२९. महाराष्ट्रातील किल्ले- ४ Anuja Kulkarni द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

२९. महाराष्ट्रातील किल्ले- ४

२९. महाराष्ट्रातील किल्ले- ४

* महाराष्ट्रातले किल्ले

३. शिवनेरी किल्ला-

शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर येथे आहे. ह्या किल्ल्याचा प्रकार गिरिदुर्ग आहे. हा किल्ला तसा फार मोठा नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे. आणि हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे. शिवनेरीचा हा किल्ला अतिशय प्राचीन किल्ला आहे. हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर गावाजवळ आणि पुण्यापासून अंदाजे १०५ किलोमीटरवर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. शिवनेरी किल्ला हा सुमारे १०७० मीटर उंच असून दक्षिण - उत्तर दीड किलोमीटर पसरलेला आहे. किल्ल्याचा दक्षिणेकडील भाग अर्धगोलाकृती आहे. आणि उत्तरेकडे तो निमुळता होत गेला आहे. गडावरील शिवाई देवीच्या नावावरूनच जिजाऊंनी छत्रपतींचे नाव ‘शिवाजी’ ठेवले, असे म्हटले जाते. याचबरोबर गंगा-जमुना नावाच्या गार पाण्याच्या दोन मोठ्या ‘टाक्या’ आहेत. किल्ल्याच्या आसपास बौद्ध लेणी असलेल्या तीन डोंगराच्या रांगा आहेत. नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर शिवनेरी किल्ला आहे. त्यावेळी नाणेघाटमार्गे खूप मोठ्या प्रमाणात व्यापार चालत असे. त्यावेळच्या राज्यकर्त्यांकडून या मार्गावर लक्ष ठेवण्याकरिता काही दुर्गांची निर्मिती करण्यात आली. त्यात शिवनेरी देखील निर्माण करण्यात आला.

* गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे-

ह्या गडावर आलेले पर्यटक तिथली हिरवाई पाहून आनंदित होतात. वन विभागाकडून राखली जाणारी परिसरातील स्वच्छता आणि वनराई पर्यटकांना नेहमीच इथे आकर्षित करत असते. खास करून गडावर असलेला बगीचा पर्यटकांचे आकर्षण आहे. शिवनेरी गडावर काय पाहता येईल-

१. शिवाई मंदिर- सात दरवाज्यांच्या वाटेने गडावर जाता येते. इथून येतांना पाचवा म्हणजे शिपाई दरवाजा पार केल्यावर मुख्य वाटसोडून उजव्या बाजूला पुढे गेल्यावर शिवाई देवीचे मंदिर लागते. याच मंदिरात शिवाई देवीची मूर्ती आहे. शिवनेरी गडाच्या कातळात असलेल्या देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. आणि मंदिर परिसर सुशोभित देखील करण्यात आला आहे. मंदीराच्या मागे असणाऱ्या कड्यात ६ ते ७ गुहा आहेत. ह्या गुहा मुक्कामासाठी मात्र अयोग्य आहेत.

२. अंबरखाना- शेवटच्या दरवाज्यातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच अंबरखाना आहे. गडावरती ज्यावेळी वस्ती होती त्यावेळी या अंबरखान्याचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात असे. आत्ता मात्र अंबरखान्याची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे.

३. कोळी चौथरा : अंबरखान्यापासून पुढे गडाकडे जात असताना दोन मार्ग दिसतात. त्यातला एक मार्ग समोर असणाऱ्या टेकडीकडे जातो. या समोरच्या टेकडीवर एक चौथरा आहे. निजामशाहीच्या पाडावानंतर आदिलशाहीचे आणि मुघलांचे त्यांच्या सीमावर्ती भागाकडे थोडेसे दुर्लक्ष होत होते. ह्या गोष्टीचा फायदा घेऊन महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुघलांनी महादेव कोळ्यांवर आक्रमण केले आणि शिवनेरी किल्ल्याला घेरले. त्यामुळे महादेव कोळ्यांच्या नवख्या सैन्याला बलाढ्य मुगल सैन्यापुढे शरणागती पत्करावी लागली. मुघल सैन्याकडून महादेव कोळी यांच्या सैनिकांचे अतोनात हाल करण्यात आले. आणि गडाच्या माथ्यावरील चौथऱ्यावर महादेव कोळी सैनिकांचा शिरच्छेद करण्यात आला. या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्यास कोळी चौथरा म्हणले जाते. कालांतराने ह्या चौथऱ्यावर एक घुमट बांधून त्यावर फारसी भाषेमध्ये लिहिलेले दोन शिलालेख बनवले गेले.

४. शिवकुंज : अंबरखान्या जवळून गडाकडे जाणारा दुसरा मार्ग शिवकुंजाकडे जातो. या मार्गाने जात असताना वाटेत पाण्याच्या बऱ्याच टाके पाहायला मिळतात. त्यात गंगा जमुना टाके देखील आहेत. शिवकुंज हे शिवनेरी किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचे स्मारक आहे. याची स्थापना व उद्‌घाटन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने बांधण्यात आलेल्या शिवकुंजात जिजाऊंच्या पुढे उभे असलेल्या बाल शिवाजीचा पंचधातूचा पुतळा आहे. जिजाबाईच्या पुढ्यात असलेला बालशिवाजी आपल्या हातातील छोटी तलवार फिरवीत आईला आपली भव्य स्वप्ने सांगत आहे हे दर्शवणारा पुतळा ‘शिवकुंजा’मध्ये बसविला आहे. शिवकुंजाजवळच कमानी मशिद आहे. त्याखाली पाण्याचे टाके आहे. कमानी मशिदीजवळून पुढे चालत गेल्यास हमामखाना आहे. तेथून पुढे उत्तरेकडे चालत गेल्यानंतर शिवजन्म स्थानाची इमारत आहे.

५. शिवजन्मस्थळ : शिवजन्मस्थानाची दगडी इमारत दुमजली आहे आणि इमारतीच्या खालच्या खोलीमध्ये शिवरायांचे जन्मस्थळ आहे. ह्या खालच्या खोलीत शिवरायांचा पुतळा आहे. येथे शिवाजी महाराजांचा पाळणा सुद्धा आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर देखील दगडी भिंती आहेत. येथून जुन्नर गाव आणि परिसर दिसतो.

६. बदामी टाके : शिवजन्म स्थळाकडून कडेलोट टोकाकडे जाताना गोल आकाराचे पाण्याचे ‘बदामी टाके’ आहे. बदामी टाक्याचा संपूर्ण घेर दगडी बांधकामाचा आहे. आणि ह्या बदामी टाकेच्या तळास देखील दगड आहे. बदामी टाक्यापासून पुढे जाणारा रस्ता कडेलोट टोकाकडे जातो.

७. कडेलोट कडा- बदामी टाक्यापासून पुढे कडेलोट टोक आहे. शिवनेरी किल्ल्याच्या उत्तर दिशेला कडेलोट टोक आहे. सुमारे दीड हजार फूट उंचीचा ह्या सरळसोट कडा आहे. गुन्हेगारांना शिक्षा देण्याकरिता कडेलोट टोकावरून त्याचा कडेलोट केला जात असे. ह्या कडेलोट टोकावरून लेण्याद्री परिसर अगदी जवळ असल्यासारखा पहावयास मिळतो.

* गडावर जाणाऱ्या वाटा-

जुन्नर गावामधून शिवनेरी गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. गडावर जाण्याच्या दोन प्रमुख वाटा जुन्नर गावातूनच जातात. पुणेकरांना तसेच मुंबईकरांना एका दिवसात शिवनेरी पाहून घरी परतता येते.

१. सात दरवाज्यांची वाट- जुन्नर गावामध्ये असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून डाव्या बाजूस असलेल्या मार्गाने चालत गेल्यास गडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचता येते. या मार्गाने गडाच्या पायथ्यापर्यंत वाहन घेऊन सुद्धा जाता येत. पुढे जाताना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा. आपण जसे जसे पुढे गडावर चालत जावू तसे आपणास जुन्नर परिसरातील असलेल्या लेण्याद्रीची लेणी गडाच्या उत्तर बाजूस दिसू लागतात.

२. साखळीची वाट- पायवाटेने चालत गेल्यास गडाच्या पायथ्याच्या कातळ भिंतीपर्यंत जाता येते. या कातळ भिंतीला लावलेल्या साखळीच्या आणि कातळात खोदलेल्या पायर्‍यांच्या साह्याने गडावर पोहोचता येते. ही वाट थोडी अवघड आहे. परंतु या मार्गाने गडावर पोचल्यास शिवजन्म स्थळाच्या ठिकाणाकडे लवकर पोचता येते.

शिवाजीमहाराजांच्या शौर्याचा इतिहास महाराष्ट्राच्या दर्‍या-खोर्‍यांशी, डोंगरकडांशी जोडलेला आहे. आणि ह्या इतिहासाशी शिवनेरी किल्ल्याचा बहुमोल वाटा आहे. त्यामुळे सर्व शिवप्रेमी ह्या शिवनेरी किल्ल्याला आवर्जून भेट देतात.