ती चं आत्मभान - 15 Anuja द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ती चं आत्मभान - 15

१५. सौदामिनी..

सौ. भाग्यश्री कुलकर्णी.

२१ डिसेंबर २०१७ संध्याकाळी ७ ची वेळ. तिरुपती रेल्वेस्टेशन मध्ये कोल्हापूरला जाणाऱ्या रेल्वेची वाट पाहत बसले होते. माझे पतीमहाशय मला सर्व सामनासह तिथेच बसवून बाहेर फेरफटका मारण्यास निघून गेले. आमची परतीची गाडी रात्री ९ वाजता होती. तितक्यात रेल्वे सहा तास लेट आहे अशी घोषणा झाली अरे बाप रे! एवढा वेळ कसा घालवावा ह्या विवंचनेत मी होते. नेहमीप्रमाणे रेल्वे स्टेशनची प्रचंड गर्दी, हमाल लोकांची लगबग, वेगवेगळ्या प्रवासी ग्रुपचे एकत्र येण्यासाठी एकमेकांना हाका मारण अस सावळा गोंधळ चालू होता. तेलगुभाषिक प्रांत असल्याने कुणाशी संवाद ही साधू शकत नव्हते. इतक्यात एक साधारणपणे ३५-३६ वर्षाची एक स्त्री कोपऱ्यात सैरभैर बसून होती. डोळ्यात एक गूढता, चेहऱ्यावर एक म्लान पण खूप सोशिक भाव. कोण असेल ही? इथ एकटीच का बसून असेल? बर नसेल का तिला? अशा अनेक प्रश्नाच मोहोळ माझ्या डोक्यात उठलेल. कदाचित माझ्या डोक्यातले विचार तिने ओळखले असावेत. आता ती स्त्री माझ्या शेजारी येऊन बसली. माझ्याकडे पाहून तिने मंद हास्य केले. ती माझ्याशी तेलगुतून संवाद साधण्याचा प्रयत्न करू लागली. पण मला तेलगु येत नाही असे मी तिला हिंदीत सांगितले. मग मोडक्या तोडक्या हिंदीत तिने विचारले ‘कहा से आई हो आप?’ महाराष्ट्र असे उत्तर दिल्यावर पटकन म्हणाली “मराठी का तुम्ही?” “हो मी कोल्हापूरहून इथे आले” असे मी तिला सांगितले. ‘मी तशी मराठीच मुलगी आहे’ तिने सांगितले ‘आमच मूळ गाव तस अमरावती आहे पण मी आंध्रप्रदेशची बोर्डर ओलांडून पुढे कधीच कधी गेले नाही. पण घरी आजीबरोबर मराठी बोलत असल्याने मला मराठी आणि तेलगु दोन्ही येते. माझ नाव सौदामिनी. अम्मा मला तुम्हाला पाहून माझ्या अम्माची आठवण झाली” आणि तिच्या डोळ्यात पाणी तराळले. “काय झाल ग बाळ मला तुझी अम्माच समज” मला ही दोन मुलीच आहेत तुही त्यांच्यासारखीच आहेस.” मी म्हणाले.

ती- त्या शिकतात का?

मी - होय

ती- “तुम्ही तुमच्या मुलीना शिकवता हे खूप चांगले आहे. आमच्या समाजात मुलीना फार शिकवले जात नाही. नेहमीच्या चक्रात अडकवले जाते. एखाद्या मुलीने शिकण्याचा हट्ट धरला तर ती वरचढ होईल ह्या भीतीने बंडखोरीचा शिक्का मारून त्रास द्यायला सुरु करतात. ती मुलगी समाजाचे नियम पाळत नाही त्यांच्या रागाचा विषय असतो. त्यांच्या आई वडिलांना पण दोष दिला जातो. माझे आईवडील पण खूप चांगले आहेत. त्यांनी सर्व विरोध पत्करून मला शिकवले स्वतःच्या पायावर उभे केले. मी सर्व ऐकत होते”. त्यानंतर ती अचानक थांबली कारण अनोळखी व्यक्तीला आपण खूप बोलतोय हा अपराधी भाव तिच्या डोळ्यात दाटला. मी विश्वासाने पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले “तुझ्या मनात जे आहे ते बोलून टाक तुला बरे वाटेल. अग कधी कधी परक्या व्यक्तीला आपला त्रास सांगितला तर फायदाच होतो एक तर आपल्या मनातल आडपडदा न ठेवता बोलू शकतो दुसर म्हणजे आपले गुपित कुणाला कळणार नाही ह्याची शाश्वती असते”. ती हलकेच हसली. “तुम्ही माझ्या अम्मासारख्या दिसता त्यामुळे मी तुम्हाला सर्व काही सांगते.” माझे दोन्ही ही सासर व माहेर हैदराबाद आहे. माझ्या आईवडिलांना आम्ही तीन मुले आहोत. मोठी बहिण विशाखापट्टणमला असते. मधला भाऊ हा त्याच्या कुटुंबासहित आईबाबांबरोबरच असतो. घरात मी सर्वात लहान. त्यामुळे शेंडेफळ सगळे हट्ट पुरे केले गेले. शिकण्याची खूप आवड होती त्यामुळे खूप शिकले आधी पदवी मग पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर एका शासकीय विभागात नोकरीला लागले. खर तर माझ्या बंडखोरी विचाराची मला खूप मोठी किंमत मोजावी लागली. ज्या समाजात शिक्षण व्यर्थ मानतात तिथे नातेवाईक आणि ओळखीचे माझे नोकरी करण काय स्वीकारणार? नातेवाईकांचे कुचकट बोलणे टोमणे सहन करावे लागत असे. त्या सर्वांचा राग माझ्या आईवडिलांवर होता. त्यांनी सारे मुकाट्याने सोसले. सर्वांच्या विरोधात जाऊन त्यानी मला सर्व गोष्टीसाठी परवानगी दिली. योगायोगाने माझी बंडखोर वृत्ती जाणून असलेल्या तरुणाने मला मागणी घातली. आमचे लग्न झाले. त्यांच्या घरचे ही जुन्या विचारांचे होते. मुली व महिलांना जास्त स्वांतत्र्य देऊ नये हे त्यांचे मत. पण नवरा चांगल्या असल्याने मी सुखात होते. ऑफिसमध्ये ही मी रमू लागले होते. उपसंचालक असलेल्या आमच्या वरिष्ठ अधिकारी madam खूप चांगल्या होत्या. त्यांना माझ्या कामाची पद्धत आवडत होती. सर्व जबाबदारीने काम निपटणे, माझा कामाचा उरक, माझी समजून घेण्याची वृत्ती, कामाचे कौशल्य. ह्या गोष्टींचे त्यांना नेहमीच कौतुक वाटे. ऑफिस मधला संध्याकाळचा चहा ही आम्ही सोबतच घेत असू. त्या कधी कधी त्यांच्या खासगी गोष्टी ही मला सांगत असत. इतका विश्वास त्यांनी माझ्यावर टाकला होता अर्थात हे सहकारी लोकांना आवडत नव्हते. ते अचंबित होत. “तुम्ही madam ना आधी ओळखत होतात का?” असे विचारले जाई. पण प्रत्यक्षात तसे काहीच नव्हते. मी ह्या आधी कधीही त्यांना भेटले नव्हते. स्टाफ मध्ये सुरवातीला असलेल्या उत्सुकतेची जागा मत्सराने घेतली. त्यांना माझे आणि madam चे जवळ असणे खटकू लागले. त्यांना सारखे असे वाटायचे की आम्ही त्यांना धोका आहोत. त्यामुळे इतर वेळी ते मला सतावत असत. माझ्याबद्दल कागाळ्या करण, गैरसमज पसरवण अशा गोष्टी ते नेहमी करत असत.

सुरवातीला छोट्या छोट्या असणाऱ्या ह्या गोष्टीचा अतिरेक झाला ते म्हणजे माझ्याविरुद्ध एक षडयंत्र रचले गेले. अर्थात मी आणि madam ह्या गोष्टीपासून पूर्णपणे अनभिज्ञ होतो. आमच्या वरिष्ठांना ऑफिस मधून माझ्याविरुद्ध कागाळ्या जायला सुरवात झाली होती. पण संचालक साहेब ऑफीस मध्ये विझिटला आले की madam माझ्याबद्दल नेहमी चांगले बोलायच्या. अखेर त्या असंतुष्ट व्यक्तीच्या प्रयत्नांना यश आले. एका कंत्राटी कामात मी पैसे खाल्ले असा आरोप केला गेला. माझ्या हाताखालच्या शिपायाला चिरीमिरी देऊन माझ्याविरुद्ध खोटी साक्ष द्यायला लावली आणि माझ्याविरुद्धचे कारस्थान यशस्वी केले आणि शेवटी व्हायचे ते झालेच संचालक साहेबांच्या ऑफिस मधून मला बडतर्फ करण्याची सूचना आली. उपसंचालक madam त्यांना परोपरीने सांगितले सर्व शहानिशा करून तिच्यावर कारवाई करूया. पण त्यांनी ऐकले नाही. तिच्याविरुद्ध माझ्याकडे खूप तक्रारी आहेत. आता मी तुमचे काही एक ऐकणार नाही. मला निर्णय घ्यावाच लागेल. शेवटी मला कोर्ट निर्णय लागेपर्यंत सेवेतून मुक्त केले गेले. मला हा मानसिक धक्का सहन होत नव्हता. माझ्या सासरचा लोकांना आयतेच कोलीत मिळाले. घरचे सगळे माझा दुस्वास करू लागले. मी माझा संयम राखून होते.मी सतत माझे निर्दोषत्व सांगत राहिले. पण पुरावे विरुद्ध गेले होते. त्यामुळे madam, माझे पती माझा भाऊ सर्वजण अगतिक होते. ऑफिस सोडताना मला madam नी सांगितली “तू निर्दोष आहेस मला माहित आहे. एका षड्यंत्रची शिकार झाली आहेस. तुझे निर्दोषत्व सिद्ध होईल. खरा गुन्हेगार आणि सूत्रधार सापडेल माझ्याकडून मी तुला जमेल तेवढी मदत करेन”. त्यांना खूप वाईट वाटत होते. madam चा विश्वास जगण्याचे बळ देण्यास पुरसा होता. सासरचे सर्व लोक माझ्यावर नाराजच होते. माझ्या पतीला खूप दोष देऊ लागले. खूप समजावून सांगून सुद्धा माझ्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. शेवटी नाईलाजाने माझ्या पतीने मला माहेरी पाठवून दिले. त्यानंतर थोडे दिवसांनी शेजारीपाजारी लोकांकडून त्रास होऊ लागला तसेच माझ्याविरुद्ध असणाऱ्या लोकांच्या धमक्या येऊ लागल्या. भावाला ह्या गोष्टीचा खूप त्रास होऊ लागला. पतीची व भावाची होणारी मानसिक कुचंबणा मला सहन होत नव्हती. शेवटी मी दोन्ही घरांचा त्याग करायचा ठरवला. सन्मानित होऊन परत त्या घरी जायचे नाहीतर जायचे नाही असे मनाशी ठरवून मी माहेरचे घरे ही सोडले. वेगवेगळया लोकांना भेटून माझ्या षड्यंत्राबदल मी माहिती गोळा करण्यास सुरवात केली. अर्थात ह्या सगळ्या लढाईत madam चा भक्कम पाठींबा होता. माझ्याविरुद्ध साक्ष दिलेला तो शिपाई त्याच्या मूळ गावी जाऊन लपून बसला होता. त्याला शोधून आम्ही ह्यामागचा खरा सूत्रधार जाणून घेण्यास आलो होतो. एक एक छडा लावता लावता भयानक सत्ये बाहेर येत होती. शेवटी असे समजले कि आमच्याच खात्यातले एक भ्रष्ट वरिष्ठ अधिकारी ह्या सगळ्याच्या मागे होते. त्यानंतर पुढची पायरी म्हणजे त्यांचा पर्दाफाश करणे आणि स्वतःच निर्दोषत्व सिद्ध करणे हा होता. ह्या कामी अनेक लोकांनी मला अप्रत्यक्षरीत्या मदत देऊ केली. अनेक अडचणीचे डोंगर, धमक्या सहन करत आम्ही योग्य ती कागदपत्रे गोळा केली आणि कोर्टाला सादर केली. “अम्मा आज माझ्यावर चालू असलेल्या केसचा निकाल लागणार आहे. मी त्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळेच इथे बालाजीच्या पायावर डोक ठेवायला आले होते आता निकाल काय आहे हि उत्सुकता आहे”. जे काय केले ते सगळे उघडकीस आले. कोर्टात त्या सर्वाचे पुरावे मी दाखल केले आहेत. त्यामुळे मी निर्दोष सिद्ध होणार आहे. खर तर ती तिच्या निकालाची वाट पाहत होती पण दुर्दैवाने तिचा फोन बंद पडला होता त्यामुळे तिचे मन आणखी सैरभैर झाले होते. तिने मला माझा फोन देण्याची विनंती केली आणि तिच्या भावाला फोन लावला त्याने निकाल तिच्या बाजूने लागला ही आनंदाची बातमी सांगितली. सूडबुद्धीने केलेल्या राजकारणाचा ती बळी आहे हे कोर्टाला तिच्या कागदपत्रावरून लक्षात आले. कोर्टाने आदेश दिला. सादर केलेल्या ह्या प्रकरणाशी त्यांचा कसला ही संबध नाही. त्यांना झालेला मनस्ताप त्यांची मानहानी गृहीत धरून त्याच्या मागील खंडित सेवेतील वेतन देऊन दहा लाख नुकसान भरपाईचा आदेश दिला. तसेच त्यांना सन्मानाने शासकीय सेवेत पुन्हा रुजू करून घ्यावे. गुन्हेगार व्यक्तीस बडतर्फ करून त्यांच्या वरिष्ठ संचालकसाहेबाना परराज्यात पाठवण्यात आले. जाताना त्यांनी madam जवळ दिलगिरी व्यक्त केली.

