत “कातडी व्यापार “..या मुळे अनेक जणी या व्यवसायात ओढल्या जात असतील

आणी एकदा इथे आलात की परतीचे सर्वच मार्ग बंद असतात त्यांच्या साठी

मग शेवट ही इथेच होतो स्वताचा आणी स्वतच्या मुलांचा अथवा मुलींचा पण ..!!!

काही गोष्टी समाजात घडत असतात

त्याला कुणाचा च इलाज नसतो

तरी देखील संध्याकाळी देवा पुढे हात जोडल्या वर नक्कीच प्रार्थना असते

की देवा कोणत्याच मुलीवर” त्या वस्तीत “राहण्याची वेळ येऊ देवू नकोस ..!!