ती चं आत्मभान .. 12 Anuja द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ती चं आत्मभान .. 12

१२. पाझर सुखाचा.

मीनल जोगळेकर

‘मावशी, मी आशा बोलतेय. संगीताची मुलगी आशा. या विकेंडला तुम्हाला वेळ आहे का ? मी तुमच्याकडे आले असते,’ फोनवरचे बोलणे ऐकून माधुरीला आनंदाचा धक्काच बसला. ‘हो, नक्की ये,’ असे म्हणून तिने आशाला तिच्या घराचा पत्ता नीट सांगून कसे यायचे याविषयी सूचना दिल्या आणि, ‘ये मग नक्की, बाय’ असे म्हणून फोन ठेवला. आशा तिच्या माहेरी काम करणाऱ्या संगीताची मुलगी. सॉफ्टवेअर इंजिनिअर झाल्यावर एम.एस.करण्यासाठी अमेरिकेतल्या नामवंत विद्यापीठात आली होती, हे माधुरीच्या आईकडून तिला कळलेच होते. ती फोन करुन भेटायला येईल, हे सुध्दा आईने सांगितले होते. आज तिचा फोन आल्यावर माधुरीचे मन 30 वर्षे मागे, तिच्या बालपणात गेले.

माधुरी, तिची मोठी बहिण, धाकटा भाऊ, आई – वडील आणि आजी असे मध्यमवर्गीय कुटुंब. वडील बँकेत अधिकारी तर आई शिक्षिका. घरची तशी खाऊन-पिऊन सुखवस्तू परिस्थिती. आईच्या सकाळच्या शाळेमुळे घरी पोळ्यांसाठी बाई ठेवली होती. ती काम सोडून तिच्या गावी परत गेल्यामुळे आजी व आई नवीन बाईच्या शोधात होत्या. माधुरीची ताई मनिषा 12 वीला, माधुरी 10 वीत तर भाऊ मिलिंद 8 वीत शिकत होता. सगळ्यांची अभ्यासाची महत्त्वाची वर्षे असल्यामुळे त्यांचीही आईला विशेष मदत होत नसे. त्यामुळे पोळेवाल्या बाईचा शोध जोरात सुरु होता.

एक दिवस शेजारच्या काकू घरी आल्या. ‘ही संगीता, हिला कामाची अतिशय आवश्यकता आहे. बघ, कामावर ठेऊन" , काकूंनी ओळख करुन दिली. माधुरी शाळेत जायच्या घाईत होती. तिने संगीताकडे एक कटाक्ष टाकला. ‘साधारण आपल्याच वयाची मुलगी दिसतेय’ तिच्या मनात विचार आला. तिनेही त्याचवेळी माधुरीकडे बघितले. नजरानजर झाली आणि ती हलकसं हसली. हसल्यावर तिचे पांढरे शुभ्र, मोत्यासारखे दात चमकून गेले. त्याची नोंद घेत माधुरी हलकेच हसून शाळेत निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी संगीता कामावर हजर झाली. माधुरीच्या आजीने तिचा ताबा घेतला. कणिक किती घ्यायची, पीठ कसे चांगले मळायचे, फुलका कसा पटकन उलटवायचा इ. सूचना तिला आजी देत होती. तोंडातून एक शब्दही न काढता संगीता शांतपणे त्या सगळ्या सूचना ऐकून त्याप्रमाणे काम करत होती. माधुरीच्या शाळेची वेळ होत आल्याने आजीने माधुरीला जेवायला बोलावले. संगीताच्या हातचे गरमा-गरम फुलके खाऊन माधुरी शाळेला पळाली.

संगीता आता हळूहळू माधुरीच्या घरी रुळू लागली. माधुरीच्या आजीशी तिची चांगलीच गट्टी जमली. आजीकडून माधुरीला कळले की संगीताचे आई-वडील वारले होते आणि तिच्या धाकट्या भावासोबत ती जवळच्या झोपडपट्टीत अलीकडेच रहायला आली होती. तिचे शिक्षण चौथीपर्यंतच झाले होते. परंतु नंतर परिस्थितीमुळे तिला शिक्षण घेता आले नव्हते. मात्र भावाला खूप शिकवायचे तिचे स्वप्न होते. त्यासाठी पडेल ते कष्ट करायची तिची तयारी होती. तिची कहाणी ऐकून माधुरीला वाईट वाटले होते. आपल्याच वयाची मुलगी शाळा न शिकता कामाला जुंपली गेली आहे, हे ऐकून माधुरीच्या मनात तिच्याविषयी कणव दाटून आली होती. तिला आपण मदत करायला हवी, हे तिच्या मनाने घेतले.

