Akalpit - 7 books and stories free download online pdf in Marathi

अकल्पित - 7

(वाचकांनी हा अध्याय वाचण्या आधी सुरुवातीचे सहा अध्याय वाचावे. अन्यथा वाचकांना या अध्यायाचा अर्थ लागणार नाही.)

Chapter 7

कधी विचार केला नव्हता की मला वेड्यांच्या हॉस्पीटलमध्ये राहावं लागेल म्हणून. दुसऱ्या दिवशी सकाळी माझी तपासणी केली जाणार होती आणि डॉक्टर मला मी वेडा असल्याचा सर्टिफिकेट देणार होते. प्रमाणपत्रा शिवाय आपण सुशिक्षीत आहोत हे सिध्द करता येत नाही. मग मला तर मनोरूग्ण असल्याचे सिध्द करायचे होते. या कलयुगात एक दिवस असा येईल, जेव्हा माणसाला माणुस असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल आणि त्या प्रमाणपत्राशिवाय हा समाज त्या माणसाला माणसांमध्ये मोजणार नाही.

काहीही असो. पण तो हॉस्पीटल भलताच मोठा होता. त्या वॉर्डमध्ये विस – पंच्वीस बेड असतील. पण त्या पैकी फक्त आठच बेड भरले होते, बाकी रिकामे. मी तिथं जेव्हा पासून गेलो होतो, तेव्हा पासून ते सातही वेडे निवांत झोपले होते (आठवा मी होतो). मला वाटलं होतं की वेड्यांच्या हॉस्पीटलमध्ये सगळी वेडी माणसं जमीनीवर लोळतात, आरडा ओरडा करतात, फाटके कपडे घालतात. पण तिथला दृश्य पाहिल्यावर आपण वेड्यांच्या हॉस्पीटलमध्ये आहोत की एखाद्या शवगृहात¿ असा प्रश्न पडला.

मी आठवा वेडा होतो आणि इतर वेड्याप्रमाणे मलाही झोपायला पाहिजे असा विचार करून मी मला दिलेल्या बेडवर आडवा झालो. डोळे बंद करून दोनच सेकंद झाले असतील, तेवढ्यात एक आवाज आला.

“आदित्य.”

डॉक्टर सोडून तिथं मला कोणीही ओळखत नव्हतं. मग अशा ठिकाणी मला ओळखणारा हा कोण, हे पाहण्यासाठी मी उठलो आणि आजूबाजूला पाहू लागलो.

“आदित्य!”

माझ्या शेजारच्या बेडवरचा सातवा वेडा माझ्याकडे आश्चर्याने पाहून म्हणाला.

“तुम्ही मला ओळखता?”

“का तू मला ओळखत नाहीस?”

“नाही... म्हणजे दोन आठवड्यांपुर्वी माझा अपघात झाला होता आणि त्या अपघातात माझी स्मृती गेली... पुर्णपणे मेमरी लॉस. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यात मला भेटलेत तेवढ्यांनाच मी ओळखतो. त्यांना सोडून मी इतर कोणालाही ओळखत नाही. त्यामुळे तुम्ही जर मला अपघाताच्या आधी भेटला असाल, तर सॉरी मला तेव्हाचं काहीच आठवत नाहीये.”

तो माझ्याकडे डोळे मोठे करून पाहतच राहिला. मी त्याला विचारले.

“... मग... सांग. तू कोण आहात ते?”

“तू मला ओळखतोस. मला तुझा मित्रच समज. पण ते महत्त्वाचं नाही. तू मला हे सांग तू इथं कसा? काय झालं तुला? मेमरी लॉस प्रॉब्लेमच्या उपचारासाठी आला आहेस का?”

“त्यासाठी नाही. पण अपघातात माझ्या डोक्यावर जो मार लागला त्यामुळे माझ्या मेंदूवर परीणाम झाला आणि मला वेगवेगळे भास होत आहेत, असं सगळे म्हणतात आणि काही प्रमाणात मलाही तसंच वाटतं.”

काही वेळ त्याने विचार केला आणि तो त्याच्या खाटेवर डोळे बंद करून अडवा झाला.

“अरे¡ मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं दिली. आता मला सांग तू कोण आहेस, इथं काय करतोय आणि मला कसा ओळखतोस?”

“त्यासाठी तू मला एक गोष्ट सांग, तू कोणाच्या शोधात आहेस?”

मला त्याचा प्रश्न काहीसा विचित्र वाटला. तसा तो व्यक्तीच मला विचित्र वाटत होता. पण त्याला तरी काय बोलायचं. शेवटी तो सुध्दा वेडाच होता.

“मी कोणाच्या शोधात आहे, म्हणजे?”

“म्हणजे तू कोणाला शोधतोय? तुला कोण हवंय?”

“पण मी ते तुला का सांगू?”

“चालेल. नको सांगू.”

एवढं बोलून त्याने पुन्हा डोळे बंद केले आणि चेहेरा दुसऱ्या बाजूला फिरवून झोपला.

“थांब. मी विचार करतो आणि तुला सांगतो की मी कोणाला शोधत आहे.” त्याला माझ्याकडून कोणते उत्तर अपेक्षीत असावे, याचा विचार मी करू लागलो.

“यासाठी विचार काय करायचा...”

“हां. मला आठवलं. मी माझ्या कॉलेजच्या काळात ज्या मुलीवर प्रेम करत होतो, त्या मुलीला शोधतोय.”

“तुझ्या चेहेऱ्याकडं पाहून तर असं वाटत नाही की तू तुझ्या कॉलेजच्या काळातल्या प्रेमीकेला शोधत आहेस म्हणून. हे उत्तर काही प्रमाणात बरोबर असेल. पण हे ते उत्तर नाही.”

