Mokal Aakash books and stories free download online pdf in Marathi

मोकळ आकाश...

मोकळ आकाश...

"मस्त झाल आज माझ "स्त्री मुक्ती" आणि "स्त्री ला सुद्धा तिच आयुष्य मनाप्रमाणे जगायचा अधिकार आहे" च भाषण!" घरी पोचल्या पोचल्या गीता उत्साहानी आभाशी बोलायला लागल्या.. "चांगल्या कामासाठी आपला थोडा हातभार लागतो आहे हि भावना आनंददायी आहे!" गीता खूप मनापासून बोलत होत्या... त्या समाजसेविका म्हणून कार्यरत होत्या. समाजातल्या वाईट पद्धती बंद करून स्त्री ला सन्मानाने जगता याव यासाठी त्या प्रयत्नशील होत्या! त्यांना मुलगा मुलगीच भेदभाव कधी पटलाच न्हवता. त्या त्यांचे विचार मुक्तपणे मांडत..आणि त्यात त्यांना आलोक च्या बाबांची सुद्धा साथ मिळत होती.

"मस्त आई.." आभा उत्साहित होऊन बोलली.. "तुमचे विचार खरच किती वेगळे आहेत! आणि तुम्ही त्याप्रमाणे वागता सुद्धा! नुसते बोलणारे बरेच असतात पण त्याच प्रमाणे वागणारे अगदी हातावर मोजण्याइतके! जेव्हा माझ आणि आलोक च लग्न करण्याबद्दल नक्की झाल तेव्हा त्यानी तुमच्याबद्दल सांगितलं होत. पण आज तो जे बोलला ते अनुभवते आहे! आमच्या लग्नाला फार दिवस नाही झाले... आणि मला तुम्ही आणि बाबा हळू हळू कळायला लागले आहात! तुम्ही किंवा बाबा माझ्यात आणि आलोक मध्ये कधी भेदभाव नाही करत! आलोक सुद्धा माझ्या बरोबरीनी सगळी काम करतो, अगदी घरातली कामं सुद्धा!! माझ भाग्य आहे कि मी ह्या घरात लग्न करून आले!!" आभा बोलत होती आणि गीता आभाच बोलण ऐकत होत्या.. आपल्या सुनेला दोघांबद्दल इतका आदर आहे आणि ते मनात न ठेवता आभा बोलून दाखवते ह्याच त्यांना कौतुक वाटत होत. ते त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवत होत. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानच हसू उमटलं होत. आभाच्या डोक्यावरून हात फिरवत त्या बोलायला लागल्या,

"आभा.. तू मला मुलीसारखीच आहे! उगाच तू सून म्हणून तुझ्याशी वेगळी वागणूक आणि आलोक मुलगा आहे म्हणून वेगळी वागणूक असा भेदभाव हवाच कशाला? मला नाही पटत अस वागण! देवासाठी मुलगा काय किंवा मुलगी काय दोघ समानच मग आपण का करायचा नसता भेदभाव? आणि आभा... मी सुद्धा तुला नेहमीच सांगत आली आहे कि स्वतःचा मान स्वतःच जपला पाहिजे! जे वाटत ते करण्याची हिम्मत दाखवली पाहिजे!" आभा सासूबाईंच बोलण ऐकून भारावून गेली होती! लग्नाला काहीच दिवस झाले होते. सासूच्या बोलण्यानी आभा खूप प्रभावित झाली होती! तिच्या घरी इतक मोकळ वातावरण अजिबात न्हवत! लहानपणीपासूनच तिची आजी आणि आई तिच्या मध्ये आणि तिच्या भावामध्ये भेदभाव करत होती. आभाला चीड यायची पण ती काही बोलू शकायची नाही! आभा ला तिच आयुष्य मनाप्रमाणे कधी जगताच आल न्हवत! पण आलोक च्या घरी मात्र ती तिचे विचार स्वतंत्रपणे मांडू शकत होती.

"हो आई... पण सगळेच तुमच्या सारखा विचार नाही करत! प्रत्येकवेळी मुलीच्या इच्छा मारल्या जातात.. कधी कधी तर मुलीला तिच्या इच्छा बोलण्यावर सुद्धा बंदी असते. आई, सगळीकडे इतकी प्रगती होतीये पण मुलींना त्यांच आयुष्य मनाप्रमाणे पण जगता येत नाही... म्हणजे खरच प्रगती होतीये कि नुसत्या प्रगतीच्या गप्पा? मुलींना जगण्यासाठी इतकी का बांधिलकी? कधी बदलणार लोकांची विचारधारणा?" आभाच्या डोळ्यात असंख्य प्रश्न होते.. आणि ते सासूने हेरले! आणि आभा उदास राहू नये म्हणून त्या खंबीरपणे बोलायला लागल्या..

"मला तुझी मनस्थिती काळाती आहे आभा.. पण कोणीतरी परिस्थिती बदलेल आणि मग मला त्याचा फायदा होईल असा विचार करण्यापेक्षा आपणच काही प्रयत्न केले तर? प्रत्येक स्त्रीनी जर दुसऱ्या स्त्री चा आदर करायचं ठरवलं तर नक्कीच प्रगती होईल! अर्थात हे आपले विचार! आपल्या आजूबाजूला अस दृश्य दिसत नाही! काही हरकत नाही.. आपण मिळून परिस्थिती बदलावी म्हणू प्रयत्न करू! आपण प्रयत्न करत राहायच बेटा.. लोकांचे विचार एक दिवसात बदणार नाहीत हे गृहीत धरूनच काम करायचं! पण एकदा का लोकांनी बदल स्वीकारायला सुरु केल कि बदल घडायला सुरु होत! बर चल आपण बोलू नंतर! जरा आराम करते.. हल्ली जास्ती दगदग नाही सहन होत.."

"हो आई.. आपण प्रयत्न करत राहायचे आपल्याला जमेल तसे..." आभा बोलत होती तितक्यात तिला काहीतरी आठवलं.. "आई एक पाच मिनिट बोलायला वेळ आहे?"

"बरोबर.. आणि तुला काही अर्जंट सांगायचं आहे? म्हणजे आपण नंतर बोललो तर चालेल? थोडा थकवा आलंय म्हणून जरा पडाव म्हणते."

"अर्जंट नाही पण खूप दिवस बोलायचं होत! पण राहूनच जात होत..." आभा नी परत थोडा विचार केला.. आणि ती बोलायला लागली, "नको! आत्ता नाही सांगत आई! आत्ता तुम्ही आराम करा! तुम्ही खूप दगदग करता आणि तुम्ही तब्येत जपान सुद्धा तितकच महत्वाच आहे. आलोक आला कि आम्ही दोघ मिळून बोलू.."

"ओह..दोघांनी सांगायचं अस काहीतरी आहे तुझ्याकडे.." गीता गोड हसल्या... "ठीके.. आलोक आला कि मग निवांत बोलू माझ्या खोलीत! तेव्हा हे पण असतील...आणि आलोक कुठे बाहेर गेलाय?"

"हो आई.. आलोक च्या शाळेतल्या मित्राचं गेट टू गेदर आहे! तिथे गेलाय.. येईलच जरा वेळात! तो निघाला आहे असा फोन आला होता."

"ठीके.. आलोक आला कि बोलू!! आता मी जाते माझ्या खोलीत! जरा वेळानी जेवायला भेटूच.."

"आराम करा आई तुम्ही... मी तुम्हाला जूस आणून देऊ?"

"नको आत्ता काही...आत्ता फक्त पडते!" गीता इतक बोलल्या आणि त्यांच्या रूम मध्ये गेल्या.. जरा वेळात आलोक आला... आणि सोफ्यावर पहुडला.. आभानी त्याला पाणी आणून दिल... आणि त्याच्या बोलायला त्याच्या जवळ जाऊन बसली... आभा आणि आलोक बऱ्याच वेळ बोलत होते.. आणि जरा वेळात ते जेवायला गेले.. जेवणाच्या टेबल तर इतर गप्पा गोष्टी झाल्या. जेवण आटोपलं आणि सगळे स्वतःच्या रूम मध्ये गेले. आणि जरा वेळातच आभा आणि आलोक आलोकच्या आई बाबांच्या रूम मध्ये गेले..

"आलोक आणि आभा… आत्ता आमच्या खोलीत? काय विशेष सांगायचं आहे?" आलोकच्या बाबांनी आलोकच्या आईकडे पाहिलं आणि बोलायला सुरु केल..

"हो बाबा... विशेषच आहे! आभा सांगेल! आज आई भाषणावरून आली तेव्हा आभा घरीच होती! आई तिच्या भाषणाबद्दल सांगत होती आभाला.. आणि ती आणि आई सकाळी बराच वेळ गप्पा मारत होत्या.."

"वा.." खुश होऊन आलोक चे बाबा बोलले... "काय बोलण झाल ते मी गीता ला विचारेन.. आत्ता आभा ला काय सांगायचं आहे ते ऐकायला आम्ही दोघ उत्सुक आहोत!" मानेनी होकार कळवत त्यांच्या बोलण्याला आलोक च्या आईनी दुजोरा दिला.

"आई,बाबा… मला नाही माहिती तुम्ही कशी प्रतिक्रिया द्याल.. पण आज सकाळी आईंच बोलण ऐकून मी भारावून गेले आणि बरेच दिवस हि गोष्ट सांगायची होती ती आज सांगायचं ठरवलं.. आधी सांगू का नको अश्या विचारात होते!"

"डोंट वरी आभा... तू बोल... तुमच्या दोघांच्या निर्णयाच्या मध्ये आम्ही येणार नाही! फक्त तुम्ही दोघ एकमेकांच्या साथीने आयुष्य जगा.." आलोक ची आई बोलली..

"हो.." आभा आणि आलोक एकसुरात म्हणाले..

"आई बाबा..आम्हाला काय वाटतंय ते सांगतो. पण ऐकायला विचित्र वाटेल..पण आमची मनापासून तशी इच्छा आहे."

"तू बोल आभा... आम्ही तुझ बोलण शांतपणे ऐकून घेऊ.. आणि मला वाटत नाही, तुम्ही आम्हाला न पटण्यासारख काही सांगाल. तू आणि आलोक, तुम्हाला काय चांगल काय वाईट याची समज आहे. तू बोल बिनधास्त होऊन.." बाबा बोलले

"हो आई... सांगते. आम्ही लग्नाच्या आधीपासूनच ठरवलं होत, आम्हाला पाहिलं बाळ हे दत्तक घ्यायचं आहे!" इतक बोलून आभा बोलायची थांबली... आभा आणि आलोक आई बाबांकडे पाहत होते.. दोघ कश्याप्रकारे प्रतिक्रिया देतील याचा दोघांनाही अंदाज न्हवता. आभाच बोलण ऐकून आलोक च्या आईचे डोळे लकाकले.. तिनी एक नजर आलोक च्या बाबांकडे पाहिलं.. आणि दोघांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आल...पण दोघ काहीच बोलले नाहीत.. आलोक आणि आभा गोंधळून गेले.. कारण घरातल्यांची संमती असल्याशिवाय त्यांना पुढे जायचं न्हवत.

"आई, बाबा, तुम्ही काही बोलत नाही.. तुमचा ह्या गोष्टीला नकार आहे? तुमची संमती नसेल तर आम्ही तुमच्या विरोधात जाऊन काहीही करणार नाही. आपल्या घरातली शांती टिकून राहाण महत्वाच आहे. आम्ही जे करू त्यानी घरातली शांती गेली तर काय उपयोग?" आभा हिरमुसून बोलली..

"नाही नाही आभा... आम्ही काही बोललो नाही म्हणजे आमचा नकार आहे अस अजिबात वाटून घेऊ नकोस. खर सांगू का?"

"हो आई.. तुम्हाला काय वाटतंय ते सांगा. आम्ही इच्छा बोलून दाखवली.."

"हाहा.. आम्हाला दोघांना तुझा अभिमान आहे! तुझा आणि आलोकचा सुद्धा! आणि आम्ही एकमेकांकडे पाहून हसलो कारण आमच्या सुद्धा मनात हाच विचार आला होता जेव्हा आमच नवीन लग्न झाल होत.. पण आम्ही तो विचार समाजाला घाबरून म्हणा किंवा काही कारणांनी पूर्ण करू शकलो न्हवतो!! आणि आमचा विचार फक्त विचारच राहिला.. आम्ही त्यावर काही करू नाही शकलो. पण तुम्ही काहीतरी वेगळ करायचा प्रयत्न करताय.. अश्यानीच समाजात सुधारणा होते. आमच्या सारखे विचार करणारी मुल आहेत ह्या गोष्टीनी आम्ही दोघ आनंदून गेलो.. काय बोलाव सुचल नाही म्हणून... तुमच्या लग्नाला फार दिवस झाले नाहीयेत.. आणि तरी तुमचा हा निर्णय खरोखर वाखाखण्या सारखा आहे! आणि आभा.. तुझ खूप कौतुक आहे! तुला बाळ होत नाही म्हणून तू बाळ दत्तक घेणार अस अजिबात नाहीये! बाळ होत नाही म्हणून दत्तक घेणारे बरेच असतील पण... तू वेगळी आहेस! तू फक्त स्वतःसाठी विचार करत नाहीस. खरच तुझे विचार वाखाख्ण्याजोगे आहेत." आलोक ची आई बोलत होती.. "मी फक्त समाज सुधारावा म्हणून प्रयत्न करते पण तू तस वागती आहेस! मला खरोखरीच तुझा अभिमान वाटतो आहे! आणि ह्यांना सुद्धा तुमच्या दोघांचा अभिमानच वाटेल याची मला खात्री आहे."

"हो हो.. मला पण तुमच्या निर्णयाबद्दल फारच आनंद झाला. खरच, कोण करत हल्ली असा विचार? सगळे स्वतःपुरता विचार करण्यात बिझी असतात.. खूप कौतुक आहे तुझ आभा!!!" आलोकच्या बाबांनी आभाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि ते बोलले, "पण एक मात्र सांगतो, हा निर्णय मोठा आहे त्यामुळे जे कराल ते एकत्र पणे करा आणि तुम्ही घेतलेल्या बाळाला एक आदर्श नागरिक बनवा.. आणि दुसर बाळ आल कि पहिल्या बाळाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका."

"हो बाबा.. आम्ही बाळाकडे पूर्ण लक्ष देऊ आणि त्याला चांगलीच शिकवण देण्याचा प्रयत्न करू! आणि दुर्लक्ष? अजिबातच नाही.. त्याची खात्री मी देते. थँक्यू आई, बाबा! तुमच्यामुळे मी माझा निर्णय पूर्णत्वाकडे नेऊ शकेन.. आणि आई..." इतक बोलून आभा सासूला बिलगली... "पण आई, माझ्या आई ला हि गोष्ट पटणार नाही! तिला तुम्ही समजून सांगू शकाल? माझी आई जरा जुन्या विचारांची आहे. आपण समाजाच काहीतरी देण लागतो आणि मला त्याची जाणीव आहे पण आई ला हि गोष्ट पटेल अस मला वाटत नाही. तिच्याशी मी बोलायचं प्रयत्न केला होता पण तिनी मला बोलून देखील दिल न्हवत."

"हो हो... त्याची चिंता सोड.. आणि मला नाही वाटत तुझ्या घरचे माझ म्हणण टाळतील.. पण तुम्ही दोघांनी इतका विचार केला कधी? अश्या निर्णयावर लगेचच येण अवघड आहे. तुम्ही बरीच चर्चा केली असणार.. पण इतका वेळ कधी मिळाला? तुमच्या लग्नाला तर काहीच महिने झाले ना?" प्रश्नार्थक मुद्र्नी आलोक ची आई बोलली.. त्यावर आलोक हसत बोलला.

"आई.. तुला माहितीच आहे! आम्ही लग्नाआधी किती हिंडायचो...त्यावेळी बऱ्याच विषयांवर गप्पा मारायचो.. तेव्हा तिच्या मनातल बोलून दाखवलं होत मला आभानी.. पहिल्यांदी मला वाटल, काय गरज आहे अस काही करायची? इतर लोकं आहेच कि.. आपण काही करायची काय गरज? पण नंतर मला जाणवलं, कोणीतरी करेल म्हणून आपण काहीच करायचं नाही हि अत्यंत वाईट गोष्ट आहे. मला जाणवलं, आपण समाजच देण लागतोच कि.. त्यामुळे माझा सुद्धा त्या गोष्टीला नकार न्हवता.. आमची बरीच चर्चा झाली होती.. आता मी पाहिलं बाळ घरात आणायला उत्सुक आहे. आणि मला खात्री होती.. आपल्या घरातून ह्या गोष्टीला नकार येणार नाही! पण थोडी धाकधूक होतीच! लोकांना सांगण वेगळ आणि आपण तस वागण वेगळ.. हि गोष्ट तुम्हाला कितपत पटेल ह्याची खात्री मात्र न्हवती...तू समाज सुधारण्यासाठी प्रयत्न कार्तेसाच पण ते आपल्या घरातून चालू होईल का ह्याबद्दल खात्री न्हवती."

"नाही नाही... आम्ही फक्त बोलत नाही!! ते आचरणात येईल ते सुद्धा पाहतो.. आपल्या घरातूनच आपण काही प्रयत्न केले तर ती किती आनंदाची गोष्ट असेल. आणि चांगल्या गोष्टींना नकार का देऊ?" हसत आलोक ची आई बोलली.. आणि बाबा सुद्धा आई बरोबर हसायला लागले..

"आता शुभस्य शीघ्रम.. दत्तक प्रकियेच काम सुरु करा." आलोक चे बाबा उत्साहानी बोलले..

"आणि हो आभा... मी उद्याच जाऊन बोलते तुझ्या आईशी आणि आजीशी सुद्धा! आणि त्यांना पटवून द्यायचं काम माझ! तुम्ही त्याची चिंता सोडा!! त्यांच्या कडून सुद्धा होकार येईल हि खात्री मी घेते."

"थँक्यू आई आणि बाबा.. आम्ही आता जातो!!" डोळ्यातलं पाणी पुसत आभा बोलली...आणि आलोक कडे पाहून बाहेर जायचा इशारा केला..

आलोक आणि आभा त्यांच्या रूम मध्ये गेले.. दोघांच्या चेहऱ्यावर समाधान होत.. आलोकच्या आईनी सांगितल्याप्रमाणे आभाच्या आई ला आभाचा निर्णय पटवून दिला.. सगळ्यांची संमती मिळाली आणि दत्तक प्रक्रियेच काम चालू झाल.. आभा च्या आयुष्य खर्या अर्थानी आनंदी झाल..

त्याच संध्याकाळी आभा निवांत बसली होती. तेव्हा नकळतपणे तिच्या नजरेसमोरून तिच्या बालपणी पासूनचा स्लाईडशो चालू झाला... तिला कधीच तिच्या घरी मनाप्रमाणे जगता आल न्हवत त्याच कारण फक्त ती एक मुलगी आहे हे होत.. तिच्या घरी तिला तिच्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार न्हवता कारण ती एक मुलगी होती! पण ती आलोक च्या घरी मात्र अशी परिस्थिती न्हवती!! तिच्या मताला किंमत मिळाली आणि तिच विश्वच बदलल.. आलोक च्या घरी तिच्या मतांना आदर मिळायला लागला होता. तिला आयुष्याकडून अजून कश्याचीच अपेक्षा न्हवती.. आभा च्या मनातले सगळे काळे ढग निघून गेले.. तिच मन मोकळ्या आकाशासारख स्वच्छ झाल... ती डोळे मिटून शांत बसली तिच्या येणाऱ्या आयुष्याची स्वप्न रंगवत!!

***

हि होती आभाची गोष्ट.. जिच्या मनात खूप इच्छा होत्या! त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तिनी प्रयत्न केले आणि तिला यश सुधा मिळाल. प्रत्येक मुलगी मनाशी एक स्वप्न घेऊन जगत असते पण त्यातल्या काहींचीच स्वप्न पूर्ण होतात.. पण आभासारख जर सगळ्या मुलींची स्वप्न पूर्ण करायला तिच्या घरातल्यांनी साथ दिली तर समाजाची खऱ्या अर्थाने प्रगती होईल.. हो कि नाही?

***

अनुजा कुलकर्णी.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED