प्रेम-गीत (कथा ) Arun V Deshpande द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रेम-गीत (कथा )

कथा –

प्रेम-गीत

ले-अरुण वि.देशपांडे

कथा -

प्रेम-गीत

ले- अरुण वि.देशपांडे

---------------------------------------------------------------

माणसाचे वय कितीही असू दे त्याच्या मनाला जेव्न्हां ,प्रेम-भावनेचा स्पर्श होतो ,त्यानंतर त्याच्या आयुष्यात विविध भावनांचे इंद्र-धनुष्य फुलून येते.त्याचे ते नेहमीचेच जग त्याला अनोखे आणि जादुभरे वाटू लागते ,त्याच्या निरस आणि मरगळून गेलेल्या जीवनात अचानक नव- चैतन्य आल्या सारखे होऊन, त्याच्या मनात एक नवा उत्साह संचारतो

. त्याच्या बदलत्या नजरेला तोच तो परिसर आता नव्याने नवा दिसू लागतो ,कोमेजून गेलेल्या मनाला फुलावे वाटते ,पाखरासारखे खुल्या आकशात भारारी मारावीशी वाटते , एकांतातात बसल्यावर मन एखादे मधुर गाणे आपसूकपणे गुणगुणायला लागते , मग जाणवते ..अरेच्या हे तर "प्रेम-गाणे " आहे,

आरती भानावर आली आणि तिच्या मनाने हळूच तिच्या कानात सांगितले - "यस आरती , तू प्रेमात पडली आहेस.

तिला जय " आठवला ", तिच्याच बाजूच्या एक ऑफिसमध्ये काम करणारा काम्पुटर इंजिनियर - जयदेव ,

ट्रेन-मधला रोजचा सह-प्रवासी , दोघांनाही माहिती झाले की .आपण कार्यालयीन असे सख्खे शेजारी आहोत , जुजबी परिचयाच्या पलीकडे काही गाडी सरकेना . एक मात्र झाले..अनोळखीपणा कमी झाला ,आणिएकमेकांना पाहून दोघांच्या चेहेऱ्यावर परिचयाचे स्मित दिसणे सुरु झाले .यातच पहिले काही महिने खर्ची पडले .

तरुण मनाला एकमेकांविषयी आकर्षण असणे , एक अनामिक ओढ असणे अगदी नैसर्गिक आहे.आरती आणि जयदेव दोघे ही फार फार तर - पंचीवीशी ते तिशी च्या एज-ग्रुप मधले असतील "असे त्यांच्याकडे पाहून वाटत असे.शिक्षण संपणे आणि लगेच छानशी नोकरी मिळणे "कित्ती छान असते ना ,,या बाबतीत आरती आणि जयदेव दोघे ही नशीबवानच आहेत असे म्हणावे लागेल.

रोजच्या आणि धावपळीच्या दिनक्रमामुळे दिवस आणि महिने कधी आले आणि कधी गेले कळत नव्हते ,अलीकडच्या काळातले "वर्क-कल्चर"फारच तणावाचे झालेले होते ,घरी-दारी- तीनही प्रहर मन जणू तणावाखाली आहे असे वाटण्यासारखी परिस्थती अनुभवत असलेल्या आरती आणि जयदेव यांची मैत्री नवे रंग भरण्यात फारशी प्रगती करू शकत नव्हती.एक मात्र झाले होते - ते म्हणजे ठरलेल्या गाडीने जाणे हुकले तरी त्यांना ते चालू शकत होते " ही नाही तर ,जी मिळेल ती ", असे ठरवून थोडा वेळ भेटून-चहा सोबत गप्पा सुरु झाल्या होत्या.

एखादी व्यक्ती मनापसून आवडू लागते "तेव्न्हा पासून आवडत्या व्यक्तीचा सहवास सारखा घडवा असे वाटत असते", एक वेडच लागते अशा वेळी मनाला ..आरतीला गेल्या काही दिवसापासून जाणवू लागले होते की' जयदेव आपल्याशी बोलायला खूप आतुर असतो, उत्सुक असतो, आफिस बाहेर तिची वाट पहात रेंगाळणारा जयदेव तिला दिसायचा ",तिच्या खुर्चीत बसून हे पाहतांना आपल्या मनाला खूप छान वाटते आहे "याचा अनुभव ती घेत असे.

आणि मग, कॅफे मधल्या चहा सोबतच्या गप्पांना एक वेगळीच खुमारी येऊ लागली.

आरतीची अशी अवस्था ,जयदेव तो देखीलआपल्या मनाची हळवी -अवस्था पाहून हरखून गेला होता . त्याच्या मनात त्याच्या प्रिय -व्यक्तीची जी चित्र-फ्रेम होती ..त्यात आरती शिवाय आता कुणाचे चित्र येऊ शकणार नव्हते .

थोडक्यात '"आग दोनो तरफ बराबर लग चुकी थी..

आपण एकमेकांच्या प्रेमात पडलेलो आहोत ..ते व्यक्त करण्यासाठी सुद्धा मन जितके अधीर असते ,त्या पेक्षा "सांगायचे कसे ?, तो-नाही म्हणाला तर ? ही भीती आरतीच्या मनाला वाटत होती ,आणि इकडे ,

जयदेवला वाटायचे - आपले बोलणे ऐकून आरती म्हणायची. अरे, मी तर तुला फक्त एक छान मित्र समजते , तुझ्या बद्दल असे काही कधीच माझ्या मनात ही नाही आले ", आणि तू तर चक्क म्हणतोय - तुझ्यावर प्रेम आहे..!

आपण आपली मैत्रीच जपू या .

दोघे ही आपापल्या जागी मनातल्या मनात ठरवत होते ..उद्या नक्की सांगू या."पहले आप-पहले आप ", तू सांग -मग.मी ..! यातच दिवस जाऊ लागले

आणि एक दिवस -गावाकडे असलेले जयदेवचे आई-बाबा काही दिवस रहाण्यासाठी म्हणून त्याच्याकडे आले .एक-दोन दिवसातच त्यांच्या येण्याचा हेतू आणि उद्देश त्यांनी स्पष्ट शब्दात जयदेवला सांगितला - हे बघ पोरा - आम्ही आता इथे आलो आहोत ते तुझ्यासाठी छानशा -अनुरूप अशा मुलीच्या शोधात ..हे काम करूनच आम्ही पुढचे काय ते ठरवूत.त्या अगोदर तू तुझे काही ठरवून वगेरे ठेवले असेल तर मोकळेपणाने सांग .उगीच बळजबरीचा राम-राम नको"

रोखठोक स्वभावाच्या बाबांना त्यावेळी तरी जयदेवने काही उत्तर दिले नाही त्याला शांत बसलेला पाहून मग –

आई म्हणाली - आता आम्ही तुझ्यासाठीची वधू-शोध मोहीम सुरु करतो रे बाबा. तुझ्या आफिसच्या कामातून तू वेळ देशील जरा आम्हाला , . केव्न्हाही पहावे तर -.. तुमचे आफिस आणि काम घरात पाठोपाठ येते ,पिच्छा काही सोडत नाही तुमचा, त्यात पुन्हा "माझा कॉल आहे म्हटले की .पुढे - २-३ तास घरतल्या माणसांना बोलायची बंदी ..अतीच झाला बाबा रे ..!

आईची तक्रार खरीच होती..सफाई तरी काय द्यावी ..जयदेवने आईकडे पाहून नुसते स्मित केले आणि ..आता पुढचे काय ? आपल्या मनातले आरती जवळ बोलून दाखवलेच पाहिजे..यात उशीर करायला नको..काय सांगावे .तिचे घरचे सुद्धा आपल्या आई-बाबा सारखे घाई करीत असतील तिला ..लग्न करण्यास हो म्हण " .

आपण इतके मुख-दुर्बल असण्याचा जयदेवला खूप राग येत होता.पण.मनातले ओठापर्यंत येऊन थांबत होते..अचानक त्याला वाटले ..आपण .आपल्या मनातले -कवितेतून सांगू या .जसे जमेल तसे..तिला भावना समजणे महत्वाचे.-रात्रभर जागून..मंत्ल्या भावनाना शब्दरूपात त्याने उतरवले .आता सकाळी आरतीला हे द्याचेच .जे होईल ते होईल..विचार पक्का झाला

.त्याच्या मनातील भावना शब्दरूपात आली ती कविता होऊन..

त्याने लिहिले -

प्रिय आरतीस ...

एकदा,

तू विचारलस मला ,

प्रेरणा ,उत्साह देणारं

कुणी अगदी जवळच

असं कुणी असावं

असं तुम्हाला वाटत नाही का ?

वाटत होतं ना..

म्हणून तर ,

तू विचारलस ,पहिल्यांदा

त्या दिवशीच-

मनाच्या कोऱ्या कागदावर

कोरून ठेवलाय मी - तूझेच नावं ...!

दुरावलेल्या माणसांनी जवळ यावे

सोबातच्यानी समजून उमजुन घ्यावे

हसत-खेळत राहावे आणि जगावे

ही जशी तुझी ,तशीच माझी इच्छा ,

कपाळावरती आठ्या दिसणे ,

दुर्मुखलेले चेहेरे पहाणे

तुला अजिबात आवडत नाही ,

बघ - आपली आवड सुद्धा कित्ती सारखी ..

म्हणून, तू मला भावणारी, आवडणारी

एक प्रिय आहेस, यापुढेही असशील ....!

आपल्या मनातल्या भावनांचे प्रतीबिम्च जणू या कवितेत आहे असे जयदेवला वाटत होते , आरतीला काय वाटेल ?

ती उत्तर देईल की ..केराची टोपली दाखवेल..? बापरे ..! कल्पनेने जयदेव घाबरून गेला .

झोपेची आराधना करीतच तो झोपी गेला .

रोजच्या प्रमाणे आफिसला जाणाऱ्या लोकल ने दोघेही निघाले .रोज सहजतेने बोलणारा जयदेव आज बोलतांना बोलू की नको..? अशा द्विधा अवस्थेत आहे ही आरतीला त्याच्याकडे पाहतांना जाणवले .ती मनात विचार करीत होती ..

काय झाले असेल याला आज? काही सिरीयस असेल का ?

तिने विचारलेच - काय हो -आज इतके अन-इझी का दिसतंय तुम्ही , काही प्रोब्लेम झालाय का घरी ? सांगा तरी मला खूप काळजी वाटते आहे तुमची.

आरतीच्या स्वरातील आपलेपणा ,आणि आस्था -त्याला सुखावणारी वाटत होती , त्याची भीती बरीचशी कमी झाली.

दिल की धडकन ..शांत होते आहे असे जाणवले . तो म्हणाला ..असे काही नाही , तुम्ही नका करू इतकी काळजी ,तसे असते तर मी सांगितले असते की तुम्हाला .

त्याचे सांगणे आरतीची काळजी कमी करणारे होते , तिचा नॉर्मल चेहेरा पाहून तो अधिक स्थिरावत होता.

आपपल्या आफिस समोर दोघे उभे होते ..मनात धैर्य एकवटून ..जयदेव ने खिशातले पाकीट काढून आरतीच्या हातात देत म्हटले ..न रागवता याचे उत्तर द्यावे - .उत्तर कसेही असो, मी ते स्वीकारीन.

हे पत्र देतांना जय्देवचा हात थरथरत आहे, त्याच्या हाताला घाम फुटला आहे, चेहेर्यावर फक घाबरून गेलेले भाव होते.

.

त्याच्याकडे पाहूनच तिला या पत्रात काय असावे ? याची कल्पना आली.मनातल्या मनात तिला हसू येत होते , असेच पत्र देण्याची वेळ जर तिच्यावर आली असती तर "आपली अवस्था या पेक्षा वेगळी झाली नसती " हे ती मनातल्या मनात काबुल करीत होतीच. जय्देव्च्या हातून ते पाकीट घेत ती आफिस मध्येगेली. थोड्यावेळाने पाहू या .काय लिहिले आहे या महाराजांनी ?'..पण, दिवसभर कामाचा लोड इतका आला की. ते बिचारे पत्र तिच्या पर्स मध्ये तसेच पडून राहिले

..इकडे,

जयदेव आफिस सुटण्याची वाट पहात होता - जातांना आरती नक्कीच काही सूचक तरी बोलेल याची त्याला खात्री होती...आणि बॉसचा निरोप आला ..अचानक मिटिंग ठरली आहे ..आज तुला थांबायचे आहे जयदेव. ओमफस झाली गाडी. .त्याला थांबावे लागले , आज सोबत येता येणार नाही,मिटिंग आहे.असा निरोप आल्यावर ,आरती घराकडे परतली

.

झोपण्याच्या वेळी तिने पर्समधले जयदेवचे पत्र काढले .लांबलचक मजकुराचे पत्र असेल .हा तिचा अंदाज चुकला , त्याची कविता तिने वाचली , एकदा -दोनदा ..अनेकदा .. खरेच ,आपण कसे आहोत हे "जयदेवने मनापासून ओळखले आहे. गेल्या वर्ष-दोन वर्षातला सहवास परस्परंना समजून घेण्यात गेलाय ..हे या कवितेतून नक्कीच जाणवले . तिला जयदेव आवडला होता , ही आवड आता प्रीतीरुपात झाली आहे , कधी न कधी हे गोड गुपित सांगून टाकावे " असे ती ठरवीत होती .पण,कधी नि कसे सांगायचे ? या स्टेशनावर गाडी रुकली होती.

आज शेवटी जयदेवने पुढाकार घेतला आणि मन मोकळे केले ..पुढचा मार्ग सुकर केलाय.

खरे तर - तिच्या आई-बाबांनी एक-दोनदा तिला विचारले ..काय ग -कुठे जमवले नाहीस ना ? परस्पर करून याल ,आणि आमच्या पायावर डोकं टेकवाल. काही भरवसा नाही आजकालच्या पोरांचा ."

तसे काही नाही हो बाबा -फक्त इतकी घाई -घाई करू नका ..मी सांगेनमाझ्या मनाची तयारी झाल्यावर .

इथेच तो विषय थांबला होता

.

आजच्या त्याच्या पत्राने पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागणार होती ..तिला तिचे मनोगत त्याला कळवायचे होते .काय लिहू ? भल्या मोठ्या कागदावर मध्यभागी एकच शब्द लिहायचा --" "हो"...!

तो समजून घेईल .."हो" शब्दात काय नव्हते ..तिच्या अबोल -नि:शब्द प्रेमाचे रामायण होते ..एक अवीट गोड असे महाकाव्य होते त्या एका प्रेममय जादू भरल्या शब्दात.

तिला आठवले ..काही महिन्यांपूर्वी त्यांच्या आफिस मध्ये एक इव्हेंट होता ..गेट-टूगेदर होते . म्युझिकल आयटम , कविता -गाणे "असे कार्यक्रम झाले ..त्यावेळी एका कवीची ऐकलेली कविता तिला खूप आवडली होती, तो संग्रह तिने काढला आणि आरती तिच्या मनातली भावना सांगणारी कविता जयदेव साठी लिहू लागली –

" गीत हळुवार एक ...!

-----------------------------------------

गीत हळुवार एक

मी तेव्न्हा म्हटले होते

ते होते तुज्साठीचे

तुलाही माहित होते .

सूर सगळे त्यातले

सरळ साधेच होते

भावले तुजला सारे

मलाही माहित होते .

येतो बहर उशिरा

जरासे माहित होते

फुलेल मन उशिरा

तुलाही माहित होते .

गुज मनोहर गोड

तुजला सांगायचे होते

ऐकण्या आतुर तू

मलाही माहित होते .

मनातली अव्यक्त प्रीत -भावना व्यक्त करणे वाटते तितके सोपे मुळीच नाही..याचा अनुभव आरती घेत होती..

"प्रेमावीण हे व्यर्थ हे जीवन

सांगत आले किती जन

कळूनी आला अर्थ यातला

गुंतले जेव्न्हा तुझ्यात मन...!

उद्याची सकाळ ,उद्याचा दिवस आरतीच्या जीवनाला प्रेममय बनवणारा होता अधिरतेने -आतुरल्या मनाने त्या नव्या पहाटेची वाट पाहण्यात तिला कधी झोप लागली कळालेच नाही.

रोजच्या प्रमाणे दिवस उजाडला ..आफिसला जाणाऱ्या लोकल मध्ये दोघांची भेट झाली. आरतीने तिचे पत्र त्याच्या हाती दिले ..क्षणाचा उशीर तिला खूप मोठ्ठा वाटू लागला .जयदेवने तिचे पत्र वाचले .कविता वाचली..मनोमन तो सुखावला , त्याच्या नजरेने तिला त्यांच्या मनातले सांगितले . जयदेवने पहिल्यांदा तिचा हात त्याच्या हातात घेतला .तो आश्वासक स्पर्श ..जीवनभरच्या साथ-सोबतीसाठीचा वादा होता.

एक सुरेल प्रेम -गीत दोघांच्या मनात सुरु होते ..त्यांच्या शिवाय कुणाला ऐकू येणारही नव्हते ...!

----------------------------------------------------------------------------------------------------------------------कथा -

प्रेम-गीत

ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.

Mo- 9850177342

email -

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------