प्रिय ..
काल तीस वर्षे झाली आपल्या सहजीवनाला
खरेच विश्वासच बसत नाहीये .
असे वाटते काल का परवा तर झालेय आपले लग्न ..!
सावरीच्या नाजुक अलवार कापसा सारखे उडाले नाही हे दिवस ..
आपल्या प्रथम भेटीतच जाणवला होता तुझा “उमदा “स्वभाव
का कोण जाणे पहिल्या भेटीतच खात्री झाली होती माझी की तु मला खुप सुखी ठेवशील
तशी फारशी काही अपेक्षा नव्हती माझी जोडीदारा विषयी ..
पण त्या अपेक्षांच्या पलीकडे जावून खुप भरभरून दिलेस मला सारे काही तु ..!!
ही सगळी खट्टी मिठ्ठी ..(खट्टी कमी आणी मिठ्ठी .जास्त )..वर्षे खूप आनंदात गेली
तसे सामान्य माणसासारखेच होते आपले ही आयुष्य .
पण अनेक अडचणी मधून सुद्धा तुझी भक्कम साथ फार मोलाची ठरली
कुठल्याही नात्यात एकमेकांना “समजून घेणे “फार महत्वाचे असते
आणी आपण तर एकमेकात सामावूनच गेलो होतो !!
मला खुप “अप्रूप आहे तुझे तुझ्या स्वभावाचे तुझ्या “दिलदार आणी प्रामाणिक वृत्तीचे !!
माझ्या दृष्टीने तु माझा “कोहिनूर “हिराच आहेच
शिवाय तुझ्या सारख्याच गुणी, सुंदर, आणी हुशार अशा
“आपल्या मुलाची” मी आई आहे याचा ही मला अभिमान आहे !
मी फार देव देव करणारी नाही ..पण
आपल्या कामाला, निष्ठेला, विचाराना, च मी देव मानते
तरीही त्या आकाशातल्या देवाची मी कायम “ऋणी “ राहीन तुझ्या सारखा जोडीदार
बहाल केल्या बद्दल ..!!
तसे तुझे माझे नाते काही वेगळेच आहे
आज इतकी वर्षे झाली तरी आपल्याला एकमेकांचा कंटाळा अजिबात येत नाही
पण आज काल का कोण जाणे त्याच त्याच रुटीन चा खुप कंटाळा आला होता
जणु वाहते पाणी तुंबून बसावे ना तसे झाले होते .....
तुला माहीत आहे मला ते एक हिंदी गाणे खुप आवडायचे
छु मंतर हो आजा चल गुम हो जाये
नजरोमे हम् ना आये
धुंढे जहा ..हम ही ना जाने हम् है कहा.... चल दोनो !!
असे वाटायचे खरेच कुठेतरी गायब व्हावे ..
आणी ती संधी अचानक च आली ..
त्या छोट्या गावी जायचे ठरले तेव्हा ..खरे तर तो निर्णय घ्यावा का नाही
यावर आपण ..खुप विचार केला होता ..
आणी तु अगदी ठाम होतास ..
“तु नको काळजी करू ..जरी अनोळखी गाव असले तरी जावु आपण
नवे आयुष्य जगायची संधीच दिलीय ..जणु बाप्पाने आपल्याला ..!
आणी दोन तीन वर्षात तर आपल्या घरी इथेच तर परतायचे आहे “
असे तु समजावून सांगितलेस मला
मग मात्र खुप उत्सुकता वाटली तिकडे जायची ...
“आपल्या आयुष्यात आपण कधीच दोन खोल्यात नव्हतो राहिलो
आपले स्वताचे घर सुद्धा आपण कीती मोठ्ठे बांधलेय ना !!
इथे मात्र छान अगदी आपल्या पुरत्याच सुंदर दोन खोल्या मिळाल्या
प्रथम ते छोटे घर पाहिल्या पाहिल्या च आपल्याला आवडले
आपण अगदी हरखून गेलो !!
मग ते सारे थोडे थोडे संसाराचे साहित्य आणणे
काही विकत ...काही आपल्या शहरातल्या घरातून आणणे
नवीन फ्रीज नवे ग्यास कनेक्शन .थोडे नवे फर्निचर
त्या दोन खोल्यात आपल्याला आवश्यक तितके सामान आपण घेतले
त्यानंतर मग किराणा माल भरणे ..
तो तर सारा आपल्या शहरातल्या घरात होताच .
छोट्या छोट्या डब्यातून तो घेवून आलो होतो आपण
अगदी एखादा “लुटुपुटीचा भातुकलीतला.संसार असावा ना अगदी तसा ..!
तसे तर मी दिवस भर घरा बाहेर असायचे
मग आल्या नंतर एकमेकाचा सहवास मिळावा म्हणून आपण ठरवले की अजिबात
टी वी घ्यायचा नाही घरात ..
त्या गावात भांडी घासणे कपडे धुणे अशा कामासाठी बाई मिळत नसे
मग घरचे काम सारे मलाच करावे लागत असे ..तु पण जमेल तसे माझे काम हलके करीत होतास
घरच्या सर्व कामात तुझी मदत तशी नेहेमीच असायची
पण या छोट्या गावात तुझी मदत खूप मोलाची होती
तू आधीच काम करून दमतेस आणखी घरकाम नको करूस असे म्हणायचा
खरे तर तुझी सोबत असणे हीच एक मोठी मोलाची मदत वाटे मला
फक्त नोकरी आणि स्वयपाक इतकीच जबाबदारी मी घेत असे
सकाळी दहा वाजता मी घरा बाहेर पडलेली संध्याकाळी सात पर्यन्त घरी यायची
संध्याकाळी माझी वाट बघत तु खिडकीत बसून असायचास
दिवसाचा सारा वेळ तु तुझे थोडे काम करीत घरी असायचा
त्या लहान गावात जिथे एखादे देऊळ , बाग , अथवा सिनेमा गृह पण नव्हते
तिथे दहा तास एकट्याने बसून रहाणे ही खरेच एक मोठी शिक्षाच होती ...
शिवाय आपल्या कडे तर टीवि पण नव्हता ..
पण तू कधी एका शब्दाने पण असे कधी बोलून दाखवत नसे
आणि आपला वेळ गाणी ऐकणे थोडे नेट पहाणे यात अगदी मज्जेत घालवायचा
तुझे तिकडचे सर्व साम्राज्य सोडून तु माझ्या साठी इथे आला होतास
पण याचा तुला जरा देखील इगो नसायचा !!
दिवस भरात दोन तीन फोन तर तुला मी करीत असायचेच
पण कधी तरी एखादा चुकला तर तू एखाद्या लहान मुला सारखा रूसत असे
मग मीच हसून तुझी समजूत काढायचे !!!
संध्याकाळी निघण्या पूर्वी एक फोन केल्या वर घरी जाताच चहा आणि खाणे तयार असे
मग आपण दोघे आलो की छान चहा घेत गप्पा करीत असू
त्या गावात खुप लवकर संध्याकाळ होत असे
मग आपण ही जेवण खाण लवकर आवरून घेत असु..
प्रचंड उकाडा असे तेव्हा ..त्या दिवसात
आपल्या वरच्या मजल्यावर गच्ची होती
अगदी स्वच्छ सुंदर आणी प्रशस्त् अशी ..
गंमत म्हणजे तिथे एक सुंदर बाक पण होता बसायला
मग आपण दोघे रात्री तिथे जाउन बसत असू
सभोवताली असलेला गावाचा लुकलुकता प्रकाश ..
सुंदर गार गार वारे वाहात असे ..
आकाशात कधी चंद्राची सुंदर कोर ..आणी थोड्या चांदण्या असत
काही वेळा ..वारे इतके जोराचे असे
की आपण अगदी एकमेकांचा हात हातात पकडून बाकावर बसत असू ..
शेजारी असलेल्या टुरिंग टोकीज मधल्या सिनेमातील गाणी सुद्धा मधुनच ऐकु येत असत
आणी मग अर्धा एका तास आपल्या निवांत गप्पा होत असत ..
विषय खरे तर अगदी साधे साधे असत
पण एकमेकांच्या बरोबर असताना त्या गप्पा पण रोमांचित वाट्त असत
सकाळी जाग पण लवकर येत असे
खरे तर उकाड्याने झोप खुप ..डिस्टर्ब होत असे रात्री ..
आपण तर एकदम थंड आणि आल्हाद दायक प्रदेशातून आलो होतो
त्यात इतक्या गरम वातावरणात राहायची कुठे सवय होती आपल्याला?
पण तरीही उठले की फ्रेश वाटत असे ..
मग आपला नेहेमीचा फिरायचा शिरस्ता ..
त्या छोट्या गावात बायका फारशा बाहेर नसत ..
त्यात मी जरा थोडी फ्याशन करणारी बाई अगदी उठून दिसत असे
आपली “जोडी “फिरायला निघाली की लोक “टकमक “पाहत असत
पण मग हळूहळू ..सारी ओळखीची झाली ..
रस्त्यात ओळख दाखवून गप्पा मारू लागली .
ही शहर गावातली शिकलेली मोठ्या हुद्द्याची दोघे आपल्याशी आपुलकीने बोलतात
याचे त्या लोकांना खुप “अप्रूप वाटत असे ..
आपल्याला मात्र त्याची फारशी काही अपूर्वाई नसे
आपण सर्वांशी च मोकळे पणी बोलत असू .
सुट्टी दिवशी कधी बाजारात चक्कर
तर कधी मित्र मंडळीना गोळा करून गप्पा करीत असू ..
दर पंधरा दिवसांनी कोल्हापुर चक्कर असेच
त्याही गावचे काही कडू गोड अनुभव घेत आपण रहात होतो
एका वृत्त पत्रात मी एक “कॉलम” लिहीत असे ,
तिथे लोकांना तो खूप आवडत असे
तुला याची फार अपूर्वाई असे .,,
माझे छापून आलेले छान कात्रणे काढून जपून ठेवणे आणि कोल्हापुरला एका स्वतंत्र फाइल मध्ये नेऊन लावणे
हे तर तुझे खूप आवडते काम असे ..
पण त्या “गावाने आपल्याही मनात एक “आठवणींचा गाव मात्र नक्की निर्माण केला
दोन वर्षे कशी संपली समजलेच नाही आपल्याला
आणि मग एक दिवस आली माझी बदली झाल्याची बातमी .. खूप खुश झाले मी
इथे आल्यावर काय करायचे कोणती शाखा मागायची ही सुद्धा तयारी सुरू झाली .
थोडे दिवस झाले पण काहीच घडेना ..
आपल्या गावी कधी जायला मिळेल हे नक्की समजेना
आज उद्या करीत महिना भर गेला तरी काहीच होईना
मग समजले की अंतर्गत काही प्रॉब्लेम मुळे अजून चार महीने तरी सुटका नव्हती .
मन खूप खट्टू झाले माझे
मग रोज वाटायचे जाऊदे ही नोकरी ..सोडून जाउ परत गावी
त्या काळात माझ्या मनाला उभारी द्यायचे फार मोठे काम तू करीत होतास
थोडे दिवस थांब ...हे ही दिवस जातील असे तुझे सांगणे असे
आणि खरेच अचानक काय सूत्रे फिरली कोण जाणे पण ..माझी सुटका झाली तिथून
आणि मग आपण आपल्या गावी परत आलो
आता पुन्हा जुन्या रुटीन ला गाडी आली आहे आपली
अजून ही एखादा चित्रपट पहावा तसे ते दिवस माझ्या डोळ्या समोरून सरकून जातात
त्या दिवसाच्या नवीन अनुभवा साथी तुझी खूप आभारी आहे
तुझीच .....