आता इतके दिवस तिने लढल्या गेलेल्या लढाईचा शेवट झाला आणि तिचा आत्मसन्मान तिला परत मिळाला. तिच्या डोळ्यातून अश्रूचा पूर वाहू लागला. माझे पतीमहाशय परत आल्याने मी उठून जायला लागले. पण तिने मला थांबण्याची खूण केली. मला पाया पडून म्हणाली. तुम्ही मला लकी ठरला आहात. मी तुम्हाला कधीच विसरणार नाही. तिने धावत जाऊन जवळच्या दुकानातून मिठाईचा पुडा आणून माझ्या हातात कोंबला आणि तिची गाडी आल्याने ती घाईघाईने आत चढली आणि मला तिथूनच हात हलवत राहिली. गाडी सुटली आणि मी तिच्या पाठमोऱ्या शरीराकडे पाहत विचार करू लागले.

खरच स्त्री मध्ये अफाट उर्जा असते काहीही करून दाखवण्याची. स्त्रीमध्ये ताकद असते मोडून पडल्यावर सुद्धा पुन्हा उभारण्याची, स्त्री मध्ये दुर्दम्य इच्छा असते तिचा आत्मसन्मान परत मिळवण्याची आणि प्रत्येक स्त्री मध्ये अशीच एक सौदामिनी असते गरज असते फक्त त्या अंधाराला भेदण्याची....

सौ. भाग्यश्री भास्कर कुलकर्णी.

कोल्हापूर.

*परिचय-

- १९७६ पासून लेखन करत आहेत.

- नियतकालिके व काही मासिकामधून कथा व कविता प्रकाशित झालेल्या आहेत.

- मराठी शुभेच्छा संदेश व शीषर्क ओळी सुचवा ह्या चांदोबा मधील स्पर्धेत यश मिळवले आहे.