इश्क – (भाग २६) Aniket Samudra द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

इश्क – (भाग २६)

“रोहन.. मी जरा रतीच्या घरी चाललो आहे..”, टेबलावरुन कारची किल्ली उचलत कबीर म्हणाला
“घरी? का रे? काय झालं?”, रोहन
“अरे दोन दिवस झाले.. तिचा फोन बंद येतोय, व्हॉट्स-अ‍ॅपपण लास्ट-सीन दिन दिवसांपूर्वीचेच आहे..”, कबीर
“कबीर..”, कबीरला थांबवत रोहन म्हणाला.. “मला वाटतं ती अपसेट असेल.. त्या दिवशी तु तिला एकटीला सोडुन राधाच्या मागे निघुन गेलास…”
“अरे पण मी आलो ना परत.. आलो तेंव्हा निघुन गेली होती ती.. मी काय करणार मग?”, रोहनचं वाक्य तोडत कबीर म्हणाला..
“हम्म.. पण मला वाटतं..”

पण कबीर त्याच्या बोलण्याची वाट न बघता निघुन गेला होता.


रतीच्या घराचं दार रतीच्या आईनेच उघडलं..

“काकु.. रती आहे घरी?”, कबीर
“नाहीए..”
“अं.. कुठे गेलीए.. तिचा फोन पण बंद येतोय दोन दिवसांपासून..”, कबीर
“विपश्यनेला…”
“विपश्यनेला?? कधी येईल..”, अचंबीत होत कबीर म्हणाला…
“दहा दिवसांनी येईल..”
“काय संन्यास वगैरे घेतीय की काय?”, हसत हसत कबीर म्हणाला खरा, पण रतीच्या आईच्या चेहर्‍यावरचे गंभीर भाव बघुन तो गप्प बसला..
“पण मग फोन?”
“फोन बंदच असतो दहा दिवस… ती आली की सांगेन तु येऊन गेलास ते..”, जवळ जवळ दार लावतच तिची आई म्हणाली..
“बरं.. ठिके.. येतो काकु..”.. पण त्याचे शेवटचे शब्द बंद दारावर आपटुन परत आले..

कबीरने कार चालु केली आणि रोहनला फोन लावला..
“बोल रे.. काय झालं? भेटली रती?”, रोहन
“नाही रे.. च्यायला ती दहा दिवस कुठे तरी विपश्यनेला गेली आहे..”, कबीर
“असं अचानक? काही बोलली पण नाही..”
“हो ना.. फोन पण बंद असेल म्हणे दहा दिवस…आणि तिची आई.. तिची आई तर माझ्याशी असं बोलत होती जणू मी कोणी दारावर आलेला सेल्समन आहे.. आतमध्ये सुध्दा नाही घेतलं.. काय झालं असेल रे?”

कबीर बोलत होता तेंव्हा त्याच्या फोनवर दुसरा फोन येत होता…

“रोहन एक मिनीटं हं.. कुणाचा तरी फोन येतोय…”, कबीरने रोहनला होल्डवर ठेवुन मोबाईल-स्क्रिनवर कुणाचा फोन आहे ते बघीतला.
दुसरा फोन राधाचा होता..

“रोहन.. मी तुला नंतर फोन करतो.. राधाचा फोन आहे..” असं म्हणुन कबीरने लगेच रोहनचा फोन कट केला आणि राधाचा फोन घेतला
पलीकडुन राधाचा मुसमुसण्याचा आवाज येत होता..

“हॅल्लो कबीर.. दोन मिनीटं वेळ आहे का?”, पलीकडुन राधाचा हलका आवाज येत होता..
“राधा? काय झालं? आवाज का तुझा असा येतोय??”, कबीर
“अनुरागने डिव्होर्स पेपर्स पाठवलेत..”, राधा मुसमुसत म्हणाली..
“अरे व्वा.. मस्तच की.. हेच तर तुला हवं होतं ना? मग रडायला काय झालं?”, कबीर
“हो रे.. पण त्याने डिव्होर्सची कारण फारच घाणेरडी दिली आहेत.. म्हणे मी तिकडे गोकर्णला…”, राधाने बोलता बोलता पॉज घेतला..
“हे बघ राधा… सोड ना.. डिव्होर्स हा नेहमीच ब्लेम-गेम असतो.. लिव्ह-इट…तुला जे पाहीजे ते मिळालंय ना?.. सो टेक इट अ‍ॅन्ड मुव्ह ऑन..”, कबीर
“हम्म.. फ़िलींग सो लोनली यार…इफ़ पॉसीबल, घरी येऊ शकतोस का? जस्ट कपल ऑफ़ ड्रिंक्स आणि मग गेलास तरी चालेल..”, राधा
“शुअर, व्हाय नॉट.. येतोच अर्ध्या तासात..”, असं म्हणुन कबीरने फोन ठेवुन दिला..

गाडी गेअर मध्ये टाकुन मुख्य रस्त्यावर येतो नं येतो तोच रोहनचा पुन्हा फोन आला. कबीरने फोन ब्ल्यु-टूथला टाकला आणि गाडीला गती दिली..

“काय म्हणत होती राधा?”, रोहन
“अरे गोची झालीए.. मी तिच्याकडेच चाललोय..”, रोहन
“का? काय झालं?”
“अरे त्या अनुरागने डिव्होर्सचे पेपर्स पाठवलेत तिला आणि कारणं काही भलती सलती दिलीत म्हणुन रडत होती बिचारी…”
“बिचारी?”
“हो मग.. एकटीच ए ती घरी.. मी येतो पट्कन जाऊन..”
“हे बघ कबीर.. माझं ऐकशील तर नको जाऊस आत्ता तिच्याकडे..”, रोहन समजावणीच्या सुरात म्हणाला.
“का?”
“अरे का काय? एकतर ती एकटी आहे घरी.. बिचारी.. त्यात दुःखी.. त्यात तु पण रती भेटली नाही म्हणुन अपसेट आहेस..”, रोहन
“तुला म्हणायचंय काय नक्की..”
“मला काय म्हणायचंय हे तुला नक्की कळतंय कबीर.. भावनेच्या भरात काही तरी होऊन बसेल.. तिला फोन करुन सांग नंतर येतो म्हणुन..”
“अरे काय? लहान ए का मी.. चल नंतर बोलतो तुझ्याशी..”, असं म्हणुन कबीरने फोन बंद केला..

रोहनने चिडुन दोन क्षण फोनकडे बघीतले आणि मग रतीचा नंबर फिरवला, परंतु जसं कबीर म्हणाला होता त्याप्रमाणे फोन स्विच्ड-ऑफ़ येत होता. पुन्हा एकदा प्रयत्न करुन त्याने फोन बंद केला.

त्याला काय करावं सुचत नव्हतं.. मग त्याने मोनिकाला फोन लावला..

“बोल शोनु.. काय करतोएस..”, मोनिका नेहमीच्याच मिस्कील टोन मध्ये म्हणाली..
“अरे सोड ते शोनु बिनु.. त्या कबीरला आधी फोन लाव आणि थांबव त्याला..”, रोहन
“का? काय झालं?”, मोनिका

रोहनने जेव्हढं भर-भर सांगता येईल तेव्हढं सांगीतलं आणि मग म्हणाला.. “मोना, कबीरला तु ओळखतेस आणि मी ही.. त्याला राधा अजुनही आवडते.. आणि कदाचीत राधाला पण तो.. आत्ता दोघंही एकटे आहेत.. अपसेट आहेत.. मला वाटतं..त्या दोघांनी असं घरी एकटं भेटणं योग्य नाही.. आय मीन.. मला तरी वाटतंय की कबीर आणि रती एकत्र यावेत.. असं असताना…”

“हम्म.. आलं लक्षात.. तु म्हणतोस ते बरोबर आहे.. मी बघते बोलुन कबीरशी..”, असं म्हणुन मोनिकाने फोन बंद केला आणि कबीरचा नंबर फिरवला..


“कबीर.. कुठे आहेस?”, मोनिका
“अं.. बाहेर आहे जरा…”
“बाहेर? बाहेर म्हणजे कुठे?”
“ड्राईव्ह करतोय.. बोल ना..”
“कामात आहेस का?”
“हं.. मी राधाकडे चाललोय.. नंतर बोलुयात का?”
“अं.. नको..ऐक ना.. जरा महत्वाचं बोलायचं होतं…”
“…”
“कबीर.. ऐकतोएस.. का?”
“मोनिका हे बघ.. आपण जरा नंतर बोलुयात ओके..?” असं म्हणुन कबीरने फोन बंद केला आणि स्विच्ड ऑफ़ करुन टाकला.


कबीरचा फोन बंद बघुन मोनिकाने रोहनला फोन केला..

“रोहन्या.. अरे तो ऐकतचं नाहीए, बंद करुन टाकलाय फोन त्याने..”
“च्यायला ह्या कबीरच्या.. बरं तु कुठे आहेस आत्ता?”
“मी स्टुडीओमध्येच आहे..”
“शूट चालु ए का?”
“नाही.. जस्ट एडीटींग करतेय पिक्सचं..”
“बरं ऐक.. मी निघतोय इथनं.. तुझ्या इथे येतो.. तुला पिक-अप करतो आणि आपण थेट राधाच्या घरी जाऊ.. ओके?”
“हम्म.. ओके.. मी स्टूडीओ लॉक करुन खाली थांबते..”
“ओके.. बाय देन..”
“बाय…”

रोहन ऑफ़ीस बंद करुन मोनिकाकडे जायला निघाला तेंव्हा कबीर राधाच्या बिल्डींगच्या पार्कींगमध्ये गाडी लावत होता.


राधाने कबीरसाठी दार उघडले तेंव्हा ती अगदीच अवतारात होती. केस मोकळेच आणि अस्ताव्यस्त होते, डोळे आणि नाकाचा शेंडा रडुन लाल झालेला दिसत होता. हातामध्ये दोन-तिन टिश्यु पेपर्स चुरगळलेले धरलेले होते.

“यु ओके?”, कबीरने आत येत विचारले
“हम्म… सॉरी.. घरात जरा पसारा आहे..” सोफ़्यावरचे कपडे, पुस्तकं उचलत राधा म्हणाली..
“इट्स ओके.. बोल काय झालं..?”

राधाने काही न बोलता चॉकलेटी इन्व्हलोपमधील डिव्होर्सची नोटीस कबीरच्या हातात दिली.

कबीर सोफ़्यावर बसला आणि त्याने सुरुवातीपासुन शेवटापर्यंत ती नोटीस वाचुन काढली..

“खूप सॅड आहे हे राधा.. अनुरागसारख्या रिस्पॉन्सीबल आणि रिस्पेक्टेड माणसाकडुन तरी हे अपेक्षीत नव्हतं..”, नोटीस वाचुन झाल्यावर कबीर म्हणाला..
“बघ की..डिव्होर्ससाठी तर आम्ही दोघंही तयार होतो.. मग असे खोटे, खालच्या पातळीला जाऊन आरोप कश्याला करायचे?”, राधाचे पुन्हा डोळे भरुन आले होते.. “आणि सॅड पार्ट म्हणजे ही नोटीस त्याने माझ्या घरच्या पत्यावर पाठवली होती.. हे.. हे सगळं वाचुन माझ्या आई-वडीलांना काय वाटलं असेल कबीर??”
“हे बघ राधा.. तु आधी शांत हो.. मी पेग बनवतो.. काय बनवु?”, कबीर सोफ़्यावरुन उठत म्हणाला..
“अ‍ॅन्टीक्वेटी ९०.. ऑन द रॉक्स..”, राधा म्हणाली..

कबीरने कपाटातुन व्हिस्कीची बॉटल काढली आणि दोघांसाठी दोन पेग बनवले..

“अनुराग आणि मी दोन वर्ष एकत्र होतो कबीर.. इतकं तर त्याला कळायला हवं ना की मी इतक्या खालच्या पातळीला जाईन का? तिकडे गोकर्णमध्ये मी काय त्या हिप्पी लोकांबरोबर झोपायला रहात होते का? एम आय अ बिच कबीर??”, राधा मुसमुसत म्हणाली..
“राधा.. मी म्हणालो ना तुला.. इट्स ऑल ए ब्लेम गेम.. त्याला फ़क्त हे सिध्द करायचंय की तो सही आहे.. तु चुक आणि म्हणुन हा डीव्होर्स होतोय..”, कबीर राधाला समजावणीच्या सुरात म्हणाला..

