२०. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्ज .. २
* राजस्थानातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती-
१. जयपूर-पिंक सिटी
राजस्थानची राजधानी असलेले जयपूर शहर म्हणजे गुलाबी रंगांच्या विविध छटा घेऊन नटलेले शहर आहे. म्हणूनच जयपूर ला पिंक सिटी म्हणून ओळखले जाते. जयपूर मध्ये पाय ठेवताच कोणत्यातरी भव्य पुस्तकातून सगळ्या गोष्टी बाहेर पडल्या आहेत अस वाटल्या शिवाय राहणार नाही. जयपूरला 'गुलाबी शहर' म्हणुनही ओळखले जाते. जयपूर पूर्वीच्या संस्थानाचेही राजधानीचे ठिकाण होते. या शहराची स्थापना इ.स. १७२८ मध्ये दुसऱ्या महाराजा जयसिंह यांनी केली. जयपूर शहर येथील महाल आणि जुन्या घरांसाठी वापरलेल्या गुलाबी दगडांसाठी प्रसिद्ध आहे. जयपूरची आधुनिक शहरी योजना केलेल्या व्यवस्थित शहरांमध्ये गणणा होते. अप्रतिम राजमहाल, पर्वतमाथ्यांवर असलेले मजबूत किल्ले, शहराच्या भोवती असलेला भिंतीचा वेढा असलेल्या ह्या शहरात परंपरा आणि आधुनिकतेचा संगम पाहायला मिळतो. आकर्षक बागा, उद्याने, रंगीबेरंगी बाजार, राजस्थानी हातमाग कपडे, दागिने आणि हेरिटेज हॉटेल्स पर्यटकांच्या नजरा खिळवून ठेवतात. राज्यांच्या महालांचे आता हेरीटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आल आहे. जयपूर हे रंगांनी सजलेलं शहर आहे. आणि इथे आल्यावर सुट्टीचा वेगळाच अनुभव पर्यटकांना मिळतो. आणि आठवणीत राहील अशी ही जागा आहे. जयपूर मध्ये काय पाहाल-
* आमेर राजवाडा- शहरापासून 11 किमी अंतरावरचा आमेर (अंबर) किल्ला या शहराचे सर्वात मोठे आकर्षण आहे ज्यामध्ये अत्यंत सुशोभित दरवाजे, सूक्ष्म जाळींचे कोरीव काम आणि मनमोहक शीश महालाचा समावेश आहे. राजा मानसिग, मिर्झा राजा जयसिंग आणि सवाई जयसिंग अशा तीन पिढ्यांनी दोन शतके हे बांधकाम केले असे सांगितले जाते. हा राजवाडा पूर्ण फिरण्यासाठी २-३ तास काढून ठेवा. मावठा सरोवरातील शांत पाणी आणि राजवाडा पाहण्यासाठी कठीण चढाचा रस्ता चढावा लागतो. इथे हत्तीवरूनही जाता येते. हे पर्यटकांची आवडते आकर्षण आहे. इथेच राजघराण्याची कुलदेवतेची प्राणप्रतिष्ठा करून तिची स्थापना करण्यात आली आहे आणि हजारो भाविक या देवीच्या दर्शनाला येत असतात. इथे पहाण्यासारखे म्हणजे उद्यान, राजवाडा, जडाव काम महाराणी छत्री, राजांची स्मारके, जलमहाल आहे. त्यामुळे इथे येण्यासाठी पर्यटक नेहमीच उत्सुक असतात.
* हवामहाल- १७९९ साली उभारला गेलेला जुन्या शहराच्या मुख्य रस्त्यावरच असलेला विंड पॅलेस अथवा हवामहाल हे येथील आणखी एक आकर्षण. इथले बांधकाम विशेष प्रसिद्ध आहे. पाच मजली ही गुलाबी रंगाच्या दगडात बांधली गेलेली वास्तू जाळीच्या खिडक्यांनी अधिक सुंदर बनली आहे. तिथून थंड हवा खेळत राहते. अस सांगितलं जाते की, राजघराण्यातील स्त्रियांना शहराचे दर्शन व्हावे, मिरवणुका पाहता याव्यात म्हणून ही वास्तू बांधली गेली. हवामहाल राजपूत आर्किटेक्चरल स्टाईल मध्ये बांधले गेले आहे. इथे मनमोहक कारंजे पर्यटकांना वेलकम करते. बिन मनोर्याचे कृष्ण मंदिर म्हणजे गोविंद देवजी मंदिर ही रजपूतांची कुलदेवता आहे. अल्बर्ट हॉल येथील संग्रहालय आणि दुष्काळात लोकांना रोजगार मिळावा म्हणून सवाई रामसिंग दुसरा यांनी १८६८ साली बांधलेली बाग अतिशय सुंदर आहे. हॉलमध्ये मूर्ती, पेंटिग्ज, सजावटीच्या वस्तू, इजिप्तच्या ममी, पर्शियन गालिचे पाहायला मिळतात व खुल्या नाट्यगृहात कार्यक्रम होतात. इथे खरेदी सुद्धा करण्यासाठी बरेच पर्याय आहेत. राजस्थानी कपडे, फर्निचर, अॅन्टिक्स ची खरेदी इथे बऱ्याच प्रमाणात केली जाते. इथे स्ट्रीट फूड सुद्धा मिळते. इथले सामोसा, भेळपुरी, पाणीपुरी, कचोरी प्रसिद्ध आहेत.
* सिटी पॅलेस- भव्य सिटी पॅलेस हे जयपूर च्या प्रमुख आकर्षणांपैकी प्रमुख आहे. हा पॅलेस बघून डोळे त्याच्या भव्यपणानी अक्षरशः दिपून जातात. जुन्या शहराच्या मध्यभागी असलेला हा राजवाडा राजस्थानी आणि मुघल शैलीचा उत्तम नमुना आहे. इथली कलाकुसर खूप सुंदर आहे. पांढर्या संगमरवरी स्तंभावर असलेल्या कोरीव कमानी आहेत त्या सोनेरी रंगीत खड्यांच्या फुलांच्या नक्षीकामाने सजविलेल्या आहेत. ह्या राजवाड्याच नियोजन अतिशय उत्तमरित्या केलेले दिसून येते. इथे असलेला चंद्र महालाच रुपांतर आता म्युझियम मध्ये केले आहे. संग्रहालयात राजांचे पेहराव, मुघल आणि रजपूत राजांची शस्त्रास्त्रे, तलवारी, रत्नजडीत सुंदर म्यान, इत्यादी पाहायला मिळते. त्याचबरोबर, इथे सुंदर पेंटिग्ज, गालिचे, राजांच्या वापरातल्या वस्तू, आणि खगोलशास्त्रावरील अतिशय दुर्मिळ असे अरबी, पर्शियन, लॅटीन व संस्कृत भाषेतील ग्रंथ सुद्धा पाहायला मिळतात. राणा जयसिंग यांनी या शहरात उभारलेल्या पाच वेधशाळेंपैकी जंतरमंतर ही सर्वात मोठी दगडी वेधशाळा मानली जाते आणि तेथील रामयंत्र आकर्षक आहे. उंची मोजण्यासाठी या यंत्राचा उपयोग केला जात असे. इथे भेट दिल्यावर आपल्या इतिहासाबद्दल आणि शूर राज्यांबद्दल उत्सुकता अजूनच वाढेल.
* नाहरगढ किल्ला- आरवली पर्वत रांगेत हा विशाल किल्ला जयपूरचा गौरव मानला जातो. हा किल्ला जयपूर मध्ये आहे. हा किल्ला पाहून जयपूरच्या श्रीमंत इतिहासाची जाणीव होते. हा किल्या जयपूर ला मजबूत संरक्षण व्हाव ह्यासाठी सवाई राजा जयसिंह द्वितीय यांनी सन १७३४ मध्ये बांधला होता. नाहरगडावरून शहर पाहणे म्हणजे अतिशय सुंदर अनुभव. दिवसा किंवा रात्री कधीही इथून घेतलेलं शहरच दर्शन विलोभनीय असते. रात्री शहरातून हा किल्ला पाहिल्यास चमचमणारा नाहरगड किल्ला अजूनच सुंदर दिसतो. इथल मुख्य आकर्षण माधवेंद्र भवन आहे. अतिशय कोरीव आणि सुरेख अस हे भवन आहे. इथे राज्याच्या बायकांना राहण्यासाठी खोल्या बांधल्या गेल्या होत्या. इथल अजून आकर्षण म्हणजे नाहरगढ़ बायोलॉजिकल पार्क आहे. इथे वाघ, सिंह आणि तरस पाहायला मिळतात आणि नाहरगढ किल्ला नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असतो.
* अल्बर्ट हॉल म्युझियम- अल्बर्ट हॉल म्युझियम हे जयपूरच्या राम निवास गार्डन मध्ये आहे. हे म्युझियम सगळ्यात जुने म्युझियम आहे. ही भारत-अरबी स्टाईल मध्ये बनवलेली वास्तू आहे. वास्तुनियोजन सर स्विंटन जैकब ह्याचं आहे. अल्बर्ट हॉल देशातील एकमेव इमारत आहे जिथे बऱ्याच देशातील शैलींचा समावेश पाहायला मिळतो. त्यामुळे ही जागा एक वेगळीच जागा म्हणून ओळखली जाते. रात्री इथे अजूनच सुंदर दृश्य दिसते. रात्री ही इमारत पिवळ्या दिव्यांनी सजवली जाते आणि ह्या इमारतीच सौंदर्य अजूनच खुलून दिसते. गार्डन मध्ये रिलॅक्स करत अल्बर्ट हॉल पाहता येतो. इथे खाण्याचे पदार्थ सुद्धा विकले जातात. आईस क्रीम आणि चाट ची मजा घेत इथे लुटता येते. भारताचा इतिहास जाणून घेण्यासाठी ही एक अत्यंत सुंदर जागा आहे. ह्या संग्रहालयात जुनी चित्रे, हत्तीचे दात, किमती खडे, विविध मूर्ती, अॅन्टीक्स आणि अश्या बऱ्याच वस्तू पाहायला मिळतात. इथे पर्यटकांसाठी इजीप्शिअन ममी हे प्रमुख आकर्षण आहे. अशी ही वास्तू अत्यंत देखणी आहे आणि वेगळेच अनुभव देऊन जाणारी आहे.
* बिर्ला मंदिर- लक्ष्मी मंदिर किंवा बिर्ला मंदिर हे मंदिर १९८८ मध्ये बनवले आहे. संगमरवरा पासून बनवलेले हे मंदिर कलाकुसरीसाठी प्रसिद्ध आहे. हे डुगरी किल्ल्याच्या खाली आहे जे विष्णूचे मंदिर आहे. हे मंदिर जयपूर चे मुख्य आकर्षण मानले जाते. ह्या मंदिरात ३ गाभारे आहेत जे ३ रूपांचे प्रतिनिधित्व करतात. मुख्य गाभाऱ्यात लक्ष्मी-नारायणाची मूर्ती आहे जी एकाच खडकात बनवलेली आहे. ह्याचबरोबर इथे गणेशाची मूर्ती सुद्धा पाहायला मिळते. हे मंदिर अतिशय सुंदर आहे आणि मनाला शांती देणारे आहे. ह्या मंदिराच्या चारी बाजूला झाडी आहे आणि इथे मन प्रसन्न होते. उत्सवाच्या काळात इथे अलोट गर्दी असते.
जयपूर मध्ये बऱ्याच वेळा डेस्टिनेशन वेडिंग केले जाते शिवाय मालिकांची शुटींग सुद्धा होतात. जयपुर मध्ये तुमच्या बजेट नुसार हॉटेल्स उपलब्ध आहेत. अगदी अलिशान हॉटेल हवी असतील तर महालांचे रुपांतर हॉटेल मधे केलेली अलिशान हॉटेल्स आहेत. ताज रामबाग पॅलेस, सुजन राजमहाल पॅलेस, शहापूर हाऊस, रॉयल हेरीटेज हवेली, द ओबेरॉय राजविलास इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत. त्याशिवाय तुमच्या बजेट नुसार तुम्हला योग्य हॉटेल्स मिळण्याची सोय सुद्धा आहे.
अस ऐतिहासिक वारसा लाभलेलं राजस्थान मधील जयपूर हे ठिकाण पर्यटकांच्या नेहमीच आवडीच आहे.