Panhala books and stories free download online pdf in Marathi

पन्हाळा ..

पन्हाळा !!


कोल्हापुर पासून अत्यंत जवळ असलेला पन्हाळगड प्रत्येक कोल्हापुर वासी माणसाच्या हृदय्यात मानाचे स्थान राखुन आहे !!
बाजी प्रभू देशपांडे नी जीवाची “बाजी “ लावून हा गड राखला होता .
ज्या शिवा काशीद ला मागे ठेवून शिवाजी राजेंनी पलायन केले त्या शिवा काशीदचाही येथे पुतळा आहे
पन्हाळ्याच्या रस्त्यावर असणार्या वाघ बिळ या ठिकाणी अजूनही जिवंत वाघ फिरत असतात
तबक उद्यान हि तबकाच्या आकाराची ओवल शेप बाग अतिशय देखणी आहे
इथे विविध प्रकारची फुला फळांची दुर्मिळ झाडे आहेत
शिवाय एक मत्स्यालय पण आहे .
“धान्याचे कोठार” जेथे पूर्वी धान्य साठवले जात असे इथे एक पाण्याचा तलाव सुद्धा आहे .

“सज्जाकोठी “हि एक अत्यंत उंच इमारत ज्याच्या वरच्या मजल्या वरून कोल्हापुरच्या आसपासचे दर्शन होते
येथे संभाजी राजे ना त्यांच्या शिवाजी महाराजांनी सहा वर्षे “नजरकैदेत ठेवले होते
शिवाय तीन दरवाजां ,वाघ दरवाजा ,पिसाटीबुरुज आणि मसाई पठार हि प्रेक्षणीय ठिकाणे आहेत
एक छोटे पाण्याचे कुंड तीन दरवाजा येथे असुन त्या पाण्यात लिंबू टाकल्यास उद्या सकाळी ते रंकाळ्यात दिसते अशा
कपोल कल्पित कथा आहेत . सरपटत पार करता येणारी एक गुहा पण आहे

