Ramy tya aathvani books and stories free download online pdf in Marathi

रम्य त्या आठवणी

ललित - लेख-

रम्य आठवणी ...!

ले –अरुण वि.देशपांडे –पुणे.

नमस्कार मित्र हो ,आठवणीतील सुट्टी " हा काळ सरून आता तब्बल पन्नास वर्षा पेक्षा जास्त वर्ष उलटून गेलेली आहेत ,माझ्या आठवणीतील सुट्ट्यांची वर्षे ..साधारण १९६० ते १९७३ ..या बारा -तेरा वर्षातील आहेत..हे दिवस शाळा ते कोलेज-ते नोकरीला लागे पर्यंत अशा दोन वळणावरचे आहेत.वडिलांची बँकेतील नोकरी त्यामुळे सारखी बदली होत असे आणि आमच्या मुक्कामची गावं बदलत असत ..यामुळे ..सुट्टी आणि मामाच्या गावी जाणे "हा आमचा वार्षिक कार्यक्रम अखंडपणे चालू असायचा .माझ्या शाळेच्या दिवसात - वर्ग चौथी ते आठवी .या वर्षात .१९६० ते १९६४ वैजापूरला होतो.उन्हाळ्याची सुट्टी आणि ते सगळे दिवस तीन -चार गावात समान वाटले जायचे .ही गावे क्रमवारी नुसार -परभणी ,जिंतूर ,वस्सा,आणि वसमतनगर , ..आणि यात सहसा बदल होत नसे...वैजापूर हे गाव मोठे असले तरी -इथे येण्या साठी रेल्वे -स्टेशन आहे त्याचे नाव-रोटेगाव , आणि परभणीला जाण्या साठी फक्त एक साधी ट्रेन आणि एक एक्स्प्रेस ट्रेन .अशा दोनच गाड्या दिवस भारातून असत. आम्हाला जाण्या साठीची "मनमाड -काचीगुडा - सवारी गाडी -प्यासेंजर ट्रेन ..मध्यरात्री -म्हणा किंवा भल्या पहाटे-म्हणा ३ ते ४ दरम्यान असायची.. या ट्रेन साठी वैजापुर गावातून रोटेगावला ,. टांग्यातून रेल्वे स्टेशनला रात्री २ वाजता निघून आम्ही रेल्वे स्टेशनवर येऊन बसत असू ,टांग्या -शिवाय रिक्षा वगेरे वाहने पर्यायी वाहने ५४-५५ वर्षापूर्वी नव्हतीच ,पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान येणारी प्यासेंजर ट्रेन सकाळी ११-साडे अकराला परभणी -जंक्शन ..ला पोंचत असे.परभणीला ..आत्याबाई कडे जेवण-खान करून व आराम करून मुकामाला आम्ही जिंतूर ला पोचायचो.हा इतका दमछाक करणारा प्रवास करण्या शिवाय गत्यंतर नव्हते .त्याला कारण हे तसेच होते

वैजापूर हे गाव ..आमच्या मूळ-गाव परभणी पासून ..खूप दूरवर असलेले गाव.. आणि आईचे माहेर .वस्सा हे छोटसे खेडेगाव .परभणी पासून तसे दूरच होते . मामा व्यवसायाने वकील .,ते जिंतूर या तालुक्याच्या गावी वास्तव्यास असत ,त्या काळी "गाव तिथे एस टी" असा महा -मंडळ कारभार नव्हता , मुख्य रस्त्यावरून मोजक्याच गाड्या जात असत ,यात सध्या बस जास्त..जलद गाड्यांचा सुळसुळाट असण्याचे ते दिवस नव्हते . त्यामुळे वस्सा या गावी जाण्या साठी जिंतूर हून मिळेल ती साधी बस पकडायची आणि फाट्यावर उतरून माळरानावरील गाडी-रस्त्याने बैलगाडीत बसून खडखड करीत छोटासा प्रवास करीत पोन्चायचे.जिंतूर ला बस स्टेंड वर आम्ही उतरलो की लगेच सगळ्यांना कळायचे ..पांडुरंगराव वसेकर वकील साह्बांच्या बहिण बाई आल्या.माझे हे वकील मामा जिंतूर नगर पालिकेचे नगराध्यक्ष"या मनाच्या पदावर होते , सलग अकरा वर्षे नगराध्यक्ष"म्हणून त्यांची लोकप्रिय अशी कारकीर्द होती.. शहरातील सर्व-सामान्य नागरिक असो व मान्यवर व्यक्ती ,सगळ्या कडून मामाना "अपने चेअरमन साब है " ,अशी आपलेपणाची पावती मिळत असे.सहाजिकच ..आम्ही जिंतूर गावात "चेअरमनसाब के मेहमान "म्हणून मिरवत असू. मग, सिनेमाला जायचे असो, नगरपालिका वाचनालय असो, व गावातील समारंभ असो .आम्हा लहान पाहुण्यांना सुद्धा अतिशय आपलेपणाची ,जिव्हाळ्याची प्रचीती येत असे. जिंतूरच्या "यशवंत टाकीज "मध्ये सिनेमी पाहिले नाही ? अरेरे , सुट्टी वाया गेली रे तुमची "असे टोमणे वाचवण्यासाठी आम्ही खूप सिनेमे पाहायचो.सुट्टीचा दुसरा टप्पा असायचा .आईच्या माहेरी ..वसा या गावाला .आमच्या आठवणीत आजोळ नंबर -एक "-वस्सा" अशीच ओळख या गावाने उमटवली आहे.इथे आजीचे वास्तव्य असायचे ,आजी ला आम्ही कधी आग ,ए -आज्जी असे म्हणलो नाही , अहो-जा हो .असे बहुमानाचे संबोधन सरसकट आमच्या बोलण्यातून असे..विजेचे दिवे नसण्याचा तो काळ- दिवसभर लक्ख -उजेड ,आणि संध्याकाळ झाली की "दिवेलागण "व्हायची आणि घर-घरात कंदील चिमण्यांच्या उजेडात सारे काम चालत असे.

वसा गावातील सगळ्या नातेवाइका कडे - "लेक आली म्हणून ,आईला पाहुणचार होत असे, बेतास-बात परिस्थती असलेली ही साधी माणसे ,"ठेविले अनंते तैसेची राहावे " अशा धारणेची ,मोठ्या समाधानाने राहत होती ,त्यांनी केलेला पाहुणचार भले ही श्रीमंतीचा नसेल ही . पण,जिव्हाळ्याने आणि प्रेमाने भरभरून असलेला हा पाहुणचार घेतांना ..व तिथून माघारी निघतांना .डोळ्यातून येणारे पाणी लपवणे आम्हाला कधीच जमले नाही..इथले दिवस फार भरभर पळून जायचे ,आणि आम्हाला वेध लागायचे ..आईच्या दुसर्या माहेरगावी जाण्याचे ..होय,आईचे तिचे स्वतःचे लहानपण तिच्या मावशीकडे गेलेले ..आमच्या या मावशी-आज्जी मोठ्या तालेवार अशा घरातील होत्या ...आईचे मावसभाऊ अम्बादासराव लोहरेकर ..माझे मामा ..अतिशय रसिक मनाचे, संगीताची आवड असणारे ,विविध वाद्य सफाईने वाजवीत असत. मामांच्या भल्या मोठ्या वाड्या जवळ "बोधानंदाचा मठ "म्हणून अतिशय प्रासादिक वास्तू आहे. या मठात त्यावेळी मामा आणि त्यांच्या समान-आवडीच्या मित्रांनी सुरु केलेला एक उत्तम आणि परिपूर्ण असा संगीत -क्लास "होता . सुट्टीत मी या क्लास मध्ये जाऊन बसायचो ..आणि तबला ,पेटी ,सतार ,तंबोरा "या विविध वाद्यांना हात लावायचो .क्वचित त्यावरून बोटे फिरवायला मिले ''तेंव्हा जो काही ताल वा स्वर उमटत असे" अजूनही तो ध्वनी माझ्या कानात -मनात गुंजत असतो..

वसमत "चे आणखी एक मोठे महत्व माझ्या आयुष्यात आहे.. ते म्हणजे ..या गावी .८-८-१९५१ ला माझा जन्म मामाच्या घरी..वसमत या गावी झाला .जिंतूरचे पांडुरंगराव वसेकर मामा , वसमतचे अंबादासराव लोह्रेकर मामा -ही दोन्ही माणसं, मोठ्या उमद्या मनाच्या व्यक्ती तर होत्याच तितकेच ते रसिक-कलावंत मनाचे होते ,साहित्य -कला -संगीत याची आवड असलेल्या या मामानी त्यांच्या बहारीच्या काळात सार्वजनिक स्वरूपात आयोजनाचे खूप कार्य केले . माझ्यावर या दोघांच्या कलासक्त मनाचा खूप मोठा प्रभाव आहे असे मानतो.कदाचित त्यामुळेच साहित्य -कला यांची आवड निर्माण होऊन ..थोडेफार का होईना लेखन करणे "ही देणगी मला मिळाली आहे.१९६५ ते १९६७ ..हैद्राबाद , १९६७ ते १९७१ - आष्टी -जि.बीड ,आणि १९७२ - अहमदपूर - परळी- ..अशा विविध गावा वरून आम्ही नियमितपणे ..परभणी -जिंतूर -वसा ,वसमत -येलदरी ..अशा ठिकाणी सुट्टीचे दिवस घालवीत राहिलो..१९७३ ला मी नोकरीला लागलो ..आणि सुट्टीचे दिवस संपले .आज पुन्हा हे सर्व आठवले ..खजाना भरलेला आहे.तो रिता कधीच होणारा नाही.

***

आठवण गुरुतुल्य अशा दोन जेष्ठ मित्रांची

प्राचार्य (नि)- डॉ.दीनानाथ फुलवाडकर सर,मु.पो.गंगाखेड- जि. परभणी.प्रा. मधुकर देशपांडे- निवृत्ती नंतर आता- पुणे

आदरणीय गुरूद्वयांस नमस्कार-सर जी-१९८२ साली बदलीच्या निमित्ताने मी औरंगाबादहुन गंगाखेडच्या स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखेत रुज झालो. माझे सहकारी मित्रश्री.दिलीप शिरपुरकर यांच्यामुळे तुम्हा दोघांचा परीचय झाला.

फुलवाडकर सर तुम्ही हिंदीचे प्राध्यापक आणि-देशपांडेसर तुम्ही मराठीचे प्राध्यापक..संत जनाबाई महविद्यालयात तुम्ही अध्यापनाचे कार्य केलेत.

तुम्ही दोघेही कथा लेखक व कवी म्हणून सर्व परीचित होतात.. मराठवाड्यात तुम्हा दोघांच्या साहित्यिक वाटचालीची नोंद झालेली होती.

देशपांडेसर तुमच्या लघुकथा व विनोदी कथा त्यावेळी मराठी तील सर्व नामवंत मासिकांतुन नियमीत प्रकाशित होत असतं, .

तुम्ही खरे तर - कसबापेठेत घर असणारे पक्के पुणेकर, नौकरी निमित्ताने गंगाखेड सारख्या ग्रामीण परीसरात पुर्णपणे रमलात.तुम्ही कुठे रहाता ? हे महत्वाचे नाही, तुम्ही कसे आणि किती सरस लेखन करता" याला महत्व असते".देशपांडेसर तुम्ही दिलेला हा गुरूमंत्र " कसोशीनेलेखन-प्रवासात आचरणात असेल " हे तुम्हाला आजही सांगतांना आनंद होतोयं.

फुलवाडकर सर - निर्लेप आणि निर्मळ असे लेखन संस्कार", तुम्ही मला दिलेत. तुम्ही ऊत्तम कथा लेखक आहातच त्याही पेक्षा तुमच्यातील भावाेत्कट कवीने मला जास्त प्रभावित केले आहे.मला कवी म्हणून जी आरंभीक अशी ओळख मिळते आहे त्याचे श्रेय मी कवी दीनानाथ फुलवाडकर यांना देईन.

गायकाचा गळा गाता असावाआणि-----लिहिणार्याचा हात लिहिता असावा",सर- तुमचा लेखन मंत्र मी गेली ३२ वर्षांनंतर आजही सातत्याने लेखनरूपात आणतो आहे.

देशपांडेसर तुम्ही मार्गदर्शक गुरू म्हणून मला लाभला आहात हे माझे लेखन भाग्य आहे.

" आपले लेखन आपल्याला मोठे करीत असते"तुमचे हे सांगणे मला कायम विद्यार्थी म्हणून जमीनीवर रहा" याची आठवण करून देत असते.

सर- तुम्ही माझे लेखन गुरू आहात, मार्गदर्शक आहात.आज वर्ष - २०१७ सुरू आहे..

लौकीक आयुष्यात आता आपण तिघेही आजोंबांच्या भुमिकेत आनंदाने जगत आहोत.

फुलवाडकर सर गंगाखेड संत जनाबाई च्या वास्तव्याने पावन झालेले क्षेत्र. अशा गोदातिरीच्या गंगाखेडी माझा लेखन प्रवास सुरू झाला, तो तुम्ही व देशपांडेसर यांच्या आशिर्वाद लाभल्याने अशी माझी श्रद्धा व भावना आहे.

नव्या साहित्यिक मित्रांना नेहमी आपलेपणाने मदत करीत जावे, त्यांचा मित्र बनावे".सर- तुमचा हाही लेखन मंत्र मी तुमच्या सारखाच पाळतो आहे.

देशपांडेसर निवृत्ती नंतर पुन्हा एकदा तुम्ही व मी पुण्यात एकत्र आलो आहोत. तुमचे लेखन अजुन दमदारपणे चालु आहे. खुप छान वाटते .

फुलवाडकर सर व मघुकर देशपांडेसर-

तुमच्या या लेखन- शिष्या च्या हातून सदैव राजस-साजस लेखन सेवा होत रहावी.असे आशिर्वाद तुमच्या कडुन नेहमीच मिळत रहावेत ही ईच्छा व विनंती.

सर्वांना यथायोग्य अभिवादन.तुमचा--स्नेहांकित-अरूण वि. देशपांडे-पुणे.

***

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED