एक निर्णय.. स्वतःचा स्वतःसाठी..
एकानंतर एक दमदार चित्रपट, मालिकांमधून मराठी अभिनेता सुबोध भावे प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. नुकताच त्याचा ‘आणि.. डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफीसवर त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यासोबतच झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ ही त्याची मालिकासुद्धा छोट्या पडद्यावर गाजतेय. म्हणजेच सुबोध भावे सध्या खूप फॉर्मात आहे. सुबोध आणखी एक नवा चित्रपट तुमच्या भेटीला घेऊन येत आहे. ‘एक निर्णय’ असं या चित्रपटाचं नाव असून याचा लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक श्रीरंग देशमुख आहे. तो एक निर्णय खूप महत्त्वाचा असतो, असं सुबोधने कॅप्शनमध्ये लिहिलं होत. प्रेक्षकांची उत्सुकता आज संपत असून, १८ जानेवारी ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर काय कमाल करतो हे पाहण्याची उत्सुकता आहे.
या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता श्रीरंग देशमुख दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. महेश मांजरेकर यांच्या ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटात श्रीरंगने भूमिका साकारली होती. ‘एक निर्णय’ हा चित्रपट कौटुंबिक कथानकावर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे. सुबोधसोबत यामध्ये मधुरा वेलणकर साटम प्रमुख भूमिकेत आहेत. प्रत्येक माणसाची निर्णयक्षमता वेगवेगळी असते. त्याला अनुसरुन त्याने स्वतःसाठी घेतलेले निर्णय आणि त्याचे होणारे दूरगामी परिणाम असे काहीसे मानवी भावभावनांचे गुंते ह्या चित्रपटात दाखवण्यात आहेत आहेत. आयुष्याच्या एखाद्या महत्त्वाच्या वळणावर प्रत्येकाला स्वतःचा एक निर्णय घ्यावा लागतो. आणि तो निर्णय आयुष्याला वेगळे वळण देणारा असतो. या वळणाच्या परिणामांचा जय किंवा पराजय असे वर्गीकरण केले तरी भावनांच्या जाळ्यात कोणाचा कसा पराजय होईल हे ठामपणे कोणा लेखकाला सांगता येणार नाही. म्हणूनच कथानकातील पात्रांच्या जय-पराजयाचा 'निर्णय' लेखक दिग्दर्शकाने प्रेक्षकांवर सोडला आहे.
स्पर्म डोनेट हा विषय जेव्हा आपल्यासमोर येतो तेव्हा आपल्याला आठवतो तो आयुष्यमान खुराणा विकी डोनर सिनेमा. वेगळ्याच विषयावर विकी डोनर हा चित्रपटात करण्यात आला होता. विकी डोनरसारखा नाही मात्र स्पर्म डोनेट याच विषयावर 'एक निर्णय स्वत:चा स्वत:साठी' या सिनेमातून भाष्य करण्यात आले आहे. म्हणजेच विकी डोनर मध्ये जे पाहिलं तेच पाहायला मिळेल असा विचार करण्याची गरज नाही.. थोड्या वेगळ्या रुपात ह्या चित्रपटाच कथानक मांडलं गेलेलं आहे. आपण आयुष्यात अनेकवेळा निर्णय घेतो मात्र कितीवेळा त्या निर्णयावर ठाम राहतो किंवा त्यातील किती निर्णय आपण स्वत:साठी घेतो ? हे या सिनेमातून आधोरेखित करण्यात आले आहे.
चित्रपटाची कथा-
ही गोष्ट आहे ईशान (सुबोध भावे), मुक्ता (मधुरा वेलणकर) आणि मानसी (कुंजिका काळविंट) यांच्यातील द्वंद्वाची. ईशान आणि मुक्ता हे पेशाने डॉक्टर आहेत. मुक्ता फिजिओथेरपिस्ट आहे. पडद्यावर सिनेमाच्या कथानकाची सुरुवात होते ती मानसी आणि ईशानच्या लग्न समारंभाने. मानसी आणि ईशानमध्ये वयाचे बरेच अंतर असल्यामुळे या लग्नामध्ये नक्कीच काहीतरी कारण, दडलंय याची चाहूल मनाला लागते. सिनेमाच्या पहिल्या पाच मिनिटांमध्येच गाणे सुरु होते आणि सिनेमाचा वेग तात्पुरता वाढतो. गाण्याच्या माध्यमातून मुख्य कथानकाचा किंबहुना पुढे घडणाऱ्या घटनांसाठी पूरक माहोल तयार केला आहे. ईशान आणि मानसीचा आनंदी संसार सुरु असतो. मानसीला दिवस जातात. मानसीला आई होण्याची चाहुल लागते मात्र हा आनंद खूप काळ टिकत नाही. काही दिवसांतच मानसीचा गर्भपात होतो परंतु, काही वैद्यकीय कारणांमुळे 'मानसी कधी आई होऊ शकत नाही.' ही बाब ईशान आणि त्याच्या कुटुंबीयांमध्ये कळते. मानसी पूर्णपणे खचते. परंतु या सगळ्यातून बाहेर पडून ती सत्यपरिस्थिती स्वीकारून पुन्हा कामाला लागते. दुसरीकडे डॉ. मुक्ता आपल्या वैद्यकीय पेशात यशाचे उच्चांक गाठत असते. हृदयरोगतज्ज्ञ असलेली डॉ. मुक्ता आपल्या आई-वडिलांसोबत राहत असते. परंतु तिच्या कामाच्या लॅपटॉपवर ईशानचा फोटो असतो. घरातल्यांनी लग्नाचा विषय काढताच 'ईशान शिवाय मी दुसऱ्या कोणाचा नवरा म्हणून विचार करू शकत नाही...' असे उत्तर ती आई-वडिलांना देत असते. यावेळी दिग्दर्शकाने सिनेमाच्या सुरुवातीला घातलेली काही कोडी सुटायला सुरुवात होते. डॉ. ईशानच्या भूतकाळात नक्कीच मुक्ता असणार असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. दरम्यान मुक्ताच्या आई-वडिलांचे विमान अपघातात निधन होते. ह्या दुःखातून मुक्ता सावरू शकत नसते. एकटी पडलेली मुक्ता आता ईशानकडे धाव घेते. पटकथेच्या या निर्णायक वळणावर मुक्ता ईशानकडे मुलाची मागणी करते. आपल्या आयुष्यात आलेला एकटेपणा दूर करण्यासाठी मुक्ता ईशानला स्पर्म डोनेट करण्याची मागणी करते. आता त्यामागचं नेमकं कारण काय? हा निर्णय घेण्यापर्यंत मुक्ता का उद्युक्त होते? ईशान आणि मुक्ताच्या भूतकाळात काय असते? ईशानची पत्नी मानसीचे काय होते? ईशान मुक्ताला मूल देण्यासाठी तयार होतो का? मुक्ताच्या भूतकाळातील कोणत्या निर्णयामुळे वर्तमानात ही परिस्थितीत उदभवली आहे? हे जाणून घेण्यासाठी सिनेमा पाहायला हवा. पूर्वार्धात सिनेमाची प्रेक्षकांवरील पकड सुटलेली असताना, उत्तरार्धात मात्र प्रेक्षक पुन्हा सिनेमात गुंततो.
श्रीरंग देशमुख यांनी लेखन, निर्मिती व दिग्दर्शन अशी तिहेरी जबाबादारी संभाळली आहे. अभिनेते श्रीरंग देशमुख यांचा दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न चांगला आहे. तसेच त्यांनी सिनेमात ईशानच्या मोठ्या भावाची भूमिका साकारली आहे. विषय अतिशय उत्तम आहे. आपली गोष्ट अगदी उत्तमरित्या प्रेक्षकांसमोर मांडण्यात ते यशस्वी ठरले आहेत.आजच्या तरुण पिढीचा प्रतिनिधीत्व करणारा सिनेमा. अभिनेते श्रीरंग देशमुख यांचा दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न म्हणून चांगला आहे. काही ठिकाणी त्यांचं पहिलंच दिग्दर्शन आहे हे जाणवतेही. परंतु आपली गोष्ट अगदी उत्तमरित्या प्रेक्षकांसमोर मांडण्यात ते यशस्वी ठरले आहेत. सुबोध भावे याने आपल्या नावाला साजेसा सहज सुंदर अभिनय यावेळी देखील केला आहे. सिनेविश्वातील नवा चेहरा असलेली कुंजिका काळविंट हिने आपल्या पदार्पणाच्या सिनेमात छान काम केले आहे. आपल्या वाट्याला आलेली भूमिका तिने चांगलीच केली आहे. अभिनयाबाबत बोलायाचे झाले तर सुबोध भावेने आपली भूमिका चोख बजावली आहे तर मधुरा वेलणकर- साटम या सिनेमातून पाच वर्षांनी कमबॅक करत असल्याचे कुठेच जाणवत नाही. त्यामुळे विशेष कौतुक करायला हवे ते; अभिनेत्री मधुरा वेलणकर हिचे. बऱ्याच वर्षांनंतर सिनेमातून काम करताना 'नट' म्हणून तिने स्वतःला पुन्हा सिद्ध केले आहे. विक्रम गोखले, मंगला केंकरे, सुहास जोशी, श्रीरंग देशमुख, शरद पोंक्षे आदी सर्व कलाकारांची कामे चांगली झाली आहेत. सिनेमातील सर्व गाणी आणि त्यासाठीच छायांकन उत्तम झाले आहे. एकदंर 'एक निर्णय' हा सिनेमा एकदा तरी पाहण्याचा निर्णय प्रेक्षक नक्कीच घेऊ शकतात. वेगळा विषय ह्या चित्रपटात पाहायला मिळतो.
अभिनेते: सुबोध भावे,मधुरा वेलणकर- साटम, कुंजिका काळविंट,विक्रम गोखले,सुहास जोशी, शरद पोंक्षे सीमा देशमुख आणि श्रीरंग देशमुख
निर्मिती : श्रीरंग देशमुख
दिग्दर्शक: श्रीरंग देशमुख