Tuji aani fakt tujich books and stories free download online pdf in Marathi

तुझी आणि फक्त तुझीच... - Letter to your Valentine.

तुझी आणि फक्त तुझीच.…

अनुजा कुलकर्णी

अक्षय,

हाय.. लॉंग टाईम! अशी करायची का पत्राची सुरवात? कशी सुरवात करू रे पत्राची? पत्रास कारण कि...?? नको. काहीतरीच वाटेल ना? जुन्या काळात गेल्यासारखं? मग अजून कशी करू सुरवात? अ...अ.. बराच विचार करून सुद्धा काहीच सुचत नाहीये रे.. शाळेत कधी 'पत्र लिहिणे' कधी मनापासून केलंच न्हवत ना..मला न्हवत वाटल कि मी आधी कुणाला पत्र लिहीन आणि त्यावेळी कधी वाटलाही नाही कि पत्र कस लिहायचं हे माहिती असाव लागेल. वॉट्सअप च्या जमान्यात पत्र लिहितीये. गम्मत आहे. मला तर थोडी फार माहिती पण नाहीये. शाळेत पत्र लिहा ह्या प्रश्नांकडे मी सरळ सरळ दुर्लक्ष करायचे. मार्क नाही मिळाले तरी चालतील पण मी नाही करणार तो अभ्यास असा विचार करायचे. किती वेडी होते ना.. माझ्या नाही आल लक्षात कि जर शाळेत नीट अभ्यास केला असता तर आत्ता त्याचा फायदा झाला असता. बर, ते राहूदे. महत्वाच म्हणजे, मला माहिती नाही कस चालू करू पत्र. चुकीच लिहील असेल तरी तू समजून घेशील. ते समजून घेशील याची खात्री आहे मला. मी कधीही पत्र न लिहिणारी आज तुझ्याशी पत्रातून बोलतीये. मलाच आश्चर्य वाटतंय..पण आज तुला पत्रातून माझ्या भावना पोचवाव्या असा वाटतंय.... माझ्या भावना तू पोचवून घेशील. मला समजून घेशील. आणि हो, माझ्या काही चुका काढल्यास ना तर भेटलास कि बघ काय करेन तुझ. पत्रामधून भावना तुझ्यापर्यंत पोहचवण माझ्यासाठी महत्वाच आहे. आणि हि परीक्षा नाहीये कि चुका झाल्या कि माझे मार्क जातील. त्यामुळे पत्रात हे चुकल, ते चुकल हे बोलायचा विचारही करू नकोस. तुला माहितीये, तू माझ्यापासून खूप दूर गेलास आणि मला तुझी उणीव नेहमीच वाटत राहिली. पण मला माझ्या भावना कधी कळल्याच नाहीत. मला आत्ता अक्कल आली आणि कळल कि माझ पण तुझ्यावर प्रेम आहे. म्हणून पत्रातून संवाद करतीये. खूप काय काय बोलायचं आहे. आणि मला माहिती आहे तुला पत्रातून केलेला संवाद किती आवडतो. नेहमीच तू माझ्यासाठी काही ना काही करत राहिलास मग आज मला तुला जे आवडत तस वागवस वाटतंय. काय झाल? विचारात पडलास ना? मला माहितीये, मी तशी आळशी.. लिहायचा मला जाम कंटाळा. वॉट्सअप पेक्षा सुद्धा फोन वर बोलणारी मी, आज पत्र लिहून का बोलतीये असाच विचार करतोयस ना अक्षय? नाही तर म्हणच नकोस.. मी तुला चांगल ओळखते... म्हणजे आय कॅन इमॅजीन युअर रिअॅक्शन! आणि माझ पत्र पाहून काय प्रतिक्रिया देशील ते मला माहितीये. तु काही बोलला नाहीस तरी पत्र वाचशील तेव्हा तुझी प्रतिक्रिया काय असेल याचा मला अंदाज आहे. तितकी नीट ओळखते तुला. मला माहितीये आधी तू माझ पत्र पाहून पोट धरून हसणार, नंतर पत्रावरच नाव पाहणार कि नक्की माझच पत्र आहे ना.. म्हणजे कोणी पाठवलय हे पाहणार! मग तुझी खात्री पटली कि माझच पत्र आहे तरी सुद्धा परत एकदा डोळे फाडून पत्रावरच नाव परत परत वाचणार. नंतर तुला खात्री पटेल मग तू पत्र पुढे वाचायला लागणार. मला तुझ्या सगळ्या सवयी चांगल्याच माहिती आहेत. तुला खात्री वाटत नाही तोपर्यंत तू शहानिशा करत राहतोस. संशयी... हाहा.. जोक्स अपार्ट! आय मिस यु अक्षय! आज अस नाही तर नेहमीच पण आज जरा जास्तीच!!!

