कहाणी भांडया कुंड्यांची Vrishali Gotkhindikar द्वारा नियतकालिक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कहाणी भांडया कुंड्यांची

“कहाणी”भांड्या कुंड्यांची !!पातेली ,सतेली ,तामली,डेचकी ,तपेली,वेड भांडे ,तसराळी,घमेले ,गडू, तांब्या ,टीप,पिपं,घागर ,बादली,हंडा कळशी ,किती तरी अशी नावे भांड्यांची .भांडीकुंडी म्हणजे बाईचा जिव्हाळ्याचा विषय !स्वयपाकात रमणारी बाई भांड्यावर खूप प्रेम करते .भांड्याना प्रेमाने हाताळते .मला सुद्धा वेगवेगळया प्रकारची भांडी खूप आवडतात .घरात खूप भांडी असली तरी भांड्यांच्या दुकानात गेले की भांड्यांच्या प्रेमात पडायला होतच !आणि मग खरेदी अटळ!!! माझ्या आजीला एक वेगळ घरातल भांड खूप आवडत असे .तिच्या नेहेमी वापरात असे. ती त्याला प्रेमाने वेडे भांडे म्हणत असे .आणि स्वत घासून पुसून ठेवत असे .नेहेमी घरची सारी खरकटी भांडी तिच्या सुनां घासत असत .स्वयपाक घर पूर्ण तिच्या ताब्यात असे मात्र भांडी घासून झाली की ती सुती कापडावर पालथी घालणे व नंतर स्वच्छ पुसून लावून ठेवणे हे काम ती स्वता करीत असे .अशा वेळेस ती ज्या प्रेमाने भांड्यांना हाताळत असे ते पाहायला मला खूप आवडे .आणि मग तिच्या पद्धतीने भांडी आवरून झाली की नेहेमी एक प्रेमळ कटाक्ष फडताळा कडे टाकत असे ..आजोबांना पाणी नेहेमी तांब्याच्या तांब्या भांड्यात लागे तांब्यां भांडे भरून ठेवल्या खेरीज जेवायला बोलवायचे नाही अशी त्यांची सक्त ताकीत असे .भात करण्या साठी पूर्वी वरून उभे व खाली खोल असे मोठे भांडे असे .भातावर छान वाफ आली की ते भांडे झाकून चुली वरील थोड्या निखार्यावर ठेवले जात असे .हा भात दिवस भर गरम रहात असे .भातावर ची पेज मीठ आणि तूप घालून प्यायला मला खूप आवडत असे .ती पेज प्यायची माझी एक खास पसरट ताटली होती .तिला “पितळी “म्हणले जायचे आईच्या माहेरी म्हणजे माझ्या आजोळी मात्र वेगळा प्रकार होता .आजीचा सतरा खोल्यांचा वाडा होता पण आर्थिक परिस्थिती खुप गरिबीची होती .तशात आजोबा कित्येक वर्ष अंथरुणाला खिळून होते त्यामुळे घरचे भागताना नाकी नऊ येत आजीला भांड्यांची खुप आवड पण पूर्वीची बरीचशी लहान मोठी भांडीआर्थिक अडचणी मुळे बाजारात गेली ..त्यामुळेतिला खूप हळहळ वाटे ..आंघोळीचे पाणी तापवायचा मोठा तांब्याचा हंडा जेव्हा विकावा लागला त्या दिवशी ती जेवली नाही “बघ ना ग वाड्यात खोल्या सतरा पण घरात मात्र सतरा भांडी पण नाहीत !!असे ती नेहेमी म्हणत असे ..मी लहान होते ..अशा वेळी काय बोलावे सुचत नसे मला .. माझ्या आजीप्रमाणे आईला पण भांडी कुंडी प्रकारात खूप रस होता .वेगवेगळी भांडी ती नेहेमी खरेदी करीत असे .पण घर दोन खोल्यांचे त्यामुळे तिची थोडी कुचंबणा होत असे .घरात मध्यम आकाराचे स्टील चे पिप असावे अशी तिची खुपइच्छा होती पण त्याची किंमत तेव्हा बजेट बाहेर होती .आई हलवा खूप उत्तम बनवत असे तिला एका दुकानातून हलवा करायची ऑर्डर मिळाली होती रोज पहाटे उठून दोन तास ती हलवा तयार करीत असे ते काम खूप किचकट होते पण ते तिने आनंदाने पार पाडले आणि जवळ जवळ चाळीस किलो हलवा संक्रांति आधी दुकानात करून दिला आणि आलेल्या पैशातून तिला हवे तसे स्टील चे पिप आणले होते खुप आनंद झाला होता तिला ..वडीलांना पण खुप कौतुक वाटले होते तिचे !!आईचा प्रत्येक भांड्यावर जीव होता .मोलकरणी ला अथवा शेजारणी ला भांड्यातून काही घालून दिले तरी ते भांडे पुन्हा परत आल्या खेरीज तिला चैन नसे .आईकडे चार कुकर होते वेगवेगळया आकाराचे आणि प्रकाराचे माझा मुलगा पुण्यात शिकायला गेला तेव्हा त्याला वरण भात घरी शिजवायला कुकर हवा होता .तसा कुकर आईकडे होता म्हणून मी थोडे दिवसा साठी मागितला पण तिचा जीव होता ना त्यात .......!मग तिने चक्क नकार दिला मला !!!तुपाचे चांदीचे भांडे घेण्याची आईची इच्छा मात्र शेवट पर्यत अपुरीच राहिली ....मी तसे भांडे घेतले तेव्हा आईच्या आठवणीने डोळ्यातले पाणी थांबेना पूर्वी लग्नात मुलीला सासरी पाठवताना तिच्या आवडीची व तिला उपयोगी असणारी भांडी दिली जात .शिवाय घरचे नातेवाईक पण केळवण करताना तिला काही भांडी हवीत का असे आवर्जून विचारत असत .या भांड्याना लग्नात “रुखवत “असे संबोधले जात असे या भांड्यात “लंगडा “बाळकृष्ण व देवी “अन्नपूर्णा “ याना विशेष स्थान असे लग्नात मांडलेल्या रुखवता वरून मुलीच्या सासरचे तिच्या घरच्या परिस्थितीचा अंदाज घेत .माझ्या लग्नात आईने आणि इतरांनी बरीच भांडी दिली होती पण स्वतंत्र संसाराला ती थोडी अपुरी होती ....मग गुपचूप साठवलेल्या पैशातून मी आणि माझ्या भावी पतींनी काही खास भांड्यांची खरेदी केली होती !!माझ्या मुलाच्या लग्नात मुलीकडून काहीच घ्यायचे नाही असे आम्ही ठरवले होते पण सुनेच्या नातेवाईका ना रुखवत मांडायची खूप हौस !!रुखवत मांडला म्हणजे तो घेतला असे समजले जाते त्यामुळे तिच्या नातेवाइकांना रुखवत मांडण्यास आम्ही निक्षून नकार दिला आणि तिला हवी तशी आणि हवी तेवढी भांडी मी स्वता घेवून दिली .आणि तिचा संसार “सजवून “दिला !! सासुबाई आमच्या घरी राहायला आल्या तेव्हा येताना त्यांची काही भांडी घेवून आल्या होत्या .पळी, गडू, वेलदोडा कुटायचा खलबत्ता ,दोन चार थाळ्या वगैरे भांडी अजून माझ्या कडे आहेतच.एक छोटा डाव ज्याला एक डाग दिला होता तो वापरायला त्याना खूप आवडत असे अजूनही तो डाव हातात घेतला कि त्यांची आठवण होते तांदळाची उकड करायचे त्यांचे खास पातेले होते ...मी पण अजून त्याच पातेल्यात उकड करते आईच्या मृत्यु नंतर तिची सर्व भांडी आम्ही गरीब आणि गरजू लोकांना देवून टाकली पण काही खास भांडी मात्र मी आणि वाहिनीने आईची आठवण म्हणून ठेवून घेतली त्यात आईने शेवटी शेवटी खरेदी केलेला एक कडीचा डबा मी ठेवून घेतला .त्यात आम्ही काही वेगळा खाऊ ठेवतो आणि त्याला आईचा डबा असेच संबोधतो ! मी माझ्या संसारातील भांड्याचे सेट नेहेमी बदलत असते आणि जुने सेट ओळखीच्या गरजू माणसाना देवून टाकते .काही दिवसा पूर्वी ओळखीच्या एका मित्राने घरच्या लोकांच्या मनाविरुद्ध लग्न केले मग त्याना माझ्या कडे असलेली आणि वेगळी ठेवलेली नवी जुनी भांडी दिली .जोडी अगदी खुष होवून गेली आता त्यांच्या संसारात तर बरीच भांडी आलीत पण तरीही स्वयपाक करताना तुमची आठवण येते असा मित्राच्या बायकोचा फोन नेहेमी असतो पूर्वी तांब्या पितळेची भांडी मोडीत घालुन संसारातील “अडचणी “सोडवल्या जात पितळी आणि तांब्याच्या भांड्यात पाणी साठवल्या मुळे पाण्यातील बक्टेरीया मरतात पितळी भांड्यांना महिना दोन महिन्याने कल्हइ करावी लागत असे .या कल्हइ तील संयुगा मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शुक्र जंतूंचा पण संकर होतो अशी ही भांडी कुंडी आणि त्याला निगडीत माणसांच्या आठवणी ची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण !!वृषाली गोटखिंडीकर