Tuji aavadati maitrin books and stories free download online pdf in Marathi

तुझी आवडती मैत्रीण... - Letter to your Valentine

तुझी आवडती मैत्रीण…

Dr Naeem Shaikh

प्रिय आदित्य,

फेसबुक, व्हॉट्स्ऍपच्या काळात माझं असं तुला पत्र लिहिणं कितपत योग्य आहे... माहित नाही. पण जे माझ्या मनाला योग्य वाटलं ते मी केलं. तू हे पत्र वाचत आहेस असं गृहीत धरून मी हे पत्र लिहिलं. गेल्या दोन तिन दिवसात मनाच्या कोपऱ्यात असा एक विचार घर करून बसलाय की तू १४ तारखेला, म्हणजे आजच्या दिवशी गच्चीवर येणार नाहीस. असा विचार माझ्या मनात आला कसा? याची अनेक कारणे आहेत आणि त्यातलंच एक कारण म्हणजे माझं नशीब. मी या बद्दल जास्त काही लिहिणार नाही. तुला वाटत असेल की माझं तुझ्याकडं काहीतरी काम असेल आणि त्या संदर्भात मी तुला हे पत्र लिहिलं असणार. कारण आजपर्यंत कधीच कामाशिवाय तू मला आठवला नाहीस. मी खुप कठोर आणि पाशान हृदयी आहे असा तुला अनुभव आला असेल.

तो दिवस मला आजही आठवतो, एका वर्षापुर्वी तुम्ही आमच्या शेजारच्या घरात राहायला आला होता. त्या दिवशी तुला तुझ्या आईने घराच्या गच्चीवर गादी टाकायला म्हणून पाठवलं होतं. चेहेरा पाडून, मनातल्या मनात स्वतःच्या नशीबाला दोष देत, गद्या खांद्यावर उचलून गच्चीवर आला होतास. मी त्यावेळी आमच्या घराच्या गच्चीवर अभ्यास करत होते. त्यावेळी मी तुला पहिल्यांदा पाहिलं. तुझं माझ्याकडं एकटक पाहणं मला आवडं नव्हतं. त्यावरून मी तुझ्याबरोबर भांडणसुध्दा केलं होतं. योगायोगाने तू माझ्याच कॉलेजमध्ये, माझ्याच वर्गात शिकायला म्हणून आलास. त्या नंतरच्या काळातही मला तू काहीसा खास वाटला नाहीस. तू माझा एक औपचारीक मित्र होतास असं म्हणता येईल. मला गच्चीवर अभ्यास करायची सवय होती आणि माझ्याशी बोलण्यासाठी म्हणून काहीतरी कारण काढून तूसुध्दा तुमच्या गच्चीवर येत होतास. त्यावेळी मला तुझा स्वभाव खुप त्रासदायक वाटायचा. पण आज अचानक या सगळ्या गोष्टी मी तुला का सांगत आहे, असा प्रश्न तुला पडला असणार. त्यातही माझं असं व्हॅलेंटाईन्स्-डे ला तुला पत्र देणं, तुला विचित्र वाटत असेल.

म्हणतात ना, पडद्यावर दिसणाऱ्या चित्रपटापेक्षा पडद्या मागे घडणाऱ्या कथा अनेक असतात. तसंच काही आपल्यामध्येही आहे. तुला जे काही जाणवलं, तू जे काही पाहिलं आणि तू जे काही अनुभवलंस ते फक्त नाण्याची एक बाजू होती. या पत्रातून मी तुला नाण्याची दुसरी बाजू सांगणार आहे. नंतरच्या काळात तू मला मित्र म्हणून खुप आवडू लागला होतास आणि तो आवडता मित्र कधी हवाहवासा वाटू लागला कळालंच नाही. नेहेमी मी तुझ्याच विचारात गुंतलेली असायचे. आदित्यने काय केलं, कसं केलं, आदित्य या क्षणी असता तर त्याने काय केलं असतं, त्याच्या सवयी काय आहेत, यांचा विचार करता करता कधी माझा दिवस निघून जायचा कळायचंच नाही. ज्या दिवशी तू मला प्रपोझ् केलंस, त्या दिवशी मला जाणवलं की मीसुध्दा तुझ्या प्रेमात जगत आहे. ज्या क्षणी हे जाणवलं तेव्हा सुरूवातीला आनंदाच्या भावणांनी माझ्या मनात जन्म घेतलं. पण नंतर आनंदाची जागा दुःखाने घेतली. त्या क्षणी माझं दुःख काय होतं, हे फक्त मलाच माहित होतं. मला हेच तर नको होतं. तू माझा किती चांगला मित्र होतास, तू नेहेमी तसाच राहावास अशी माझी इच्छा होती. पण तुझ्या प्रपोझ् केल्यानंतर सर्व काही बदललं. मला माहित होतं की तू जेव्हा जेव्हा माझ्या समोर येशील, तेव्हा तुझ्या डोळ्यांत मला नेहेमी माझ्यासाठी एकच प्रश्न दिसेल आणि तो म्हणून माझ्या मनात तुझ्याबद्दल कोणत्या भावणाबद्दलचा.

