फन्ने खान- अभिनयासाठी पाहावा असा चित्रपट..
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
'फन्ने खान'चं कथानक आशा-आकांक्षा...स्वप्नं आणि नात्यांभोवती गुंफलेलं आहे. हा चित्रपट 'एवरीबडी इज फेमस' ह्या Belgian सिनेमाचा रेमेक आहे. प्रत्येक वडील आपल्या मुलीसाठी झटत असतो आणि तेच ह्या चित्रपटातून अधोरेखित केलेलं आहे. मुलीला देशाची 'गानकोकिळा' करण्यासाठी आणि तिला एक मोठं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी जीवाचा आटापिटा करणाऱ्या आणि कोणत्याही थराला जाणाऱ्या एका वडिलांची ही गोष्ट आहे. आपल्या मुलीची स्वप्न मोडू नयेत ह्यासाठी वडिलांची तळमळ ह्या चित्रपटात दिसून येते. वेगळा विषय, बडे कलाकार ह्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर जादू करेल अस आत्ताच चित्र आहे. अनिल कपूर, ऐश्वर्या राय बच्चन, सतीश कौशिक आणि दिव्या दत्ता यांच्यासारखे मुरलेल दिग्गज आहेत. ऐश्वर्या राय ह्या चित्रपटात कमालीची देखणी दिसते पण तिला ह्या चित्रपटात फार वाव नाही. आणि अनिल कपूर, राजकुमार राव ह्यांच्या अभिनय कौशल्यावर कोणाचाच दुमत नाही. एकूणच 'फन्ने खान' एक संगीत नाट्यच आहे. त्यात स्टार कलाकार आपल्या जादुई आवाजाची भुरळ घालतात. या चित्रपटात अनिल कपूरच सगळं काही आहे. त्यानं जीव ओतून एका पित्याची भूमिका वठवली आहे. ऐश्वर्या राय आणि राजकुमार राव ही जोडी नवीन आहे. त्यासाठी एकदा तरी 'फन्ने खान' पाहायला हवा. त्याचबरोबर अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय ह्यांना बऱ्याच वर्ष्यानंतर एकत्र काम केले आहे त्यामुळे ते बघायची उत्सुकता दर्शकांमध्ये दिसून येते आहे.
चित्रपटाची कथा थोडक्यात- फन्ने खान ह्या चित्रपटाची कथा अर्थातच फन्ने खान म्हणजे अनिल कपूर भोवती फिरणार ह्यात काही वाद नाही. आपण पाहिलेलं प्रत्येक स्वप्न पूर्ण होतंच असं नाही. अनेकदा ही अपुरी स्वप्नं पालक आपल्या मुलांच्या माध्यमातून पूर्ण करताना पाहायला मिळतात. स्वप्न, नाती आणि आशावाद ह्या चित्रपटात दिसून येतो. ह्या चित्रपटातला फन्ने खान मोठे स्वप्न पाहणारा आणि ते पूर्ण करू न शकलेला एक माणूस. त्याच्या पातळीवर तो चांगलाच आहे. त्याची स्वप्न सुद्धा खरी आहेत. त्याच्या वर्तुळात त्याचे कौतुकही होते; परंतु त्याची कला त्या वर्तुळाबाहेर पडू शकत नाही. आपल्या वर्तुळात त्याला फन्ने खान म्हटले जात असले तरी बाहेर हे नाव कुचेष्टेचेही ठरते. ही गोष्ट अशाच फन्ने खान, उर्फ प्रशांत कुमार (अनिल कपूर) याची आहे. ही गोष्ट खरेतर त्याचीही नाही. त्याच्यातील वडिलांची आहे. आपले राहून गेलेले स्वप्न मुलगी लता (पिहू संद) साकारेल, या आशावादाची आहे. त्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असण्याचे आहे. कलाकार आणि बाप या दोन्ही पातळ्यांवर मुलीसाठी केलेल्या अनेकानेक गोष्टींचीही आहे. आणि ते वाखाखण्याजोगं आहे. हा फन्ने खान मोठा गायक, संगीतकार होण्याचे स्वप्न पाहत असतो. पण त्याच्या गाण्याला मर्यादा येतात आणि त्याला त्याच्या वर्तुळापुढे जाणे जमत नाही. तरीही बायको कविता (दिव्या दत्ता) त्याला साथ देत असते. आपली स्वप्न पूर्ण झाली नाही म्हणून खचून न जाता तो आपले स्वप्न मुलीमध्ये पाहयाला लागतो. एकीकडे मुलीची स्वप्न, आणि तिच स्वप्न वडील देखील मुलीसाठी पाहत असतात. लता ची सुद्धा स्वप्न वडिलांसारखीच असतात. आणि वडील त्यांची स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत त्यामुळे त्यांचे केवळ एकचं स्वप्न असतं, ते म्हणजे, आपल्या एकुलत्या एका मुलीला सुपरस्टार गायिका बनवण्याचं. यासाठीचं त्याची धडपड सुरु असते. प्रशांतची मुलगी लता (पिहू संद) मात्र पित्यावर सतत चिडलेली असते. स्वत:च्या जाडेपणावरून लोकांचे ऐकावी लागणारी टोमणी, साधारण चेहरा असलेल्या न्यूनगंडामुळे स्वत:तील प्रतिभेकडे झालेले दुर्लक्ष यासगळ्यांचे खापर ती आपल्या वडिलांच्या डोक्यावर फोडत असते. पण तरीही लताला स्टार बनवण्याच्या इर्षेने प्रशांतला पछाडले असते. तिच्यासाठी गाणी लिहिणे, त्याला तासंतास चाली लावत बसणे आणि ही गाणी प्रोड्यूस करायला पैसा उभा करणे यासाठी तो जीवतोड मेहनत करतो. हा भाग बघण्यासारखा आहे. त्याचा जीवलग मित्र अदीर (राजकुमार राव) त्याला ह्या कामात मदत करतो. पण त्याच दरम्यान प्रशांत कुमारची नोकरी जाते. पण अश्यावेळी खचून न जाता तो टॅक्सी चालवू लागतो. प्रत्येक घरात वडील आणि मुलीचे मतभेद असतात ते फन्ने खान मध्ये दाखवले आहेत. वयात आलेली मुलगी आणि वडील यांच्यात दृष्टिकोनामुळे वाद होतात. 'वडिलांना काही कळत नाही,' यावर तिचा त्या वयातील बहुतेकांप्रमाणे तिचा देखील ठाम विश्वास असतो. पण अश्यावेळी वडील मात्र कलाच मोठे करते, या दृष्टिकोनावर ठाम असलेले दाखवले आहेत. पोटापाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून प्रशांत टॅक्सी चालवायला घेतो आणि एकदिवस अनपेक्षितपणे त्याची भेट सुपरस्टार गायिका बेबी सिंगशी (ऐश्वर्या राय) होते. खरे तर प्रशांत हताश झालेला असतो. त्याला काय करावे हे सुचत नसते. एकदा काही कारणामुळे आपल्या सेक्रेटरीवर (गिरीश कुलकर्णी) चिडलेली बेबी सिंग गाडीतून उतरून प्रशांत कुमारच्या टॅक्सीत बसते. पण बेबी सिंगसारख्या एवढ्या मोठ्या गायिकेला पाहून तो मनोमन तो तिला किडनॅप करण्याचा प्लान बनवतो. अदीरच्या मदतीने ते तिला आपल्या जुन्या फॅक्टरीत ठेवतात. पण मुळातचं गुन्हेगारीची कुठलीही पार्श्वभूमी नसल्यामुळे दोघेही घाबरतात आणि सगळा प्लान उलटतो. यातली बेबी तिचा हावरट मॅनेजर, प्रोड्यूसर आणि त्यांच्या पैशा कमावण्याच्या कल्पनांना कंटाळलेली असते. प्रशांत व अदीरसारख्या बावळट किडनॅपरच्या रूपात तिच्या हाती आयते कोलीत सापडते आणि तीही या संधीचा फायदा घेते. पुढे कथा बरीच वळणे घेते. काही अपेक्षित आहेत, काही अनपेक्षित आणि गोष्ट अंताला पोहोचते. आणि चित्रपट संपतो. चित्रपटाची कथा मध्यंतरानंतर थोडी भरकटलेली दिसते. सुरवातीला चित्रपट पकड घेतो पण तरी मध्यंतरानंतर चित्रपट थोडा रेंगाळतो. कथा पुढे जाते आहे, असे वाटत नाही. ती त्याच जागी फिरल्यासारखी वाटते.बेबी सिंगची कोणतीही वास्तवातील पार्श्वभूमी दाखवलेली नाही. तिच्या आयुष्यात फक्त एक मॅनेजर दाखवण्यात आला आहे. याशिवाय कथा लांबलेली आणि थोडी किचकट वाटते. पण ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता येऊ शकते. कथेमध्ये फार नाविन्य नाही पण त्यातील अपहरण आपल्याला 'गंमतजंमत' या चित्रपटाची आठवणही करून देते. पण दिग्दर्शनाची धुरा अतुल मांजरेकर यांनी केलेली हाताळणी चांगली आहे. अनिल कपूर त्यांच्या भूमिकेत रंगत आणतात. त्या वडिलांची तडफड ते छान दाखवतात. ऐश्वर्या राय आणि राजकुमार राव यांनी आपापल्या भूमिका, त्यांचे एकमेकांशी बोलणे, गुंतणे साकारले आहे. राजकुमार राव त्याच्या भूमिकेत अगदी योग्य वाटतो. लता आणि तिची आई सगळेच जण आपापली भूमिका जगतात. पिहूने त्या वयातील मुलीच्या भावना, शरीरावरून सतत बोलल्यामुळे होणारी तडफड चांगल्या प्रकारे दाखवली आहे. तिचे वडिलांवर प्रेम आहे; परंतु तिचा गोंधळ झाला आहे. वडील जुन्या मताचे असल्यामुळे त्यांना काहीही समजत नाही, असे तिला वाटते आहे. या साऱ्या भावना पिहू छान व्यक्त करते. गिरीश कुलकर्णीचा सेक्रेटरी बेरकी आहे. त्याची चालण्याची ढब, बोलणे हे सारे त्या पात्राला पुढे नेणारे आहे. प्रसंगानंतर प्रसंग येत राहतात, अपेक्षित घटना पुढे येत नाहीत. ग्लॅमरची दुनिया आणि प्रशांत कुमारचे जग यातील फरक कॅमेरा दाखवतो. तो फार चकचकाटाला भुललेला नाही. यामध्ये गाणी खूप महत्त्वाची आहेत. बाकी साऱ्या चित्रपटावर अनिल कपूर छाप पाडतो. 'आपल्या लेकीसाठी स्वप्न पाहणारा, ते पूर्ण करण्यासाठी वाटेल ते करणारा बाप,' ही गोष्ट बहुतेकांच्या परिचयाची आहे. अनेकांनी ती जगलेलीही आहे. याच कथेला असलेला 'फिल्मी' झटका म्हणजे हा चित्रपट!
हा चित्रपट का बघावा-
- अनिल कपूर, ऐश्वर्या राय, आणि राजकुमार राव यांच्या अभिनयासाठी हा चित्रपट बह्घायला हरकत नाही.
- वडिलांची मुलीसाठी तळमळ अतिशय सुंदर रित्या ह्या चित्रपटात दाखवली आहे.
- पूर्ण परिवारासोबत पाहता येईल असा हा चित्रपट आहे.
- फक्त मज्जा म्हणून नाही तर आपल्या इच्छा आकांश पूर्तीसाठी नवीन उर्मी ह्या चित्रपटातून मिळू शकेल.
- चित्रपटात काही गोष्टी कमी वाटतात पण त्याकडे आपण सहज दुर्लक्ष करू शकतो.
- ह्या चित्रपटामुळे तुम्हाला आयुष्य जगण्यासाठी प्रेरणा मिळेल.
अनिल कपूर ह्यांच्या अभिनयासाठी एकदातरी बघावा असा हा चित्रपट नक्कीच आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------अनुजा कुलकर्णी.