Akalpit - 9 books and stories free download online pdf in Marathi

अकल्पित - 9

(वाचकांनी हा अध्याय वाचण्या आधी सुरुवातीचे आठ अध्याय वाचावे. अन्यथा वाचकांना या अध्यायाचा अर्थ लागणार नाही.)

Chapter 9

सायलीचं माझ्याकडं पाहून स्मितहास्य करणं, माझ्यासाठी वेळ काढून मला एकांतात भेटायला येणं, मला भेटण्यासाठी घरी खोटं सांगणं, या सगळ्या गोष्टी मला इशारा करत होत्या की सायलीच्याही मनात माझ्यासाठी प्रेमाच्या भावना काही प्रमाणात असणार. कदाचित सायलीने तिच्या बॉयफ्रेंडची जी गोष्ट मला सांगितली होती, त्या गोष्टीतला तिचा बॉयफ्रेंड मीच होतो. पण या सगळ्या संभावणा होत्या. खरं काय आणि खोटं काय, मला माहित नव्हतं. सायलीच्या घरून आल्यापासून हाच विचार करत होतो की सायलीला काय सांगायचं आणि कसं सांगायचं. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत विचार केला. पण काहीसुध्दा चांगलं सुचलं नाही.

मी दारासमोरच्या पायऱ्यांवर विचार करत बसलो होतो. गेटजवळ हालचाल झाल्याचा भास झाला. मी त्या दिशेने पाहिलं तर गेटवर अमन उभा होता. त्याला पाहताच मी धावत त्याच्या जवळ गेलो आणि त्याचा हात घट्ट धरून म्हणालो.

“या शहरात कदाचित कोणाही माहित नसेल की गेल्या सहा सात महिन्यात झालेल्या सहा खुनांमागचा हत्यारा कोण आहे. पण मला माहित आहे तो हत्यारा कोण आहे आणि आता मी त्याला पोलीसांकडं घेऊन जाणार आहे.”

“आदित्य माझ्याकडं जास्त वेळ नाहीये. मला फक्त एवढं सांग की तू ग्रिक् हिल्सच्या लाकडी पुलावर गेला होता का¿”

जी गोष्ट माझ्या आणि सायलीशिवाय कोणालाही माहित नव्हती. ती गोष्ट अमनला कशी कळाली¿ हे समजण्यासाठी मी त्याला विचारलं.

“तुला कोणी सांगितलं ग्रिक् हिल्सबद्दल¿”

“मला कोणी सांगितलं नाही, मला माहित आहे. तू मला फक्त एवढं सांग की तू गेला होतास की नव्हतास¿”

“अजून गेलो नाही¿”

“म्हणजे आज जाणार असशील... हूश्श्...”

दिर्घ श्वास सोडत तो घराच्या दिशेने निघाला.

“तू अजूनही सांगितलं नाहीस की तुला कसं कळालं ग्रिक् हिल्सबद्दल¿”

“मी तुला सगळं काही सविस्तर सांगू शकत नाही. कारण माझ्याजवळ एवढा वेळ नाहीये. मी तुला सांगतोय तेवढं ऐक.”

बोलता बोलता त्याने माझ्या हातात घड्याळ घातलं.

“हे काय आहे¿”

“माझ्याकडून तुला भेट.”

दिसण्यावरून ते घड्याळ माहागातलं दिसत होतं. त्या प्रकारचं घड्याळ मी त्या क्षणापर्यंत तरी कधी पाहिलं नव्हतं.

“पण हे घड्याळ कशाला¿”

“तुझ्या बर्थ-डेला मी तुला काहीच देऊ शकलो नाही. म्हणून आता देतोय.”

त्याने त्याच्या खिशातून एक पत्र काढलं आणि माझ्या खिशात ठेवत म्हणाला.

“हे पत्र खास तुझ्यासाठी आहे. तू याला कधीही वाचु शकतोस. पण मला विचारशील तर मी तुला सांगेण की या पत्राला आता वाचुन तुझा वेळ वाया घालवू नकोस. कारण आपल्या दोघांकडेही वाया घालवायला वेळ नाहीये.”