अगदी शाळा कॉलेज पासून आम्हाला पन्हाळ्याचे प्रचंड “आकर्षण “!
शाळेत असताना वाड्यातील सर्व अबाल वृद्ध मिळुन जेवणाचे डबे घेवून पन्हाळ्यावर जात असू
जेवण खाण ,गप्पा ,पत्ते .गाण्याच्या भेंड्या ,शिवाय मुलांचे इतर खेळ या सर्वांचा आनंद घेत असताना संध्यकाळ कशी होई
तेच समजत नसे .संध्याकाळी सहा वाजता कोल्हापुर ला जाणारी शेवटची बस असे .
ड्रायवर उशीर झाला तर चक्क आम्हाला बोलवायला येत असे कारण संध्याकाळ नंतर गडावर थांबणे “डेंजर ‘असे .
आणि त्या काळी दोन चाकी गाड्या फार कमी लोका कडे असत .
अशा पन्हाळा सहली आम्ही दोन तीन महिन्या आड नेहेमीच करीत असू .शिवाय दिवाळी झाल्यावर आम्हां सर्वांचा एक मस्त
मिसळ कार्यक्रम पन्हाळ्या वर होत असे .!
वाड्यातील सर्व जण आपल्या कडे जे जे फराळा चे असे ते घेवून येत असत .
त्यातल्या एकी कडे मिसळ चा कट करायचे काम असे .
मग वर्गणी काढून पावाची खरेदी होत असे कारण कमीत कमी वीस ते पंचवीस जण या सहली मध्ये सामील असत
सर्वाना पुरेल इतका पाव आणायचा असे .
मग सोबत आणलेला कट चहा च्या गाडीवर गरम करायला दिला जात असे बदल्यात चहा वाल्या कडे चहा ची ओर्डेर द्यावी लागायची .तबक उद्यान मध्ये फेरफटका मारल्यावर असली जबरी भूक लागत असे की बस !
सोबत नंतर स्वीट डिश म्हणून सर्वांकडचे उरलेले लाडू करंज्या अथवा शंकरपाळ्या असत .
हि धम्माल सहल बच्चे कंपनी चे दर वर्षाचे मोठे “आकर्षण “असे .
दिवाळी संपल्यावर राहिलेले काही पाहुणे पण या सहलीत सामील होत असत व मजा आणखीन वाढत असे .!
शाळेत असताना पावसाला सुरवात झाली की आम्हा मैत्रिणींचे बेत सुरु होत पन्हाळा सहलीचे .
या सहलीचे एक विशेष असे ते म्हणजे या सहलीत आम्ही छत्र्या अथवा रेनकोट वर्ज्य करीत असु. बसने पन्हाळा फिरायला
जायचे ,भरपूर भिजायचे आणि मग परत यायचे .घरी येई पर्यंत अंगावरचे कपडे वाळुन जात आणि घरच्या लोकांना अजिबात
पत्ता लागत नसे भिजल्याचा .शिवाय त्या वेळी मिडिया इतका जागृत नसल्याने मुली भिजल्या आहेत या गोष्टी कडे पाहण्याची
नजर पण “साफ “ असे .
कॉलेज ला असतानां आम्हा मुलीना मुला बरोबर फिरण्याची सोडा साधे बोलण्याची पण परवानगी नसे .पण तरुण वय
असल्याने मुलामुलीना एकमेकात मिसळणे आवडत असे .आमच्या वर्गात कॉन्वेंट एज्युकेटेड ग्रुप होता त्या मुलामुलीमध्ये खुप मोकळ
वातावरण होते .आम्ही तीन चार मराठी शाळेत शिकलेल्या मुलींची त्यांची बरी मैत्री होती .एकदा त्यांनी सर्व एकत्र मिळुन पन्हाळा
पिकनिक ठरवली आणि आम्हाला पण बोलावले .घरची परवानगी आम्हाला मिळणे केवळ अशक्य होते त्यामुळे खोट बोलून जाण्या
व्यतिरिक्त पर्याय नव्हता .मग काय मैत्रिणीच्या बहिणीचा साखरपुडा आहे अशी थाप मारून गेलो .घरचे तितके कन्विन्स नव्हते पण
तिघी एकत्र पणे जात होतो त्यामुळे लाईन क्लियर झाली .खुपधमाल केली त्या दिवशी .वेगवेगळे खायचे प्रकार होते .कोका कोला
थम्स अप सारखी ड्रिंक होती जी आम्ही कधी प्यायली नव्हती !! खेळायला बॉल रिंग होती ,शिवाय पत्ते पण आणले होते .
एका मुलाने टेप रेकॉर्डर आणला होता त्यावर गाणी लावून आम्ही भरपूर नाचलो होतो .आमच्या आयुष्यात अद्याप आम्ही कधी
विसरलो नाही असा तो दिवस आम्ही एन्जोय केला .मनात मात्र एक भीती होती की कुणी ओळखीच्या लोकांनी आम्हाला तिथे
पाहू नये ....नाहीतर मग आमची काही खैर नव्हती .संध्याकाळी घरी पोचल्यावर घरच्यांनी साखरपुडा कसा झाला काय काय केले
असे विचारले ...पण खुप दमलो आहे असे कारण सांगून आम्ही बिछान्यात गुडूप झालो .
लग्न ठरले तेव्हा होणार्या नवर्या सोबत कोल्हापुरात रंकाळा किंवा इतर ठिकाणी बागेत फिरत होतो .पण एकदा त्याने
सुचवले आपण पन्हाळ्याला जाउया असे .त्या वेळी दोघाना पन्हाळ्या ला पाठवायला घरच्या लोकांचा थोडा विरोध होता कारण
लग्न ठरले होते पण अजून साखरपुडा नव्हता झाला ..मग असेच आजीला गोड बोलून मध्यस्थी घातले आणि परवानगी मिळाली
पण सोबत भावाच्या मुलाला घेवून जायचे ही अट होती .पण त्यात सुध्दा आनंद वाटला .भावी नवर्या सोबत स्कुटर वरून मागे बसून
पन्हाळ्याला जाण्यात फार “थ्रील “वाटले होते .हातात हात घेवून फिरलो ,आईस्क्रीम ,भेळ,भजी खाल्ली ..खुप फिरून एका हॉटेल
लां जेवलो आणि मग परत आलो .त्या रात्री खुप वेळ झोप नाही लागली ...खुप आनंदाने !!
वडील सरकारी नोकर होते .एकदा त्याना दोन दिवस पन्हाळ्या च्या रेस्ट हाउस चे बुकिंग मिळाले होते .मग आई वडील ,आम्ही दोघ आणि आमचा छोटा मुलगा राहायला गेलो तिकडे .तेव्हा पन्हाळ्याला हॉटेल्स ची फार सोय नव्हती .
वडिलाना मिळालेल रेस्ट हाउस म्हणजे एक मोठा बंगला होता .चार प्रशस्त खोल्या आजूबाजूला सुंदर बाग ,रुचकर जेवण
शिवाय आईवडील सोबत असल्याने आम्ही दोघेच मुलाला त्यांच्या सोबत ठेवून भरपूर फिरू शकलो .पौर्णिमेच्या टिपूर चांदण्यात
फिरण्याची मजा घेतली आम्ही त्या वेळेस!! जणू एखाद्या फिल्म चे हिरो हिरोईन आहोत असा फील होता आम्हाला !!!