राधाने आपला पेग संपवला आणि दुसरा बनवला..

“मान्य आहे कबीर.. पण हे सगळं मी मुकपणे मान्य करु का? तेथे सेशन्स-कोर्टात डिव्होर्सच्या आधी माझे आई-बाब पण बरोबर असणार.. त्यांच्यासमोर मी म्हणु की हे खरं आहे? आणि जर का हे अमान्य केलं.. तर त्या केसला पुन्हा फाटे फुटतील.. खर्‍या-खोट्याची शहानीशा करण्यासाठी वकील आपल्या बाह्या सरसावुन पुढे सरकतील.. आणि न जाणो पुढचे कित्तेक महीने हेच चालु राहील…”

राधाने आपला दुसरा पेगही एव्हाना संपवला आणि तिसरा भरला..

“राधा.. सांभाळुन.. डोन्ट ओव्हरड्रिंक ओके?”, कबीर

पण राधाचं त्याच्याकडे लक्षचं नव्हतं.. ती स्वतःशीच जणु बोलत होती.. तिने तिसरा पेगही बॉटम्स-अप केला. व्हिस्कीचा तो गरम पेग तिच्या घश्याला जाळत गेला. तिच्या कपाळावर आठ्यांच एक जाळं पसरलं.. तिने ग्लास टेबलावर आपटला आणि चेहर्‍यावर कोसळणारे केस सांभाळत ती खुर्चीकडे सरकली आणि तिचा तोल गेला.

“राधा.. सांभाळ..”, कबीर पट्कन सोफ्यातुन उठला, त्याने राधाला खांद्याला धरुन सोफ़्यावर बसवले..

राधाने दुःखाने आपले डोळे बंद केले होते..

“कबीर.. खरंच आयुष्याचे निर्णय घेताना मी चुकलीए का रे?”
“नाही राधा.. आपण आपल्या आयुष्याचे मालक असतो ना? मग आपले निर्णय आपण सार्थ ठरवायचे असतात.. ते चुकले तर मार्ग बदलायचा, पण जे आपल्याला हवंय ते साध्य करुन घ्यायचंच..”
“कित्ती छान बोलतोस तु कबीर.. हम्म.. लेखक आहेस नं म्हणुन असं बोलु शकतोस.. पण माझं काय? माझे विचार म्हणजे फ़क्त कचराच असतो सगळा..”

राधा सोफ़्यावर थोडीशी कलंडुन कबीरच्या खांद्याला टेकुन बसली..
कबीरच्या ह्र्दयाची धडधड कमलीची वाढली होती..

“मी नेहमीच फ़क्त आणि फ़क्त माझाच विचार केला कबिर.. मला काय हवंय, इतरांसाठी कधीच वागले नाही.. पण आता वाटतंय.. ह्यामुळेच मी आज एकटी आहे.. मन मोकळं करावं..कुणाचा सल्ला घ्यावा असं कोणीच नाही रे माझ्या आयुष्यात.. असं वाटतंय कंटाळा आलाय ह्या एकटेपणाचा.. आज तिशीत असतानाच ही परीस्थीती.. पुढे जाऊन तर काय होईल मग?.. असं वाटतं.. असं वाटतं की कोणी तरी हवं सोबतीला..”

तिने अचानक डोळे उघडुन कबीरकडे बघीतलं…

“आठवतंय.. त्या दिवशी बिचवर मी तुला काय म्हणाले होते?”
“काय?”
“आय.. लव्ह.. यु.. कबीर.. असंच म्हणाले होते ना…”
“हम्म..”
“आय स्टील लव्ह यु कबीर.. आय वॉंट यु इन माय लाईफ़… नॉट जस्ट फ़ॉर सम टाईम.. बट फ़ॉर लाईफ़-टाईम…. होशील तु माझा???”

कबीर ह्या अनपेक्षीत धक्याने बधीर होऊन गेला..

“किस मी डीप कबीर… आय वॉंन्ट टु लिव्ह इन धीस मोमेंट.. प्लिज कीस मी..”, राधाने डोळे बंद केले….

कबीरला आपल्या शरीरातल्या नसां-नसा फुट्तील की काय असं वाटत होतं…

“राधा.. मला वाटतं तु शुध्दीत नाहीएस.. आपण नंतर बोलुयात का?”
“कमऑन कबीर.. इट्स जस्ट ३ पेग्स.. मी इतकी पण कमकुवत नाहीए.. पुर्ण शुध्दीत आहे मी.. हे बघ..” असं म्हणुन राधा सोफ़्यावरुन उतरुन कबीरसमोर उभी राहीली.. “बघ.. मी सरळ उभी आहे नं..”

“हम्म…”

अचानक राधा आपल्या गुडघ्यावर वाकली आणि कबीरचा हात हातात घेऊन म्हणाली.. “लेट्स गेट मॅरीड?”


रोहन आणि मोनिका संध्याकाळच्या ट्रॅफीकमधुन धरपडत राधाच्या घरापाशी पोहोचले…

“शिट्ट रोहन.. एक तास लागला आपल्याला…”
“हम्म.. नॉट टु वरी.. कबीर आहे बघ अजुन..”, पार्कींगमध्ये उभ्या असलेल्या कबीरच्या गाडीकडे बोट दाखवत रोहन म्हणाला.
“हो रे.. चल पट्कन..”

लिफ़्टसाठी न थांबता दोघंही चारमजले चढुन राधाच्या घरापाशी पोहोचले आणि त्यांनी बेल वाजवली..
बर्‍याच वेळानंतर राधाने दार उघडले..

“ओह हाय रोहन.. हा मोनिका..”, दोघांना दारात बघुन आश्चर्यचकीत होत राधा म्हणाली..
“कबिर आहे?”, रोहन
“हो.. आहे नं.. का? काय झालं?”

रोहनचा आवाज ऐकुन कबीरही आतमधुन बाहेर आला..

रोहन आणि मोनिका दोघंही कबीरचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करत होते..

“रोहन? काय झालं.. ये नं आतमध्ये ये…”, दोघांना आतमध्ये घेत कबिर म्हणाला..

दोघंही आतमध्ये आले..

“कॉफ़ी घेणार?”, राधाने विचारलं..
“अं.. नाही नको…”, मोनिका
“अगं घे.. मी टाकतंच होते.. बसा मी येतेच दोन मिनिटांत..”, असं म्हणुन राधा आतमध्ये गेली..

“इकडे कसे काय आलात दोघं?”, कबीरने रोहन आणि मोनिकाला विचारलं..
“कबीर.. एव्हरीथींग ऑलराईट?”, रोहनने विचारले..
“हो.. अ‍ॅबस्युलेटली? का?”, कबीर
“नाही तु म्हणालास ना मगाशी.. गोची झालीए.. राधा रडतीए वगैरे…”, रोहन
“हम्म. मगाशी ती डिस्टर्ब्ड होती.. पण एव्हरीथींग इज ऑलराईट नाऊ..”, कबीर हसत हसत म्हणाला..

रोहन पुढे काही बोलणार एव्हढ्यात राधा कॉफ़ीचे कप घेऊन बाहेर आली.

कॉफ़ी पिताना रोहन आणि मोनिका दोघांनीही एक गोष्ट नोटीस केली की कबीर आणि राधा एकमेकांकडे बघुन मधुनच हसत होते.. तर दोघांच्या काहीतरी खाणाखूणा चालल्या होता..

शेवटी न रहावुन रोहनने विचारले… “तुमच्या कानगोष्टी चालणार असतील.. तर आम्ही जाउ का?”
“नाही रे.. सॉरी.. प्लिज बस..”, कबीर रोहनला थांबवत म्हणाला..

“अ‍ॅक्युचली.. इट्स टु अर्ली.. पण आम्हाला तुम्हा-दोघांना काहीतरी सांगायचंय..”, राधा कबीरकडे बघत म्हणाली..
“काय झालंय..”, रोहन आणि मोनिकाने एकमेकांकडे चिंतीत नजरेने बघीतले आणि विचारले..

एक मोठ्ठा पॉज घेऊन राधा म्हणाली.. “वुई आर गेटींग मॅरीड…”

[क्रमशः]