हिमाचल प्रदेश- न विसरता येण्यासारखी जागा - भाग १ Anuja Kulkarni द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

हिमाचल प्रदेश- न विसरता येण्यासारखी जागा - भाग १

हिमाचल प्रदेश- न विसरता येण्यासारखी जागा - भाग १

हिमाचल प्रदेश हे उत्तर भारतातील एक पहाडी राज्य आहे. हिमाचल प्रदेश चा शाब्दिक अर्थ "बर्फाचे पहाड असलेला प्रांत" असा आहे. बर्फ नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असतो त्यामुळे पर्यटकांच आवडत ठिकाण म्हणून हिमाचल प्रदेश प्रसिद्ध आहे. हिमाचलच्या उत्तरेला जम्मू आणि काश्मीर, पश्चिमेला पंजाब, आग्नेयेला उत्तराखंड व दक्षिणेला हरियाणा ही राज्ये आहेत. हिमाचल प्रदेशाचे क्षेत्रफळ ५५,६७३ चौ.किमी आहे. लोकसंख्या ६८,५६,५०९ एवढी आहे. हिंदी व पहाडी ह्या येथील प्रमुख भाषा/बोली आहेत. शिमला ही हिमाचलची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हिमाचल प्रदेशाची साक्षरता ८३.७८ टक्के आहे. गहू, बटाटे, तांदूळ, आले ही येथील प्रमुख पिके आहेत. हे राज्य हिमालयाच्या कुशीत वसले असल्यामुळे येथे अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. पर्यटन हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. कुलू, मनाली, सिमला, धरमशाला यांसारखी प्रसिद्ध पर्यटन स्थळे या राज्यात असल्यामुळे पर्यटनाच्या बाबतीत हे राज्य आघाडीवर आहे. इथे लाखोंच्या संखेने पर्यटक येत असतात. निसर्गाच्या कुशीत आरामदायक आणि आनंददायक ट्रेकिंगसाठी हिमाचल प्रदेश आणि उत्तरांचलचा क्रमांक यादीमध्ये सर्वात वरचा आहे.

हिमाचल प्रदेश सुंदर निसर्गासाठी ओळखला जातो. त्याचबरोबर, तेथील शांत वातावरण पर्यटकांना हवेहवेसे वाटत असते. हिमालयातील स्थानामुळे हिमाचल प्रदेशाच्या प्राकृतिक रचनेत टोकाची तफावत आढळते. छायामय दऱ्या व खोरी, खडबडीत सुळके, हिमनद्या, अफाट पाइन वने, खळखळाट करत वाहणाऱ्या दऱ्या, समृद्ध वनस्पती व प्राणिजीवन ही वैशिष्टपूर्ण भूदृश्ये हिमाचल प्रदेशराज्यात आढळतात. येथील खोल दरी प्रदेशातील किमान उंची ३०० मी. असून ती कमाल ८,५९८ मी.पर्यंत वाढत गेलेली आढळते. हिमालयाच्या पूर्व-पश्चिम पसरलेल्या व एकमेकींना समांतर असणाऱ्या तीन प्रमुख पर्वतश्रेण्या येथे आढळतात. प्राकृतिक दृष्ट्या त्यांपैकी सर्वांत उत्तरेकडील श्रेणीला ग्रेटर हिमालय किंवा हिमाद्री, मधल्या श्रेणीला लोअर हिमालय किंवा हिमाचल आणि हिमालयाच्या पायथ्याकडील श्रेणीला शिवालिक टेकड्या किंवा आउटर हिमालय म्हणतात. हिमाद्री पर्वतश्रेणीतील झास्कार पर्वतश्रेणी सर्वांत उंच असून तिची उंची सुमारे ८,००० मी. आहे. त्यातून अनेक हिमनद्या वाहतात आणि हा भूप्रदेश बाराही महिने बर्फाच्छादित असतो. येथे माणसांची किंवा पशुपक्ष्यांचीही वस्ती नाही. लेसर हिमालय किंवा हिमाचल पर्वतश्रेणीची सरासरी उंची ४,५०० मी. आहे. या पर्वतश्रेणीत धवलधार व पीरपंजाल या पर्वतरांगा असून या भागाला अल्पाइन विभाग असेही म्हणतात. या प्रदेशाच्या दक्षिणेला पंजाबच्या पठाराजवळ शिवालिक टेकड्या असून ह्या आउटर हिमालयाची सस.पासून उंची ९०० ते १,५०० मी. आहे. या पर्वतराजीच्या उत्तरेकडील सांरचनिक खोऱ्यातील समांतर पर्वतश्रेणींना दून (डून) म्हणतात. या दूनपैकी डेहरा, कोहत्री, चौखंबा, पट्टी व कोटा ही प्रमुख असून डेहरा हे सर्वांत मोठे, सुपीक, चांगले जलसिंचित व विकसित आहे. त्यातून सोंग नदी वाहते. येथील खोऱ्यांमध्ये कांग्रा (कांगडा) सर्वांत मोठे खोरे असून येथे मैदानी समतल जमीन आहे.शिवाय महसू, रामपूर, स्पिती, लाहूल बास्पा ही येथील अन्य खोरी आहेत. राज्यात रावी, बिआस, सतलज, चिनाब आणि यमुना या प्रमुख नद्या असूनकाही सरोवरे आहेत. रावी ही कांग्रा जिल्ह्यातील धवलधार पर्वताच्या हिमाच्छादित बारा बंगहाल श्रेणीत उगम पावते, तर यमुना नदीचा प्रवाह जम्नोत्री हिमनदीतून सुरू होतो. लेसर हिमालयामधून अनेक प्रवाह यमुनेला मिळतात. चिनाब नदी पीरपंजाल आणि हिमाद्री यांमधील सांरचनिक द्रोणीमधून १६० किमी. वायव्येस वाहते. बिआस नदी गुरुदासपूरजवळ आणि सतलज भाक्राजवळ पंजाबात प्रवेश करते.

हवामान : हिमाचल प्रदेशाच्या हवामानात उंचीनुसार विविधता आढळते. अगदी उत्तरेकडील हिमाद्री पर्वतश्रेणी कायम बर्फाच्छादित असल्यामुळे तेथील हवामान अतिथंड असते. तेथील बर्फाच्या थरांची जाडी २५ ते ३० मी. आढळते; मात्र लेसर हिमालय भागात हवामान समशीतोष्ण कटिबंधीय प्रकारचे आहे. उंच माथ्याच्या भागात अल्पाइन किंवा आर्क्टिक प्रकारचे शीत हवामान आढळते. पंजाबच्या पठारी प्रदेशाला लागून असलेल्या शिवालिक प्रदेशात जून ते सप्टेंबरपर्यंत पावसाळा असतो. तेथील सरासरी पर्जन्यमान १८३ सेंमी. असून तो मुख्यत्वे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या काळात पडतो. उन्हाळ्यातील कमाल तापमान २०° से. असते; तर हिवाळ्यात विशेषत: जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत ते ४.४° ते ⇨ -६° से.पर्यंत आढळते. या काळात बर्फ पडतो, कडे कोसळतात, भूमिसर्पण होते आणि रहदारी ठप्प होते. कधीकधी उणे सेल्सिअसपर्यंत तापमान जाते. मनाली-लेहसह अनेक राज्यमार्ग बर्फ पडल्यामुळे वाहतुकीस बंद होतात. वार्षिक जलवायुमानाचा विचार करता राज्यात उबदार व आल्हाददायक हवामान मे ते जुलैचा मध्य व सप्टेंबरचा मध्य ते नोव्हेंबरचा पहिला आठवडा यांदरम्यान असते. दून खोऱ्यांमध्ये उन्हाळ्यात तापमान वाढते आणि सरासरी सु. २२५ सेंमी. पाऊस पडतो.

लेसर हिमालयात व शिवालिक प्रदेशात घनदाट जंगले आहेत. त्यांत देवदार, चीड (पाइन), बांज, कैल इ. वृक्ष असून पर्वतांच्या उतारावर गवताची कुरणे आढळतात. या अरण्यमय भागामुळे अरण्यावलंबी अनेक व्यवसाय तिथे चालतात. तसेच गवताच्या मुबलकतेमुळे मेंढपाळी व्यवसायही चालतो.

जंगलात अस्वले, नीलगाय, चिंकारा, रानकोंबड्या, तांबडा पंडक (पँडा), खवल्या मांजर, लांडगा, हरिण, काळवीट, याक व सरपटणारे प्राणी पाहावयास मिळतात. दुर्मिळ व सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला हिमचित्ता येथे आढळतो. तिबेटी अरगली मेंढ्या येथे आहेत. राज्यात दोन राष्ट्रीय उद्याने आणि ३२ वन्य जीव अभयारण्ये आहेत.

कला व संस्कृती : हिंदू देव-देवतांचे निवास या भूमीत आहेत, अशी लोकांची श्रद्धा असल्यामुळे या प्रदेशाला ‘देवभूमी’ किंवा ‘व्हॅली ऑफ गॉड्ज’ असे म्हणतात. राज्यात दगडातील तसेच लाकडांत बांधलेली अनेक मंदिरे आढळतात. हिमाचलमधील अनेकविध यात्रा-जत्रा या पारंपरिक हिंदू देवतांच्या सण-उत्सवांशी निगडित असून यांतून नृत्य-संगीतादी कार्यक्रम होतात. तसेच बाजार भरतो आणि अन्य प्रदेशांतूनही लोक तेथे जमतात. अशा सणांत दसरा, शिवरात्र इत्यादी सणांना विशेष महत्त्व असते. कुलू खोरे हे जसे पाईन, देवदार वृक्षांसाठी तसेच ते रंगीबेरंगी फुलांच्या ताटव्यांसाठी आणि सफरचंदांच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. येथील दसरा उत्सव तीन-चार दिवस चालतो. रघुनाथ हा या प्रदेशातील सर्वांत मोठा व पूज्य देव आहे. यात्रेनिमित्त सामूहिक नृत्य होते. तरुण-तरुणी त्यात भाग घेतात. या वेळी मोठा व्यापार भरतो व दुरून लोक जमतात. कुलूच्या दक्षिणेला १५ किमी.वर बाजौरा गावात बशेशर महादेवाचे भव्य व जुने (आठवे शतक) मंदिर असून त्यावर शिल्पांकन आहे.

सिरमोर जिल्ह्यात रेणुका तलाव असून रेणुकेची पूजा होते. चंबा येथे शिवमंदिर असून श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी तेथे जत्रा भरते. ती श्रावण संपेपर्यंत चालते. मंडीनगरातही शिवमंदिर असून शिवरात्रीला तेथे मोठी जत्रा भरते व ती आठ दिवस चालते. या वेळी देवतांच्या प्रतिमांची पालखीतून गावभर मिरवणूक काढतात. गंगुवाल (बिलासपूर जिल्हा) गावाजवळ पहाडी शिखरावर नैना देवीचे मंदीर आहे. भाद्रपद महिन्यात येथे मोठा उत्सव होतो. त्याला अन्य राज्यांतूनही लोक येतात. नलवाणीच्या व्यापारी जत्रेत पशू खरेदी-विक्री, खेळांच्या स्पर्धा व नृत्य-नाटक यांचे आयोजन करतात. किन्नौरमध्ये उरव्यांग नामक जत्रा भरते. उरव्यांग म्हणजे फुलांचा उत्सव. लोक फुलांचा शृंगार करून देवतांना फुले वाहतात. राज्यात पहाडी जत्राही भरतात. त्यांना लबीची जत्रा म्हणतात. या जत्रेत राज्यात निर्मिती झालेल्या वस्तूंची विशेषत: लोकरी शाली (पशमी), रजया, पट्टू गालिचे यांची विक्री होते. तसेच फळे, घोडे, खेचरे, याक, बकऱ्या यांचीही खरेदी-विक्री होते. हिमाचल प्रदेशात इतरत्र न आढळणारी जमलू देवता (मलाना खोरे), मनू देवता, हिडिंबा (मनालीजवळ) यांची मंदिरे आहेत. सिमला येथे श्रीराम जाखू हनुमान, श्यामला (काळी देवी) ही मंदिरे आहेत. कांग्रात वज्रेश्वरी व जवळच ज्वालामुखीचे मंदिर आहे.

यात्रा-जत्रेतील नृत्य-गायनादी उपक्रमांशिवाय या राज्यात काही विशिष्ट नृत्यप्रकार आढळतात. त्यांत लाहलडी नृत्य (कुलू खोरे) तरुण--तरुणी सवाल-जवाबाद्वारे सादर करतात; तर मालानामक नृत्यात मुली एक ओळ गातात आणि मुले वा पुरुष पुढील ओळ गातात. येथे नाट्टी नावाचे नृत्य प्रसिद्ध आहे. तसेच गद्दी, किन्नर वगैरे जमातींची सामूहिक नृत्ये प्रसिद्ध आहेत. त्यांतील लोकगीते ही विशेषकरून प्रणय आणि त्यातील विरह या विषयांशी निगडित असतात. हिमाचल प्रदेशात ५५ नगरे असून त्यांपैकी सिमला हेच सर्वार्थाने शहर आहे. उर्वरित नगरांत बिलासपूर, चंबा, कसौली, कुलू, मण्डी, नाहन, पालमपूर, सोलन आणि सुंदरनगर ही महत्त्वाची आहेत.