यानंतर ची आठवण काही वर्षा पूर्वीची आहे . पुतण्याकडे औरंगाबाद येथे गेलो असताना पन्हाळा हा विषय
निघाला .त्याला गड किल्य्याचे प्रचंड वेड आहे .तो सहज बोलता बोलता मलां म्हणाला काकू मला गडावर चांदण्या रात्री राहायला
खुप आवडेल . माझे एक स्वप्न आहे ते .मी तो विषय डोक्यात ठेवला .आणि मग एका वर्षी तो योग जुळून आणला .त्याच्या लग्नाचा
वाढदिवस होता तेव्हा मुद्दाम त्याला कोल्हापुंरला बोलावून घेतले .त्याला ही सवड सापडली आणि तो सहकुटुंब आला .मी त्याचे
त्या दोन दिवसाचे पन्हाळा येथे ओळखीच्या हॉटेल मध्ये बुकिंग करून ठेवले आणि मग आल्यावर त्याच्या मुलांना माझ्याकडे ठेवून
घेतले आणि जोडीला पन्हाळा गडावर पाठवून दिले .दोघे परत आली तेव्हा इतकी “खुश “ झाली होती .पुतण्या म्हणला ....
काकु तुझे कसे आभार मानू ग ..? गडावर चांदण्या रात्री राहायचे आणि फिरायचे माझे आयुष्यातले महत्वाचे “स्वप्न “ तु पूर्ण केलेस .
मी फक्त हसले ..पण मनातून मला खुप समाधान वाटले मला .!
पाउस सुरु व्हायच्या दिवसात पन्हाळा गडावर ढग..उतरतात.तो “नजारा “अप्रतिम असतो .एका वर्षी माझी मैत्रीण
तिच्या कुटुंबां सह कोल्हापूरला आली होती .देवीचे दर्शन तिला घ्यायचे होते .मी तिला सहज पन्हाळा सहल सुचवली .
खरेतर घरच्या एका महत्वाच्या प्रोब्लेम मुळे तिचा अजिबात मूड नव्हता एन्जोय करायचा ...पण माझ्या आग्रहा मुळे ती तयार झाली
जून ..महिन्याचा दुसरा आठवडा होता तो .. अजून सुरवात नव्हती पावसाला .आम्ही पन्हाळ्यात पोचलो थोड फिरायला सुरु केले
तोवर अचानक हवा बदलली आणि सगळीकडचे ढग गोळा व्हायला सुरु झाले ढग आमच्या इतके जवळ होते की अगदी हातात धरावे वाट्त होते !!!!
आणि अचानक झूम झूम पावसाला सुरवात झाली आम्ही पळत पळत एका हॉटेल चा आश्रय घेतला .तिथे मस्त कांदा भजी तयार करीत होते .मग हॉटेल च्या लोबी मध्ये बसून बाहेरचा पाउस एन्जोय करीत आम्ही खमंग कांदा भजी आणि चहा चा आस्वाद घेतला .
हॉटेल उंचावर असल्याने संपूर्ण गडावर पडणारा पाउस दिसत होता .दोन तास आम्ही तो “समा “अक्षरशः एन्जोय केला .
मैत्रीण खुप खुश झाली ..माझ्या चिंतांचा मला खरेच विसर पडला ग ..असे तीने मला बोलून दाखवले .
तशा असंख्य आठवणी आहेत पन्हाळ्या च्या .कोल्हापुरच्या अगदी जवळ असल्याने कधी ही “मूड “झाला की निघतो
आम्ही तिकडे .एखाद दिवशी उठले की चहा घेवून नाश्त्याला पन्हाळ्यात ,तर कधी दुपारचे जेवण घेण्या साठी तिकडे जायचे .
कधी संध्याकाळी डिनर तिथे एखाद्या हॉटेल ला घ्य्यायचे असाही बेत असतो .जानेवारी महिन्या च्या आसपास तिकडे रस्त्यावर
गुऱ्हाळ पण चालू असतात .येता जाता ओळखीच्या लोकांनी बोलावलेल्या गुऱ्हाळात पण जाऊन गरम गुळ ,उसाचा रस मनसोक्त
पिता येतो
तीन दरवाजां जवळ बचत गटातील बायकांनी खाद्य पदार्थांची दुकाने थाटली आहेत
खमंग भजी चमचमीत बटाटे वडा आणि इतर अनेक पदार्थ अत्यंत कमी किमतीत इथे मिळतात
सर्वाचे आकर्षण ठरलेला तेथील जेवणाचा मेन्यू म्हणजे पिठले भाकरी
फक्त तीस रुपयात एक मोठी कुरकुरीत पातळ ज्वारीची भाकरी पिठले ,मिरची चा खर्डा ,दही आणि मासालेभात असा
हा फक्कड बेत असतो .आवडत असेल तर तिखट चमचमीत भरले वागे पण देतात .
तव्या वरची गरम भाकरी आणि स्वच्छ मोकळी गडावरील हवा !
चार घास जास्त च जातात पोटात ...शिवाय वाढणाऱ्या बायकांचा प्रेमळ आग्रह
काय लागल तर मागून घ्या हा खास “कोल्हापुरी आग्रह ...फार समाधान वाटत जेवताना ..
सर्व थरातील आणि सर्व गावातील लोकांच्या या मेन्यू वर अक्षरशः उड्या पडतात
असा हा पन्हाळा प्रत्येक कोल्हापूर वासीयाची “जान “आहे ..

वृषाली ..

.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED