लिफ्ट - part -1 Amita a. Salvi द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लिफ्ट - part -1

लिफ्ट

Part - 1

ऑपरेशन थिएटरच्या बाहेर बसलेली सुमन मनातून थोडी घाबरलेली होती. श्रीधरने - तिच्या पतीने त्यांच्या ऑपरेशनविषयी अमेरिकेत स्थाईक झालेल्या त्यांच्या मुलाला - अजयला कळवायचे नाही, अशी अट ऑपरेशनसाठी तयार होताना घातली होती. या त्यांच्या अटीमागे अजयविषयीचे त्यांचे प्रेम होते, त्याला येण्या-जाण्याचा त्रास होऊ नये ही इच्छा होती आणि सुमनलाही ते पटलं होतं पण आज आत त्यांचे ऑपरेशन होत असताना मात्र तिला ब्रम्हांड आठवत होते. अजयला बोलावले नाही म्हणून ती स्वतःलाच दोष देत होती. आज तिला भविष्यातल्या खडतर वाटचालीची चाहूल लागली होती. या वयात दोघांना अशा अनाहुत संकटांना सामोरे जाताना कोणाची साथ मिळणार नव्हती. तिच्या डोळ्यासमोर नोकरी आणि घर सांभाळण्याची तारेवरची कसरत करणारी सुमन येत होती. आयुष्यभर धावून शेवटी मिळालं काय? हे निराधार आयुष्य ! तिचं मन विषण्ण झालं होतं. त्यातून ते मोठं हॉस्पिटल! आत अनेकांची ऑपरेशन होत होती. त्यातील एकाचा हार्टच्या ऑपरेशनच्या वेळी मृत्यू झाला आणि तेथील शोकाकुल वातावरणामुळे सुमनच्या मनावरील ताण अधिकच वाढला. कोणाची धावपळ नको म्हणून तिने नात्यातील कोणालाही बोलावले नव्हते. तीही आपण मोठी चूक केली असं तिला आता वाटू लागलं. ते दोन तास म्हणजे जणू तिला अनेक युगे गेल्यासारखी वाटली. जेव्हा डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी हसून तिला ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडल्याचं सांगितलं तेव्हा कुठे तिचं भरकटणारं मन ताळ्यावर आलं.

श्रीधरना ऑपरेशननंतर स्पेशल रूममधे हलवण्यात आलं. एका रूममधे दोन कोट, बाजूला पेशन्टबरोबरच्या व्यक्तीसाठी एक दिवाण! सुमनने काही जवळच्या लोकांना श्रीधरच्या ऑपरेशनविषयी कळवलं. हे सर्व होईपर्यंत संध्याकाळ झाली होती. तिने पाहिलं, शेजारच्या बेडवरच्या वृद्ध पेशन्टची प्रकृती बहुतेक चिंताजनक झाली होती. डॉक्टर आणि नर्सेसची धावपळ चालली होती. पण काही उपयोग झाला नाही. तेथील बायकांचे हुंदके ऐकू येऊ लागले. थोड्या वेळाने बोडी बाहेर नेण्यात आली आणि तेथे शांतता पसरली.

आज सकाळपासून सुमनला एका वेगळ्याच विश्वात वावरत असल्यासारखे वाटत होते. तेथील मृत्यूच्या छायेने तिचं मन सुन्न झालं होतं. वार्डमधील दुःखद दृष्य पाहिल्यावर तिला भीतीने घेरलं होतं. रात्री इथे कसं रहायचं, हा प्रश्न तिला सतावत होता. पण हॉस्पिटलच्या लोकांसाठी हे सर्व रूटीन होतं. काही वेळाने सफाई कामगाराने येऊन बेड साफ केला. नवीन चादरी घातल्या. लादी फिनेलने स्वच्छ केली. आणि थोड्याच वेळात तिथे दुसरा - खरं म्हणजे दुसरी - पेशन्ट आली. त्या बाईंचं गुडघ्याचं ऑपरेशन सकाळीच झालं होतं. आता कोट रिकामी झाल्यामुळे त्यांना इथे आणलं होतं. त्यांना त्यांच्याबरोबरच्या लोकांशी बोलताना बघून सुमनच्या मनावरचं ओझं बरंचसं उतरलं. त्यांच्या दोन मुलींनी सुमनचीही चॊकशी केली. त्यांनी बरोबर आलेल्या सगळ्या नातेवाईकांना घरी जायला सांगितलं तेव्हा सुमनला आश्चर्य वाटलं. एक मुलगी त्यांच्याबरोबर राहिली होती . रूममधे त्या आल्यापासून तेथील वातावरण बदलून गेलं. तिथला कोंदटपणा कमी होऊन थोडा मोकळेपणा आला. तिथल्या मंद दिव्यांचा प्रकाश आपोआप थोडा वाढलाय असं सुमनला वाटू लागलं.

सकाळी त्या सुमनकडे बघून हसल्या. पंच्याहत्तरीला आल्या असल्या तरी उत्साही वाटत होत्या. अजून सलाइन लावलेलं होतं पण चेहरा प्रसन्न होता. सुमनने त्यांच्या जवळ जाऊन प्रकृतीची चॊकशी केली. त्या दोघी चारच वाक्य बोलल्या असतील पण तेवढ्यातूनच त्यांच्या व्यक्तिमत्वातील कणखरपणा सुमनला जाणवला. त्यांचं बोलणं खणखणीत होतं. साधारणपणे या वयातील व्यक्तींच्या बोलण्यात असणारा कडवटपणा त्यांच्याशी बोलताना सुमनला जाणवली नाही. सकाळी आठ वाजता रात्री थांबलेली मुलगी गेली आणि तिच्या जागी दुसरी मुलगी आली. घरचे लोक संध्याकाळी भेटीच्या वेळीच आले. ऑपरेशनसाठी सांगितलेल्या बजेटपेक्षा खूप खर्च झाल्याची तक्रार मुली करत होत्या पण सुनिताबाईंनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. रात्री परत त्यांच्याबरोबर रहायला काल रात्री थांबलेली मुलगी आली. बहुतेक त्या दोघी त्यांना हॉस्पिटलमधे सांभाळायला ठेवलेल्या नर्स दिसत होत्या. पण नर्सचा गणवेष घालत नव्हत्या त्यामुळे ओळखू येत नव्हत्या.

त्या दिवशी दिवशी संध्याकाळी श्रीधरना भेटण्यासाठी ओळखीचे बरेच लोक आले होते. काहींनी मुद्दाम अजयचा विषय काढून आजची मुले आई-वडिलांविषयी कशी बेफिकीर झाली आहेत हे ऎकवायला सुरुवात केली. पण श्रीधरनी अजयला ऑपरेशनविषयी कळवलेलेच नाही असं सांगितल्यावर तो विषय तिथेच थांबला.

तिस-या दिवशी संध्याकाळी त्यांच्या नर्सने- मीनाने आल्या आल्या गमतीने विचारलं,

"काय मॅडम! म‌ऊ खिचडीबरोबर तुमच्या आवडीचं लोणचं मिळालं की नाही आज? "

"अग! कसलं आलंय लोणचं? तिखट आंबट सगळंच वर्ज आहे. मिळमिळीत जेवणाचा कंटाळा आलाय अगदी! आणि अजून चार दिवस काढायचे आहेत." सुनिताबाई अगतिक आवाजात म्हणाल्या.

या नर्सला बाईंच्या जेवणाच्या आवडीनिवडी कशा माहीत? सुमनच्या मनात विचार आला.

हे संभाषण श्रीधरनीही ऐकलं. "मी तर घरी जायचीच वाट बघतोय. गेल्याबरोबर हॉटेलमधून मस्त डिशेस मागवणार." ते सुमनला म्हणाले.

"ते नाही चालणार! काही दिवस तरी तुम्हाला घरीसुद्धा पथ्य पाळावेच लागेल." ती त्यांना दटावत म्हणाली.

दुस-या दिवशी सकाळी परत तोच विषय निघाला. दिवसपाळीची नर्स मेधा त्यांची थट्टा करत होती. " तुम्हाला रोज सकाळी ताज्या दुधाचा चहा लागतो नं! आज करून घेतला की नाही?"

शेवटी न रहावून सुमनने विचारलं, " तुमच्या आवडी - निवडी यांना कशा माहीत?"

"या दोघीही फक्त अता ऑपरेशन झालंय म्हणून इथे येत नाहीत ! त्या दोघीही कायम माझ्याबरोबर असतात!" सुनिताबाई हसत म्हणाल्या.

"रोज कशाला?" सुमनने चमकून विचारले.

"माझा मुलगा आहे अमेरिकेला! गेली अनेक वर्षे तो तिथे आहे. उच्च शिक्षणासाठी तिथे गेला, नंतर चांगली नोकरी मिळाली. नंतर लग्न झालं. एक मुलगाही आहे. " त्यांचा मुलाविषयीचा अभिमान त्यांच्या स्वरात डोकावत होता.

त्या पुढे बोलू लागल्या," वर्षातून एकदा मला भेटायला सगळी येतात. कधी मला अमेरिकेला बोलावतात. ब-याच वेळा तिथे जाऊन आले. आता मात्र एवढा मोठा प्रवास झेपत नाही."

" तुमच्या मुली मुंब‌ईतच आहेत नं ?" सुमनलाही आता जिज्ञासा वाटू लागली होती. "

"मोठ्या दोन मुली आहेत ! सासरी असतात. मुंबईतच रहातात पण त्यांना त्यांच्या जबाबदा-या आहेत!अधूनमधून भेटायला येतात. माझे पती पाच वर्षांपूर्वी वारले. आता मी घरी एकटीच असते.पण मुलींनी त्यांच्या घरच्या माणसांची- मुलांची हेळसांड करून माझ्या मागे रहावं हे मला पटत नाही. खूप आवश्यक असेल तेव्हाच त्यांना फोन करून बोलावते. तशी मी अजून तरी हिंडू - फिरू शकते. घरी माझं जेवणही मीच बनवते. पण मला एकटेपणा वाटायला नको म्हणून मुलाने ह्या दोन नर्स ठेवल्यायत. सकाळी मेधा आणि संध्याकाळी मीना येते. त्या नर्सप्रमाणे नाही; तर माझ्या मुली असल्याप्रमाणे माझ्याबरोबर रहातात."

"मलाही सुरूवातीला त्या तुमच्या नात्यातल्या कोणीतरी असतील असं वाटलं होतं." सुमनला संभाषण चालू ठेवायचं होतं. तिला भेडसावणा-या प्रश्नांना अनपेक्षितपणे उत्तरं मिळत होती.

"या माझ्या ऑपरेशनची व्यवस्थाही त्यानेच केली. अता चिन्मयची - माझ्या नातवाची शाळा चालू आहे, त्यामुळे त्यांना इथे येणं शक्य नव्हतं आणि मला डॉक्टरनी इमर्जन्सी ऑपरेशन सांगितलं. मग त्याने माझ्या पुतण्याला सांगून सर्व काही जुळवून आणलं. पुढच्या महिन्यात चिन्मयची परीक्षा झाली, की सगळे महिन्याभरासाठी इथे येणारच आहेत." मुलाचा विषय आल्यावर सुनिताबाईंना किती बोलू आणि किती नको असं झालं होतं.

त्या थोडावेळ थांबल्या. काहीतरी त्यांच्या ओठावर येत होतं पण बोलायला त्या कचरत होत्या. पण शेवटी न रहावून बोलू लागल्या," मला वाटतं, तुमचा मुलगाही बाहेरगावी नोकरी करतो. तुमच्याकडे भेटायला येणारे काहीजण आडून आडून त्याला दोष देत होते. तो तुम्हाला सोडून तिथे रहातो - आजकाल मुलांना आई-वडिलांची किंमत नाही असे विषय काढून तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करत होते. पण खरं सांगू? मुलांचाही नाइलाज आहे. आपण त्यांनाही समजून घ्यायला हवं! " सुमनच्या मनातली व्यथा सुनिताबाईंना कळली होती, हे त्यांच्या बोलण्यावरून सुमनच्या लक्षात आलं. दोघीही समदुःखी होत्या, पण सुमनचे मन अजूनही दोलायमान होते, तर सुनिताबाईंनी त्यांची वाटचाल निश्चित केली होती.

" आजकाल इथे उच्च शिक्षणासाठी अॅडमिशन मिळणं कठीण आणि मिळालं तरी सर्वसामान्यांना परवडणारं नाही आणि चांगली नोकरी मिळणं त्याहूनही कठीण! त्यांना त्यांच्या नशीबाने त्यांना उच्चशिक्षण घेण्याची आणि चांगलं जीवन जगण्याची संधी दिलीय तर आपण का अडकाठी आणायची? कोणी म्हणालं, तर मी उत्तर देते,"माझ्या मुलामधे सातासमुद्रापलीकडे जाऊन स्वतःला सिद्ध करण्याची हिम्मत आहे, तर त्याला मी का रोखू? आपलं आयुष्य आपण जगलो, त्यांचं आयुष्य त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू दे. आणि जर माझी काही तक्रार नाही तर इतरांना त्याला दोष द्यायचा काय अधिकार आहे?"

" पण या वयात आपल्याला एकटं रहावं लागतंय त्याचं काय? लोकही त्यांना जे दिसतं तेच बोलतात!" सुमनने तिच्या मनातला सल बोलून दाखवला.

"इथं रहाणारी किती मुलं आजकाल एकत्र कुटुंबात रहातात? काहीजण वेगळं घर घेतात ते आपण समजू शकतो पण काही ठिकाणी तर आई-वडील शरीराने असहाय झाले, की त्यांचं घर- संपत्ती घेऊन त्यांना वृद्धाश्रमात पाठवणारी मुलंही आहेत. आपली मुलं मेहनत करून स्वतःचा उत्कर्ष करून घेतायत हे कॊतुकास्पद नाही वाटत तुम्हाला? आपण इतर कोणावर अवलंबून असता कामा नये. आपला आनंद आपणच शोधायचा ! आयुष्य आनंदाने घालवायचं! आणि मुलांना आशीर्वाद द्यायचे. आता जग किती जवळ आलंय! व्हिडिओ कोलिंग करून आपण मुलाशी आणि नातवंडांशी समोरासमोर बोलू शकतो. आपल्यापासून ते खूप लांब रहातायत असं वाटतच नाही. पूर्वीचा काळ आणि आजच्या काळात जमीन अस्मानाचा फरक आहे. हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं!" आता त्यांचं म्हणणं सुमनला पटायला लागलं होतं निराश मनाला उभारी मिळू लागली होती.

***

दोन दिवस कसल्यातरी संपामुळे मुंबई बंद होती; त्यानंतर रविवार आला त्यामुळे श्रीधरना डिस्चार्ज मिळू शकत नव्हता. सुमनचा हॉस्पिटलमधला मुक्काम दोन दिवसांनी वाढला. कितीही कंटाळा आला, तरी इलाज नव्हता. सुनिताबाई मोबाइलवर जुने चित्रपट बघत, गाणी ऐकत! सुमनची आणि त्यांची अगदी जुनी मैत्री असल्याप्रमाणे त्यांच्या गप्पा रंगत होत्या. आता त्यांना फिजिओथेरेपी सुरू झाली होती. वोर्डमधे आणि बाहेर त्यांना चालवलेही जात होते. त्यासुद्धा दुखण्याचा बाऊ न करता उत्साहाने प्रतिसाद देत होत्या.

त्या दिवशी सकाळी न‌ऊच्या सुमारास त्यांना साकेतचा- त्यांच्या मुलाचा फोन आला. व्हिडिओ कोलिंगवर नातू, सून - सगळ्यांशी प्रसन्नपणे बोलल्या. " माझी काही काळजी करू नका! आता तर मी चालायलाही लागलेय. " मुलाला अपराधी वाटू नये म्हणून त्या अधिकच उत्साहाने बोलत होत्या.

पण पुढच्या संभाषणाच्या वेळी त्यांचा चेहरा थोडा कठोर झाला. "नको साकेत ! आहे तीच जागा खूप मोठी आहे. आणखी बाजूचा फ्लॅट घेण्याची काहीच गरज नाही." यानंतर थोडा वेळ थांबून म्हणाल्या,

"हो बाळा! मला माहीत आहे त्या फ्लॅटचे पैसे तूच देशील. पण आपल्याला आणखी मोठ्या जागेची गरज आहे असं नाही वाटत मला!" त्यांच्या आवाजात निश्चय होता.

"आपण हा विषय जरा बाजूला ठेऊया! दोन-तीन दिवसांत मला डिस्चार्ज मिळेल. मग आपण बोलू! चिन्मय झोपायला गेला वाटतं ! तुलाही सकाळी कामावर जायचंय नं? तिथे आता रात्रीचे अकरा वाजले असतील. तूही झोप आता! जास्त जागरणं बरी नाहीत" त्या बहूधा त्या विषयावरील बोलणे टाळण्यासाठी म्हणाल्या.

फोन ठेवल्यावर बराच वेळ त्या डोळे मिटून शांत पडल्या होत्या, पण मनात मात्र विचारांचं तांडव सुरू असावं.

***

contd...( Part. II )