मैत्र प्राण्यांचे
प्राणी आणी मी एक अजब नाते आहे बर का !!
प्राणी म्हणजे कुत्रा मंजर शेळी गाय म्हैस ..या पैकी कोणताही प्राणी
कुत्रा या प्राण्याची खरे तर पुर्वी पासून फार दहशत होती
पण मुलाच्या नादाने घरी कुत्रा आला
आणी मग हळूहळू त्याच्या विषयी ममत्व वाटु लागले
आमचा कुत्रा म्हणजे धनगरी” वाण” होते त्याचे नाव जिमी
प्रचंड मस्तीखोर आणी दिसायला वाघा सारखा
अगदी पाहणाऱ्याच्या मनात धडकी भरवणारा ,..
पण स्वारी खुप चलाख होती
खुप दंगा केला आणी घरात कोणी रागावू लागले की थेट माझ्या पाठीमागे लपणार
मग कुणाची काय बिशाद आहे हात लावायची
सगळे लाड काय ते माझ्या कडून करून घ्यायचे
मी दुध पोळी कुस्करून दिली आणी पुढ्यात ठेवली आणि खा म्हणले की मगच खायचा ..
तो पर्यंत नुसता तोंडाकडे पाहत बसायचा ..
त्याची आणखी एक गंमत म्हणजे मी कधी घराबाहेर पडले की
मी कुठे जातेय याकडे खुप लक्ष असायचे
पोर्चमध्ये बांधलेला असला तर मी अगदी डोळ्याच्या आटोक्या बाहेर जाई पर्यंत मला पहायचा
मी बाहेर पडताना कायम त्याला घेवूनच जावे असा आग्रह असे त्याचा
त्यानंतर जेव्हा मी परत येईन तेव्हा मला दुरून पहिले तरी उद्या मारायला लागायचा ते थेट मी घरात येईपर्यंत
मग माझे सर्व चेकिंग ..
मी कुठे जाऊन आले असावे ..
मी काय आणले आहे अगदी माझ्या तोंडाचा पण वास घेऊन मी काय खाल्ले असावे ते पहायचा तो ..!!
मुलाला प्राण्यांची अती आवड ..”आई पोपट पाळूया ना आपण “
एक दिवस हट्ट केला त्याने ..पण मी निक्षून नाही म्हणले
मग मला मांजर तरी आण हा त्याचा आग्रह
मग अशा रीतीने मनीचा शिरकाव झाला घरी ..
मग काय तीचे निरनिराळे नखरे सांभाळणे ..
तसे कुत्रा आणी ती परिचयाची झाली होती
इतर वेळी अगदी एकमेकाच्या जवळ पडून असायची
पण आम्ही कोणी पाहू लागलो तर लगेच एकमेकावर गुरगुरायची
खुप हसू येत असे तेव्हा
मध्यंतरी आमचा कुत्रा हरवला तो परत आला नाही
यानंतर कीती तरी वर्षे वेगवेगळ्या मांजरी नी आमचे घर व्यापून टाकले होते
त्यांच्या साठी पोळ्या भाताची सोय करणे दुध ठेवणे ही कामे वाढली
आमच्या कडच्या मांजरी इतक्या चावट असायच्या
की त्याना ठराविक तापमानाचे दुध लागत असे
अती गार अथवा गरम घातले की ..त्या गुर्गुरून घर डोक्यावर घेत असत ..
एकीला दुध पोळी
तर एक पोळीला तोंडही लावणार नाही
एकीला दुध भात तर एक भाताचे शीत पण खाणार नाही असले नखरे !!!
आमच्या बागेत आम्ही झोपाळा बांधला होता .
त्यावर छान मखमल च्या उशा होत्या
त्यावर बसून झोप घेणे त्यांच्या अगदी आनंदाचा भाग ..
एखादे वेळी आम्हाला बसायला मिळणार नाही पण या मात्र कायम झोपाळा अडवून बसणार
एका वेळेस तर एक मनी एक बोका आणी चार पिल्ले इतके प्राणी घरी होते
सगळी मिळून झोपाळा अडवायची ..
त्यांनी बसू नये म्हणुन मी उशा काढुन ठेवायची
तेव्हा त्या रागाने रुद्रावतार धारण करीत व इतका आरडा ओरडा करीत
की परत उशा जागे वर ठेवाव्याच लागत ..
सध्या नोकरीच्या कारणाने मी कधी कधी बाहेर असायचे
पण महिना पंधरा दिवसांनी जेव्हा जेव्हा मी येते ना तेव्हा या मनीला कसा पत्ता लागतो कोण जाणे
दुसऱ्या दिवशी बाईसाहेब हजर असायच्या
आपल्याला काही कारणाने बाहेर जेवायला जायचे असले
तरी हिची दुध पोळी तयार ठेवावीच लागायची !!
कुठेही जा मांजरे येवून माझ्या मांडीवर बसतात नाहीतर किमान अंग तरी घासतात माझ्या अंगाला ..
मध्ये दुबई ला गेले होते तेव्हा रात्री तिथे एका चहाच्या ठेल्यावर चहा प्यायला गेलो होतो
थंडी मी मी म्हणत म्हणत होती
आम्ही पुर्ण प्याक कपडे घालून त्यावर शाल गुंडाळून चहाची वाट पाहत समोरील दुकानाच्या पायरीवर बसलो
आणी अचानक एक मांजर समोर आले ..आले ते थेट माझ्या जवळच
मी आपल नेहेमी प्रमाणे त्याच्याशी गप्पा मारून अंगावर हात पण फिरवला
मग ते आणखीन लाडात आले आणि अंगाला अंग घासू लागले .
आमच्या सोबत एक छोटी मुलगी होती तीला मांजर खुप आवडले
ती पण त्याला बोलाऊ लागली ..मांजर तिच्या पण जवळ जाऊ लागले
पण तिच्या आईने तीला अडवले
तिच्या आईला भीती वाटली मांजर चावेल तीला
मी मात्र जेवढा वेळ तिथे होते तेवढा वेळ मांजर मला चिकटून बसले होते
एकदा एका मैत्रिणी कडे गेले होते तीला मांजर बिलकुल आवडत नाही
मी तिच्या कडे गेले आणी कुठून कोण जाणे दोन मांजरे तिच्या घराच्या मागच्या
आणी पुढच्या दरवाज्या जवळ आली .
माझ्या नेहेमीच्या सवयी प्रमाणे मी त्यांना बोलाऊ लागले
आणी ती पण दोन्ही मांजरे म्याव म्याव करीत माझ्याशी बोलू लागली
मैत्रीण एवढी वैतागली
अग कुठून आली ग ही मांजरे हाकल हाकल त्यांना
तिचा आरडा ओरडा सुरु झाला
मला मांजरे आवडतात हे समजल्या वर ती म्हणाली तरीच ही दोघे तुझा “माग “
काढत इथे आली असावीत !!
फिरायच्या रस्त्यावरील एका घरातील डॉन नावाचा कुत्रा इतका माहितीचा झाला होता
की रोज मी आले की तो मला हस्तांदोलन करीत असे
जर का एखाद्या दिवशी यात खंड पडला तर त्याला अजिबात चालत नसे
तो भुंकून भुंकून मला बोलाऊन घेत असे
वाघाच्या आकाराचा तो कुत्रा इतका प्रेमाने गळ्यात पडत असे की पाहणाऱ्या
माणसाला पण आमच्या या स्नेहाचे नवल वाटे
रस्त्यावरची कुत्री तर जाम खुष असतात माझ्यावर
फिरायला जायच्या रस्त्यावर ची सारी कुत्री माझ्या अगदी जवळच्या ओळखीची असतात
मग कधी त्यांना बिस्कीट दे कधी पोळी घाल हे ही चालु असते
कित्येक कुत्री तर नंतर इतकी जवळीक साधतात की जर बिस्कीट आणले नाही
तर तेथे असणार्या जवळच्या दुकानातून त्यांना बिस्कीट पुडा घेऊन द्यावाच लागतो
तेवढा त्याचा माझ्यावर हक्क ..च असतो ना प्रेमाचा ..!!
इतकेच नाही रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या शेळ्या ही माझ्या चांगल्या ओळखीच्या असतात
एका वाचमन च्या शेळीला मी अधुन मधुन भाज्यांची डेखे वगैरे घालत असे
तीला माझी इतकी सवय झाली होती की मी रोज तीला जाताना .
.शेवंते ..
शेवंते
अशी हाक घालूनच पुढे जात असे
व ती पण बें बें करीत असे .
माझे तीचे काय नाते होते कोण जाणे ..
पण एके दिवशी मी तिच्या कडे लक्ष द्यायला विसरले तर ती चक्क दावे तोडुन
माझ्या मागे माझ्या घरा पर्यंत आली होती
त्यावेळी तिची मालकीण पण थक्क झाली होती ..!
असे हे माझे आणी प्राण्यांचे मैत्र ..
प्राणी अथवा पक्षी कोणी असो त्यांच्याशी दोन शब्द बोलून जायची सवयच आहे मला
अशीच माझी एक कुत्रा प्रेमी मैत्रीण आहे ती नेहेमी म्हणते
प्राणी आपल्या वर अकारण इतके निस्वार्थी प्रेम करतात
याचा अर्थ आपण त्यांच्या साठी देवाने पाठवलेले “प्रेषित “आहोत
म्हणुन च ते आपल्याला चटकन ओळखतात आणी जवळीक साधतात
मला ही खरेच वाटते हे ..!!