तो पुन्हा गेटच्या दिशेने जाऊ लागला. मी त्याचा हात धरून त्याला थांबवले.

“मी तुला यावेळी असा जाऊन देणार नाहीये. तुला माझ्यासोबत पोलीसांकडं यावंच लागेल.”

“मी सांगितलं ना तुला की आपल्या दोघांकडेही वाया घालवायला वेळ बिलकुल नाहीये.”

“वेळ असो वा नसो, पण तुला माझ्यासोबत पोलीसस्टेशनमध्ये यावच लागेल. तू सहा खुन केलेत.”

“ते सहा खुन मी केले नाही.”

“तू नाही केले तर मग कोणी केले¿”

काही क्षणासाठी तो शांत राहून गेटच्या दिशेने पाहू लागला.

“काय विचार करतोय¿”

त्याने माझा हात धरला आणि मला रस्त्याच्या दिशेने घेऊन जाऊ लागला.

“मला कुठं घेऊन चाललास¿”

“तुला उत्तर हवंय ना की ते खुन कोणी केलेत म्हणून. तुला तुझं देण्याआधी काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील.”

तो मला कुठं घेऊन चालला होता, याचं उत्तर त्याने मला दिलंच नाही. गेट बाहेर त्याने त्याची गाडी उभी केली होती. त्याने मला त्याच्या गाडीवर बसवलं आणि गाडी अतिवेगाने चालवू लागला. त्याने त्याच हॉस्पीटल बाहेर गाडी थांबवली, जिथं आम्ही दोघं पहिल्यांदा भेटलो होतो.

“मला इथं का घेऊन आलास¿ किमान या प्रश्नाचं उत्तर तरी दे.”

“आत जायचं, डॉक्टरांना भेटायचं आणि विचारायचं की तुला त्यांनी कोणत्या आधारावर मानसीक रोगी असल्याचा प्रमाणपत्र दिला होता¿”

“त्याच्यासाठी तू मला इथं आणलंय का¿ अरे त्यांना मी खरंच मनोरोगी असल्याचा भास झाला होता...”

“उगच अंदाज लाऊ नकोस. आत जा आणि डॉक्टरांना विचार.”

त्याच्या सांगण्यावरून नाही तर माझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी मी डॉक्टरांकडं गेलो. डॉक्टरांच्या केबीनमध्ये गेल्यावर मी त्यांना विचारले –

डॉक्टर, मी आदित्य. गेल्या महिन्यात मी जेव्हा तुमच्याकडं आलो होतो. तेव्हा तुम्ही मला जो लेखी पत्र... तो प्रमाणपत्र दिला होता. तो कशाच्या आधारावर दिलात¿”

डॉक्टर माझ्याकडे डोळे बारीक करून पाहत होते. कदाचित त्यांनी मला ओळखलं नव्हतं.

आदित्य... आदित्य देसाई... मला भास होत आहेत असं मी सांगितलं होतं... एका हत्येच्या संदर्भात पोलीसांना पत्र लिहिलं होतं.

डॉक्टरांना आठवल्यावर ते म्हणाले.

अरे हो. आदित्य देसाई. पण काय झालं¿ आज अचानक, असं...

मला विचारायचं होतं की तुम्ही मला ते प्रमाणपत्र दिलं होतं, ते कशाच्या आधारावर दिलं होतं.

का, तुम्हाला माहित नाहीये का¿”

माहित असतं तर तुम्हाला विचारलं असतं का डॉक्टर.

तुच तर म्हणाला होता की तुला वेगवेगळे भास होत आहेत, तू पोलीसांना पत्र लिहून एका अपराधाबद्दल सांगितलंत, त्या संदर्भात काही व्यक्तींचे नावे घेतलीसस, पण पोलीस तपासानंतर ते व्यक्ती अस्तीत्वातच नाही असं कळालं, तसंच तुम्ही सांगितलं होतं की तुम्हाला भास हे फक्त रात्रीचेच होतात. त्यामुळे मी तुम्हाला आमच्या इथं ऍडमिट व्हायला सांगितलं होतं आणि हे सुध्दा सांगितलं होतं की आमच्याकडे रात्रीचे तपासणी करण्यासाठी विशेष उपकरण आहेत. तुमच्या लक्षणांना लक्षात घेऊन मी नर्सला तुमच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं.

त्या रात्री तू झोपेत चालत वॉर्डमधून बाहेर आलात आणि नाईटच्या सिस्टरांना पत्र लिहिण्यासाठी कागद मागितला. त्यावेळी त्यांनी आमच्या इथल्या नाईटच्या डॉक्टरांना बोलावले. त्यांनी तुला तपासल्यावर तू खरंच झोपेत असल्याचं सिध्द झालं. माझ्या सांगण्यावरून त्यांनी तुला कागद आणि पेन दिला. त्यावेळीसुध्दा तू पोलीसांच्या नावाने पत्र लिहिलं. त्यामुळे भूतकाळात जे काही पत्र तू लिहिले असतील त्यातल्या काही गोष्टी खऱ्या, तर काही काल्पनीक असणार.

पण डॉक्टर हे कसं शक्य आहे¿”

त्या रात्रीच्या तपासणी नंतर माझा अनुभव असं सांगतो की झोपेत चालणे आणि झोपेत पत्र लिहिने वगैरे हे फक्त डोक्यावर मार लागल्याने झालेला आजार नाहीये. हा विकार तुला अपघाता पुर्वीसुध्दा असणार.

झोपेत चालण्या – बोलण्यापर्यंत ठिक आहे. पण कोणी झोपेत पत्र कसं लिहू शकतो¿”

तुम्ही पत्राचं काय बोलता. माणसं झोपेत टायपिंग करतात, गाडी चालवतात, स्विंमींग करतात. एवढं नाही तर काही माणसांनी झोपेत खुनसुध्दा केले आहेत. आतापर्यंत असे झोपेत खुन केल्याचे २७ केसेस् माझ्याकडे आलेत.

डॉक्टरांशी बोलून सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या होत्या.

पण डॉक्टर याच्यावर काही उपचार नाही का¿

आहे. पण उपचाराने विकार पुर्णतः नष्ट होण्याची गॅरेंटी कोणताही डॉक्टर घेणार नाही. उपचार करायचं असेल तर तुम्ही आमच्या हॉस्पीटलमध्ये ऍडमिट होऊ शकता.

नक्कीच... पण आता नाही. आधी सगळी कामं उरकून घेतो आणि मगच उपचारासाठी येतो.

जसं तुम्हाला सोईस्कर वाटेल.

मला संध्याकाळी सायलीला भेटायला जायची आठवण झाल्याबरोबर मी तिथून निघालो. हॉस्पीटल बाहेर अमन माझी वाट पाहत थांबला होता. मला पाहताच त्याने गाडी चालू केली आणि बसायचा इशारा केला.

“याचा अर्थ सगळे पत्र मी झोपेत लिहिले होते¿”

गाडीवर बसत मी अमनला विचारले.

“मला तर माहितच नव्हतं की तू असं काही केलं असशील. त्या दिवशी हॉस्पीटलमध्ये भेटलास तेव्हा मला कळालं की तुझा अपघात झाला वगैरे. त्यानंतर मी चौकशी केल्यावर कळालं की तू पोलीसांना तो पत्र आणि फोटो पाठवलास म्हणून.”

विचार करून करून डोकं दुःखू लागलं होतं. असं वाटत होतं मला चक्कर येईल की काय. अमन अतिवेगाने गाडी चालवत होता. काही वेळातच आम्ही माझ्या घरा समोर पोहोचलो.

“याचा अर्थ असा की मला पोलीसांना माहिती द्यायची नव्हती. ते तर मी चुकून झोपेत पत्र पाठवलं¿”

गाडीवरून उतरत अमनला मी विचारलं.

