कथा - एकटी ..! Arun V Deshpande द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कथा - एकटी ..!

कथा – एकटी ..!

ले - अरुण वि.देशपांडे

रेवतीने घड्याळात पाहिले, संध्याकाळचे पाच वाजून गेलेले होते, आफिसातुन, कालेजातून येणार्यांना घरी येण्यास अजून एक-दीड तास लागणार होता, थोडक्यात रेवतीची संध्याकाळ नेहमीप्रमाणे तिच्या एकटीची असणार होती. सकाळच्या कामांची घाई आटोपली की दुपारी विश्रांती होत असे, त्यामुळे थकवा आलाय असे जाणवत नसे.

बेडरूम मधल्या आरश्यासमोर रेवती उभी होती .त्या आरश्यात दिसणाऱ्या तिच्याच प्रतीबिम्बाकडे पाहून तिला क्षणभर स्वतहाचे कौतुक वाटून गेले.चाळीशीच्या उंबरठ्यावर रेंगाळणाऱ्या रेवतीला पाहून तिच्या वयाचा अंदाज करणारा हमखास तिचे वय आहे त्या पेक्षा कमीच करायचा .रेवती ही दोन मोठ्या मुलांची आई आहे “, हे तिची दोन्ही मुलं समोर आल्यावरच कळत असे. सहाजिकच रेवतीकडे पाहून, तिच्या सौंदर्याचा हेवा समोरच्या व्यक्तीच्या नजरेतून जाणवत असे त्यावेळी रेवतीचे मन आपोआप खुशीच्या फुलोऱ्याने फुलून येत असे.

दाट केसांचा वळणदार झुबका बोटांशी कुरवाळत , रेवतीने केसांचा सुबकसा अंबाडा बाधून, कपाळावर लालचुटुक टिकली लावली आणि पुन्हा आरशात पाहिले – रेवती –खूप सुंदर दिसतेस ..! आरशाने दिलेल्या सुरेख पावतीने तिचे मन अधिकच सुखावून गेले. रोजच्या संध्याकाळी अशी छान तयार झालेली रेवती मग

दिवाणखान्यात एकटीच येऊन बसत असे. आफिसमधून आलेल्या तिच्या राजनला तो घरी आल्यावर रेवती अशीच छान तयार होऊन बसलेली दिसायला हवी असे. राजनची ही इच्छा रेवती नेहमीच पूर्ण करीत असे. तिच्या राजनला हे आवडते “ हे तिला इतक्या वर्षांच्या परस्पर सहवासात कळाले होते.

सीमा आणि समीर या दोन मुलांची आई “म्हणूनही रेवती योग्य ती काळजी घेतच होती. कालेजात जाणार्या आपल्या या मुलांना ती जपत होती. या टीनएज-गुर्प मधल्या मुला-मुलींना सगळ्याच गोष्टींचे मोठे कुतूहल असते. मुलगी-सीमा ज्युनियर कालेजात आणि मोठा मुलगा –समीर डीग्री होल्डर होणारा. रेवतीच्या या दोन्ही मुलांना आता त्यांचे स्वतहाचे विश्व जणू गवसले होते .काल पर्यंत आईच्या बोटांनधरून चालणारी चिमुकली पोरं आज नव्या वेगवान बाईक्स पळवत ..आई ..टा टा..ग ..! असे म्हणत नजरेआड होत होती. मुलांच्या आठवणीत रेवती रमत गेली.

तिने पुन्हा घड्याळाकडे पाहिले, आज घड्याळाला देखील वेळ दाखवण्याचा कंटाळा आलेला असावा. त्यातील काटे हळूहळू एका आकड्यावरून दुसऱ्या आकड्यावर येत आहेत असे तिला वाटत होते.. मग,

त्याचा ही तिला कंटाळा आला, रेवती किचनमध्ये गेली, स्वतहाला आवडणारी सुगंधी कॉफी तयार केली आणि बाहेरच्या प्रशस्त ओट्यावरच्या पायर्यावर बसून ती मस्त आरामशीर बसून कॉफीचा स्वाद घेऊ लागली . असे एकटीनेच कोफी पिणे तिला फार आवडायचे .” सगळ्यात असून –कोणातही नसल्याची ही मनोवस्था “, रेवतीला मनोमन आवडत असायची. अशावेळी तिच्या घरा समोरून कुणी जात असेले तरी ती त्या व्यक्तीला आवाज देण्याचे टाळत असे, आणि काफी –स्वादात हरवून जात असे.

अशा मूड मध्ये दूरवर नजर लावून ती स्वतःतच गुरफटून जायची. जुन्या मधुर आणि अवीट गोडीच्या गाण्याना ऐकण्यात हरवून जायची. शांत मनाने आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलणे सुखद असा अनुभव असायचा. अशा मूड मध्ये किती तरी वेळ रेवती बाहेर पायर्यावर बसून रहात असे.

इथं बसलं की समोरची बाग नजरेत भरायची, ही बाग तिच्या राजनची, त्याच्या निसर्ग-प्रेमाची साक्ष असणारी “ , मखमली हिरवळ, टवटवीत गुलाब “ “, दिलखुलासपणे स्वागत करणारी जास्वंदी, मंद मंद स्मित करणारी नाजूक चमेली “ “, सदाबहार चाफा “ ..आणि इतर कितीतरी फुले आणि वेली “..हे सगळा काही राजनच्या आवडीमुळे होते. बागेतून रेवतीची नजर फिरून परत आली. आणि तिच्या मनाला रोजच्या प्रमाणे आजही तिचे एकटेपण तीव्रतेने जाणवले “, गेले अनेक महिने ती एकटी पडत होती., तिच्या घरातील प्रत्येकाची स्वतहाचे असे एक वेगळे जग –वेगळी दुनिया निर्माण झालेली होती., या जगात, दुनियेत रेवतीला मात्र कुणीच सामील करून घेण्यास तयार होत नव्हते .

मुलाचे – समीरचे मित्र घरी आले म्हणजे पोरांच्या आवाजाने घर भरून जायचे. मुलांचे जोक्स –त्यांचे हसणे रेवतीच्या कानावर पडायचे, खाण्याच्या डिश देण्याच्या निमित्ताने मग ती आजूबाजूस रेंगाळत असे. तिच्या अशा येण्याने पोरांचे खदखदून हसणे एकदम बंद होऊन जायचे. तेव्न्हा आपलं असे येणे बरोबर नाहीये “, हे जाणून रेवती तिथून उठत आतल्या रूम मध्ये एकटीच बसून रहात असे.

कधी कधी मुलीच्या – सीमाच्या मैत्रिणी येऊन बसायच्या. मुलींच्या गप्पा, नाजूक आणि किणकीणत्या

आवाजातले कुजबुजते विनोद आणि हसणे रेवतीच्या कानापर्यंत येऊन थांबायचे. रेवती बाहेर आलेली

दिसली की मुलींच्या गप्पा एकदम थांबायच्या. आपल्या येण्याने मुलींना संकोचल्या सारखे होतंय हे रेवेतीला जाणवत असे.

तिच्या दोन्ही मुलांची अशी तऱ्हा, तर राजनची वेगळीच तऱ्हा होती. त्याची सकाळ उगवायची ती बागकामासाठी .अशा कामात त्याला रेवतीने मध्ये मध्ये करणे चालत नसायचे. त्यामुळे बागेत ती जाई त्यावेळी एखाद्या वेलीला पाणी देतांना हातात पाईप धरून चुपचाप उभी राही. बागकाम करून झाल्यावर घरात आलेल्या राजनच्या समोर चहाचा कप आणि हातात पेपर आला की, रेवती समोरच्या खुर्चीवर बसलेली आहे याकेडे सुद्धा त्याचे लक्ष नसे. अश्या राजनने गेल्या काहीदिव्सांपासून सोशल क्लब मध्ये जाणे सुरु केले होते . मग, रात्री जेवणं झाल्याबरोबर “ आज फारच थकलो बुवा “, असे म्हणत तो तडक बेडरूम मध्ये जाऊन गाढ झोपी जाई.

हे सारं असह्य होऊन एके दिवशी रेवती त्याला म्हणाली – अहो , आजकाल मी घरात एकटीच असते. याकडे तुमचा कुणाचे तरी लक्ष आहे का ? तुम्ही आफिस्मध्ये आणि ते झालं की क्लबमध्ये जाऊन बसता , समीर आणि सीमा त्यांच्या मित्र-मैत्रीणीत गुरफटून गेलेले ..अशावेळी मी एकटीने दिवसभर काय करावं ? कुणाशी बोलावं मी ?

अहो –मी येऊ का तुमच्या सोबत . सोशल क्लब मध्ये ? काय हरकत आहे ?

रेवतीचे हे बोलणे ऐकून घेत राजन म्हणाला – सॉरी रेवती – तिथे सगळे एक-एकटे येणारे, तेंव्हा माझी इच्छा असली तरीही तिथे तुला नेता येणार नाही रेवती, खरं म्हणजे तुला घरातल्या घरातच किती तरी गोष्टी आहेत टाईमपास करण्यासाठी . टीव्ही आहे, पुस्तके आहेत, पेपर आहेत ,शिवाय कॉलोनि मधल्या तुझ्या मैत्रिणी आहेत ज्यांच्या बरोबर तास-तास गप्पा करण्यात घालवू शकतेस.तरीही तू मला म्हणत असतेस –करमत नाही ..मला आश्चर्य वाटते आहे तुझे .

राजनचे बोलणे आठवले आणि रेवतीच्या चेहर्यावर खिन्न्से स्मित तरळून गेले .ती स्वतःशी म्हणाली –

राजन ने बाहेर रहाण्याचे समर्थन तर केलेच ,वर पुन्हा आपल्यालाच उपदेशाचा डोस दिला .कमाल आहे या माणसाची . त्याला कधी कळेल का आपले मन ? दिवसभ टीव्ही पहाणे ,पेपर मधल्या निरर्थक बातम्या वाचणे ,न समजणारी पुस्तके वाचणे , या गोष्टीत मन कसे काय रमेल ? आणि कॉलोनीत कुणी येणे किंवा आपण कुणाकडे जाऊन गप्पा करणे “याने काय साध्य होणार आहे ? कुणाबरोबर ही बोलत बसा ,

त्यात त्याच त्या विषयावरच्या गप्पा ,स्वतःची टिमकी वाजवणे ,दुसर्यांच्या चुका आणि दोष शोधण्यात हे स्वतःचे दोष मात्र सोयीस्करपणे विसरून बोलत असतात ..अशा एरंडाच्या गुऱ्हाळाला चव ना ढव...!

या अशा विचारांनी रेवतीच्या मनावरती खिन्नतेचे दाट असे मळभ दाटून आले.तिला वाटत होते “आपल्या आयुष्यालाच एक प्रकारचा निरर्थकपणा आलेला आहे. नवरा बाहेरच्या जगात रमतोय ,समीर आणि सीमा दोन्ही मुलं आपल्याला विसरून त्यांच्या नव्या दुनियेत गुंतली आहेत .आता फक्त आपणच एकटं पडलो आहोत. या सर्वांना वेळेवर खायला करून देणे, त्यांची काळजी करणे “हेच आपले काम आहे.”सुखानं भरलेल्या संसारात आज रेवतीला खूप असमाधानी आहोत असे राहून राहून वाटत होते. माणसाच्या मनाची तऱ्हा काही औरच असते .आहे त्या गोष्टीत समाधान मानण्यातला आनंद मिळवण्यापेक्षा , न मिळणार्या गोष्टीमुळे असमाधानी रहाणे माणसाचे हे असे मन उमजणे कठीण असते “ हेच खरे आहे.

तिला वाटले- आपले मन अगदी असेच हरवून गेल्यासारखे झालेले आहे.आजची ही संध्याकाळची उदासवाणी वेळ तिला अधिकच हूर हूर लावणारी वाटू लागली.हातातल्या रिकाम्या कॉफी मग कडे पाहून तिला वाटले “अरेच्या – आपले मन सुद्धा या कपा सारखेच रिकामे रिकामे होऊन गेले आहे.” ओट्यावर तिला अशी एकटी बसलेली पाहून –समोरून जाणर्या परांजपेबाई थांबून म्हणाल्या – काय हो ,रेवतीताई ,तब्येत बरी नाही काय तुमची ? अशा वेळी एकट्याच काय बसलात ? उदास उदास दिसत आहात ..काय झाला सांगाल का ?

सीमाच्या कालेजातील परांजपेबाई थांबून बोलत आहे म्हटल्यावर .रेवतीने स्वतःला सावरले ,कारण बाईंनी नेमकेपणे आपली मनोवस्था टिपली आहे हे तिला जाणवले ..तसे रेवती म्हणाली.. तसे नाही हो मैडम,हे वेळ अशीच असते रोज..समीरचे बाबा आता येतील थोड्या वेळात .सीमा आणि समीर येतील कालेजातून .आणि त्यांच्या येण्याची वाट पहात बसने हे तर माझे कामच आहे. अशा वेळी मी एकटी “आहे असे म्हणून ही काय उपयोग आहे का ? तुम्हीच सांगा मेडम .

तिचे बोलणे ऐकून घेत परंजापेबाई तिच्या शेजारी बसत म्हणाल्या –रेव्तीताई ,तुमच्या या अशा एकटेपणावर माझ्याकडे उपाय आहे.तो तुम्हाला पटेल की नाही ? याचीच शंका आहे.तरी पण हा उपाय मी तुम्हाला जरूर सांगेन.

ताई ,गेल्या काही वर्षापासून आम्ही काही मंडळी मिळून वृद्धाश्रम “ चालवतो आहोत .तिथे आता बरीच संख्या वाढली आहे.कुणाचा आधार नसलेले वृद्ध लोक इथे आहेत.त्यांच्याकडे पाहिलं की वाटता –यांच्याशी येऊन जर कुणी बोलत बसला ,मानसिक आधार देण्याचे काम केले तर किती छान होईल .निदान यांचे काही क्षण तरी प्रेमाने भरून जातील.

“आमच्या आश्रमात भेटायला येण्याची वेळ संध्याकाळची आहे.बरेचजण आपणहून येतात या लोकांना बोलण्यासाठी. आम्हाला अशीकल्पना सुचली आहे की ..विविध क्षेत्रातील व्यक्तींनी ,स्वंयसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आणि तुमच्या सारख्या संवेदनशील मनाच्या व्यक्तींनी –गृहिणींनी ,आवर्जून वेळ काढून आमच्या आश्रमात येऊन या वृद्ध व्यक्तींना वेळ द्यावा “ अशी विनंती आणि त्यासाठीचे आमंत्रण देण्यासाठी आली आहे असे समजा रेव्तीताई .. तुम्ही तुमच्या सोयीने येत चला ,आम्हाला खूप छान वाटेल.आणि रेवतीताई ..तुम्ही माझ्या या सूचनेचा आणि विनंतीचा जरूर विचार करा.या उपक्रमात तुम्ही सहभागी झालात तर.नंतर तुम्हाला कळणार नाही की..तुमचा एकटेपणा कधी सोडून गेलाय तुम्हाला .आणि हो ,तुमचा निर्णय हो असो किंवा नाही “, मला जरूर सांगाल.

परांजपेबाई निघून गेल्या ,रेवती कितीतरी वेळ तशीच बसून राहिली .राजनला आज खूपच उशीर झाला आहे “,म्हणजे तो क्लब मध्येच जेवण करून येणार हे नक्की होते .आपापल्या फ्रेंड्स मध्ये रमून गेलेल्या समीर आणि सीमाला आईची आठवण होईलच असे नव्हते . आता बागेतही सामसूम झालेली होती .दिवसभर खुललेली वेली-फुले आता पाकळ्या मिटून घेत झोपी गेलेली होती .या वातावरणात स्वतःचे एकटेपण “रेवतीला अधिकच उदासवाणे वाटू लागले .

मग, परांजपेबाईंनी केलेली सूचना तिला आठवली ..आणि ती स्वतःला म्हणाली –“रेवती ,खरच ,काय हरकत आहे ग ?,आपण जाऊ या आश्रमात ,तिथे जाऊन सर्वात मिसळून बोलू,गप्पा करू .आता आपल्या घरातील प्रत्येकजण सुखी आहे –समाधानी आहे “.या गोष्टीचा आनंद आहेच तरी पण एकटेपणाच्या भावनेने आपण असमाधानी आहोत.

आपले हे एकटेपण काही तासापुर्ते असणारे आहे.आश्रमातली वृद्धांचे एकटेपण तर आयुष्यभराचे आहे.त्यांना कुणी नाही.,कुणी येत नाही, बोलत नाही ,कुणाचा सहवास नाही ..अशांना आपणहून आपण बोललो-भेटलो तर किती छान वाटेल या सर्वांना . आपण न गेल्याने काहीच फरक पडणार नाही तिथे ..पण, जाऊ लागलो तर नक्कीच खुप फरक पडेल कारण आपण तिथे जाऊन आनंद देऊ शकणार आहोत.

या विचाराने समाधानाची एक झुळूक जणू रेवतीच्या मनाला स्पर्शून गेली .तिच्या मनावरचे दडपण दूर झाले.आपल्या सोबतीची गरज कुणासाठी तरी आवश्यक आहे ..ही भावना तिला खूप सुखद वाटत होती.

एकटेपणाची तीव्रता आपल्या मनाने अनुभवली आहे.मग,आपणच दुसर्यांचे एकटेपण दूर करू शकलो तर ते किती छान होईल. इतका वेळ स्वतःला “एकटी “समजणारी रेवती एका वेगळ्याच अनुभूतीने राजनच्या येण्याची वाटपाहू लागली .रेवतीने ठरवलेले सेवाकार्य त्याला नक्कीच आवडणारे आहे हा विस्वास तिला नवी उमेद देणारा होता. रेवती आता यापुढे “एकटी “ नसणार .

कथा –एकटी ..!