मावशी Vrishali Gotkhindikar द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मावशी

तीला मावशी म्हणत असे मी शेजारच्या वाड्यात होती राहायला
आणी आईकडे पण नेहेमी येत असे कधी गप्पा करायला तर कधी काही शिकायला
खूप मोठे अगदी गुढग्या पर्यंत पोचणारे दाट लांब सडक केस
गोरा रंग ..दात थोडेसे पुढे आलेले .डोळे थोडे घारे..उंची बेताची
दिसायला अशी थोडी बेताची ..म्हणाना
बुद्धीने पण सुमार त्यामुळे शिकण्यात पण गती नव्हती
घरातले शेंडे फळ होती ती मोठी सर्व भावंडे खूप हुशार वगैरे
बहिणी पण दिसायला चांगल्या
त्यामुळे हिच्या कडे घरच्या लोकांचे तसे फार से लक्ष नसे
काही करायला गेली की ..गप् बस ग तुला काय समजतेय?
असा शेरा सगळीकडून मिळत असे ..
तिची आई पण मग त्राग्याने .तु काही करू नको सगळे बिघडवून ठेवतेस
असे म्हणत असे ..आणी कामा पासून तीला दूर सारत असे
ती मग खूप हिरमुसली होवून आमच्याकडे येवून बसत असे
तशात ती तरुण होत होती तेव्हाच घरची परिस्थिती खालावत गेली
मग हिचे नटणे चांगले कपडे वापरणे यावर पण संक्रांत आली ..
भाऊ म्हणत वेडपट आहेस तु ..शिकत नाही काही नाही मग कशाला हवे नटणे
बस घरातच ..
असे करीत वेडी ..बिनकामाची .लहरी .अडाणी असेच शिक्के तिच्यावर बसत गेले
आणी मग भावंडाना पण तीचे घरात असणे खुपू लागले
आता उजवून टाकू हिला ..बघा एखादे स्थळ .असे सगळीकडे सांगू लागली
तिच्या मनाचा विचार कुणालाच करावा वाटत नव्हता .. .
ती पण उद्धट आणी बेफिकीर झाली ..कुणाचेच ऐकेना
अशात एक छान स्थळ आले तिच्या साठी
मुलगा देखणां ..शहरात कामाला .त्याने पसंत केली तीला
घरच्यांना पण नवल वाटले ..हे ध्यान कसे काय पसंत पडले ?
पण बरे झाले ..पीडा गेली ..असे म्हणून त्यांनी जास्त चौकशी न कर्ता उजवून टाकले तीला
ती मनात खुष होती ..शहरात वेगळा संसार ..नवरा देखणां आणी काय हवे
आनंदाने सासरी गेली ती ..
पहिल्यांदा माहेरी आली घरच्यांनी कौतुक केले खूप
पण नवरा न्यायला आला तो नाराज होता ..काम काही येत नाही
हे असले बावळट ध्यान माझ्या गळ्यात बांधले
मला फसवले ..असे म्हणू लागला ..
घरच्या लोकांनी तीला चार गोष्टी सांगून त्याची पण समजुत काढली ..
मग गेला तो तीला घेवून ,
काही दिवस बरे गेले ..आणी पहिल्या बाळंत पणा साठी ती माहेरी आली
बोलण्या बोलण्या तुन समजले
तिच्या नवऱ्याची शहरात ठेवलेली “बाई होती ..
नोकरीचा पण .. काही खास ठिकाण नव्हता
हिला नोकरा सारखे वागवत ..नशीब इतके की मार झोड करत नसत !
मावशी खूप हिरमुसली होती ..पण वाटत होते बाळ झाले की काही सुधारणा होईल
आणी मग मावशीने एका सुंदर कन्येला जन्म दिला .
घरची पण सगळी हरखली इतकी सुंदर मुलगी .खूप दिवसात या घरात जन्मली नव्हती
नवरा आला बारशाला पण मला मुलगी नको होती म्हणाला
हिला परत नाही नेणार ..असे म्हणून पाहून चार घेवून सटकला
मग काय मुली बरोबर हिला आईच्या घरी राहणे भाग पडले
भाऊ बहिणी या पूर्वीच मार्गाला लागले होते
त्यामुळे घरात ही आणी आई ..
मावशीची मुलगी आजोळी मोठी होवू लागली .
आणी अचानक मावशीचा नवरा परत आला ..शहरात जागा घेतली आहे ..
मला नोकरी पण चांगली लागली आहे असे सांगू लागला
सर्वाना वाटले दिवस पालटले ..वाट्ते हिचे ..!
मग अधून मधून येवू लागला .काही तरी घेवून ,मुलीचे पण कौतुक करू लागला
आज नेतो ..उद्या नेतो असे म्हणू लागला
आणी मग परत मावशीला दिवस राहिले
शरीराच्या गरजे साठी तो येत होता हे समजल्या वर मात्र
मावशीच्या आईने कडक शब्दात त्याला सुनावले आणी येणे बंद केले त्याचे
आता दुसऱ्या वेळी पण मावशीने “अधिक सुंदर मुलीला जन्म दिला
आता भाऊ बहिणींनी तिची चौकशी करणे सोडून दिले
त्यांचा स्वताचा मोठा वाडाहोता .थोडी शेती ..चौघींचे बऱ्यापैकी भागू लागले
मुली हळू हळू मोठ्या होत होत्या .
तालुक्याच्या गावी जावून शिकल्या ..
हुशार आणी देखण्या त्या मुली पाहून मावशीला खूप कौतुक वाटे
मुलीना पण आईची कणव वाटे .पण बापाचे रक्त पण होते ना अंगात
मग त्या कधी कधी आईला हिडीस फिडीस करत ..मावशी खूप नाराज होत असे तेव्हा
त्यांच्या रुप गुणा मुळे यथावकाश त्यांचे पण “राजकुमार
त्यांना न्यायला आले चांगली घरे मिळाली त्यांना
लग्नात मात्र मावशीचा नवरा येवून मिरवत असे व रुबाब दाखवे
बाकी मुली आणी मावशी यांच्या बाबतीत त्याची जबाबदारी शून्य असे
मी पण माझ्या सासरी रमले होते ..आईकडून कधीतरी काही समजत असे ..
नंतर सारे आहे तसेच चालू होते आता मावशी आणी तिची आई फक्त होत्या शेजारी
आणी तिच्या आईने सुद्धा आपला इथला प्रवास संपवला
मध्यंतरी बरेच दिवस काहीच चौकशी न करणारी तिची भावंडे आईच्या क्रीयाकर्माला
आली होती .तिथेच विषय निघाला
आता तिच्या भावंडांना ती नको होती
हा वाडा ती बळकावेल असे त्यांना वाटले .तीला नवऱ्याकडे पाठवून द्यायचे ठरले
तिच्या नवऱ्याचे भावंडा पुढे काही चालेना ..तो अखेर तयार झाला तीला न्यायला
मावशीला जायचे नव्हते ...पण
मावशीच्या हातात काहीच नव्हते .तिच्या रडण्याला अंत नव्हता
माझ्या आई पाशी ती खूप रडली ..
पण माझी आई तरी काय करू शकणार होती .
तिच्या नवऱ्याला बोलावून मावशीला पाठवून देण्यात आले .
यानंतर तो वाडा विकला गेला ..आणी मावशीचा विषय पण संपला !!
मी जेव्हा कधी माहेरी येत असे ..तिचा विषय आईच्या आणी माझ्यात हटकून निघत असे
काही दिवसा पूर्वी पंढरपूरला गेले होते देव दर्शनासाठी
तिथे फुट पाथवर एक भिकारीण मरून पडली होती म्हणून चौकशी साठी पोलीस आले होते
बघ्यांची ही .मोठी गर्दी जमली होती .
कोणी कोणी त्या भिकारणी विषयी बोलत होते
अरे .वेडी होती ती
तिचा नवरा तीला इथे भीक मागायला बसवून गेला होता
अधून मधून तिने गोळा केलेली भीक घेवून जायला यायचा
पैसे काढून घेतल्या वर दोन तीन दिवस उपाशीच जायचे ..तीचे बिचारीचे
सहज म्हणून मी डोकावले ..पाहते तो काय ती “मावशी ..होती
मी तिच्या साठी पूर्वी पण काही करू शकत नव्हते .
आणी आता काय करणार होते ?..माझ्या डोळ्यात पाणी आले मी चटकन बाजूला झाले
तिचा विवर्ण चेहेरा ..आणी ते श्रांत क्लांत शरीर मला पाहवेना ..
एका चांगल्या घरातल्या बाईला .असे रस्त्यावर मरण आले
कदाचित यालाच “दैवगती म्हणत असावेत