मला वाटत होतं, जर मी तुझ्यापासून लांब राहिले, तुला वाईट वागणूक दिली, तर तुझ्या मनातून माझ्याबद्दलचं प्रेम कमी होईल. त्यामुळं मी तुला त्या दिवशी नकार दिला. पण जसा मी विचार केला होता तसं काहीच झालं नाही. मी तुला स्वतःपासून लांब करण्याचा प्रयत्न केला, तुला चांगली वागणूक दिली नाही. तरीसुध्दा तू रोज मला भेटण्यासाठी गच्चीवर येत राहिलास. वेगवेगळ्या कारणांनी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केलास. मी तुझ्याशी इतकी वाईट वागले तरी तू मला गरज पडली तेव्हा माझी मदत करायला सगळ्यात आधी आलास. तुझ्या अशा स्वभावाने माझ्या मनातले विचार नक्कीच बदलले. पण तुझ्या सोबत आयुष्यभर राहिण, असा वचन मी तुला कधीच देऊ शकणार नाही. मी दोन महिन्यासाठी घरी नव्हते आणि मला माहित आहे की गेल्या दोन महिन्यात तू रोज गच्चीवर मला पाहण्यासाठी येत असशील. तू मला शोधण्यासाठी माझ्या घरीसुध्दा आला होतास, हे मला बाबांकडून कळालं. तू, तुझा स्वभाव, तुझे विचार, तुझी मैत्री, सर्व काही खुप सुंदर आहे. हे सगळं पाहिल्यानंतर माझं मन किती कुरुप आहे हे जाणवलं. मला तू खुप आवडतोस आणि मीसुध्दा तुझ्यावर प्रेम करते. मग माझं तुला नकार देणं, तुला स्वतःपासून दूर करणं, तुझ्याशी वाईट वागणं, हे सगळं कशासाठी? असं तुला वाटत असेल.

मी जेव्हा कॉलेजला ऍडमीशन घेतलं तेव्हा पासूनच मी खुप आजारी राहायला लागले होते. अनेकदा तातपुर्ते उपचार घेऊन पाहिले. देवांपासून दानवांपर्यंत, वास्तु शास्त्रापासून भूता-प्रेतांपर्यंत, सगळ्या शक्यता तपासून पाहिल्या. पण काहीच हाती लागलं नाही. वेगवेगळ्या कारणांना पुढं करत निदानाकडे दुर्लक्ष करत उपचारावर भर दिला आणि शेवटी जेव्हा निदान झालं तेव्हा कळालं की मला टि.बी. होता. त्यासाठीचे उपचार म्हणून औषधे चालू केली. पण योग्य निदान आणि योग्य उपचाराला उशीर झाल्यामुळे हा विकार पुढच्या स्थरावर गेला होता. त्यामुळे औषधांचा हवा तसा परीणाम झाला नाही. मला हा आजार आहे हे जर समाजात कळालं तर आम्हाला समाजातून बाहेर काढतील, भवीष्यात कोणीही माझ्याशी लग्न करणार नाही, म्हणून मी आणि माझ्या घरच्यांनी मिळून हे ठरवलं की माझ्या आजाराबद्दल कोणालाही सांगायचं नाही. मला तू इतका आवडत होतास की माझ्यामुळे हा विकार तुला होईल की काय, या भितीने मी तुला स्वतःपासून दूर केलं. माझं तुझ्यावर प्रेम करत असूनसुध्दा तुला खोटं सांगीतलं आणि तुला नकार दिला.

त्या गोळ्यांनी होणारा त्रास मला सहन झाला नाही आणि काही काळानंतर मी गोळ्या घेणं बंद केलं. गेल्या काही महिण्यांपासून माझ्या स्वास्थ्यात बिगाड झाला होता. माझ्या शरीराची परीस्थिती वाईट होऊ लागली होती. तपासानंतर मी एम्.डी.आर. टि.बी.ची पेशंट असल्याचे कळाले. त्यासाठीच्या उपचारासाठी मी गेले दोन महिने हॉस्पीटलमध्ये होते. शेवटचा उपचार करून पाहूया असं डॉक्टर म्हणाले. दोन महिण्यांच्या उपचारानंतर त्यांनाही कळालं की माझ्या शरीराला आता औषधांची गरज नाहीये. हा विकार माझ्या शरीराला अशा ठिकाणी घेऊन गेला होता की जगातले कोणतेही उपचार तिथं पोहोचू शकणार नव्हते. त्यांनी मला तिन महिण्यांचा वेळ दिलाय. दिवसेंदिवस मी अधीकाधीक कमजोर होत आहे. श्वास दिर्घ आणि अधीक त्रासदायक झाला आहे. कधी कधी श्वास घेण्यासाठी ऑक्सीजन सिलेंडरची मदत घ्यावी लागते.

स्वच्छ आणि नैसर्गीक ऑक्सीजन मिळवण्यासाठी मी रोज गच्चीवर येते. बराच वेळ बसून समोर तुमच्या गच्चीकडं पाहत राहते. तू मला भेटण्यासाठी रोज गच्चीवर येतोस. पण तू माझ्याशी कधी न बोलता, तर कधी औपचारीक प्रश्न विचारून निघून जातोस. तुझ्या डोळ्यात माझ्या प्रति तुझं प्रेम आणि मला न मिळवल्याचे, अपयशी झाल्याचे दुःख मी रोज पाहते. मला रोज वाटतं तुला थांबवून तुझ्याशी खुप काही बोलावं. पण काय करू, डॉक्टरांनी जास्त न बोलण्याची ताकीद दिली आहे. माझ्या फुफ्फुसांमध्ये आता तेवढी ताकद राहिली नाही की तुझ्यासोबत तासंतास गप्पा मारू. पण जेवढे शब्द तुझ्या तोंडातून ऐकते तेवढं मला बरं वाटतं. एकदा मी तुला विचारलं होतं की तू नेहेमी माझी मदत का करतोस? त्यावर तू म्हणाला होतास की मदत करण्याच कारण मी तुझी आवडती मैत्रीण असणं, हे आहे. असंच आयुष्यभर मला तुझी आवडती मैत्रीण म्हणून आठवणीत जपुन ठेव.

जेव्हा तू मला ओळखत नव्हतास तेव्हा, माझा मित्र झालास तेव्हा, प्रेमात पडलास तेव्हा आणि तुझ्या प्रेमाला मी नकार दिला तेव्हा सुध्दा, तू नेहेमी माझ्या सोबत होतास. तू माझी सोबत आयुष्यभर देशील हे मला माहित होतं. पण मी तुझ्यासोबत आयुष्यभर राहू शकणार नाही, याचीसुध्दा मला कल्पणा होती. मला हा आजार नसता तर मी तुला होकार दिला असता. त्यामुळे तुझ्या मनातल्या अपयशाची भावना काढून टाक. म्हणतात व्हॅलेंटाईन्स्-डे प्रेमींचा दिवस, प्रेम व्यक्त करण्याचा दिवस असतो. आज संध्याकाळी मी नेहेमीप्रमाणे गच्चीवर येणार आहे. आज तू सुध्दा गच्चीवर यावंस आणि आज जास्तवेळ गच्चीवर थांबस, अशी माझी इच्छा आहे. तुझं माझ्या डोळ्यांसमोर राहणं, हेच माझ्यासाठी व्हॅलेंटाईन्स्-डेचं गिफ्ट असेल.

  • तुझी आवडती मैत्रीण,
  • करीश्मा.

    इतर रसदार पर्याय

    शेयर करा

    NEW REALESED