चित्रकार
त्या बागेत भरलेल्या गर्दीवर अमर ने आपली नजर फिरवली .
सोबत असलेला पत्रकार त्याला म्हणाला ,”पाहिलेत साहेब कीती गर्दी उसळली आहे या तुमच्या पेंटिंग च्या प्रदर्शनाला ..आणि हो तुमची चित्रे तर एकसे एक आहेत हे मात्र निर्विवाद ..”
अमर हसला आणि म्हणाला ,” हो ते तर दिसतेच आहे म्हणा ..मलाही खुप आनंद वाटतो आहे ,माझ्या कलेला मिळालेली “दाद “पाहुन ..”
अमर एक अतिशय उत्तम चित्रकार होता .
पेंटिंग ची आवड त्याच्या घरातुन आली होती .त्याचे वडील ,आजोबा अतिशय चांगले चित्रकार होते ,पण आर्थिक चणचणी मुळे त्या काळी ते फार पुढे येऊ शकले नव्हते .अमर च्या बाबतीत मात्र घरातुन त्याला पुर्ण प्रोत्साहन पहिल्या पासुन मिळाल्या कारणाने लहान वयातच तो एक उत्तम चित्रकार म्हणुन नावाजला जाऊ लागला .नुकताच त्याने आपला एक स्वतःचा स्टुडिओ पण काढला होता .
सामाजिक विषयावर चित्रे काढणे ही अमर ची एक खास खुबी होती .
आजच्या प्रदर्शनात पण त्याने हुंडाबळी, स्त्री भृणहत्या ,पर्यावरण असमतोल ,
ड्रायविंग सेन्स ,लोकसंख्या पायबंद ,अशा प्रकारची अनेक चित्रे ,वेगवेगळ्या नेत्यांची पोट्रेट, निसर्ग चित्रे ,काही न्यूड फोटोग्राफी अशी अनेक चित्रे मांडली होती .सर्व लोक त्याचा वेवेगळ्या प्रकारे आस्वाद घेत होते .आणि नावाजत पण होते .अमर अतिशय आनंदी होता .दिवस कसा सरला समजलेच नाही .त्याच प्रदर्शनात त्याने उस्फुर्त काही चित्रे सुद्द्धा काढली .लहान मुलांना काही वेळ मार्गदर्शन पण केले. अमरचे आई वडील व घरचे लोक पण कृतकृत्य झाले हे सारे पाहुन.
उद्या या विषयी सर्व वर्तमानपत्रात मोठी बातमी येणार होती .
पण अमर ला काय माहिती त्याच्या आयुष्यात उद्या काय वाढुन ठेवले होते .
दुसर्या दिवशी सर्व वर्तमानपत्रांचा परामर्श वाचुन अमर अत्यंत खुशीत स्टुडीओ कडे रवाना झाला .स्टुडीओ संपत ने ,त्याच्या नोकराने उघडुन नेहेमीप्रमाणे साफसूफ करून ठेवला होता ...पण हे काय बाहेर तर बरीच गर्दी जमली होती .
अमर आत जाऊन खुर्चीत बसताच बरीच झुंड आत शिरली ..
त्यांचा रोख एकंदर ठीक वाटत नव्हता ..नक्की काय झाले होते अमरला समजायला मार्ग नव्हता .तरी पण त्यांच्या कडे हसुन पहात अमर म्हणाला ,
“बोला काय काम आहे माझ्याकडे ?”
एकजण पुढे आला आणि म्हणाला ..
“काय राव ब्रश हातात मिळाला म्हणुन काय पण चित्रे काढता काय ?
“म्हणजे कशाबद्दल बोलताय तुम्ही ..?मला नाही समजले ..”अमर म्हणाला
मग आणखी एक दोघे पुढे आले ,” काय समाज सुधारायचा ठेका दिलाय काय तुम्हाला ?कोण ब्रम्हदेव समजता का स्वत:ला ?
आणखी एक पुढे आला आणि म्हणाला ,आमी गाडी कशी चालवायची आता तुमी ठरीवणार का ?”
आम्ही किती मुलांना जन्म द्यायचा हा आमचा प्रश्न हाय तुमी कोण ते ठरवणार ?
“अनि नग असेल आमाला मुलगी तुमास्नी काय करायचं हाय “
लई शान समजता व्हय सोत्ताला ?”
असे करत एक एक पुढे येऊन अद्वातद्वा बोलत राहिले ..
आता अमरच्या लक्षात आले हे सर्व त्याच्या सामाजिक चित्रा विषयी चालले होते
बोलणारा घोळका खुप मोठा होता ..आणि आणखीन अनेक लोक त्यात मिसळून बडबड करीत होते .
अत्यंत खालच्या वर्गातील ती माणसे ,त्यांचे अर्वाच्य बोलणे आणि शिवीगाळ करणे हे पाहिल्यावर अमरला हे समजुन चुकले की यांच्या पुढे जास्त बोलण्यात अर्थ नव्हता त्याची भूमिका समजून घेणारी ती माणसे नव्हतीच ..त्यातली काही तर फुल पिऊन आली होती सकाळीच ..
अमर शांतपणे म्हणाला आता मला काही बोलु द्याल का ?
संपत हलकेच त्याच्या कानात म्हणाला ‘दादा यांच्या पुढ काहीही बोलू नका ..”
“तुमच आमाला काय बी ऐकायचं न्हाय ..गपगुमान सुदरायचं बगा ..”
एक जण पुढे येऊन जरब देत बोलला ..
“हे बघा चित्रे काढणे हा माझा व्यवसाय आहे आणि ती मी काढणारच .ती कशी काढायची आणि काय काढायची हे मला सांगायची गरज नाही “अमर बोलला .
“ह्ये बग काय त्ये अमी सांगितल हाय ..अजून पण ऐकायचं नसल तर परिणामाला तयार रहा ..”चला रे सगळी ..असे म्हणून झुंड इकडच्या तिकडच्या खुर्च्या पाडत निघून गेली .
“संपत जा बाबा चहा सांगुन ये आपल्याला ..दिवस असा उजाडला आहे .
संपत बाहेर निघून जाताच अमरने खुर्चीत टेकून डोळे मिटून घेतले ..
अजून दोन मिनिटे नाही झाली तोवर आणखीन एक घोळका आत आला .
एका विशिष्ट समाजाचे प्रतिनिधित्व करणारा तो घोळका येताच समोरच्य खुर्च्या
अडवून बसला त्यांचे “चमचे” त्यांच्या मागे उभे राहिले .
आता हे कशाला आले असतील ?असा विचार करीत असतानाच संपत चहा घेऊन आत आला
“या या ..चहा घेणार का ?” असे अमरने विचारताच ..
‘आमच्या नेत्याची वेडी वाकडी चित्र काढून आम्हाला चहा विचारताय “?
हे ऐकून अमर थक्क झाला ..”काय झालेय त्या चित्रात ?”त्याने विचारले
त्यांच्या चेहेर्यावर सात्विक भाव हवेत, शिवाय चित्रात हात जोडलेले हवे होते “
“पण ते जसे आहेत तसेच मी दाखवले आहेत आणि फक्त चेहेरा असल्याने हात वगैरे नाही दाखवता आले त्यात ...” अमर म्हणाला
“हे पहा आमचा नेता सन्माननीय आहे तुम्हाला त्यांचे चित्र बदलून परत निराळे काढावे लागेल .”एक धमकी वजा स्वर आला ..
त्या नेत्याचे कौतुक ऐकताच मनातल्या मनात अमरला हसु आले .
या तथाकथित नेत्याचा बद्फैलीपणा ,स्त्री लंपट पणा सगळीकडे सर्वश्रुत होता .
केवळ पैशाच्या जोरावर त्याने बरीच काळी कृत्ये लपवली होती .
“हे काढलेले चित्र तर काही बदलता नाही येणार आणि चित्रे काढायचे माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही “
हे ऐकताच सामोरचा समूह “लालेलाल” झाला ..
“ हे तुम्ही बरे करीत नाही ..बघून घेऊ आम्ही पण “
असे म्हणत समूह चालता झाला ..
एवढे होईपर्यंत चहा “गारढोण “झाला होता ..
दादा दुसरा चहा आणु का ?संपत म्हणाला ..
“नको आता घरीच जातो जेवायला तु बंद करून घे “
असे म्हणून अमर बाहेर पडला ..
घरी पोचल्यावर सर्वाना त्याने काय काय घडले ते सांगितले
वडील म्हणाले” तु कलाकार आहेस आणि कलाकार कुणाचा गुलाम नसतो “
तुझे स्वातंत्र्य तु जप “...
या सर्व प्रकाराने अमरचे डोके दुखू लागले .तशात घरी आल्यापासून सतत फोन चालू होते ..अभिनंदनाचे ,कौतुकाचे ,त्यामुळे थोडे बरे पण वाटत होते .
मध्येच एका मुख्याध्यापकाचा फोन आला .आधी थोडे कौतुक वगैरे झाल्यावर त्यांनी मुद्द्याला हात घातला .त्यांचे म्हणणे इतक्या चांगल्या चित्रकाराने न्यूड चित्रे काढणे चांगले नाही त्यामुळे समाज मनावर विपरीत परिणाम होतो वगैरे ..
अमरने त्यांना समजाऊन सांगितले की न्यूड पोट्रेट हे चित्रकलेचे अंग आहे आणि सर्व प्रकारची चित्र काढणे हे तर चित्रकाराचे कामच आहे .
त्यांना ते पटले नाही ..माझ्या सारख्या इतक्या बुजुर्ग माणसाचे तु ऐकत नाहीस तु खुपच उद्धट आहेस ...वगैरे बोलू लागले .
अमरने काहीही न बोलता फोन ठेऊन दिला .
जेवण करून अमरने एक छान झोप घेतली ..पण थोड्या बेचैनीत !!
उठल्यावर त्याने संपतला फोन करून सांगितले संध्याकाळी स्टुडीओ नको उघडू
सकाळ पासुन घडलेल्या प्रसंगांनी त्याला स्टुडीओत जायची इच्छा राहिली नव्हती
टीवी पाहत तो बसुन राहिला .
तेवढ्यात त्याचे काही परिचित काही शेजारी पाजारी त्याला भेटायला आले .
त्याला वाटले आता जरा मुड “फ्रेश” होईल आपला ..
मात्र गप्पांच्या ओघात त्याला समजले की त्याची निसर्ग चित्रे काही लोकांना खास नाही वाटली ..त्यांचे म्हणणे आपल्याकडील निसर्ग त्याच्या चित्रापेक्षा खुपच चांगला आहे .
त्याने सांगितले मी माझ्या नजरेतुन जो निसर्ग पाहिला तो मांडला आहे तो हुबेहूब दिसलाच पाहिजे हा आग्रह का ?
प्रदर्शनात त्याने जी उस्फुर्त चित्रे काढली त्यात काही माणसांना सामील व्हायचे होते पण अमरने त्यांना वेळ दिला नाही अशी काही लोकांची “तक्रार” होती .
अशा आणि यासारख्या अनेक चित्रविचित्र तक्रारी लोक मांडत होते .
अखेर एकदाचे सगळे त्यांच्या त्यांच्या घरी निघुन गेल्यावर अमरला “हायसे “
वाटले .आज दिवसभर तो खुप थकुन गेला होता .
त्याच्या मनात आले काय झाले आहे हे लोकांना ?
प्रत्येक गोष्ट मी म्हणतो तशीच झाली पाहिजे हा अट्टाहास का त्यांचा? प्रत्येकाची एक “अभिव्यक्ती” असते त्यावर घाला का घालत आहेत हे लोक ?
खुप “अस्वस्थ” झाला होता तो ...आणि अखेर तो दिवस सरला .
पण दुसर्या दिवशी त्याच्यापुढे वेगळेच संकट वाढून ठेवले होते .
सकाळीच त्याला संपतचा फोन आला दादा असाल तसे निघुन या स्टुडीओ वर दगड फेक झाली आहे .
हे ऐकताच ताबडतोब अमर तिथे पोचला ..
नव्या कोर्या स्टुडीओ ची पार वाट लावून टाकली होती समाजकंटकानी
दगड मारून खिडक्या फोडल्या होत्या ,कुलपाशी छेड्खानी केली होती
पाटी काढुन खाली फेकली होती .
नशीब कुलुप फोडता न आल्याने त्यांना आत शिरता आले नव्हते
आत जाऊन पाहिले असता त्याच्या चित्रांचा खजिना मात्र शाबूत होता
त्याला “हायसे “ वाटले
संपत म्हणाला “दादा आपण पोलीस तक्रार करू “
पण कोणाची आणि काय तक्रार करणार होता तो .?
.नको तो “ससेमिरा” पाठी लागला असता त्यामुळे गप्प बसने क्रमप्राप्त होते .
त्याचे मन अगदी विषण्ण झाले एवढे खरे ....!
दिवस सरत होते असेच ..कामे चालुच होती .
पेंटिंग च्या ओर्डेर होत्याच ..शिवाय जहांगीर मध्ये एक मोठे प्रदर्शन होते त्यात चित्रे मांडायची तयारी चालु होती .
अचानक शहराबाहेर झोपडपट्टीत दंगली उसळल्या .दोन जातीमधील भांडणे विकोपाला गेली आणि बरीच जाळपोळ झाली .
दंग्याला “चेहेरा” नसतो फक्त जाईल तिथे तो नुकसान करीत सुटतो इतकेच .
सुक्या सोबत ओले पण जळते या म्हणीनुसार गरीब निरपराध लोकांचे भरपुर नुकसान झाले काही लोक तर रस्त्यावर आले .
सरकारी मदतीची मागणी झाली ..नेते लोक येऊन आश्वासन देऊन गेले .
एक दोन दिवस झाले पण परिस्थितीत काही फरक पडेना .
अमरचे “संवेदनाक्षम” मन जागृत होते .
तो तिकडे घरी तयार केलेलं अन्न घेऊन जात होता आणि लोकांना पुरवत होता .त्याच्या सारखे बरेच लोक होते परोपकारी ते पण बरीच मदत करीत होते .
पण इतक्याने काय होणार ?
त्यांचे संसार उध्वस्त झाले होते ते उभे करायला हवे होते .
मग त्याने लगबगीने एक निर्णय घेतला ..
दोन दिवसातच एक ट्रक स्टुडीओच्या दारासमोर उभा राहिला .
तयार होती ती सर्व चित्रे अमरने चांगल्या दरात विकून टाकली .
आलेल्या पैशातून झोपद्पट्टी पुनर्वसन काम सुरु झाले .
या कामात त्याला अजुन काही “दानशूर” व्यक्तीची पण मदत झाली .
लोकांची घरे तयार होऊन त्यांना संसार उपयोगी साहित्य ,थोडे धान्य धुन्य
पुरवले गेले आणि एकदाचे लोक परत प्रस्थापित झाले
या कामात जवळ जवळ तीन आठवडे गेले .
सर्व गरिबांनी अमरला खुप “दुवा “दिला .
पण अमरला यात काही विशेष वाटत नव्हते हे तर “माणुस” म्हणून त्याचे कर्तव्य त्याने केले अशीच त्याची भावना होती .
शहरात पण त्याचे खुप कौतुक झाले ,आईवडीलाना पण अभिमान वाटला .
दोनच दिवसांनी टीवी चे वार्ताहर त्याची मुलाखत घ्यायला आले .
मुलाखतीत त्यांनी अमरला प्रश्न विचारला .
तुमच्या स्टुडीओची मागे काही लोकांनी “नासधूस “ केली होती ते लोक यातलेच होते ...
तरी पण तुम्ही आपली चित्रे विकून या दंग्यात पोळलेल्या लोकांना मदत केलीत हे कसे काय ?
अमर म्हणाला ,” या समाजातुन मी वर आलो याचे मीही काही “देणे” लागतो .
हा समाज माझा अभिमान आहे आणि तो जपायसाठी मी माझी चित्रे विकली
चित्रे मी परत काढू शकतो पण माझ्या स्वाभिमानाला तडा जाऊ देणे मला रुचले नसते .