तू सुद्धा मला नीट ओळखतोस. खरच मी आळशी आहे. उगाच त्रास करून घेत नाही. आणि इतक लिहायचा तर मला नेहमीच कंटाळा यायचा पण आज तुला पत्र लिहितांना मजा येतीये. आपण फोन वर तर नेहमीच बोलायचो पण तू एनडीए मध्ये गेलास आणि आपल्या फोन वर बोलण्याला किती मर्यादा आल्या. मला खरच एका चांगल्या मित्राची गरज नेहमीच होती पण तेव्हा मात्र तू माझ्या आजूबाजूला न्हवतास. खर तर आपली मैत्री शाळेपासूनची.. म्हणजे तू माझ्या आयुष्यात नेहमीच होतास. अगदी शाळेपासून. आणि तुला मी शाळेपासूनच आवडत होते. अर्थात ते तू आत्ता सांगितलस. मला तू आवडयाचास पण मला ते प्रेम आहे हे कधी कळलंच नाही. आता मला कळल कि मी सुद्धा तुझ्यावर प्रेम करते तुझ्या इतकाच किंवा त्यापेक्षा जास्तीही असू शकेल. टाईमपास च प्रेम नाही. खर खर मनापासून!!! तू आजूबाजूला हवा आहेस पण तू जवळ नाहीस. ठीके.. मी तुला कधीही म्हणणार नाही कि तुझा निर्णय चुकीचा होता. तुझा निर्णय योग्य होता! आणि तुला किती मनापासून एनडीए मध्ये जायचं होत आणि नंतर आर्मी! तू ते केलस सुद्धा! जिद्दीनी केलस. खूप मस्त स्वप्न आहेत तुझी... खूप कमी लोकं अशी स्वप्न पाहू शकतात. ते सुद्धा मला माहिती आहे. खूप खंबीर आहेस तू.. असे निर्णय एका रात्रीत घेता येत नाहीत. मी कधी आधी इतक बोललेच नाही तू आर्मी मध्ये जाणार म्हणाल्यावर. पण आज खूप सार बोलायचं आहे. जे जे वाटत ते सगळ नाही पण थोड्या तरी गोष्टी. आपण भेटून तर बोलूच पण आत्ता तुला पत्र लिहून सगळ सांगावस वाटल. पत्रातून मन मोकळ कारावस वाटतंय. मला खात्री आहे कि तू माझ पत्र नीट जपून ठेवशील. माझ कोणासाठीही पाहिलं पत्र आहे त्यामुळे मी पण ह्या पत्राची एक कॉपी माझ्याकडे नीट जपून ठेवणारे. आज ह्या पत्राद्वारे मी माझ मन तुझ्यासमोर मोकळ करतीये त्यामुळे साहजिकच माझ्यासाठी हे पत्र खूप खास आहे. आणि सगळ्यात आधी सॉरी. मी खूप दिवस लावला तुला उत्तर द्यायला. तू मला बरेच दिवसांपूर्वी प्रपोज केल होतस पण मी तुला उत्तर मात्र दिल न्हवत. म्हणजे तू अचानक मला प्रपोज केलस. त्यावेळी मला थोडा धक्का बसला होता. धक्का म्हणजे आपण नेहमीच चांगले मित्र तर होतोच पण तू जेव्हा मला लग्नासाठी प्रपोज केलस तेव्हा मात्र मी जरा गडबडले होते. मित्र म्हणून मी तुझ्या खूप जवळ होते. मी प्रत्येक गोष्ट तुझ्याशी शेअर करायचे. तू माझा खूप जवळचा मित्र आहेस. पण माझ्या मनात लग्नाचा विचारही न्हवता. तुझ्याशी अस नाही..मी लग्नाचा विचारही करत न्हवते आणि तुझ्याकडून अनपेक्षितपणे आलेले शब्द होते ते आणि त्यामुळे मी गडबडून गेले खरच. मला माहिती आहे तु माझ्या उत्तराची किती आतुरतेनी वाट पाहत होतास पण मी होते कि विषय टाळत राहिले. मला कळल नाही मी तुला काय उत्तर देऊ. आणि मला तुला दुखवायचं न्हवत म्हणून माझा खटाटोप होता. प्रेम आणि लग्न काय असत ते मला कळायला खरच खूप उशीर झाला. तू काय बोलतो आहेस ते समजून घ्यायला किती वेळ घेतला मी. मला तर नेहमी असच वाटायचं कि प्रेम बीम सगळ झूठ असत. त्या नात्याला खरच किती महत्व आहे हे मला कधी कळलच न्हवत. शाळेत तू एकदम अबोल होतास पण आपण ११व्वी मध्ये तू मोकळा होत गेलास. आणि तेव्हाच आपली मैत्री अजून घट्ट होत गेली. आणि तू त्याच वेळी काहीतरी महत्वाचे निर्णय घेत होतास. तू ते निर्णय मला बोलूनही दाखवले होतेस पण मला तुझ्या निर्णयांच महत्व कधी कळलंच न्हवत. तुझा निर्णय धाडसाचा होता. आय.आय.टी सोडून तू एनडीए मध्ये जायचा निर्णय घेतलास आणि त्यावेळी मला तुझ्या निर्णयाबद्दल शंका आली होती. सहज आयुष्य सोडून खडतर आयुष्य तू निवडलस. मला माहिती होत, तुझे बाबा पण त्याच फिल्ड मधले आहेत आणि त्यांचाच आदर्श तू तुझ्या डोळ्यांसमोर ठेऊन निर्णय घेतले होतेस. मला आधी अस वाटायचं आपण कशाला काही करायचं? इतर लोकं आहेतच कि. म्हणजे तू आय.आय.टी मध्ये जावस अस मला वाटत होत. तिथे तुला खूप पैसे, नाव मिळाल असत. मला न्हवत्या कळल्या तुझ्या भावना. तुझ देशप्रेम, देशासाठी काही करायची इच्छा. म्हणजे मला न्हवत कळल हे सगळ. खरच सांगते कि मी स्वार्थी होऊन बघत होते. पण आता मात्र मला तुझा अभिमान आहे. वयाच्या २४व्या वर्षी तू खडतर प्रशिक्षण घेऊन देशाच संरक्षण करायला सीमेवर तैनात असतोस. तू तुझे फोटो क्वचित कुठे ठेवतोस पण परवा तुझा आर्मी युनिफोर्म मधला फोटो मी पहिला आणि मी तुझ्या खरच पेमात पडले. माझ्यासाठी फक्त तू आहेस हि भावना जागृत झाली. मला तुझ्यावरच प्रेम कळल त्यावेळी. तुझ्यावरून खरोखर नजर हटत न्हवती. तुझ्यासाठी आर्मी युनिफोर्म च काय महत्व आहे हे मला तेव्हा जाणवलं. तूझ्या चेहऱ्यावरचा तजेला मला काहीतरी खुणवत होता. मी ह्यासाठीच जन्मलो आहे हे ठासून सांगत होता तुझा चेहरा. आणि तू उंच, राजबिंडा दिसत होतास. माझ्यासाठी एकदम खास. माझ्या शब्दात सांगयचं झाल तर "लई भारी.." एखाद्या नटाला देखील मागे टाकशील असाच. तेव्हाच मी निर्णय घेतला, आता लग्न केल तर ते तुझ्याशीच. म्हणजे तुला फक्त होकार द्यायचा होता. पण मी वेडी. जे जवळ होत त्याच्याबद्दल कधी विचारच न्हवता केला. पण माझे डोळे उघडले मग मात्र माझ्या मनात काही किंतु अजिबात न्हवता. आधी मी छोटीशीच होते रे.. संकुचित विचार करत होते. पण आता माझे विचार प्रगल्भ होतायत. मी आयुष्याच्या सुंदर टप्प्यातून जातीये. मी प्रेम म्हणजे काय हे समजून घेतीये. प्रेम फक्त लोकांवर नसत तर देशावरच प्रेम एखाद्या व्यक्तीवरच्या प्रेमापेक्षा खूप भारी आहे. आणि अश्या माणसाबरोबर मला नेहमीच राहायला आवडेल. आता मला माझ उभ आयुष्य तुझ्यासोबत जगायचं आहे. आर्मी मॅन ची बायको म्हणून मिरवायच आहे. तू माझ्यासाठी खूप महत्वाचा आहेस. तू माझ्याबरोबर असशील नेहमीच पण तू माझ्याबरोबर आणि देशासाठी सुद्धा असशील. आणि मला त्या गोष्टीचा नेहमीच अभिमान असेल. आणि महत्वाच म्हणजे, तुझी बायको म्हणून मिरवतांना मला खूप मस्त वाटेल. आणि हो, तुझ प्रपोज माझ्यासाठी नेहमीच खास राहील. तू भेट आता लवकर. आणि ह्यावेळी मी तुला प्रपोज करेन. माझ्या अंदाजात. ते प्रपोज तुझ्या प्रपोज इतक भारी नसेल कदाचित पण माझ्या भावना पोचवायचा तो एक साधा प्रयत्न असेल. आय लव यु आणि आय व्हॅल्यु यु हे सांगायचा प्रयत्न. पण तू आता इतक्या लाबं गेला आहेस कि मनात आल कि तुला भेटता पण येणार नाही. त्यासाठी मला तुझी वाट पहावी लागेल. तुझ्यासाठी मी कितीही वाट पाहू शकते कारण मला माहितीये तू फक्त माझा आहेस. अजून काहीच दिवस..मग मात्र मी माझी सकाळ तुझ्याबरोबर चालू करणार आणि रात्र सुद्धा तुझ्याच सोबत संपवणार. तू जिथे जाशील तिथे मी तुझ्या सावलीसारखी तुझ्या मागे येणार. माझ्या होकारामुळे आता तू अडकलास. आता तुला माझ्याशिवाय कुठेही जाता येणार नाही. आता तुझ्या प्रत्येक श्वासावर माझा जास्त अधिकार आहे. आता तुला सहजासहजी कुठेच सोडणार नाही अगदी तुझ्यासमोर मृत्यू सुद्धा आला तरी सुद्धा नाही. तू कुठेही जा.. मी तुला एकट सोडणार नाही. हा माझा शब्द आहे. ए, सॉरी. थोड सेंटी होतंय ना.. पण तुझा मूड फ्रेश करते आणि तुला भली मोठी हग देते. फील मी.. माझी घट्ट मिठी.. तू पत्र वाचशील तेव्हा तुला माझ्या हृदयाचे ठोके सुद्धा ऐकू येतील. मी नेहमीच तुझ्या जवळ असेल याची खात्री देत राहतील. आता मला काहीही नको.. आता फक्त तुला भेटायची ओढ.. हे पत्र तुला व्हॅलनटाइन च्या दिवशी मिळेल. ह्या वेळेचा व्हॅलनटाइन माझ्यासाठी खूप खास असेल अगदी तू जवळ नसलास तरी तुझ्या आठवणीत माझा पूर्ण दिवस जाईल. आणि मी तुझी वाट पाहत असेन हे नेहमीच लक्षात ठेव.

इतक लिहायची सवय कुठे आहे रे मला.. दमले आता. हात पण दुखायला लागले तुला पत्र लिहून. पण मस्त वाटल. माझे विचार पत्रातून तुझ्यासमोर मांडायला. पत्र कस लिहिलंय ते मला नाही माहित. माझ पत्र गोड मानून वाच. हाहा.. आणि पत्र लिहितांना तुझा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जात न्हवता. आता लवकर ये भेटायला आणि आय मिस यु. आता आयुष्याचा पुढचा प्रवास तुझ्याबरोबर चालू करायला मी उत्सुक आहे. लव यु सो मच! लकवर भेट. मी खूप आतुरतेनी वाट पहातीये तुझी..

तुझी आणि फक्त तुझीच,

(तुझ्या मनातल लाडाच नाव लिहून पाठव- मी वाट पहातीये तुझ्या उत्तराची.)

***

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED