Unhalyat vapra chandan aani dhya tvachechi kalji books and stories free download online pdf in Marathi

उन्हाळ्यात वापरा चंदन आणि घ्या त्वचेची काळजी..

उन्हाळ्यात वापरा चंदन आणि घ्या त्वचेची काळजी..

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पाहता पाहता थंडी संपत आली आणि उन्हाळा वाढायला लागलाय. हवेत बदल व्हायला लागला कि त्वचेच्या तक्रारी हि सामान्य तक्रार दिसून येते. त्वचा हा अतिशय नाजूक अवयव आहे. त्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. बऱ्याच वेळा त्वचेची योग्य निगा राखण्यासाठी ब्युटी पार्लर ची आठवण यायला लागते. आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे, वातावरणातील बदलांमुळे, वाढत्या ताणतणावांमुळे एकीकडे उपजत सौंदर्य टिकवण्याची गरज वाढत असल्याचे दिसत असले, तरी त्यासाठी प्रत्येक वेळी ब्युटी पार्लरमध्ये जाणे शक्‍य होतेच असे नाही. त्यामुळे आपण त्वचेची काळजी घेण्यासाठी बाजारात बरीचशी क्रीम्स आणि लोशन्स आहेत त्याचा वापर करू शकतो, पण ही उत्पादने वापरल्यामुळे त्वचेला त्रास होऊ शकत आणि त्वचेला कायमच नुकसान होऊ शकत. हे टाळण्यासाठी नैसर्गिक उपाय निवडणे कधीही उत्तम आहे. आपल्या कडे सहज उपलब्ध असणारा उपाय म्हणजे- चंदन. घरगुती उपचारांमध्ये चंदनाचा उपयोग घराच्या घरी सुंदर त्वचा मिळण्यासाठी करू शकतो. त्वचेला खाज सुटणे,उन्हातून आल्यवर त्वचा लाल होणे, खाजणे इत्यादी तक्रारींपासून सुटका होण्यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे चंदनाच लेप किंवा चंदनाच तेल हा आहे. त्याचबरोबर काही साध्या सोप्या उपायांच्या साह्याने घरच्या घरी सौंदर्य जपता येऊ शकते; तेही महागड्या ब्युटी पार्लर ला जाऊन जास्ती पैसे खर्च न करता! चंदनाचा उपयोग कारण अतिशय सोप्प आहे. ते आपण घरच्या घरी करू शकतो आणि उत्तम परिणाम मिळवू शकतो! चंदनामध्ये औषधी गुणधर्म असतात. त्वचेचा मऊपणा वाढवण्याचा गुणधर्म चंदन या वनस्पतीचा आहे. चंदन, आपल्या घरातलं एक सुंदर गुपीतच आहे. प्राचीन काळापासून आजपर्यंत चंदनाचं महत्त्वं घरोघर टिकून आहे. चंदन हे वेदनाशमक, आरामदायी, अँण्टिसेप्टिक, बुरशीनाशक आणि थंडावा देणारं असतं. चंदनाचा उपयोग सौंदर्य उपचार आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये मोठय़ा प्रमाणावर केला जातो. चंदन वनस्पतीच्या तेलात त्वचा मऊ ठेवण्याचे सर्वात जास्त गुणधर्म आहेत. चंदनाच्या तेलाने नियमितपणे चेह-याला मसाज केल्यास त्वचेतील रक्ताभिसरण उत्तम होऊन त्वचा मऊ होते. शिवाय त्वचा नितळ होण्यास मदत होते.

चंदनाचा वापर आपल्या देशात परंपरेने चालत आला आहे. उन्हाळ्यातला हा उपचार उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी असतो. त्यामुळेच कितीही नव नवीन सौंदर्य प्रसाधन बाजारात आली तरी चंदनाचा वापर होतांना दिसून येतो. सौंदर्य प्रसाधन आणि औषध म्हणून चंदनाचा आपल्या समाजात होत असलेला वापर यातून अधोरेखित होत असतो. चंदनाचा उपयोग त्वचेला तजेला आणण्यासाठी चांगलाच होत असतो. चंदन आपल्याला दोन स्वरूपात सहजतेने प्राप्तही होते. बाजारात चंदनाची पावडर मिळते, चंदनाचे तेलही मिळते आणि चंदनाच्या खोडाचा म्हणजे लाकडाचा तुकडाही मिळतो.

* चंदन कश्याप्रकारे वापरू शकतो-

१. पिंपल्स घालवण्यासाठी चंदनाचा उपयोग..

चेहऱ्यावर जास्त तेल जमा झाल्यामुळे पुरळ आणि मुरुम होण्याची शक्यता वाढते. चंदनाच वापर पुरळ आणि मुरुमांवर सर्वोत्तम होममेड उपचार आहे. १ टेबलस्पून चंदन पाऊडर, १/२ टेबलस्पून हळद आणि १ टेबलस्पून गुलाबपाणी ह्याचे मिश्रण करून पेस्ट करा. आपला चेहऱ्यावर वर ह्या पेस्ट चा एक कोट लावा आणि 20 मिनीटे ठेवा आणि त्यानंतर पाण्याने धुवा. असे केल्याने , आपण चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी करू शकता आणि त्याचबरोबर आपली त्वचा सुंदर राहण्यास मदत होते.

2. मऊ त्वचेकरता- चंदन

वाढत्या वयाबरोबरच आपली त्वचा सतत पर्यावरणाच्या प्रदूषणाला सामोरी जात असते. त्यामुळे त्वचेचा मऊपण हरवलेला दिसतो आणि चेहरा निस्तेज दिसू शकतो. अश्यावेळी जर त्वचेवर चंदन, हळद आणि लिंबू समान प्रमाणात घेऊन त्याची पेस्ट लाऊन ठेवली आणि ३० मिनिटांनी थंड पाण्यानी स्वच्छ धुतली तर त्याचा फायदा चेहऱ्यावर झालेला दिसून येतो. हि पेस्ट लावल्यामुळे चेहऱ्याची त्वचा फक्त मऊ होणार नाही तर चेहऱ्यावरचे डाग सुद्धा घालवायला मदत होईल.

३. शरीरावरील पुरळ आणि अॅलर्जी कमी करण्यासाठी- चंदन एक उत्तम उपाय

उन्हाळ्यात अंगावर पुरळ किंवा अॅलर्जीच्या त्रासानी आपण बऱ्याच वेळा त्रस्त होत असाल. त्यात उन्हाळ्यात त्वचा अधिक संवेदनशील बनते. हा त्रास कमी करण्यासाठी चंदन हा एक उत्तम उपाय आहे. चंदन पावडर 1 टेस्पून, एक चिमूटभर कापूर घेऊन मिक्स करावे आणि त्यात पाणी घालून पेस्ट तयार करून घ्या. त्वचेवर जिथे जिथे आलेल्या अॅलर्जी आणि पुरळ वर एकसारखी लावून ठेवा. १ तास वाळू द्या आणि नंतर थंड पाण्यानी धुवून टाका. चंदनाचा वापर केल्यानी त्वचेवर आलेली अॅलर्जी कमी होईल. सोरायसिस, पुरळ उठणे किंवा स्कीन अॅलर्जी आणि बर्न्स साठी हा सर्वोत्तम नैसर्गिक उपचार आहे .

४. तजेलदार त्वचेसाठी-

उन्हाचा आणि वार्‍याचा परिणाम होऊन त्वचा खराब झालेली असते. त्वचा खराब होण्याबरोबरच त्वचा काळी झालेली दिसते. तेव्हा त्वचेचा तजेलदारपणा टिकवून ठेवण्यासाठी चंदन आणि हळद ह्याचा उपयोग होऊ शकतो. चंदन आणि हळद यांचे मिश्रण करावे, त्यात थोडे पाणी मिसळून त्याचा लेप चेहर्‍यावर लावावा, तो २० मिनिटे ठेवावा. नंतर धुऊन टाकावा. अस केल्यानी त्वचा तजेलदार होते. या मिश्रणाने चेहर्‍यावरच्या तारुण्यपीटिकाही कमी होतात आणि त्यांच्यामुळे पडणारे डागही निघून जाऊन त्वचा निर्मळ होते. त्वचा कोरडी असणारांनी चंदनाचा केवळ पाण्यात कालवून तयार झालेला लेप लावावा. चेहर्‍यावरची त्वचा मऊ आणि स्निग्ध होते. चंदन, बदामाच्या बियांचे पावडर आणि दूध यांच्या मिश्रणानेही त्वचेचा दिमाख वाढतो. हे मिश्रण चेहरा, हात आणि पायांनाही लावायला हरकत नाही.

५. त्वचेच्या सुरकुत्या घालवायला- चंदन

चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या कि बैचन होत असाल. घाबरू नका. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करून तरुण दिसण्याकरता चंदनाचा वापर हा एक उत्तम उपाय आहे. चंदन हे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करायला आणि तरुण दिसण्याकरता उपयुक्त आहे. २ टेबलस्पून चंदन पाऊडर, अंड्याच्या बलक आणि १ टेबलस्पून मध घेऊन त्याची पेस्ट बनवून ती पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर १ तास लाऊन पाण्यानी धुवून टाका. आणि चेहऱ्याची त्वचा घट होईल त्याचबरोबर चेहऱ्यावरच्या सुरकुत्या सुद्धा कमी होतील. चंदन हे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करायला आणि त्वचा घट्ट करायला अतिशय उपयुक्त आहे.

*चंदन वापरल्यामुळे काही साइड इफेक्ट्स दिसून येत नाहीत :

आयुर्वेद मध्ये सांगितल्याप्रमाणे चंदन कित्येक शतके वापरले जात आहे. चंदनाच्या वापरामुळे कोणत्याही प्रकारच्या त्वचा विकारात आराम पडल्याच दिसून येत. चंदन हा एक नैसर्गिक पदार्थ आहे. चंदनाचा नियमित उपयोग केल्यामुळे कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स दिसून येत नाहीत. फक्त जे चंदन वापरताय ते चांगल आहे ह्याची खात्री करायला विसरू नका. आणि चंदन वापराबद्दल मनात शंका असेल तर डॉक्टर चा सल्ला घेण कधीही हितकारक. कधी कधी त्वचा खूप संवेदनशील असू शकते त्यामुळे मनात शंका असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन चंदन वापरणं कधीही हितकारक ठरेल.

चंदन हा सर्व त्वचा समस्येवर आणि त्वचा तजेलदार करण्यासाठी,त्वचेवरील सुरकुत्या घालवण्यासाठी, चेहरा तजेलदार करण्यासाठी सर्वोत्तम नैसर्गिक मार्ग आहे. त्यामुळे महागडी क्रीम्स वापरण्यापेक्षा पूर्वापार चालत आलेलं चंदन वापरून बघा. आणि सुंदर दिसा. तुमची त्वचा कोणत्याही प्रकारची असो- तेलकट , कोरडी, किंवा सामान्य- तुम्ही चंदनाचा उपयोग करून सुंदर दिसू शकता. आणि चंदन वापरल्यामुळे आरशासमोर तासंतास उभ राहून चेहऱ्यावर झालेला फरक नक्की पाहू शकता!!

येणारा उन्हाळा तुम्हाला आनंदी जाओ... काळजी घ्या!

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

अनुजा कुलकर्णी.

Email id- anuakulk@gmail.com

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED