सैराट Vs धडक ... Anuja Kulkarni द्वारा मूव्ही पुनरावलोकने मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सैराट Vs धडक ...

'सैराट' Vs 'धडक'...

सिनेसृष्टीशी निगडीत सध्याचा चर्चेचा विषय आहे तो म्हणजे 'सैराट' की 'धडक'... कोणता सिनेमा वरचढ आहे? सिनेमा हा सिनेमा असतो पण रिमेक असेल तर दुसऱ्या सिनेमाचा पहिल्या सिनेमाशी तुलना तर होणारच. 'धडक' 'सैराट' पुढे थोडा फिका पडला अस वाटेल सुद्धा पण पूर्ण जगभरात 'धडक' ला सुद्धा चागला प्रतिसाद मिळतो आहे. २०१६ साली प्रदर्शित झालेला 'सैराट' सगळ्यांच्याच मनावर राज्य करून गेला. 'सैराट'च्या खणखणीत यशात वेगळा विषय, त्याची थीम, त्याचे संगीत आणि त्याचा अनपेक्षित धक्कादायक शेवट या बरोबरच महत्त्वाचा वाटा आहे तो नवीन चेहर्‍यांचा- अर्थात आकाश ठोसर (परश्या) आणि रिंकू राजगुरू (आर्ची) यांचाही त्या यशात मोठाच वाटा आहे. चित्रपटातले चेहरे गर्दी खेचून आणू शकतात ह्याच उत्तम उदाहरण होत आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू! दोन नवीन चेहरे घेऊन नागनाथ मंजुळे ह्यांनी चित्रपट बंनावला आणि त्याच चित्रपटांने कैक मराठी मनावर अधिराज्य केल. चित्रपटाच्या कथेनुसार यात नवीन चेहऱ्यांना बराच वाव होता. कधी कधी तेच तेच चेहरे पाहून प्रेक्षक सुद्धा कंटाळून जातो. कथेला योग्य असे चेहरे निवडणे हे काम 'सैराट' मध्ये उत्तम रित्या झाल होत. बदल हा प्रेक्षकांना भावतो आणि त्याचप्रमाणेच 'सैराट' पाहतांना प्रेक्षकांना सुखद बदल मिळाला. 'सैराट'च्या रिमेक 'धडक'मध्येही इशान खट्टर आणि जान्हवी कपूर अशा अगदी नवीन चेहऱ्यांना पटकथेनुसार संधी मिळाली असून त्यांना चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीत मिळत असलेला उस्फूर्त प्रतिसाद पाहता त्यांनाही स्वीकारले जाईल असे जाणवते. 'सैराट' या मराठीतील सर्वात सुपरहिट ठरलेल्या चित्रपटाचा हिंदी रिमेक 'धडक’ शुक्रवारी प्रदर्शित झाला. जान्हवी कपूर ईशान खट्टर ह्या दोघांचा हा चित्रपट!! जान्हवी कपूर ही प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी ह्यांची मुलगी. श्रीदेवी ह्या अभिनय क्षेत्रातल्या हिरा म्हणून ओळखल्या जातात. आणि जान्हवीचा पहिलाच चित्रपट असल्यामुळे तिच्याकडून खूप अपेक्षा असणार हे अगदी नक्की होतं. आणि जान्हवीने सुद्धा तिच्या कामामुळे प्रेक्षकांना निराश केल नाहीये. जान्हवीची शैली वेगळीच आहे. ती आईची कॉपी करायचा प्रयत्न करतांना दिसत नाही त्यामुळे 'धडक' मध्ये जान्हवीला पाहण डोळ्यांना सुखावा देते.

एखाद्या चित्रपटाचा 'रीमेक' काढताना मूळ चित्रपटाचा आशय तोच ठेऊन एका नव्या मांडणीमध्ये सिनेमाची गोष्ट प्रेक्षकांपुढे आणण्याची एक प्रचलित पद्धत आपल्याकडे आहे. म्हणजे 'रीमेक'च्या नावाखाली मूळ सिनेमाची कथा कुठेटती हरवल्या सारखी वाटते. 'धडक' पाहतांना मूळ कथेचा आत्माच कुठेतरी हरवल्यासारखा वाटतो. पण जान्हवी आणि ईशान ने काम चांगले केले आहे त्यामुळे चित्रपट पाहण्यासारखा आहे. 'सैराट'' ही काही फक्त प्रेमकथा नव्हती. समाजातील जातिव्यवस्था, त्यातील अंडरकरंट्स, प्रतिगामी मानसिकता असे अनेक मुद्दे दिग्दर्शकाने 'सैराट'मध्ये अधोरेखित केले होते. ऑनर किलिंगचं वास्तव दाखवतानाच अनेक गोष्टींवर दिग्दर्शकाने भाष्य केले होते. दुर्दैवाने 'धडक'मध्ये यातलं काहीही येत नाही. 'धडक' ही फक्त एक प्रेम कथा राहते. ज्यांनी 'सैराट' पाहिलाच नाही अशा प्रेक्षकांना 'धडक' आवडू शकतो. एक स्वतंत्र सिनेमा म्हणूनही त्याकडे पाहायचं म्हटलं आणि 'सैराट'शी तुलना करायची नाही अस जरी ठरवलं तरीही 'धडक' प्रेक्षकाला खिळवून ठेऊ शकत नाही अस काही मतं दिसून येतायत. अर्थात ह्यात सुद्धा दुमत आहे. काही लोकांच्या पसंतीस 'धडक' हा सिनेमा पडतोय असाच दिसून येतंय. 'धडक'’च्या मुळा मध्ये 'सैराट' आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. दुस-या शब्दांत सांगायचे तर 'धडक'चा आत्माच 'सैराट' आहे. काही प्रमाणात प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात हा चित्रपट यशस्वी होतो. यातील व्यक्तिरेखा कधी हसवतात तर कधी भावूक करतात. जान्हवीच्या डेब्यूबद्दल सांगायचे तर, हा तिचा डेब्यू सिनेमा आहे. पण तिचा अभिनय प्रेक्षकांना तिच्या प्रेमात पडायला भाग पाडणारा आहे. ती चित्रपटात कमालीची सुंदर दिसतेय. ईशानचा हा दुसरा चित्रपट आहे. पण त्याच्या चेह-यावरचे भाव खल्लास करणारे आहेत. अगदी सहज भूमिका दोन्ही कलाकारांकडून झालेली दिसते. या दोन्ही मुख्य कलाकारांशिवाय आशुतोष राणाचा परफॉर्मन्सही दमदार आहे. कथा संथपणे पुढे सरकते. गाणी चांगली आहेत. पण अनेकठिकाणी ते कथेच्या प्रवाहात अडथळा निर्माण करतात. खरे तर या चित्रपटातील लव्हस्टोरी तशीच जुनीच आहे. पण या लव्हस्टोरीचे वेगळेपण डोळ्यात भरणारे आहे. संवादही चांगले आहेत. ज्यांनी 'सैराट' पाहिलाय, ते या चित्रपटाशी 'धडक’ची तुलना करणारच. पण ज्यांनी 'सैराट' बघितलेला नाही. त्यांना हा चित्रपट चांगलाच भावणारा आहे. ज्यांनी 'सैराट' पाहिलेला आहे, त्यांच्यासाठीही 'धडक'चा क्लायमॅक्स अचंबित करणारा आहे. कथेत केलेला थोडा बदल काहींना भावला पण काहींना मात्र हा बदल अजिबात रुचलेला नाहीये.

२०१६ मध्ये मराठी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलेला चित्रपट म्हणजे 'सैराट' होता. 'सैराट' ही मुल संकल्पना असल्यामुळे कधी 'सैराट'च पारडं 'धडक' पुढे जड आहे अस वाटत. पण सगळ्या दृष्टीने विचार केल्यावर 'धडक' ह्या चित्रपट सुद्धा चांगली कामगिरी करेल अस दिसून येते आहे.

* चित्रपटांची तुलना करायची गरज आहे का हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे पण तुलना करायचीच असेल तर सगळ्यात आधी दोन्ही चित्रपटांची आकडेवारी बघण महत्वाच आहे-

१- चित्रपटाचे बजेट-

'सैराट' ही मराठी मधली एक स्मॉल बजेट फिल्म होती. त्याच बजेट ४ कोटी इतक कमी होत पण त्याला मिळालेला प्रतिसाद बजेट च्या तुलनेत नक्कीच चांगला होता. 'धडक' ह्या चित्रपटचे बजेट ५५ कोटी होत आणि वर १५ कोटी त्याच्या मार्केटिंग साठी वापरले गेले होते.

२. कलाकारांना मिळालेलं मानधन-

चित्रपटामध्ये नटांना मिळालेलं मानधन हा एक महत्वाचा मुद्दा असतो. 'सैराट' मध्ये आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू ह्या दोन्ही कलाकारांना प्रत्येकी ५ लाख रुपये मिळाले होते आणि 'धडक' विषयी बोलायचं झाल तर हा आकडा खूपच मोठा आहे. 'धडक' ह्या चित्रपटामध्ये ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर ला ६० लाख रुपये मिळाल्याच्या बातम्या आहेत.

३. बॉक्स ऑफिस कलेक्शन-

'सैराट' हा मराठी मधला पहिलाच चित्रपट आहे ज्यांनी १०० कोटींचा पल्ला गाठून पार केला होता. मराठी मध्ये इतक बॉक्स ऑफिस कलेक्शन हा चर्चेचा मुद्दा होता. 'धडक' ह्या चित्रपटाची चांगली सुरवात झालेली दिसून येते आहे. आणि लवकरच 'धडक' १०० कोटींचा पल्ला पार करेल अशी चिन्ह आहेत.

* आता 'सैराट' आणि 'धडक' ह्या दोन्ही चित्रपटांविषयी थोडस-

-'सैराट' ची कथा थोडक्यात-

अर्ची आणि परशाच्या प्रेमाची गोष्ट म्हणजे 'सैराट'. ही गोष्ट अवास्तव नाही. यापूर्वी ‘एक दुजे के लिये’, ‘कयामत से कयामत तक’, ‘इशकजादे’ अशा अनेक सिनेमांमधून याची गोष्ट थोड्या फार फरकाने दिसते. सीनिअर कॉलेजात दाखल झालेल्या दोन भिन्न समाजातल्या दोघांचा एकमेकावर जीव जडतो. यातली अर्चना गावातला राजकारणी असलेल्या पाटलाची पोर. तर प्रशांत हा कोळ्याचा पोर. अर्चना-प्रशांत या दोघांचे स्वभाव भिन्न. तरीही या नात्याचा रंग हळूहळू गुलाबी होऊ लागतो. सिनेमाच्या प्रोमोत जे दिसतं, तसाच सगळा मामला. पुढे हे ‘प्रेमप्रकरण’ पाटलाच्या घरी कळतं.. कळतं म्हणजे रंगेहाथ सापडतातच दोघे. मग पुढे व्हायचं तेच होतं. हाणामारी.. तुडवातुडवी.. अर्चना-प्रशांतच्या पळून जाण्यापासून पार शेवटापर्यंत ही आतातायी 'सैराट' मानसिकता टिपली गेली आहे. या मानसिकतेची बळी विनाकारण पुढची पिढीही ठरते हेही तो सूचित करतो. ह्या चित्रपटामध्ये आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरूचे काम अप्रतिम झाले होते.

-'धडक'ची कथा थोडक्यात-

'सैराट''ची गोष्ट ''धडक''मध्ये येताना थेट राजस्थानातील उदयपूरमध्ये पोहोचते. राजघराण्याची पार्श्वभूमी असलेल्या पार्थवीला (जान्हवी कपूर) राजघराण्याचे नियम, बंधने मान्य नाहीत. तिला निर्णयस्वातंत्र्य हवं आहे; पण पार्थवीचे वडील ठाकूर रतनसिंह (आशुतोष राणा) कडक शिस्तीचे असून राजकारणात सक्रिय आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना सत्ता हस्तगत करायची आहे. कॉलेजमध्ये शिकणारी पार्थवी मधुकरच्या (ईशान खट्टर) प्रेमात पडते. मात्र, जातीच्या भिंती या दोघांमध्ये उभ्या आहेत. रतनसिंह यांच्या कुटुंबापासून दूर राहा, असं ईशानच्या वडिलांनी बजावूनही या दोघांमध्ये प्रेमाचं नातं फुलत जातं. मग 'सैराट'प्रमाणे मधुकरचे दोन जिगरी दोस्त आहेत, पार्थवीची एक मैत्रीण आहे, उदयपूरच्या राजवाड्यांभोवती असलेल्या तलावांमध्ये पोहण्यासाठी मारलेल्या उड्या आहेत आणि 'अंग्रेजी समझता है ना तू' असा नायिकेचा डायलॉगही आहे. हा सारा प्रेमपट अगदी ''सैराट''च्या लाइनवरून जातो, तिथे शेवटी जे आर्ची-परश्याच्या वाट्याला येतं तेच या दोघांच्याही येतं, हे वेगळं सांगायची गरज नाही. पण त्यात थोडा बदल आहे. छोट्याशा भूमिकेत ऐश्वर्या नारकर लक्षात राहते.

'धडक' मध्ये पटकथा थोडी बदलली आहे त्यामुळे 'सैराट' ज्यांनी पाहिला आहे त्यांना आहे त्यांना काही उणीवा जाणवू शकतात. मूळ कथेत प्रेमाबरोबर पोटाचाही प्रश्न दाखवला आहे त्याचा अभाव 'धडक' मध्ये प्रकार्ष्यानी जाणवतो. शेवट 'सैराट' पेक्षा वेगळा केलाय जो काही लोकांच्या पसंतीस उतरला नाहिये. त्याच बरोबर अजय अतुल यांचं संगीत गोड आहे पण ती गाणी हिंदीत आणि चित्रपटात काही वेळा खटकतात. पण जर 'धडक' आणि 'सैराट' ची तुलना केली नाही तर चित्रपट आणि अभिनय नक्कीच चांगला झाला आहे. जर 'धडक' आणि 'सैराट' ची तुलना करायचीच असेल तर 'सैराट' ह्या मूळ सिनेमाच पारडं नक्कीच जड वाटेल. महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना 'धडक' कितपत आवडेल अशी चिंता व्यक्त होत आहे. पण तरीही ह्या चित्रपटाची चांगली सुरवात झाली आहे. आता ही घोड दौड अशीच पुढे चालत राहील का ते पाहण उत्सुकतेच ठरेल. धडक’चा ट्रेलर, गाणी प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून नकारात्मक प्रतिसाद जास्त आला. पण, बॉक्स ऑफिसवर मात्र या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्रदर्शनाच्या दिवशी ‘स्टुडंट ऑफ द इयर’चा विक्रम मोडत या चित्रपटाने ८.७१ कोटी कमावले. तर शनिवारी ११.०४ कोटी आणि रविवारी १३.९२ कोटी मिळून एकूण ३३.६७ कोटींची कमाई ‘धडक’ने केली आहे.

प्रत्येक चित्रपट बनताना त्यासाठी बरेच लोकं कष्ट घेत असतात. आणि त्या चित्रपटाविषयी प्रत्येकाचीच मतं वेगळो असतील पण शेवटी निर्णय प्रत्येकाला घ्यायची गरज आहे आणि चित्रपट बघून प्रत्येकानी आपापला निर्णय घेणं चांगलंच! जान्हवी आणि इशान च काम वाखाखण्याजोग आहे. नवीन चेहरे, वेगळी शैली हे पाहायचं असेल तर हा सिनेमा बघण्यासारखा आहे. दोन्ही कलाकारांची मेहनत सिनेमात दिसून येते. चित्रपट पाहतांना तुम्ही करण जोहरचा सिनेमा पाहत आहात, हे तुमच्या मनावर वारंवार लक्षात येत राहील. 'सैराट'मध्ये असलेला साधेपणा, वास्तववादी आयुष्य यांच्याशी फारकत घेतल्यामुळे सिनेमातली सगळी गंमत मात्र तुम्ही मिस करू शकता. काही नकारात्मक गोष्टी सोडल्या तर हा चित्रपट थेटर मध्ये जाऊन पाहायला हरकत नाही आणि 'सैराट' ला डोक्यात न ठेवता जर हा चित्रपट पहिला तर त्याचा आनंद नक्की घेता येईल. नवीन चेहरे मोठ्या पडद्यावर पाहायला नक्की मजा येईल. सिनेमा आपल्या मनोरंजनासाठी असतो त्यामुळे कोणत्याही सिनेमाचा आनंद घेण महत्वाच असत. तस केल, 'धडक' ची तुलना 'सैराट' बरोबर केली नाही आणि निखळ मनोरंजनासाठी 'धडक' पहिला तर तुमचा हिरमोड नक्की होणार नाही.

अनुजा कुलकर्णी.