एक दिवस माधुरीने संगीताला पुढे शिक्षण घेण्याबद्दल विचारले. मात्र, "आता शिक्षणात मन रमणार नाही", असे संगीताने सांगितले. माधुरीची आई शिक्षिका असल्याने तिनेही संगीताला "मी शिकवते, तू प्रयत्न कर", असे सांगून बघितले. संगीताने मात्र, ‘ आता मला शिकण्याची इच्छा नाही. माझ्या भावाला, गणेशला तुम्ही शिकवाल का ?’ अशी विनंती केली. माधुरीच्या आईने ती मान्य केली आणि गणेश तिच्या आईकडे शिकवणीसाठी येऊ लागला. संगीताचा चेहरा त्यामुळे थोडा खुललेला दिसू लागला. एकीकडे माधुरीच्या आजीच्या मदतीने संगीताला आणखी 4 घरी पोळ्या करण्याची कामे मिळाले तरी दुसरीकडे तिचा रोजच्या जगण्याचा संघर्ष सुरुच होता.

संगीता राहात असलेली झोपडपट्टी अनेक दारुड्या, जुगारी माणसांनी भरलेली होती. नळावरची भांडणे तर रोजचीच ठरलेली. शिवाय तरुण मुलगी एकटी आहे, हे बघून वस्तीतली टवाळ टाळकी तिच्या जाण्या-येण्याच्या वाटेवर टपून बसलेली असायची. या सगळ्यांचा सामना संगीता अगदी निकराने करत असायची. अधून-मधून माधुरीच्या आजीकडे ती याबाबत मन मोकळे करायची. आजी तिला धीर द्यायची व युक्तीच्या चार गोष्टी सांगत असे. एकदा तर कहरच झाला. रात्री काम आटोपून संगीता तिच्या भावासोबत झोपडीच्या दाराशी हवा खात बसली होती. बाहेर दारु पिऊन तर्र झालेला एक मवाली अर्वाच्च भाषेत बडबड करु लागला. संगीता व तिच्या भावाने त्याकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला, तरीही तो तिच्या झोपडीत जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करु लागला. संगीताच्या संयमाचा बांध फुटला. ती तरा-तरा उठली, कोपऱ्यातली काठी घेऊन तिने त्याला चोप द्यायला सुरुवात केली. तो ओरडू लागला, लोक गोळा झाले. त्यांनी त्याची तिच्या तावडीतून कशीबशी सुटका केली. ती रात्र संगीता आणि तिच्या भावाने जागून काढली. मात्र दुसऱ्या दिवसापासून झोपडपट्टीतल्या लोकांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलून गेला. त्या रात्रीचे तिचे त रणचंडीकेचे रुप बघून वस्तीतली टवाळ टाळकी जरा वरमली होती. रस्त्यात जाता-येता तिची छेड काढण्याचा प्रकार थांबला होता.

संगीताचा हा पराक्रम सांगताना माधुरीच्या आजीच्या डोळ्यात कौतुक दाटून आले होते. माधुरीच्या घरच्यांच्या आधारामुळे आणि दोन वेळचा घास सुखाने खायला मिळू लागल्याने संगीता आणि गणेशचे रुप हळूहळू पालटू लागले. कालांतराने माधुरीच्या मदतीने तिने बँकेत खाते उघडले. थोडी-थोडी बचत ती करु लागली. माधुरीच्या बाबांनी तिला एक सेकंडहँड सायकल घेऊन दिली. ती घेतल्याने तिचा कामावर येण्या-जाण्याचा वेळ वाचू लागला. आणखी दोन घरची कामे तीने धरली.

बघता-बघता 5-6 वर्षांचा काळ निघून गेला. मनिषा पदवीधर होऊन बँकेत नोकरीला लागली होती. माधुरी इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला होती, मिलिंद मुंबईला जे.जे.स्कूल ऑफ आर्टसला शिकायला गेला होता. मधल्या काळात संगीताने माधुरीच्या आजीकडून शिवणकाम, भरतकाम शिकून घेतले होते. पोळ्यांच्या कामासोबत ती भरतकाम, शिवणकामातून थोडे-थोडे पैसे मिळवू लागली होती. गणेश आता दहावीला आला होता. अभ्यासात हुशार नसला तरी कष्टाळू होता. माधुरीची आई जास्त वेळ देऊन त्याच्याकडून परीक्षेची तयारी करुन घेत होती. गणेशला त्याच्या ताईचे कष्ट, तिची तळमळ दिसत होती. चांगले मार्कस् मिळवायचा निश्चय त्याने केला होता. दहावीची परीक्षा झाल्या-झाल्या गणेश माधुरीच्या बाबांच्या ओळखीने एका डॉक्टरांकडे कंपाँडर म्हणून जाऊ लागला होता. अखेर निकालाचा दिवस जवळ आला.निकालाच्या दिवशी संगीता काळजीत होती. माधुरीने ऑनलाईन बघून गणेशचा निकाल सांगितला. 78 टक्के मिळवून तो पास झाला होता. संगीताच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आपला भाऊ आता कॉलेजात जाणार, तेव्हा त्या बदनाम वस्तीची सावली त्याच्यावर पडू नये, या हेतूने तिने माधुरीच्या आई-वडीलांच्या सल्ल्याने व मदतीने एका चाळीत एक छोटी खोली भाड्याने घेतली.

गणेशने कॉमर्सला ॲडमिशन घेतले. दिवसभर कॉलेज करुन तो संध्याकाळी डॉक्टरांकडे कामावर जात असे. बारावीलाही चांगले मार्कस् मिळवून त्याने सी.ए.व्हायचे ठरवले. इकडे मनिषाताईचे लग्न होऊन ती बँगलोरला गेली. माधुरी पुण्याला मोठ्या कंपनीत नोकरीला लागली होती. मिलिंद मुंबईला एका बड्या ॲड एजन्सीत नोकरीला लागला. संगीताने हळूहळू जास्तीच्या कामांमधून पैसे साठवून चाळीतली खोली विकत घेतली. थोडे बँकेकडून कर्जही घेतले. त्यासाठी माधुरीच्या बाबांनी तिला मदत केली होती. माधुरीच्या ऑफिसकडून तिला अमेरिकेला जाण्याची ऑफर आली आणि ती सहा महिन्यांसाठी अमेरिकेला गेली. तिकडे गेल्यावर तिचा प्रोजेक्ट आणखी लांबला. त्यामुळे तिचा मुक्काम 6 महिन्यांऐवजी दीड वर्ष झाला. माधुरीला अमेरिकेत खरे तर खूप एकटे वाटत होते आणि या एकटेपणातच तिला तिच्याच ऑफिसमधल्या अमरचा आधार लाभला. अमर तिच्याच कॉलेजमधला सिनियर, तिला अमेरिकेत जीवनासाथी म्हणून भेटला. दोघांनी आपापल्या घरच्यांना कळविले. दोघांचे कुटुंबिय एकमेकांना भेटले आणि त्यांचे लग्न निश्चित केले. प्रोजेक्ट संपताच दोघेही भारतात आले आणि लग्न करुन पुण्याला आणि थोड्या दिवसांनी अमेरिकेला नवीन प्रोजेक्टसाठी रवाना झाले. इकडे संगीताचेही लग्नाचे वय झाले होते. पण भावाचे शिक्षण संपून त्याला नोकरी लागल्याशिवाय संगीताला काहीच सुचत नव्हते. गणेश अभ्यास सांभाळून नोकरी करत होता, सी.ए.ची परीक्षा पास होणं एवढे सोपं नव्हते. त्याचे शेवटचे दोन पेपर्स गेली दोन वर्षे राहून जात होते. तो पूर्ण प्रयत्न करीत होता, पण यश मिळत नव्हते. दरम्यान, माधुरीची आजी एक दिवस अचानक गेली. संगीताला तर मोठा आधार गेल्यासारखे वाटले. संगीताचे बाबापण बँकेतून सेवानिवृत्त झाले होते. संगीता चाळीतल्या खोलीचे कर्ज फेडण्यासाठी भरपूर कष्ट करत होती. गणेशला ते कष्ट दिसत होते आणि ताईची त्यातून लवकर सुटका करुन तिचा संसार सुरु व्हावा असे त्यालाही वाटत होते. अखेर तिसऱ्या प्रयत्नात त्याचे पेपर्स निघाले आणि तो सी.ए.झाला. डॉक्टरांच्या ओळखीने एका सी.ए. फर्ममध्ये तो कामाला लागला होताच, आता सी.ए.झाल्यानंतर चांगला पगार तो मिळवू लागला.

संगीताने आता लग्न करावे म्हणून गणेश आणि माधुरीचे आई-वडील तिच्या मागे लागू लागले. पण भावाचे लग्न झाल्याशिवाय नाही, या मतावर संगीता ठाम होती. त्यादरम्यान संगीताच्या चाळीत राहणाऱ्या एका होतकरु मुलाकडे तिचे लक्ष वेधले गेले. तो पोलिओमुळे एका पायाने थोडा अधू होता, पण सगळ्यांशी हसतमुख आणि बोलून-चालून सुसंस्कृत मुलगा होता. महादेव त्याचे नाव. महादेव एका खाजगी कंपनीत ऑफिसबॉय म्हणून कामाला होता. त्याचे आई-वडील गावाकडे होते. अधू पायामुळे त्याला लहानपणापासून हेटाळणी सहन करावी लागल्याने तो कुटुंबियांपासून दुरावला होता. जिद्दीने बारावीपर्यंत शिक्षण घेऊन तो नोकरीच्या शोधात नागपूरला आला होता. अनेक हाल-अपेष्टा सहन करत तो या नोकरीत स्थिरावला होता आणि संगीताच्याच चाळीत एका खोलीत भाड्याने राहत होता, अविवाहित होता. त्याच्याशी थोडी ओळख वाढल्यावर त्याच्याकडून त्याची कहाणी तिला कळली. त्याची जिद्द,सरळपणा, मुख्य म्हणजे निर्व्यसनीपणा तिला आवडले होते. गणेश आणि माधुरीचे आई-वडील, ज्यांना ती देशपांडे काका-काकू म्हणत असे, त्यांच्याकडून लग्नासाठी वारंवार आग्रह झाल्यावर तिने एक दिवस महादेवकडे लग्नाचा विषय काढला. महादेव मानी होता. त्याला सहानुभूती म्हणून हे लग्न मान्य नव्हते. त्याने तसे स्पष्ट सांगून संगीताला नकार दिला. संगीताने स्वत:च्या लग्नाचा विषय संपवून गणेशच्या लग्नासाठी खटपट सुरु केली. नकारानंतरही संगीताने महादेवशी वागण्यात काहीही बदल केला नाही. पूर्वीप्रमाणेच ती त्याच्याशी वागत-बोलत होती. गणेशसाठी तिच्या चाळीत राहणारी निलिमा ही चुणचुणीत मुलगी तिच्या मनात भरली. गणेशला विचारुन तिने निलिमाच्या घरी भेटून विषय काढला. निलिमाचे आई-वडील संगीता,गणेशच्या गेल्या 10-12 वर्षांच्या कष्टमय प्रवासाबद्दल ऐकून होते. त्यांना त्याचे मनातून कौतुक होतेच. त्यांनीही होकार दिला आणि महिनाभरात गणेश-निलिमाचे लग्न साधेपणाने लावून दिले. दोनच महिन्यात गणेशच्या कंपनीतर्फे त्याला दुबई येथे जाण्याची संधी चालून आली. संगीताने त्याला आनंदाने परवानगी दिली. गणेश-निलिमा दुबईला रवाना झाले.

इकडे माधुरीचा भाऊ मिलिंदचे लग्न होऊन तो मुंबईला स्थिरावला होता. वडील सेवानिवृत्त झाले होते, तर आई सेवानिवृत्तीच्या मार्गावर होती. त्यांच्या घरात आता ती दोघंच राहिली होती, तर गणेशच्या दुबईल्या जाण्याने संगीताही एकटी पडली होती. दरम्यान वर्षभराचा काळ गेला. एक दिवस महादेव देशपांडे काका-काकूंसमोर येऊन उभा राहिला. त्याने संगीताशी लग्नाची इच्छा त्यांच्यापुढे व्यक्त केली. तो म्हणाला की त्याने संगीताच्या लग्नाच्या मागणीचा विचार केला होता आणि वर्षभर तिचा स्वभाव, विचार बारकाईने जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर ती आपल्यासाठी योग्य जीवनसाथी ठरेल असा विश्वास वाटल्याने तो लग्नाचा प्रस्ताव घेऊन आला होता. देशपांडे काका-काकूंनी संगीताला बोलावून घेतले. दोघांनाही समोरा-समोर बसवून दोघांचेही विचार स्पष्ट मांडण्याबद्दल सांगितले. दोघांच्याही मनातल्या सर्व शंका दूर करुन त्यांनी दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला. दुबईहून गणेश लग्नाला येऊ शकेल, असे बघून नोंदणी पध्दतीने लग्न करायचे ठरले. योगायोगाने माधुरी अमरसह सुट्टीवर आली असल्याने तिही लग्नाला उपस्थित होती. संगीताच्यावतीने साक्षीदार म्हणून देशपांडे काका-काकूंनी सह्या केल्या तर महादेवच्यावतीने माधुरी-अमर उभे राहिले. संगीताचा संसार सुरु झाला.

काळ भरभर पुढे सरकत होता. देशपांड्यांची तीन मुले आणि त्यांच्या घरातील मुलेच झालेल्या संगीता, गणेशचे संसार बहरु लागले होते. संगीतानेही वर्षभरात एका गोंडस मुलीला जन्म दिला. ‘आशा’ तिचे नाव. वर्षभराने आणखी एका मुलाचे त्यांच्या संसारात आगमन झाले. त्याचे नाव आनंद ठेवले. देशपांडे काकूंची मुलेही संसारात रमल्याने त्यांचे येणे आता हळूहळू दोन-दोन वर्षांनी होत होते. काकूही सेवानिवृत्त झाल्या होत्या. त्या दोघांना संगीताच्या कुटुंबाचा आणि संगीताच्या कुटुंबाला त्यांचा चांगला आधार होता. गणेशप्रमाणेच आशा-आनंद देशपांडे काकूंकडून शिकवणी घेऊ लागले होते. त्यांची प्रगती अधून-मधून माधुरीच्या कानावर पडायची. सगळ्यांनाच त्यांचे कौतुक वाटायचे.

संगीताही मुलांना देशपांडे काकूंच्या सर्व मुलांबद्दल कौतुकाने सांगून त्यांचा आदर्श ठेवायची. आशाने माधुरीमावशी सारखे इंजिनिअर व्हायचे ठरवले. आनंदला लहानपणापासून सैनिकी पोषाखाचे जबरदस्त आकर्षण होते. देशपांडे काकांनी त्याला 7वीत असताना कर्नल गोखलेंकडे नेले. त्यांच्या देखरेखीखाली शारीरिक क्षमता आणि शिस्तीचे धडे तो गिरवू लागला. आशाने बारावीला चांगला अभ्यास करुन इंजिनिअरिंगला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळवली. आनंद कर्नल गोखल्यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीएची तयारी करु लागला. पहिल्या प्रयत्नात त्याला यश आले नाही. पण संगीता-महादेवने त्याला पैश्यांची काळजी न करता पुन्हा एकदा प्रयत्न करायला सांगितले. कर्नल गोखले, देशपांडे काका-काकूंचा भक्कम आधार पाठीशी होता. अपयशामुळे आलेल्या नैराश्यावर मात करत आनंद पुन्हा एकदा तयारीला लागला. आशाचे इंजिनिअरिंग होत आले होते. त्यानंतर एम.एस.साठी अमेरिकेला जाण्याचा विचार तिने देशपांडे काका-काकूंना बोलून दाखवला. त्यांनी तिला एका चांगल्या करियर कौंसेलरकडे नेले. त्याने दिलेल्या सल्ल्यानुसार ती गेट परीक्षेच्या तयारीला लागली. आनंदने पूर्ण तयारी करुन एन.डी.ए.ची परीक्षा पुन्हा एकदा दिली. थोड्याच दिवसात त्याचा निकाल लागून त्याची निवड झाल्याची आनंदाची बातमी त्याने काका-काकूंना दिली. थोड्याच दिवसात तो पुण्याला रवाना झाला. आशा गेटच्या स्कोअरच्या बळावर अमेरिकेकडे झेपावणार होती. माधुरी मधल्या काळात एका बिझनेस ट्रीपवर नॉर्वेला गेल्याने आशाच्या अमेरिकेला येण्याबाबत तिला काही कळले नव्हते आणि आज अचानक आशाचा फोनवरचा आवाज ऐकून गेल्या 30 वर्षांचा काळ तिच्या डोळ्यांसमोरुन एका चलत चित्राप्रमाणे झरझर निघून गेला. आशाच्या धडाडीचे तिला मनापासून कौतुक वाटले.

पुढच्या विकएंडला आशा ठरल्याप्रमाणे माधुरीच्या घरी आली. संगीताप्रमाणेच सावळी, शिडशिडीत आशा, जणू संगीताचीच प्रतिकृतीच. माधुरीच्या आणि तिच्या पोटभर गप्पा झाल्या. जुन्या आठवणींची उजळणी होत राहिली. माधुरीचे दोन दिवस अगदी मजेत गेले. पुन्हा येण्याबद्दल सांगून माधुरीने आशाला जड अंत:करणाने निरोप दिला. माधुरीच्या दोन्ही कन्या उच्च शिक्षणासाठी दुसऱ्या राज्यांमध्ये होत्या. त्यामुळे माधुरीचे घर आणि मन आशाच्या अधून-मधून येण्याने उत्साहाने भरुन जात असे. होता-होता दोन वर्षे भुर्रकन उडून गेली. आशानेही अतिशय कष्टाने एम.एस.पूर्ण केले. तिच्या पदवीदानाचा दिवस जवळ आला. माधुरीने दरम्यानच्या काळात आईशी बोलून संगीता-महादेवचा पासपोर्ट तयार करुन घेतला होता. आशाच्या पदवीदान समारंभासाठी संगीताने अमेरिकेला यावे, अशी माधुरीची तीव्र इच्छा होती. महादेवला तेवढी रजा मिळू शकली नाही, पण संगीताचे परतीचे तिकिट माधुरीने आईकडे पाठवून तिची अमेरिकेला येण्याची सर्व तयारी करुन द्यायला सांगितली.

पदवीदान समारंभाला आशाने माधुरीलाच तिची नातेवाईक म्हणून येण्याची विनंती केली होती. त्यानुसार माधुरी तिथे जाणार होतीच. पण दोन दिवस आधी संगीता तिच्याकडे पोहोचेल अशी व्यवस्था माधुरीने केली होती. त्यानुसार स्वत:चा पहिला –वहिला विमान प्रवास आणि परदेश प्रवास करुन संगीता माधुरीकडे पोहोचली. माधुरीने संगीतासाठी विद्यापीठाची विशेष परवानगी काढून तिच्यासाठीही पदवीदान समारंभाचा प्रवेश पास मिळवला होता. पदवीदान समारंभाला ती आणि आशा दोघीही आपापल्या घरुन विद्यापीठात पोहोचणार होत्या. त्याप्रमाणे आशा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापाशी तिच्या माधुरीमावशीची वाट बघत होती. उशीर व्हायला लागली, तसा तिने मावशीला मोबाईलवर कॉल करुन ती आत जात असल्याचा व लवकर पोहोचण्याचा निरोप दिला. समारंभ सुरु झाला. सर्व परिसर देशोदेशींच्या विद्यार्थी व पालकांनी फुलून गेला होता. त्यात अनेक भारतीय विद्यार्थी आणि पालकही होते. आपल्या पाल्यांचे यश पाहून त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले होते.

त्या गर्दीत आनंदाश्रूंनी डबडबलेले माधुरी आणि संगीताचे डोळेही होते. पदवीदानानंतर काही पालकांना मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली होती. आशाची पालक म्हणून माधुरीचे नाव पुकारले गेले. माधुरी स्टेजवर गेली, पण सोबत संगीताला घेऊन ! त्या दोघींना स्टेजवर बघून आशाचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना ! हजारो किलोमीटर दुरवरुन, महागडे तिकिट काढून आपली अल्पशिक्षित आई या परक्या देशात आपले कौतुक बघण्यासाठी उपस्थित आहे, यावर आशाचा विश्वासच बसेना ! आपण स्वप्नात आहोत की जागेपणी, हे तिने स्वत:ला चिमटा काढून बघितले. अगदी एखाद्या चित्रपटात शोभावा असा प्रसंग होता तो. माधुरीने बोलायला सुरुवात केली. सर्वप्रथम तिने संगीताची साऱ्यांना ओळख करुन दिली. त्यानंतर तिच्या खडतर प्रवासाबद्दल आणि आशा-आनंद तसेच गणेशला वाढविण्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी तिने घेतलेल्या कष्टांबद्दल नेमक्या शब्दांत प्रभावीपणे माहिती सांगितली. सारा आसमंत टाळ्यांच्या कडकडाटाने भरुन गेला होता. सभागृहातील मंडळी उभे राहून त्या दोघींना मानवंदना देत होत्या. समारंभ संपल्यावर आशाने माधुरीसोबत तिच्या घरी आनंद साजरा करण्यासाठी दोन दिवस राहायला जायचे आधीच ठरले होते. त्यानुसार आशा संगीतासह माधुरीच्या घरी गेली. माधुरीने त्यांच्यासाठी एक छोटीशी सरप्राईज पार्टी घरी ठेवली होती. तिच्या मित्रपरिवारातील प्रतिष्ठित लोक पार्टीला उपस्थित होते.त्यांनी आशा व संगीताचे भरपूर कौतुक केले. तिथल्या महाराष्ट्र मंडळाकडून संगीताला विकेंडला मुलाखतीचे निमंत्रण आले. इतक्या सगळ्या मोठ्या लोकांसमोर बोलायचे म्हणून तिला दडपण आले होते. पण आशा व माधुरीनी तिला धीर दिला, तिची थोडी तयारी करुन घेतली. मुलाखतीचा दिवस उजाडला. जवळची त्यातल्या त्यात चांगली साडी नेसून संगीता तयार झाली होती. मुलीच्या यशाने तिच्या सावळ्या चेहऱ्यावर समाधानाची आगळी झळाळी आली होती. मुलाखत छान रंगली. संगीताने सुरुवातीपासूनचा आपला प्रवास, भावाला शिकवून मोठे करण्याचे छोटे स्वप्न घेऊन देशपांडे कुटुंबियांकडे टाकलेले पाऊल त्यांच्याकडून मिळालेले मार्गदर्शन व आधार, योग्य जीवनसाथीची लाभलेली साथ व मुलांनी कष्टाचे केलेले चीज या सर्वांबाबत अतिशय प्रांजळपणे मन मोकळे केले. या साऱ्या प्रवासात माधुरीच्या सुंदर मैत्र भावनेबद्दल तिने साश्रू नयनांनी कृतज्ञता व्यक्त केली. रक्ताच्या नात्यांपलीकडल्या या रेशीमबंधांनी तिच्या जीवनाला आकार दिला होता, त्यात सुखाचे, आनंदाचे रंग भरले होते.

मुलाखतीच्या शेवटी ती म्हणाली, ‘देशपांडे कुटुंबियांच्यामुळे मला रक्ताच्या नात्यापलीकडली माणुसकीची नाती कळली. माणुसकीची ही किल्ली मला त्यांच्याकडून मिळाली आहे, ती मी प्राणपणाने जपेन व इतरांसाठी त्याचा वापर करेन. देव जर कुठे असेल, तर तो माणसातच आहे, हे मला त्यांच्यामुळे कळले. माणूसपणाची खूण मला पटली, मी धन्य झाले.’ टाळ्यांचा कडकडाट होत राहीला, आशा-संगीता-माधुरीचे डोळे समाधानाने पाझरत राहिले...

  • मीनल जोगळेकर