“का? असं काय आहे माझ्या चेहेऱ्यावर, ज्याच्याकडं पाहून तुला असं वाटतं.”

“पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या चेहेऱ्यावर तुमचं प्रेम मिळाल्याची लाली दिसत आहे...”

“असं असेल तर तुम्ही पुन्हा एकदा बघा. प्रेम मिळाल्याची लाली नसेल, टेंशनची लाली असेल.”

“नाही. ही लाली प्रेम मिळाल्याचीच आहे आणि दुसऱी गोष्ट म्हणजे मला माहित आहे की तुम्ही कोणाच्या शोधात आहात ते¿”

“जर तुला माहित आहे, तर तुच सांग मी कोणाच्या शोधात आहे¿”

“तू एकदा विचार तरी कर.”

मी आणखी विचार केला. आधी मी त्याला खुन आणि पोलीसांबद्दल सांगणार नव्हतो. पण शेवटी मला त्याला सांगावं लागलं.

“मी माझ्या एका मित्राला शोधतोय. त्याने खुन केलाय. खरंतर तो माझा मित्र आहे की नाही ते मला सुध्दा माहित नाही. पण तो जो कोणी आहे. तो खुन करुन पळालाय हे नक्की. पोलीस त्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्याच्याबद्दल पोलीसांनासुध्दा आतापर्यंत काहीच पुरावा सापडला नाहीये. पण हेसुध्दा तेवढंच खरं आहे की मी त्याला शोधत नाहीये.”

“तू त्यालाच शोधतोय, किंबहूना तुझं मन तरी. पण माझं ऐक तो व्यक्ती तुला किंवा पोलीसांना शोधून सापडणार नाहीये.”

त्याच्या जवळ नक्कीच माझ्याबद्दल किंवा त्या मृत व्यक्तीबद्दल काहीतरी माहिती असावी, याची मला खात्री होती.

“पण तू एवढ्या विश्वासाने कसा सांगू शकतोस की मी किंवा पोलीस त्याला कधीच शोधू शकणार नाही म्हणून. तू त्याला ओळखतोस का?”

“मी कोणाला काय ओळखणार आणि कोणाला काय सांगणार. मी फक्त वेडा आहे. माझ्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही.”

“मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू मला सांगू शकतोस.”

“तू ज्याला शोधत आहेस. तो व्यक्ती एका वेड्यांच्या हॉस्पीटलमध्ये आहे.”

“वेड्यांच्या हॉस्पीटलमध्ये! कुठल्या हॉस्पीटलमध्ये?”

“याच शहरातल्या एका हॉस्पीटलमध्ये.”

त्याक्षणी मला राहुलने आदल्या दिवशी हॉस्पीटलबद्दल सांगितलेली माहिती आठवली. त्या आधाराने मी त्याला म्हणालो.

“ज्या हॉस्पीटलमध्ये आपण सध्याला बसलोय तो या शहरातला एकमात्र मनोरोग चिकित्सालय आहे. म्हणजे वेड्यांच हॉस्पीटल. तर काय तो याच हॉस्पीटलमध्ये आहे?”

“तू हुशार आहेस. पण मी तुला सर्व काही असं सरळ सरळ सांगू शकत नाही. जर मी तुला सर्व काही असं सरळ सरळ सांगीतलं तर तू आणि पोलीस त्या व्यक्ती पर्यंत पोहोचणार आणि त्याला पकडणार.”

“पण तो इथं का आहे? म्हणजे त्याने तर शहर सोडून पळून जायला पाहिजे होतं.”

“वेड्यांवर कोणत्याही प्रकारा गुन्हा दाखल करता येत नाही म्हणून.”

मी त्याच्या चेहेऱ्यावरचे हावभाव पाहिले. ते पाहिल्यावर मला त्याच्यावर संशय आला आणि मी त्याला विचारले.

“तुच तर तो खुनी नाहीस ना?”

माझ्या प्रश्नानंतर तो काही न बोलता फक्त जोरजोरात हसू लागला. त्याच्या हसण्यावरून हत्यारा तोच असणार याची मला खात्री पटली. हसून झाल्यावर काही न बोलता तो झोपून गेला. त्याला पोलीसांच्या हाती पकडवून द्यावे की नाही यावर मी तासभर विचार केला. पण पोलीसांच्या हाती त्याला दिले आणि त्याने तो खुनी नसल्याचे सिध्द करून दाखवले, तर मी पुन्हा पोलीसांच्या लफड्यात अडकेल. या विचाराने मी काही न करता तसाच झोपलो.

*****

सकाळी जेव्हा नर्सने मला उठवलं तेव्हा माझ्या शेजारचा बेड रिकामा होता. जेव्हा मी नर्सला त्या बेडवरच्या पेशंटबद्दल विचारले तेव्हा तिने त्या बेडवर कधी कोणी पेशंट नव्हताच असं सांगितलं. तिच्या म्हणण्यानुसार त्या वॉर्डमध्ये सातच पेशंट होते. सकाळ सकाळी मिळालेल्या बातमीनंतर मला माझ्यावरच संशय येऊ लागला. डॉक्टरांनीसुध्दा माझी तपासणी न करताच मला लेखीपत्र देऊन टाकले.

“पण डॉक्टर तुम्ही तर म्हणाला होतात की माझी तपासणी केल्याशिवाय मला लेखी पत्र देणार नाही म्हणून. मग तुम्ही मला पत्र तपासणीशिवाय कसं दिलंत¿”

“तुम्हाला नेमका काय आजार आहे. हे आम्हाला कळाले आहे. त्या आधारावरूनच मी तुम्हाला हे पत्र देतोय.”

मी आश्चर्याने त्या पत्राकडे पाहत होतो.

“... मी तुम्हाला म्हणालो होतो ना की आमच्याकडे सगळ्या सुविधा आहेत म्हणून. त्यांचा आम्ही वापर केला आणि तुमच्या आजाराचे निदान केले. आता तुम्ही हे पत्र पोलीसांना देऊ शकता.”

मला पत्र पाहिजे होतं आणि ते मला मिळालं. बाकी त्यांनी कोणत्या विकाराचा निदान केला, मला खरंच भास होत आहेत का किंवा मला तपासण्यासाठी त्यांनी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला, याचा विचार न करता मी तिथून निघालो. जिन्यामधून खाली उतरताच समोर राहुल दिसला.

“राहुल¡ तू इथं¿”

“तुच घराच्या दारावर माझ्यासाठी तो कागद चिटकवला होतास ना, की मी हॉस्पीटलमध्ये जातोय. घरी नसलो तर हॉस्पीटलमध्ये फोन करून विचार.”

“हो – हो. मीच चिटकवला होता तो कागद. पण मी तो काल जाताना चिटकवला होता. संध्याकाळी कामावरून आल्यावर वाचला नाहीस का¿”

“संध्याकाळी मला कामावरून घरी येता येता रात्रीचे दहा वाजले. म्हणून मग मी तुझ्या घरी गेलोच नाही. पण सकाळी तुझ्या घरी पोहोचलो तेव्हा मला तो कागद दारावर दिसला. त्याला वाचून हॉस्पीटलमध्ये फोन केला. त्यांनी सांगितलं की तू इथं कालपासून ऍड्मीट झाला आहेस म्हणून. तू इथं फक्त डॉक्टरांचं पत्र घ्यायला आला होतासना. मग इथं उपचार घेत का बसलास¿”

“उपचार नव्हतो घेत. माझी तपासणी करून, मला खरच तो आजार आहे हे सिध्द झाल्याशिवाय डॉक्टर मला पत्र देणार नव्हते. म्हणून त्यांनी मला इथं ऍडमिट व्हायला सांगितलं.”

“मग आता काय करायचं. तुला तर तो आजार नाहीये. मग तो सिध्द कसा होणार¿ आणि आजार सिध्द झाला नाही तर पोलीस आपल्या दोघांना तुरूंगात टाकणार.”

राहुल डोक्याला हात लाऊन गोंधळलेल्या अवस्थेत बोलत होता.

“जरा याच्याकडे बघं.”

माझ्या हातातल्या पत्राकडे पाहायला सांगून मी ते पत्र त्याच्या तोंडासमोर धरले. त्याने ते पत्र हातात घेत मला विचारले.

“हे काय आहे¿”

“वाचून बघ.”

“अं.... आदित्य देसाई हे एका मानस विकाराने ग्रस्त रुग्ण आहेत. यांनी दिलेल्या माहितीवर पोलीसांनी किंवा कायद्याशी निगडीत कोणत्याही विभागाने विश्वास ठेऊ नये किंवा याला गंभिरतेने घेऊ नये. आदित्य यांच्या आजाराबद्दल अधीक माहितीसाठी रुग्णालयाला संपर्क साधावा. आम्ही आपली पुर्णतः सहायता करण्याचा प्रयत्न करू.”

पत्र वाचून झाल्यावर राहुल माझ्याकडे डोळे फाडून पाहू लागला.

“राहुल, मला वाटतंय मला खरंच आजार झाला आहे. काल रात्री मला एक पेशंट माझ्या शेजारच्या बेडवर दिसला. मी त्याच्याशी बोललो, गप्पा मारल्या आणि सकाळी तो गायब झाला. मी नर्सला विचारलं तर ती म्हणाली की त्या बेडवर कोणी पेशंट नव्हताच आणि बरेच दिवसांपासून तो बेड रिकामाच आहे.”

राहुल विचारात पडला. तो इतका गोंधळलेला होता की त्याला काय करावे ते कळत नव्हते.

“पुढं काय करायचं¿”

मी त्याला विचारलं..

“मला सुध्दा समजत नाहीये.”

“ते जाऊदे. तुझ्याकडे शंभर रूपये आहेत का¿”

त्याने खिशातून पाकिट बाहेर काढले आणि त्यामधून शंभर रूपये मला दिले.

“काल मी फक्त डॉक्टरांची फी दिली होती. बेडचा भाडा दिलाच नव्हता.”

आम्ही काऊंटरवर आलो. मी माझे कागदपत्र त्यांना दाखवले. काऊंटरवर बसलेल्या बाईने त्यांच्या रजीस्टरमध्ये पाहून मला पैशाची पावती दिली. त्या पावतीवर रुपये १८० असं लिहिलं होतं.

“१८०¿ इतके कसे¿ तुम्हीच काल म्हणाला होता ना की एका दिवसाचे चार्ज नव्वद रुपये होतील. मग आता दुप्पट पैसे का मागताय¿”

“एक बेड, एक दिवस वापरल्याचे नव्वद रूपये. पण तुम्ही दोन बेड वापरल्यामुळे दुप्पट पैसे.”

“मी दोन बेड कधी वापरले¿”

“एक बेडवर तुम्ही झोपलात आणि दुसऱ्या बेडवर तुमचा भाऊ झोपला होता, त्यांचे पैसे.”

“माझा भाऊ¿ कोण माझा भाऊ¿ माझा कोणी भाऊ नाहीये.”

“तुमचा भाऊ नव्हता तर कोण होता तो¿”

“मला काय माहित कोण होता तो. आणि तुम्ही त्याच्यावर कसा विश्वास ठेवला की तो माझाच भाऊ आहे म्हणून¿”

“हे बघा सर. तुम्ही माझा वेळ वाया घालवू नका. तो तुमचा भाऊ होता की नव्हता ते तुम्ही आपापसात पाहून घ्या. ज्या मानसाने तुमचे आणि त्याच्या बेडचे पैसे भरलेत, त्या मानसाला भाऊ समजा नाहीतर काहीही समजा. फायदा तर तुमचाच झाला ना. त्यांनी पैसे भरले आणि पावती इथंच सोडून गेले म्हणून ही पावती मी तुम्हाला दिली...”

बोलता बोलता तिने पन्नासची नोट आम्हाला दिली आणि पुढं बोलू लागली.

“... आणि ही नोट बदलून द्या. त्यांनी आम्हाला खोटी नोट दिली आहे.”

मी नोट हातात घेतली आणि नोटेला वरून खालून पाहिले.

“ही नोट खोटी आहे¿ पण कशावरून¿”

“नोटेवर सन २०१० असं लिहिलं आहे. तुम्ही १९९४ मध्ये २०१०ची नोट देताय. मग ती खोटी नोट नाही तर मग काय खरी आहे का¿”

मी नोटेवर पाहिले. खरंच त्यावर सन २०१० असं लिहिलं होतं. मी तिला पन्नासची नोट बदलून दिली आणि तिथून निघालो.

तिच्या बोलण्यावरून हे तर सिध्द झालं होतं की मला कोणत्याही प्रकारचा विकार नव्हता आणि आदल्या रात्री माझ्या सोबत बोलणारा व्यक्ती माझा भास नसून, एक जिवंत व्यक्ती होता. मी त्या पावतीवर नाव पाहिलं. त्याच्यावर पैसे भरणाऱ्याचे नावाच्या जागी “अमन मेहेता” असं लिहिलं होतं.

*****

सायलीने आम्हाला बोलवलेल्या वेळेवर मी आणि करीश्मा तिच्या घरी पोहोचलो. राहुललाही मी सांगितलं होतं. त्यानुसार तोसुध्दा तिथं पोहोचला. सायलीचा घर म्हणजे जुनाट बिल्डींगमधला वन बि.एच्.के. फ्लॅट. बिल्डींग जरी जुनी असली तरी घर मात्र आतून नवीन दिलत होता. कदाचित घराच्या स्वच्छतेवरून आणि सजावटीवरून असं वाटत असावं. तिच्या घरी सगळ्या जुन्या मित्रांना भेटनं झालं. त्यांना मी माझ्या अपघाताबद्दल आणि त्यांनी मला जुन्या आठवणींबद्दल सर्व काही सांगितलं. घरी जाण्यासाठी उशीर होऊ नये म्हणून सर्वांनी लवकर जेवण करायचे ठरवले. आम्ही जेवण करून घेतलं आणि लांब राहणारे एक एक करुन आपापल्या घरी निघून गेले.

शेवटी आम्ही काही पाच सहा जणं राहिलो होतो. आतापर्यंत आम्ही सायलीच्या घराचा हॉल आणि किचन पाहिला होता. आमच्यापैकीच एकाने तिला बेडरुम पाहण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही बेडरूममध्ये प्रवेश केल्याबरोबर आम्हाला भिंतीवर कार्टूनाचे चित्र पाहायला मिळाले. ते दृश्य पाहून मला माझा आधीचा बेडरूम आठवला. पण तिच्या भिंतीवरच्या कार्टूनांमध्ये एक वैशिष्ठ पाहायला मिळाले. सर्व चित्र एकाच कार्टूनाचे होते.

“हे काय सायली¿”

मी चित्रांकडे आश्चर्याने पाहत विचारले.

“तुला माहित नाही का सायली याची फॅन आहे¿”

आमच्यातलीच एक महिला व्यक्ती म्हणाली.

“अरे तू कोणाला विचारतीयेस. हा तर सगळा फॉर्मेट झाला आहे.”

माझ्या शेजारी उभा माझा कॉलेजचा मित्र हसत त्या महिलेला म्हणाला.

“ए सॉफ्टवेअर इंजीनिअर, जरा शांत राहशील का¿”

सायली त्याला शांत करत पुढं बोलू लागली.

“... आदित्य, मलाना लहान पणापासून कार्टूनमधले हे पात्र खुप आवडायचे. म्हणून मी लहानपणापासूनच याचे चित्र जमवत गेले आणि चिटकवत गेले.”

“अच्छा. पण काय आहे हे¿”

“काय आहे म्हणजे, फुलपाखरू आहे ते.”

करीश्माने माझ्या खांद्यावर मारत सांगितले.

“तिला लहानपणा पासून हे फुलपाखरूचं कार्टून खुप आवडायचं...”

तिची आई किचनमधून बाहेर येत म्हणाली.

“हातातल्या घड्याळावर, बॅगवर, पाण्याच्या बाटलीवर, एवढंच काय तर कपड्यांच्या डिझाईनमध्येसुध्दा याच फुलपाखरूच चित्र हवं होतं. म्हणून आम्ही हिलासुध्दा फुलपाखरूच म्हणतो.”

“आई¡ ही गोष्ट काय सांगण्यासारखी आहे का¿”

ती चिढून म्हणाली. बाकी आम्ही हसू लागलो. तिच्या बेडरुमध्ये प्रत्येकजण आपापली जागा धरून बसला होता. मी कपाटा शेजारी बसलो. त्या कपाटाच्या एका भागात छोटासा शोकेस होता. माझी सहज त्या शोकेसकडं नजर गेली. त्यात सायलीच्या कॉलेजच्या काळातला एक ब्लॅक ऍन्ड वाईट फोटो फ्रेम करून लावला होता. मी त्या शोकेसमधून तो फोटो बाहेर काढला आणि त्या फोटोकडे पाहू लागलो.

“सेकंड यीअरचा फोटो आहे. प्रिंसीपलकडून मी स्पेशल एक कॉपी घेतली होती.”

सायली त्या फोटोकडं पाहत म्हणाली. सुरुवातीला मी त्या फोटोमध्ये स्वतःला शोधलं. मला मी फोटोत दिसल्यानंतर एक – एक करून इतरांनाही शोधू लागलो. त्या फोटोमध्ये मला अमनही दिसला.

“हा या फोटोत काय करतोय¿”

सायलीने फोटोत पाहिले आणि म्हणाली.

“तो अमन आहे. तोसुध्दा आपल्याच क्लासमध्ये शिकत होता.”

मी रागात राहुलकडं पाहिलं.

“जर हा आपल्याच बॅचचा आहे तर मग तू याला त्या दिवशी ओळखलं का नाहीस¿”

“मी कसं ओळखणार¿ मी कुठं त्याला पाहिलं होतं. आणि तसंही...”

राहुल पुढं काही बोलणार त्या आधी सायलीने मला विचारले.

“तुम्ही कशाबद्दल बोलतायं¿ आम्हाला पण सांगा.”

“अरे त्या दिवशी मी...”

मी बोलता बोलता थांबलो. मी वेड्यांच्या हॉस्पीटलमध्ये गेलो होतो, ही गोष्ट मी त्यांना कसं सांगणार.

“... अं... तो दोन तिन दिवसांआधी मला भेटला होता. पण त्याने मला सांगितलं नाही की तो माझा मित्र आहे म्हणून.”

मी विषय टाळत पुन्हा फोटोकडं पाहिलं. फोटोमध्ये दिसणाऱ्या प्रत्येकाला मी त्या दिवशी सायलीच्या घरी पाहिलं होतं, फक्त दोन व्यक्तींना सोडून. त्या दोघांकडे बोट दाखवंत मी सायलीला विचारलं.

“यांना मी ओळखलं नाही...”

“तो डाव्या बाजूला उभा आहे तो सुधीर आणि त्याच्या मागच्या बाजूला उभी नंदिनी आहे. दोघंही आपल्याच बॅचमध्ये होती.”

सायली इतरांकडं पाहून काहीशी थांबून म्हणाली. मी सगळ्यांकडं पाहून विचारलं.

“हे दोघं आले नाही आज¿”

“सुधीर सध्दा दिल्लीला आहे. तो तिथंच जॉब करतो. नंदिनी कोणाच्याच कॉन्टॅक्टमध्ये नाहीये. ती कुठं आहे, काय करते, कोणालाच माहित नाही.”

सायली बोलता बोलता थांबली आणि किचनच्या दिशेने निघून गेली. मी फोटोकडं पाहत होतो.

“ती खुप विचित्र होती. सगळ्यांशी भांडायची. खुप गर्वीष्ठ आणि अहंकारी मुलगी होती. म्हणून तिच्याशी कोणी कॉन्टॅक्ट ठेवला नाही.”

माझ्या मागे बसलेल्या मंगेशचा आवाज आला. मी मागे वळून पाहिले आणि त्याला विचारले.

“मग तिचा कोणीच फ्रेंड नव्हता का¿”

“तुच एकमात्र मित्र होतास तिचा. तुझ्याच कॉन्टॅक्टमध्ये होती शेवटपर्यंत ती.”

“कोणाच्याच कॉन्टॅक्टमध्ये नव्हती आणि माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होती असं का¿”

मी मोठ्या आवाजात विचारले.

“आम्हाला काय माहित. याच्या मागंच रहस्य फक्त दोनच जणांना माहित होतं.”

“ते दोघं कोण¿”

मी मंगेशला विचारलं. पण उत्तर मात्र भलत्याच व्यक्तींने दिलं.

“एक तू, ज्याची स्मरण शक्ती गायब झाली आहे आणि दुसरी नंदिनी, जी स्वतःच गायब आहे. तिच्याबद्दल सध्या कोणाला काहीच माहित नाहीये.”

मुलींमधून कोणीतरी बोललं आणि नंतर सर्वजण हसू लागले. एवढ्या सायली सगळ्यांसाठी ट्रे मध्ये आईस्क्रिम घेऊन आली.

“त्या सोफ्याला प्लास्टीकमध्ये बंद करून का ठेवलंय. लग्नात द्यायला ठेवलंय का¿”

करीश्माने सायलीला विचारले.

“हा सोफा तर मला आदित्यने लग्नाचा गिफ्ट म्हणून दिला आहे.”

सर्वजण त्या सोफ्या जवळ जाऊन सोफ्याला पाहू लागले.

“तू एवढी माहागाची वस्तू गिफ्ट म्हणून देशील. वाटलं नव्हतं.”

मंगेश मला म्हणाला. करीश्मा आणि राहुल माझ्याकडे पाहू लागले. त्यांचा तसा चेहेरा पाहून मला पैशांचा घोळ आठवला.

आईस्क्रिम खाऊन मी, करीश्मा, आणि राहुल करीश्माच्या घरी गेलो. तिच्या घरी गेल्यावर पैशांचा विषय निघू नये याची मी पुर्ण काळजी घेतली. त्या रात्री आम्ही तिच्याच घरी राहिलो.

*****

दुसऱ्या दिवशी मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो. मी तिथं पोहोचण्याआधीच त्या कॉन्स्टेबलांनी सगळी सेटींग लाऊन ठेवली होती. त्यांनी माझ्याबद्दल इन्स्पेक्टरला सांगितलं होतं. इन्स्पेक्टरने कॉन्स्टेबलांना माझ्या औपचारीक कामांबद्दल सगळं काही समजवलं. मी तिथे पोहोचलो तेव्हा इन्स्पेक्टर तिथं नव्हते. मी माझ्याजवळचा प्रमाणपत्र त्या कॉन्स्टेबलला दिला. सगळ्या गोष्टी आधीच तयार होत्या. मला फक्त एका कागदावर सही करायची होती आणि तो केस बंद होणार होता. त्या सही नंतर मी त्या प्रकरणातून बाहेर होणार होतो. तिथल्या कॉन्स्टेबलला मी त्यांच्याबद्दल विचारलं.

इन्स्पेक्टर कुठं गेलेत¿”

ते बाहेर गेलेत. त्यांना उशीर होणार आहे. तुमच्याकडून डॉक्टरांकडचं प्रमाणपत्र घेऊन ठेवायला त्यांनी आम्हाला सांगितलं आहे. फक्त या कागदांवर सही करा, म्हणजे झालंच. बाकी तुम्हाला त्यांच्याजवळ दुसरं काही काम आहे का¿”

मी असंच विचारलं. माझं दुसरं काही काम नाहीये.

कॉन्स्टेबल जाग्यावरून उठून इन्स्पेक्टरच्या केबीनमध्ये गेला. आतून त्याने एक कागद आणला. त्यावर काही गोष्टी लिहिल्यानंतर त्याने तो कागद मला सहीसाठी दिला.

आता या केसचं काय होणार¿ म्हणजे ती महिला कोण होती¿ कोणी तिचा खुन केला¿ याचा शोध कोण घेणार¿”

कागदावर सही करताना मी त्याला विचारले.

या कागदावर तुमची सही म्हणजे आता केस बंद. या नंतर खुन कोणाचा झाला¿ याचा आम्ही शोध घेणार नाही.

म्हणजे या नतंर खुनी समाजात स्वतंत्रपणे फिरू शकतो¿”

हा केस तुमच्याकडून बंद झाला असं समजायचं.

पण हे तर चुकीचं आहे. त्या हत्या करणाऱ्याचा तुम्ही शोध घ्यायला पाहिजे.

तुम्हाला एवढीच काळजी होती तर हा खोटा प्रमाणपत्र का बनवून आणला तुम्ही¿ तुम्हाला कितीही, काहीही वाटलं तरी आम्ही पुराव्याशिवाय काहीच करु शकत नाही आणि हा काय पहिला केस नाहीये. गेल्या सहा सात महिन्यात असेच पाच मृतदेह सापडले आहेत. हे सगळे खुन एकाच प्रकारे करण्यात आले. विशेष म्हणजे पाच खुन केल्यानंतरही आमच्याकडे त्याच्या विरोधात एकही पक्का पुरावा नाहीये. तो कोण आहे हे तर लांबच, जेवढे पुरावे आहेत त्यातून काहीही सिध्द करणं शक्य होणार नाही. तुमच्या केसमध्ये कोणाचा खुन झालाय हे सुध्दा माहित नाही. पण इतर केसमध्ये ज्यांचा खुन झाला आहे. त्यांच्या नातेवाईकांनी आम्हाला हैराण केलंय. त्यामुळे तुमचा केस बंद करतोय. पण जेव्हा इतर केसचा निकाल लागेल. त्यावेळी तुमच्या केसचा खलनायकसुध्दा सापडेलच.

“पण तुम्ही हे कसं सांगू शकता की ते सगळे खुन एकाच व्यक्तीने केले आहे म्हणून¿”

“पाच हत्यांपैकी तिन हत्या केल्यानंतर त्याने आम्हाला पत्र लिहून खुन केल्याचे कळवले होते. तो खुन करून मृतदेहांना नदीत किंवा तलावात फेकून देतो. प्रत्येकाला एकाच प्रकारे मारलंय त्याने. एका माणसाने त्याला मृतदेह पाण्यात फेकताना पाहिले होते. पण तो बऱ्याच अंतरावरून पाहत असल्याने त्याला त्याचा चेहेरा दिसला नाही. फक्त एवढंच कळालं की तो काळा कोट आणि गळ्यात लाल मफलर घालतो. सहाव्या हत्येच्या वेळी जेव्हा तुमचं पत्र आम्हाला मिळालं, तेव्हा आम्हाला वाटलं खुन करणाऱ्यानेच पत्र पाठवलं असणार. कारण तुम्ही पत्रासाठी ज्या कागदाचा वापर केला होता, तशाच कागदाचा वापर खुनीसुध्दा करतो.”

मग माझ्या केसमध्ये खुन्याकडून पत्र आलं का¿”

हेच तर विशेष आहे. त्याने यावेळी पत्र पाठवलं नाहीये. तो मध्य रात्री रस्त्यावर उतरतो, प्रत्येक वेळी महिलेलाच मारतो, मारून शहरातल्या किंवा शहराजवळच्या नदी नाल्यात फेकून देतो, एवढं सगळं करतो आणि त्याला असं करताना कोणीही पाहत नाही. तुमच्या केसमध्ये एक आशेची किरण हाती लागली होती. पण काही फायदा झाला नाही.

मी सही केलेला कागद त्यांच्या हातात दिला आणि म्हणालो.

आम्ही तर या प्रकरणातून बाहेर झालो. बाकी तुम्ही त्याला लवकर शोधाल, अशी आशा करतो. चला मग, भेटू पुन्हा कधीतरी.

मी त्यांच्याशी हात मिळवला. पण जाण्याआधी तो कॉन्स्टेबल मला गंभीर स्वरात म्हणाला.

सावध राहा. कदाचित तो खुनी अजूनही तुमच्याच मागावर असेल.

त्यांच्या वाक्याचं महत्त्व हे भविष्यात माझ्या समोर येणार होतं.

******

त्या दिवशी कामावरून सुटल्यावर राहुल सरळ माझ्या घरी आला. रात्रीचं जेवण झाल्यावर आम्ही अंगणात खुडच्या टाकून बसलो.

“मला अजूनही एक गोष्ट कळाली नाही. त्या डॉक्टरने मला प्रमाणपत्र दिलं कसं¿”

मी राहुलला विचारलं. त्याच्या हातात पुस्तक होतं आणि तो त्या पुस्तकात काहीतरी शोधत होता. पुस्तकातून डोकं बाहेर न काढता तो मला म्हणाला.

“तू वेडा असशील, म्हणून त्याने तुला तसा प्रमाणपत्र दिला आहे.”

“कदाचित त्याला माझ्या काही गोष्टी वेड्यासारख्या वाटल्या असतील... पण...”

या एका मुद्द्यावर येऊन माझ्या मनाचा विचारचक्र पुढं सरकतंच नव्हता आणि त्यात माझ्या मनातल्या गोष्टी मी राहुलला सांगणं योग्य राहिल की नाही, हा वेगळाच विषय होता. शेवटी त्या दिवशी मी ठरवलं आणि त्याला सांगितलं.

“राहुल तुला एक गोष्ट सांगू¿”

“हूँ”

त्याने माझ्याप्रती जास्त उत्सुक्ता न दाखवता तो शब्द उच्चारला.

“पुढच्या चौकात ती बाग आहे ना... तिथं मला एक पेटी सापडली. ती माझीच होती पण माहित नाही का मी त्या पेटीला तिथं जमीनीत पुरलं होतं.”

“हा मग¿”

“त्यात काही पत्र आहेत. त्या पत्रांमधलं अक्षरही माझंच आहे. पण ते पत्र मी कोणाला लिहिलं होतं, ते माहित नाही.”

“तुला काय सांगायचंय नक्की¿”

“मला हे सांगायचंय की ते प्रेमपत्र होतं. मी त्यावर नाव नव्हतं लिहिलं. पण...”

“एक तर तुला पंधरा दिवसांआधीचं काहीही आठवत नाहीये. त्यातून तुला आठवतं की तू कोण्याएके काळी चौकातल्या बागेत ती पेटी लपवली होतीस. त्यातून त्या पेटीत प्रेमपत्र निघाले, तेही तुच लिहिलेस... तुला एक सांगतो. आधीच इथं गोधळ कमी नाही आणि त्यात तू असं काही सांगून आणखी गोंधळ वाढवू नकोस.”

त्याचं बोलणं ऐकून मी शांत बसलो.

“आता बोलत का नाहीस¿”

“तुच तर म्हणालास ना आणखी गोंधळ वाढवू नकोस म्हणून.”

“माझा तो अर्थ नव्हता. आणखी गोंधळ वाढवू नको, म्हणजे असं गोल गोल फिरवून बोलू नकोस. जे काही सांगायचंय ते स्पष्ट सांग.”

“मी स्पष्टच सांगतोय. मला त्या बागेत जायला एकनाथ काकांनी सांगितलं होतं. ते म्हणाले होते की मी नेहेमी तिथं जायचो. ती बाग मी हॉस्पीटलमध्ये असताना स्वप्नात पाहिली होती, म्हणून मी तिथं जमीनीत त्या पेटीला शोधलं. मला त्या पेटीत माझेच प्रेमपत्र आणि सोबत फुलपाखरूच्या आकाराची, नक्षीकाम केलेली, छोटीशी एक लाकडी वस्तू मिळाली आहे. काल आपण सायलीच्या घरी गेलो होतो तेव्हा तिथंसुध्दा तशाच प्रकारचं नक्षीकाम केलेलं फुकपाखरूचं चित्र होतं. त्यात आणि मला सापडलेल्या फुलपाखरात काहीच फरक नाहीये.”

“म्हणजे तुला वाटतं...”

“हो. मी ज्या मुलीला ते प्रेमपत्र लिहिले होते. ती मुलगी दुसरी कोणी नसून सायलीच आहे.”

“पण जर ते प्रेमपत्र तिच्यासाठी लिहिले होतेस, तर मग ते पत्र तुझ्याजवळ कसे¿ ते पत्र तिच्याजवळ असायला पाहिजे होते ना¿”

“ते पत्र मी कधी तिला दिलेच नसतील. कदाचित तिला प्रेमपत्र देण्याची माझी हिम्मतच झाली नसेल.”

“तू उगच कोणत्याही गोष्टीचा विचार करत बसू नकोस. एका फुलपाखरावरून तू कुठल्या कुठं गेलास.”

“नाही रे, मला असं वाटतं की ते पत्र मी सायलीसाठीच लिहिले असणार.”

“मला बोलललास, तिथंपर्यंत ठिक आहे. पण बाकी कोणाला हे असं सांगू नकोस. उगच तिचं लग्न मोडशील.”

“पण मला वाटतं...”

मला मध्येच थांबवत तो म्हणाला.

“तुला असं वाटतं, तुला तसं वाटतं... पण तुला वाटतं तसंच झालं असेल, हे सिध्द करणारा कोणताही पुरावा तुझ्याकडे नाहीये. म्हणून या सगळ्या संभावणांना खरं समजून असं काहीही करू नकोस, ज्याने तुझ्या किंवा तिच्या लग्नात संकटं निर्माण होतील.”

पुढं काही न बोलता मी फक्त होकारार्थी मान डोलवली.

“आणि आता जास्त विचार करायचं नाही. खुन झाला, ती मुलगी कोण होती, खुन कोणी केला असेल, तुझी प्रेमीका कोण होती, पत्र कोणी कोणाला लिहिलं होतं, वगैरे – वगैरे. कशाचाही विचार करायचा नाही. समजलं का¿”

“पत्र कोणी लिहिलं होतं, ते तर मला माहित आहे. ते मीच लिहिलं होतं.”

“म्हटलं ना, कशाचाही विचार करायचा नाही.”

राहुल माझ्यावर ओरडत म्हणाला.

“हो... समजलं.”

तो उठला आणि घरात गेला. पुस्तक सोफ्यावर फेकून त्याने त्याच्या स्कुटरची चावी घेतली आणि तो बाहेर आला.

“रात्रीचा कुठं चाललास¿”

मी राहुलला विचारलं.

“आणखी कुठं जाणार मी. घरी जातोय.”

“पण का¿ आज रात्री इथंच राहा. उद्या सकाळी जा.”

“घरी जातो. रात्रभर बसून प्रॉजेक्ट पुर्ण करतो. या वेळी जर मी माझ्या बॉसला त्याचा प्रॉजेक्ट बनवून दिला नाही तर तो मला नक्कीच कामावरून काढून टाकेल.”

डोक्यावर हेलमेट अडकवून तो त्याची स्कुटर घेऊन निघून गेला. मी बराच वेळ तिथंच बसून राहिलो. झालेल्या प्रकाराचा विचार करायचा का¿ याच्यावर विचार करत होतो.

तेवढ्या फोन वाजल्याचा आवाज आला. सुरुवातीला मी त्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं. पण जेव्हा फोनचा आवाज येतच राहिला आणि कोणी फोन उचलले नाही, त्यावेळी मी आवाजाचा अंदाज घ्यायला सुरुवात केली. आश्चर्यकारक गोष्ट होती की तो आवाज माझ्याच घरातून येत होता. मी धावत घरात आलो आणि वाजणाऱ्या फोनकडं पाहतच राहिलो. फोन बंद झाला पण मी विचार करण्याच्या नादात फोन उचललाच नाही. थोड्या वेळाने फोन पुन्हा आला. यावेळी मी फोन उचलला.

“हॅलो. कोण¿”

“हॅलो, तुम्ही आदित्य बोलताय का¿”

“हो मी आदित्यच बोलतोय, पण तुम्ही कोण¿”

“मी कोण आहे, माझं नाव काय आहे, हे मी तुम्हाला भेटल्यावर सांगेन. मला तुम्हाला भेटायचं आहे. तुमच्याकडे माझं एक काम आहे.”

“पण तुम्हाला मला कोणत्या संदर्भात भेटायचं आहे¿ आणि तुम्ही कोण आहात हे माहित असल्याशिवाय मी तुम्हाला भेटायला का येऊ¿”

“मी तुमचा मित्रच आहे असं समजा. पण कुठला मित्र, कुठं राहतो हे सगळं सांगायला आता माझ्याकडे वेळ नाहीये. तुम्ही उद्या सकाळी हॉटेल ब्लु डायमंडमध्ये या. तुमच्याकडं माझं खुप महत्त्वाचं काम आहे. विसरू नका आणि नक्की या. हॉटेल ब्लु डायमंड, सकाळी १० वाजता.”

एवढं बोलून त्याने फोन ठेवला.

काही वेळापुर्वी मी ज्या विचारांपासून दूर जाण्याचा विचार करत होतो. तेच विचार पुन्हा माझ्या डोक्यात येऊ लागले.

फोन बंद होता तर फोन चालू कसा झाला¿ आणि जर कधी फोन बंद नव्हताच तर मग करीश्माने मला खोटं का सांगितलं¿ प्रत्येक दिवशी नव- नवीन पात्र माझ्या समोर येत होते. प्रत्येकाकडे एक वेगळीच कथा. प्रत्येकाकडे अपुर्ण माहिती आणि छोटीशी आठवण. पण सुरुवातीपासून त्या क्षणापर्यंत संपुर्ण माहिती कोणालाही नव्हती. मी डोक्याला हात लाऊन सोफ्यावर आडवा झालो.

पेटीतल्या पत्रांमुळं काही प्रमाणात आयुष्यात प्रेम येताना दिसत होतं. पण राहुलने त्याचासुध्दा कचरा केला.

विचार चक्र सुरु असताना मला पेटीतल्या पत्रांची आठवण झाली आणि थोडासा रिलॅक्स होण्यासाठी मी ती पत्रे वाचायला काढली. त्यातले चार पत्र मी वाचले होते आणि ते चारही पत्र जवळ जवळ सारखेच होते. त्यात एकच पत्र राहिला होता. त्यातही तशाच प्रकारचं काहीतरी लिहिलं असणार असा विचार करून तो पत्र वाचायला घेतला.

“तुम्ही खुप मंद आहात. तशी तुमच्याकडून अपेक्षा तर होतीच. पण तुम्ही माझ्या अपेक्षेपेक्षाही जास्त मंद निघालात. दोन आठवड्यांपुर्वी एक जिवंत व्यक्ती बेपत्ता झाली आणि पोलीसांना अजून एकही पुरावा सापडला नाही. तिला शोधायची इच्छा असल्यास पुर्व दिशेला शहराबाहेरच्या तलावात तिला शोधा. ती नक्कीच सापडेल.”

तो पत्र खुप विचित्र होता. कदाचित नदीत सापडलेल्या मृतदेहाबद्दल माहिती देण्यासाठी मीच पोलीसांना तो पत्र लिहिला असेल. पण त्या पत्रातल्या भाषेवरून मी पोलीसांना फक्त माहिती द्यायला तो पत्र लिहिला नव्हता, हे समजलं. डोकं जास्त दुःखू नये म्हणून सर्व विचारांना बाजूला ठेवून मी झोपून गेलो.

******

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED