३३. महाराष्ट्रातील किल्ले - ८ Anuja Kulkarni द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

३३. महाराष्ट्रातील किल्ले - ८

३३. महाराष्ट्रातील किल्ले- ८

८. तोरणा किल्ला-

तोरणा हा सह्याद्री पर्वतरांगांमधील प्रसिद्ध डोंगरी किल्ला आहे. आणि पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच डोंगर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला सर्वप्रथम जिंकून आपल्या स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली होती. तोरणा किल्ला प्रचंडगड म्हणून सुद्धा ओळखला जातो. तोरणा किल्ला पुणे जिल्ह्यातला दुर्गकोटातील अतिदुर्गम आणि अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या पर्वत रांगेतून दोन बाजू निघून पूर्वेला पसरलेल्या आहेत. त्या पैकी एका बाजूला तोरणा किल्ला आणि राजगड हे किल्ले आहेत. दुसऱ्या बाजूला भुलेश्वर रांग असे म्हणले जाते. तोरणा किल्ला पुण्यापासून अगदीच जवळ आहे. म्हणजे पुण्यापासून रस्त्याच्या वाटेने तोरण्यापर्यंतचे अंतर ६० किमी आहे.

ह्या किल्ल्याला ऐतिहासिक महत्व लाभलेले आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा एक प्रमुख शिलेदार म्हणून तोरणा किल्ल्या ओळखला जातो. अशी इतिहासात नोंद सुद्धा मिळते. महाराष्ट्रातील सर्व गडांचा स्वतःचा असा विशिष्ट इतिहास आहे. आणि त्यामुळेच हे सगळे किल्ले खास आहेत. त्याचप्रमाणे तोरणा किल्ल्यावर देखील इतिहास घडलेला आहे. शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली होती त्यावेळी सर्वप्रथम सर केलेला किल्ला म्हणजे तोरणा किल्ला, असे इतिहास सांगतो. त्या आधी हा किल्ला विजापूरच्या अदिलशहाच्या ताब्यामध्ये होता. शिवाजी महाराजांनी तो आपल्या ताब्यात घेऊन स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली. याच कारणामुळे या किल्ल्यास ‘तोरणा’ असे नाव दिले गेले असे काही इतिहासकार सांगतात. त्याचबरोबर, काही अभ्यासकांच्या मते तोरणा गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडे असल्यामुळे गडाचे नाव ‘तोरणा’ असे ठेवण्यात आले होते. गड काबीज केल्यानंतर शिवाजी महाराजांनी गडाची पहाणी करत असताना गडाचा प्रचंड विस्तार पहिला आणि शिवाजी महाराजांनी गडाचे नाव 'प्रचंडगड' असे ठेवले होते.

परंतु, तोरणा हा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही आहे. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरुनहा शैवपंथाचा आश्रम असावा असा अंदाज बांधला जातो. इ.स.१४७० ते १४८६ च्या दरम्यान बहमनी राजवटीसाठी मालिक अहमद याने हा किल्ला जिंकला होता. त्यानंतर हा किल्ला निजामशाहीत गेला. मग हा किल्ला शिवाजी महाराजांनी घेतला आणि याचे नाव प्रचंडगड ठेवले. गडावर काही इमारती बांधल्या. शिवाजी महाराजांनी आग्राहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यातले ५ हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांचा वध झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. पण नंतर शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठांच्या ताब्यात आणला. पुढे इ.स.१७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला आणि लढाई करून आपल्या ताब्यात आणला. मग याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावरलोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला आणि त्यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला आहे. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महारजांकडेच राहिला. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला आहे.

तोरणा किल्ल्याला झुंजार आणि बुधला अश्या दोन माच्या आहेत. यातील झुंजार माची विस्ताराने छोटी आहे पण ही माची छोटी असून सुद्धा चढण्यास खुप अवघड आहे. आणि राजगड आणि तोरण्याच्या मध्ये बुधला माची विस्तारलेली आहे.

* तोरणा किल्ल्यावर काय पाहता येईल-

तोरणा म्हणजेच प्रचंडगड हा पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला आहे. ह्या किल्ल्याची तटबंदी आजही मजबूत अवस्थेत आहे. तोरणा किल्ल्याच्या उत्तर दिशेला कानद नदी आणि दक्षिण दिशेला वेळवंडी नदीचे खोरे आहे. गडावर जात असताना तोरण्याचा पहिला दरवाजा आपल्याला लागतो. दगडी कातळात असलेल्या या दरवाजाला बिनीचा दरवाजा म्हणले जाते. बिनीच्या दरवाजातून पुढे गेल्यानंतर कोठीचा दरवाजा लागतो.

१. तोरणजाई देवी मंदिर (कोठी दरवाजा) आणि मेंगाई देवी मंदिर-

कोठी दरवाज्यासमोरच्या दगडी चिरेबंदी तटामध्ये एक छोटे मंदिर आहे. त्यामध्ये तोरणजाई देवीची मूर्ती आहे. याच ठिकाणी खोदाई करत असताना शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना मोहरांचे हंडे सापडल्याची इतिहासात नोंद आहे. गडाकडे पुढे जात असताना वाटेवर तोरण टाके आणि खोकड टाके लागतात. त्याच्या पुढे जवळच मेंगाई देवीचे मंदिर आहे. रात्री मुक्कामी येणारे दुर्गप्रेमी या ठिकाणी मुक्काम करतात. तसेच नवरात्र उत्सव काळामध्ये वेल्हे गावातील लोक गडावर देवीचा नवरात्र उत्सव साजरा करतात. मेंगाई देवी मंदिरापासून झुंजार माचीकडे जात असताना हनुमान बुरुज, भेल बुरुज, सफेली बुरुज, माळेचा बुरुज, फुटका बुरुज आणि लक्कडखाना पाहायला मिळते.

२. झुंजार माची-

मेंगाई देवीच्या मंदिराकडून हनुमान बुरुजाकडे आल्यावर बुरुजाच्या तटावरुन खाली उतरुन दिंडी दरवाजा ने झुंजार माचीकडे जाता येते. परंतु, झुंजार माचीकडे जाणारी वाट सोपी नाही. पावसाळ्यात झुंजार माचीकडे जाणे धोकादायक असते त्यामुळे काळजी घेणे हिताचे ठरते आणि सतर्क राहून झुंजार माचीकडे जाणे गरजेचे आहे. झुंजार माचीवर पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात धुके असते. झुंझार माचीवरून उन्हाळ्यात दूरवरच्या परिसराचे विलोभनीय दृश्य पाहायला मिळते.

३. तोरणेश्वर महादेवाचे मंदिर-

मेंगाई देवी मंदीर परिसरामध्ये वास्तूंचे भग्न अवशेष पहायला मिळतात. याच ठिकाणी बुधला माचीकडे जाण्यासाठी असलेल्या वाटेवर तोरणेश्वर महादेवाचे मंदिर पाहायला मिळते. या परिसरात देखील पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात धुके असते. आणि इथला नजारा सुरेख दिसतो. धुके इतके असते की समोरचा माणूस देखील दिसू शकत नाही. त्यामुळे काळजी घेणे कधीही हितावह.. तर उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी गेल्यावर तोरणा परिसरातील राजगड, केंजळगड, रोहीडा,सिंहगड, पुरंदर, वज्रगड पर्यंतचा सर्व परिसर पाहायला मिळतो

४. बुधला माची-

गडाच्या पश्चिमेला बुधला माची पाहायला मिळते. बुधला माचीच्या टोकाला चित्ता दरवाजा लागतो. बुधला माचीकडून गडाकडे येत असताना कोकण दरवाजा, टकमक बुरुज, शिवगंगा, पाताळगंगा टाके पाहायला मिळतात. बुधला माचीवरून एक वाट भगत दरवाज्याकडे जाते तर दुसरी वाट घोडजिन टोकाकडे जाते. भगत दरवाजाच्या रस्त्याने राजगडाकडे जाण्याचा मार्ग आहे. या ठिकाणी जाण्याची वाट अतिशय कठीण आहे. एकदम उभा कातळ कडा आहे. त्यामुळे पावसाळ्यात या वाटेने जाणे धोक्याचे ठरू शकते.

५. बालेकिल्ला-

बालेकिल्ला ही तोरणा गडावरील सर्वात उंचावरची जागा आहे. बुधला माची परिसरातील सह्याद्रीचे सौंदर्य अविस्मरणीय आहे. तिथून परतीच्या वाटेने मेंगाई देवीच्या मंदिराकडे आल्यानंतर बालेकिल्ल्याचे अवशेष पाहायला मिळतात. बालेकिल्ल्यापासून गडाचा प्रचंड असा विस्तारही पाहायला मिळतो. खरेतर त्याच्या या विस्तारावरूनच शिवाजी महाराजांनी तोरण्याचे ‘प्रचंडगड’ असे नाव ठेवले होते.

* गडावर कसे जाता येईल-

पुणे जवळच वेल्हे तोरण्याच्या पायथ्याशी आहे. पुणे-वेल्हे अंतर ६० कि.मी आहे. पुणे-नसरापूर-वेल्हे, पुणे-पानशेत-वेल्हे व पुणे-खानापूर-पाबे मार्गे वेल्हे अशा मार्गाने तोरणा गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. शिवाजीच्या काळातील वेल्हे-वेग्रे आळीमार्गे पाऊलवाटेने दीड-दोन तासात बिनी दरवाजातून तोरण्यावर जाता येते. हा मार्ग इतर मार्गांपेक्षा सोपा मानला जातो. धोकादायक रस्त्यावर पुरातत्त्व खात्याने लोखंडी संरक्षक कठडे बसवले आहेत. त्यामुळे ट्रेकर्स ची सुरक्षा सांभाळली जाते. आणि सहज चढउतार करता येते. दुसरा मार्ग वेल्ह्यापासून ५ कि.मी अंतरावर असलेल्या भट्टी या गावातून आहे. गावाच्या पश्चिम दिशेकडून वाळणजाई दरवाजातून बुधला माचीवर थेट वाटेने पोहचता येते. या नेहमीच्या वाटांशिवाय चोरवाटेने येणारे इतर मार्ग अडचणीचे आणि धोकादायक आहेत. वेल्हे गावातून चढताना दिसणारा तोरणा आणि गुंजवण्याकडून दिसणारा राजगड यात बरेच साम्य आढळते

तोरणा किल्ल्यावर पर्यटक सुट्ट्यांमध्ये आवर्जून भेट देतात. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असलेल्या तोरणा किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटक निसर्ग सौंदर्याचा देखावा नजरेत साठवून मंत्रमुग्ध होतात. पण हा किल्ला धोकादायक आहे त्यामुळे जास्त उत्साहात ह्या गडावर फिरणे धोकादायक ठरू शकते. अतिशय सुंदर पण चढाई साठी अवघड असलेला हा किल्ला ट्रेकर्सना नेहमीच गवसणी घालत असतो. पण जबाबदारीने आणि सांभाळून ह्या किल्ल्याचा आनंद घेतला तर तो आनंद नक्कीच द्विगुणीत होईल हे नक्की!