१४. अष्टविनायक - भाग २ Anuja Kulkarni द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

१४. अष्टविनायक - भाग २

१४. अष्टविनायक - भाग २

५. श्री विघ्नेश्वर-

श्री विघ्नेश्वरला ओझरचा गणपती देखील म्हणतात. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे.

मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. चिमाजी आप्पा यांनी हे देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढविला.

राजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सूरू केला. यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली व त्याला यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले. त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्वच यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरवात केली. यामळे ऋषीमूनींनी विघ्नासूराचा बंदोबस्त करण्याची गणपतीला विनंती केली. गणपतीने पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपतीला शरण गेला. गणपतीने त्याला जेथे माझी पूजा केली जाते तेथे न येण्याच्या अटीवर सोडून दिले. विघ्नासूराने गणपतीला विनंती केली की तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव भक्तगणांती घ्यावे व तुम्ही येथेचे वास्तव्य करावे. विघ्‍नासूराची ही विनंती गणपतीने मान्य केली व तो या ठिकाणी विघ्नहर या नावाने वास्तव्य करू लागला.

मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि. मी. वर तर पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर आहे. येथून जवळच आर्वी उपग्रह केंद्र व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक दुर्बिण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हादेखील जवळच आहे.

पुणे-नाशिक रस्त्यावर जुन्नर तालुक्यातील हे देवस्थान नारायणगावापासून ८ कि.मी. अंतरावर कुकडी नदीच्या काठी आहे. जवळचे रेल्वे स्टेशन पुणे आहे.

६. श्री गिरिजात्मज-

अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज. जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पायऱ्या आहेत. पार्वतीने आपणास पुत्र व्हावा म्हणून या डोंगरात १२ वर्षे तपश्चर्या केली. ही तपश्चर्या फलद्रूप होऊन श्री गजानन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला बटुरूपात प्रकट झाले. गिरिजेचा म्हणजे पार्वतीचा आत्मज(पुत्र) म्हणून या गणपतीला 'गिरिजात्मज' हे नाव मिळाले.

लेण्याद्री (गिरिजात्मज) हा ३० बौद्ध लेण्यांचा समूह आहे तसेच लेणी क्रमांक ७ हा अष्टविनायकांमधील सहावा गणपती आहे. पुणे जिल्ह्यातील गणपतीचे हे देऊळ डोंगरात एका गुहेत आहे. कुकडी नदीच्या तीरावर लेण्याद्री गाव वसले आहे. लेण्याद्रीजवळच्या या डोंगरात ३० लेण्या आहेत, त्यातील ७ व्या लेणीत गिरिजात्मकाचे मंदिर आहे. २६ लेण्या ह्या स्वतंत्र क्रमांकाच्या असून दक्षिणाभिमुख व पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रमांकित आहेत.

इथे जाण्यासाठी रेल्वे आणि रस्त्याचा पर्याय आहे.

७. श्री वरदविनायक-

वरदविनायक (महड) हे रायगड जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. अष्टविनायकात सातवा गणपती म्हणून महाडचा वरदविनायक ओळखला जातो. या गणपतीची एकदम जवळ जाऊन पूजा करता येते.

हे देऊळ अष्टविनायकांपैकीएक आहे.या मंदिराचा जिर्णोद्धार झाला असला तरी मंदिराचा गाभारा पेशवेकालिन असून तो हेमांडपंथी आहे. हा गणपती पुरातन कालीन असल्याचे सांगितले जाते.गणेश येथे वरदविनायक (समृद्धी व यश देणारा ) या रूपात राहात असे या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. या देवळाच्या चारही बाजूस चार हत्तींच्या मूर्ती आहेत. ८ फूट बाय ८ फूट असलेल्या या देवळाला २५ फूट उंचीचा कळस आहे. कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे.पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटवलेला असतो, असे म्हणतात की हा दिवा १८९२ पासून पेटता आहे.

मुंबई-पनवेल-खोपोली मार्गावर खोपोलीच्या अलिकडे ६ कि.मी. अंतरावर उजवीकडे महडसाठी रस्ता जातो. मुंबई-महड अंतर ८३ कि.मी आहे.

मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर कर्जतपासून महड २४ कि.मी. आहे.

कर्जत ते महड फाटा एस.टी. बसेस आहेत. महड फाटय़ापासून देवस्थान दीड कि.मी. आहे. पायी जाण्यास सोपे आहे.

८. श्री बल्लाळेश्वर मंदिर-

हा गणपती पालीचा गणपती म्हणून ओळखला जातो. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे. हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे. या मंदिराचे नाव गणपतीचा भक्त बल्लाळ याच्या नावावरून पडले आहे. पूर्वीच्या काळी बल्लाळ नावाचा एक मुलगा होता, तो गणपतीचा निस्सीम भक्त होता. एक दिवस त्याने पाली गावात विशेष पूजेचे आयोजन केले. पूजा कित्येक दिवस चालूच होती, पूजेला बसलेली अनेक मुलं घरी न जाता तिथेच बसून राहिली. यावरून चिडून त्या मुलांच्या पालकांनी बल्लाळ याला मारहाण केली आणि गणपतीच्या मुर्तीसकट त्याला जंगलात फेकून दिलं. अतिशय गंभीर अवस्था असताना बल्लाळ गणपतीच्या मंत्रांचा जप करत होता. या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान गणेशानी त्याला दर्शन दिले.

पाली खोपोलीपासून ३८ कि. मी. अंतरावर आहे तर पुण्यापासून १११ कि. मी. अंतरावर आहे. खोपोली – पेण रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो, तर पनवेल – गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकणपासून पाली असा रस्ता जातो.

गणपती वर श्रद्धा असणारे बरेच असतात. त्यामुळे बहुतांश लोकांना अष्टविनायक यात्रा करण्याची इच्छा असते. जर यात्रा म्हणून अष्टविनायक करत असाल तर शेवटी परत मोरेश्वर ला जाऊन यात्रा पूर्ण करायची पद्धत आहे. अष्टविनायकांच दर्शन घेण्यासाठी बरेच भाविक उत्सुक असतात. काही वेगवेगळ जाण पसंद करतात तर काही २ दिवसात ही यात्रा पूर्ण करतात. अतिशय सुंदर मूर्ती आणि परिसर इथे आहे. आणि अष्टविनायाकांना भेट दिल्यावर मन प्रसन्न होत. गणेशाची विविध रूपे पाहायला मिळतात. अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. अष्टविनायक दर्शनासाठी पुणे, अहमदनगर, रायगड या तीन जिल्ह्यांतून प्रवास होतो. निरनिराळ्या रूपांत श्री गणेशमूर्ती आहेत. त्याही कुठे डोंगरात, खडकात, कुठे नदीकाठी आहेत, त्यामुळे अष्टविनायकाची यात्रा करणाऱ्या भाविकाला यात्रेबरोबरच पर्यटनाचाही अनुभव मिळतो. अशा या अष्टविनायकाची महती केवळ महाराष्ट्रापुरती नाही, तर संपूर्ण भारतभर पसरली आहे. अश्या ह्या अष्टविनायकाचे दर्शन माणस शांती देते.

शेवटी अष्टविनायका तुझा महिमा कसा ह्या गाण्यातलं शेवटच कडव जे नेहमीच अष्टविनायकाची आठवण करून देतात-

दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा
दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा
अष्टविनायका तुझा महिमा कसा
अष्टविनायका तुझा महिमा कसा
मोरया मोरया मंगलमुर्ती मोरया || मोरया मोरया मंगलमुर्ती मोरया ||
मोरया मोरया मयुरेश्वरा मोरया || मोरया मोरया मयुरेश्वरा मोरया ||
मोरया मोरया चिंतामणी मोरया || मोरया मोरया चिंतामणी मोरया ||
मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया || मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया ||
मोरया मोरया महागणपती मोरया || मोरया मोरया महागणपती मोरया ||
मोरया मोरया विघ्नेश्वरा मोरया || मोरया मोरया विघ्नेश्वरा मोरया ||
मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया || मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया ||
मोरया मोरया वरदविनायक मोरया || मोरया मोरया वरदविनायक मोरया ||
मोरया मोरया बल्लाळेश्वरा मोरया || मोरया मोरया बल्लाळेश्वरा मोरया ||
मोरया मोरया अष्टविनायक मोरया || मोरया मोरया अष्टविनायक मोरया ||
मोरया मोरया अष्टविनायक मोरया || मोरया मोरया अष्टविनायक मोरया ||
मोरया मोरया अष्टविनायक मोरया || मोरया मोरया अष्टविनायक मोरया ||