“आणि सोबत आपला फोटोसुध्दा पाठवलास¿”

“आपला¿”

“आपला म्हणजे जो फोटो मी तुला दिला होता तो फोटो. तू आधी दोन खुन केलेस. तरीसुध्दा पोलीसांना तुझ्या विरूध्द एकही पुरावा सापडला नाही म्हणून पुढच्या तिनही हत्येनंतर तू पोलीसांना पत्र लिहून खुनाबद्दल कळवलं. जेव्हा मला कळालं की तू पाच खुन केलेस, तेव्हा सहाव्या खुनाच्या वेळी तुझी मदत करायचं ठरवलं. कारण त्यानंतर तू माझी एका कामात मदत करणार होतास. तू माझ्याशी गद्दारी करू नये म्हणून खुन करताना मी तुझा फोटो काढला आणि त्याची एक कॉपी तुला दिली आणि एक माझ्याजवळ ठेवली. आपण ठरवलं होतं की एक महिन्यानंतर पुन्हा भेटायचं आणि माझं काम करायचं. पण जेव्हा मला कळालं की तुझा अपघात झालाय आणि तू सर्व काही विसरून बसलास, तेव्हा मी माझा प्लॅन चेन्ज् केला...”

“थांब – थांब. म्हणजे या शहरात गेल्या सहा सात महिन्यामध्ये जे खुन झाले ते मी केलेत¿ पोलीस ज्याच्या शोधत आहे तो खुनी मी आहे¿”

“मला वाटलं तुला स्वतःहून कळेल. पण असं झालं नाही म्हणून मी तुला सांगायला आलोय.”

“हे शक्यच नाही. मी कसं कोणाला मारू शकतो¿”

अमन गाडीवरून उतरला आणि माझ्या खांद्यावर हात ठेऊन म्हणाला.

“जर तू भूतकाळातल्या गोष्टींचा विचार करत बसलास आणि स्वतःला खुनी समजलंस, तर तू सायलीला भेटायला जाणार नाहीस आणि आज जर तू सायलीला भेटायला गेला नाहीस तर आयुष्यभर एकटाच राहशील. त्यामुळे एक लक्षात ठेव. ज्याने ते सहा खुन केले, तो आदित्य अपघातात मेला आणि जो आदित्य माझ्यासमोर उभा आहे तो फक्त एक सामान्य फोटोग्राफर आहे.”

“आतापर्यंत मी स्वतःला अपराधी समजत नव्हतो, पण आता वाटायला लागलंय. जर तुझी ही इच्छा आहे की मी स्वतःला अपराधी समजू नये, तर मग तू इथं आलासंच कशाला¿ आधी मी खुनी आहे असं तुझं सांगणं आणि नंतर सगळं काही विसरून जा, असं सांगणं... तू स्वतःला विचार की तू इथं आलास तरी कशासाठी¿”

“सत्य लपवता येत नाही. आज ना उद्या तुझ्या समोर हे सत्य येणारच होतं. जर हे सत्य सायलीशी लग्न झाल्यानंतर तुला कळालं असतं तर तू तिला सोडून पळून गेला असतास. म्हणून हे सगळं मी तुला सांगितलं. कारण मला माहित आहे की तू तिला सोडून पळून जाणार आहेस.”

“आज ना उद्या पोलीस माझ्यापर्यंत पोहोचतील आणि मला शिक्षा होईल. त्यामुळं जर सायलीने माझ्यासारख्या आपराध्याशी लग्न केलं, तर तिचं आयुष्य बरबाद होईल. मग अशा परिस्थितीत मी तिच्याशी कसा लग्न करू शकतो.”

“हाच विचार करून तू महिन्याभरापुर्वी सायलीला लग्नासाठी नकार दिला होतास. त्यावेळी तू खुप मोठी चुक केली होतीस. आता पुन्हा तिच चुक करू नकोस. तुला भवीष्यात कधीच पोलीस जेलमध्ये टाकणार नाही याची गॅरेंटी मी देतो.”

“कशाच्या आधारावर तू गॅरेंटी देतोय¿”

“कारण तुझे सगळे आरोप मी माझ्यावर घेणार आहे.”

“पण तू असं का करशील¿”

“तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला सायलीला भेटल्यावर मिळतील... माझ्यावर विश्वास ठेव.”

असं बोलून तो गाडीवर बसला. स्कुटरला किक् मारून त्याने माझ्याकडे पाहिले आणि पुढं बोलू लागला.

“... सायलीला काय बोलू, असा प्रश्न तुला पडला असेल. काहीही बोलण्याची गरज नाहीये. तुझ्या जवळ जे जुने प्रेमपत्र आहेत त्यातला एक घेऊन जा. तिन वर्षापुर्वी जो पत्र देऊ शकला नाहीस, तो आता दे... आणि कपाटाच्या डाव्या बाजूला अडकवलेल्या कपड्यांमधून एखादा शर्ट घालून जा.”

एवढं बोलून तो निघून गेला. मला अजूनही त्याच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. मी कपाटाच्या डाव्या बाजूला अडकवलेल्या कपड्यांमध्ये पाहिले. कपाटाच्या त्या भागात इतर कपड्यांसोबत काळाकोट आणि लाल मफलरही अडकवला होता. त्याला पाहिल्यावर कॉन्स्टेबलचे ते वाक्य आठवले.

“...एका माणसाने त्याला मृतदेह पाण्यात फेकताना पाहिले होते. पण तो बऱ्याच अंतरावरून पाहत असल्याने त्याला त्या माणसाला चेहेरा दिसला नाही. फक्त एवढंच कळालं की तो काळा कोट आणि गळ्यात लाल मफलर घालतो... सहाव्या हत्येच्या वेळी जेव्हा तुमचं पत्र आम्हाला मिळालं, तेव्हा आम्हाला वाटलं खुन करणाऱ्यानेच पत्र पाठवलं असणार. कारण तुम्ही पत्रासाठी ज्या कागदाचा वापर केला होता, तशाच कागदाचा वापर खुनीसुध्दा करतोय.”

कोणालाही न सांगता पोलीसांना पत्र पाठवणे, डॉक्टरांकडून माझ्या विचित्र आजाराबद्दल कळणे आणि प्रेमपत्रांमध्ये पोलीसांना पाठवायचे पत्र सापडणे. या सगळ्यावरून खुनी मीच असण्याची दाट शक्यता होती. पण हे सुध्दा सत्य होतं की ज्याने खुन केले तो आदित्य अपघाता आधीचा आदित्य होता. त्या वेळी मला राहुलचे ते वाक्य आठवले.

“... भूतकाळातला आदित्य खरंच नालायक होता. पण आता तू सगळं विसरला आहेस. म्हणून मग तू तो आदित्य राहिला नाहीस.”

त्याने जे काही सांगितलं त्यावर विश्वास ठेवावं की नाही, मला समजत नव्हते. पण जर मी सायलीला भेटायला गेलो नाही, तर अशा अनोळखी ठिकाणी ती माझी वाट पाहात बसेल, आणि ते योग्य होणार नाही. म्हणून बराच वेळ विचार केल्यानंतर सायलीला भेटायला जायचे मी नक्की केले.

बरोबर पाच वाजता मी तिथं पोहोचलो. सायली माझ्या आधीच तिथं आली होती आणि लाकडीपुलावर माझी वाट पाहत होती. मला पाहताच ती आनंदाने माझ्या दिशेने चालत येऊ लागली. मी तिला पुलावरच थांबायला सांगून धावत तिच्याजवळ गेलो.

“आता पाच वाजले आहेत. मी दिलेल्या वेळेवर आलोय. तू लवकर आलीस.”

“इथं येऊन मला तास झाला... ते जाऊदे, तू काहीतरी सांगणार होतास.”

मी काही न बोलता सोबत आणलेले प्रेमपत्र तिला दिले. तिने ते वाचले आणि विचारले.

“हे पत्र मी तिन वर्षांपुर्वी वाचलं होतं. पुन्हा वाचायला बरं वाटलं पण तू हे मला आता... तुला ती भेटली का¿”

मी होकारार्थी मान हलवली.

“कोण आहे ती¿”

नक्षीकाम केलेले लाकडी फुलपाखरू, जे तिने मला दिले होते, ते मी तिला दाखवले.

“आदित्य... हे काय आहे¿”

“हे तू मला दिलं होतंस ना¿”

“हे मीच तुला गिफ्ट म्हणून दिलं होतं. पण तू हे आता... परत द्यायला आणलं आहेस का¿”

“मी हे तुला का देईन¿ हे तू मला दिलं होतं, आता हे माझं...”

“कारण गेल्या वेळीसुध्दा तू हे मला दिलं होतंस आणि म्हणाला होतास की तू माझ्यावर प्रेम करतोस पण लग्न करू शकणार नाहीस.”

“यावेळी तू माझ्याशी लग्न करशील का, हे विचारायला मी आलो आहे.”

“तुझ्या आयुष्यात दुसरं कोणी नसताना आणि माझ्यावर प्रेम करत असूनसुध्दा, गेल्यावेळी तू मला लग्नाला नकार देऊन निघून गेला होतास. दुसऱ्या दिवशी माझ्या घरी तुझ्या नावाचं गिफ्ट आलं. एक सोफा, गिफ्ट माझ्या लग्नासाठी. काल बाबा आले आणि त्यांना त्या सोफ्यावर बसायचं होतं. मी त्यांना बसू नका म्हणून सांगितलं पण ते त्या सोफ्यावर बसले. त्यांना काहीतरी वेगळं वाटलं म्हणून त्यांनी सोफ्याचा कव्हर काढून पाहिला. आत नोटांच्या गड्ड्या रचुन ठेवल्या होत्या. आम्ही मोजले ते पैसे. तिस लाख रूपये रोख रक्कम होती. बाबा पोलीसांत तक्रार करणार होते पण मी त्यांना सांगितलं की ते पैसे आदित्यचे आहेत म्हणून. मी तुला त्यावेळी माझं दुःख सांगितलं, म्हणून मला मदत करण्यासाठी तुझ्या संपत्ती मधले सगळे पैसे तू मला दिलेस. जर तुला माझ्या भवीष्याची एवढीच काळजी होती तर तू मला लग्नासाठी नाकार का दिलास¿”

बोलता बोलता सायलीच्या डोळ्यातून आश्रृ वाहू लागले.

“हे बघ सायली. भूतकाळात मी जे काही केलं, ते मी का केलं याची मला काहीच कल्पना नाही. पण आता मी तुला फक्त लग्नाबद्दल विचारायला आलो आहे. मला माहित आहे की पुढच्या महिन्यात तुझं लग्न होणार आहे. पण मनातल्या भावना मनातच राहून जाऊ नये, याची भिती होती म्हणून...”

तिने डोळे पुसले आणि स्मितहास्य करत होकारार्थी मान डोलवली. मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. मी जे काही पाहत होतो ते सत्य आहे की माझा भास, याची खात्री करून घेण्यासाठी मी तिला याबद्दल पुन्हा विचारणार होतो, त्या आधी जोराचा आवाज झाला. काही कळण्याआधी माझ्या खाद्यावर जोरदार आघात झाल्याचे मला जाणवले. त्या आघाताची तिव्रता एवढी होती की मी त्या पुलाच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचलो. सायली काही हालचाल करणार त्या आधी माझा तोल गेला आणि मी पुलावरून खाली कोसळलो.”

“पुढं काय झालं¿”

मनीषने आदित्यला विचारले. आदित्य शांतपणे उठला आणि फाईलांच्या गठ्ठ्यांमध्ये काहीतरी शोधू लागला. तो जे काही शोधत होता, ते त्याला मिळाल्यावर तो पुन्हा त्याच्या जाग्यावर आला आणि हातातला वर्तमानपत्राचा तुकडा मनीषला देत म्हणाला.

“तुझ्या प्रश्नाचं उत्तर.”

मनीषने वर्तमानपत्राचा तो तुकडा हातात घेतला. त्याच्यावर १६ डिसेंबर १९९४ अशी तारीख होती. त्यावर एक बातमी प्रकाशित झाली होती. ज्यामध्ये आदित्यचा फोटो होता. मनीष ती बातमी वाचू लागला.

“अमन मेहेता नावाच्या आरोपीने बंदूकीच्या गोळ्या झाडून २६ वर्षीय आदित्य देसाई यांची हत्या केली. या घटनेची प्रत्यक्ष दर्शनी सायली मेहेता यांनी घटनेची माहिती पोलीसांना दिली. गोळी लागुन आदित्य देसाई नदीत पडले. परंतू अद्यापही पोलीसांना त्यांचा मृतदेह हाती लागला नाही. विशेष म्हणजे आदित्य देसाई यांचा खुन केल्यानंतर त्यांच्या हत्या करणाऱ्याने पळून न जाता स्वतःला पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.”

मनीष वाचता वाचता मध्येच थांबला. त्याने वर्तमानपत्रातल्या आदित्यच्या फोटोकडं पाहिले. फोटोला व्यवस्थित पाहून झाल्यानंतर त्याच्या समोर बसलेल्या आदित्यकडं पाहिलं.

“१९९४ च्या बातमी मधला आदित्य सेम टू सेम तुमच्यासारखा दिसतोय. तुम्ही मला आता जी स्टोरी सांगितली ती त्या आदित्यची असणार, तुमची नाही.”

“मी माझ्याबद्दलच सांगत होतो आणि तो फोटो माझाच आहे.”

“हे शक्यच नाही. १९९४ मध्ये तुमचं वय २६ वर्ष आणि आतासुध्दा तुमचं वय २६ च्या आसपासचं वाटतंय.”

“२६च्या आसपासचं नाही, २६च आहे.”

“म्हणजे २३ वर्षानंतरही तुमचं वय तेवढंच राहिलं जेवढं २३ वर्षापुर्वी होतं.”

आदित्य खुडचीवरून उठला आणि अंगावर कोट चढवत म्हणाला.

“तुला विश्वास ठेवायचा असेल तर तू ठेव, नाही तर ठेवु नकोस. मला काहीही फरक पडत नाही.”

“१९९४ मध्ये जर तुमचा मृत्यु झाला असता तर तुम्ही आता जिवंत नसता... आणि चला मान्य केलं की आता तुम्ही जे काही सांगितलं ते स्वतःबद्दल सांगितलं. पण यात मलीसाच्या मृत्युशी संबंधीत एकही गोष्ट नव्हती आणि तुम्ही मला मलीसाच्या मृत्युबद्दल सांगणार होता.”

“मी तुला आधीच सांगितलं होतं. ज्यावेळी तुला माझ्या बोलण्यावर आणि माझ्यावर विश्वास बसेल त्याच वेळी मी तुला मलीसाच्या मृत्युबद्दल सत्य सांगेन... आणि तुझ्या बोलण्यावरून असं वाटतंय की तुला माझ्यावर विश्वास नाहीये.”

“विश्वास ठेवणं शक्यच नाही.”

“तुला ‘क्वान्टम फिसीक्स्’ बद्दल माहित आहे का¿”

मनीषने नकार दर्शवला.

“मग एक काम कर. माझ्या सोबत चल. आपण आधी डॉ. रामेश्वर यांच्या लॅबमध्ये हा डायल देऊ आणि तसंच त्यांच्या लेक्चरला जाऊया. तिथं जाऊन तुला कळेल की एक व्यक्ती काळाच्या दोन वेगळ्या भागात कसा जिवंत राहू शकतो.”

आदित्यने सुटकेस हातात घेतलं आणि तो निघाला. त्याच्या मागोमाग मनीषही निघाला.

*****

“अकल्पित” या कादंबरीचा हा शेवटचा अध्याय होता. या अध्यायासोबत कथेचा पहिला भाग समाप्त

झाला. या कथेचा दुसरा भाग लवकरात लवकर आपल्यासमोर आणण्याचा मी पुर्णपणे प्रयत्न करेन.

(क्रमशः)

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED