Antarrashtriya yogadin ani mi books and stories free download online pdf in Marathi

आंतरराष्ट्रीय योगदिन आणि मी

उद्धव भयवाळ

औरंगाबाद

आंतरराष्ट्रीय योगदिन आणि मी

{ विनोदी कथा }

आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघामध्ये ठेवला आणि १७७ देशांनी अगदी कमी वेळेमध्ये या प्रस्तावास पाठींबा देऊन तो प्रस्ताव पारित केला. तेव्हापासून आमच्या कॉलनीतच काय पूर्ण शहरामध्ये एक नवचैतन्याचे वारे वाहू लागले. ज्याच्या त्याच्या तोंडी योगाशिवाय दुसरी गोष्टच नव्हती. पाच वर्षांच्या पोरापासून तर नव्वद वर्षांच्या थोरापर्यंत सगळ्याच्या तोंडी एकच विषय, "२१ जूनचा योगदिन." आमचे शहरही त्याला अपवाद नव्हते. पावसाळ्यात जागोजागी कुत्र्याच्या छत्र्या उगवाव्यात, तसे आमच्या शहरात गल्लोगल्ली योगाचे क्लासेस एकदमच सुरू झाले. त्या क्लासेसमधील स्वयंघोषित योगतज्ञ अगदी कमी फीसमध्ये उत्तम योगशिक्षण देण्याचा दावा करू लागले. जागोजागी योगाच्या वेगवेगळ्या क्लासेसच्या जाहिराती झळकू लागल्या. त्या जाहिरातींमधील कमनीय बांध्याच्या पोरींचे वेगवेगळ्या पोजमधील योग करतांनाचे फोटो पाहण्यासाठी टारगट पोरांच्या झुंडीच्या झुंडी गल्लीगल्लीमध्ये आणि कोपऱ्याकोपऱ्यावर जमू लागल्या.

जसजसा २१ जूनचा दिवस जवळ येऊ लागला, तसतसे आमच्या कॉलनीतील सर्वांच्याच, विशेषत: स्त्रियांच्या उत्साहाला उधाण आले. जो तो टी.व्ही. समोर बसून रामदेव बाबांचे चॅनल लावून ठेवू लागला आणि जमेल तशी योगासने करू लागला. प्रत्येक स्त्री आपापल्या नवऱ्याला योगाचे महत्त्व समजावून सांगू लागली आणि बळजबरीने योगसाधना करण्यास भाग पाडू लागली. मग माझी सौ. कशी बरे मागे राहील? माझ्या अति उत्साही सौ.ने आमच्या घराला तर योगाच्या क्लासचेच स्वरूप आणले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मला आणि आमच्या दोन्ही मुलांना पहाटे पाचच्या आधीच साखरझोपेतून उठवून ती आम्हा सर्वांना टी.व्ही. समोर बसवू लागली. सोबतच सौ.ची कॉमेंट्री सुरू असायची.

माझ्याकडे विचित्र नजरेने पाहात मला म्हणायची, "तुमच्या पोटाचा घेर बघा किती वाढलाय! या निमित्ताने तो घेर तरी कमी करा."

आणि नंतरचा डोस मुलांना असायचा. "अन् पोरांनो, तुम्ही नका तुमच्या बाबांसारखे आळशी बनू. तुमच्या बाबांना तर व्यायाम, योगासने म्हटले की, आधीच हजार आठ्या पडतात कपाळावर. त्या रामदेव बाबांचे अंग बघा कसे कराकरा वाकते, तसे जमले पाहिजे."

तिची ही कॉमेंट्री ऐकून ऐकून मी तर जाम कंटाळलो होतो. सुरुवातीला कुरकुर करीत का होईना मी मुलांच्या सोबत योगासने करण्याचा प्रयत्न करू लागलो. पण नंतर नंतर मुले उत्साहाने योगासने करीत आहेत हे पाहून मीही उसने अवसान आणू लागलो. पण का कोण जाणे, मला योगासने करण्याचा खूप कंटाळा यायचा. योगासने करता करता मला झोप यायची आणि म्हणून जांभया खूप यायच्या. ते सौ. च्या नजरेस पडले की, ती माझ्यावर जोरात ओरडायची. "जांभया नका देऊ." तेव्हा तिला मी म्हणायचो,

" अगं, मी जांभया देत नाहीय. तोंडाचा व्यायाम करतोय!"

कपालभाती प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, शलभासन, ताडासन, वक्रासन, मेरुदंडासन इत्यादी, काय काय करून करून माझा जीव मेटाकुटीला यायचा. पण एखाद्या हेडमास्तरणीसारखी माझी सौ. बाजूलाच खुर्ची टाकून बसलेली असायची अन् माझ्या प्रत्येक हालचालीवर कडक नजर ठेवायची. त्यामुळे अनिच्छेने का होईना, पण योगासने करणे मला भाग पडायचे. त्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे योगासने करता करता माझे काही चुकले की, मुले माझ्याकडे पाहून फिदीफिदी हसायला लागायची; अन् वरून सौ.चा जिव्हारी लागणारा डायलॉग ऐकावा लागायचा. तो म्हणजे," मला ठावूक होतं, तुम्हाला कधीच काही जमायचं नाही. नीट करा. नीट करा. इकडे तिकडे नका पाहू वेंधळ्यासारखे. त्या रामदेव बाबावर नजर ठेवा म्हणजे जमेल सगळे आपोआप."

दीड ते दोन तास अशी सर्व आसने झाल्यावर शेवटी असायचे शवासन. काही म्हणा, पण मला शवासनच सगळ्यात जास्त आवडायचे. शवासन करता करता तर मला झोप केव्हा लागायची अन् मी तारस्वरात कधी घोरू लागायचो हे कळायचे देखील नाही. पण ते सुखही सौ.ला बघवत नसे.

"तुम्हाला कितीदा सांगितलं, शवासन करतांना झोपायचं नसतं. जागे रहा." असं माझ्या कानाशी ओरडत ती गदागदा हलवून मला उठवायची.

आता असं रोजच होऊ लागलं. तेव्हा तिरीमिरीत मी एक दिवस तिला विचारलं, " तू आम्हाला एवढं सांगतेस. मग तू का करीत नाहीस योगासने?" तेव्हा ती अशी भडकली म्हणता.

" माझी नका काळजी करू. तुमचं सगळ्यांचं करता करता माझा पुष्कळ व्यायाम होतो दिवसभर." असा बॉम्बगोळा टाकला तिने माझ्यावर. मग एक दिवस मी शेवटचं अस्त्र फेकलं तिच्यावर. मी म्हणालो, " हे सर्व फक्त एकवीस जूनपर्यंतच करायचंय ना? एकदा योगदिन साजरा झाला की झालं. असंच ना?" तेव्हा अगदी त्वेषाने ती म्हणाली, "नाही, नाही. एकवीस जून हे निमित्त आहे. त्यानिमित्ताने आता सदैव योगासने करण्याची सवय अंगी बाणवायची. रोज सकाळी मी तुम्हाला टी.व्ही. लावून देत जाईन. त्यासमोर बसून सराव करायचा. मग जमेल आपोआप सगळं." आता आली का पंचाईत! मी तर गारच पडलो. पण तुम्हाला सांगतो, माझा सृष्टीतील चमत्कारांवर फार विश्वास आहे; आणि असाच एक चमत्कार एकवीस जूनच्या पुष्कळ अगोदरच आमच्या घरात घडला.

माझ्या सौ.ला एक दिवस तिच्या मोठ्या भावाचा सोलापूरहून फोन आला. त्या भावाची विवाहित मुलगी डिलेव्हरीसाठी म्हणून सोलापूरला माहेरी आलेली होती आणि तिच्या बाळंतपणासाठी माझ्या सौ.ला तिच्या भावाने तिकडे बोलावले होते. त्यामुळे माझ्या सौ.ला ताबडतोब तिकडे जाणे भाग होते.

नेहमी मारक्या म्हशीसारखी माझ्याकडे पाहणारी माझी सौ. त्या दिवशी ही बातमी सांगतांना मात्र माझ्याशी इतके लाडेलाडे बोलू लागली की काही विचारू नका.

"अहो, ऐकलं का? मी काय म्हणते?" तिचे ते लाडेलाडे बोलणे ऐकून मी स्वत:लाच चिमटा काढला. क्षणभर मला वाटले, मी स्वप्नात तर नाही ना?

"काय म्हणतेस? बोल. एरव्हीसुद्धा तूच बोलत असतेस आणि मी फक्त श्रवणभक्ती करतो, हे माहित आहे ना तुला?"

" तुमचं काही पण! फारच विनोदी आहात तुम्ही. बरं ते जाऊ द्या. सोलापूरहून दादाचा फोन आला होता मघाशी. बेबी आलीय सोलापूरला. "

"ही कोण बेबी?" माझा भाबडा प्रश्न.

"असं काय करता? गायत्री नाही का, माझी भाची? सारे तिला बेबीच म्हणतात." सौ. पुन्हा लाडात. हे तिचं रूप मला फार दिवसांनी दिसलं. नाहीतर माझी बायको माझ्याशी इतक्या लाडात? शक्यच नाही. त्यामुळे मी पुन्हा एकदा स्वत:ला चिमटा काढला.

"असं होय? गायत्रीला बेबी म्हणतात हे मला काय माहित? बरं, ती कशाला आलीय सोलापूरला?" मी शक्यतो नॉर्मल चेहरा ठेवून तिला विचारलं.

"अहो बाळंतपणासाठी आलीय. पहिलटकरीण आहे ती. तिचे दिवस भरत आलेत. त्यामुळे दादा

मला म्हणाला की, 'तू जशी असशील तशी ताबडतोब निघून ये.' म्हणून मी म्हणते, मला उद्या पहाटेच सोलापूरच्या गाडीत बसवून द्या ना प्लीज."

अरे बाप रे, सौ.च्या तोंडून आता "प्लीज?" मी स्वप्नात तर नाही ना?

मी म्हटलं, "काही हरकत नाही. तुला जाणे जरुरीच आहे तर जायलाच पाहिजे."

पण तुम्हाला खरं सांगू? ही बातमी सौ.ने जेव्हा मला सांगितली ना, तेव्हा मला किती आनंद झाला याचे मी वर्णन करू शकत नाही. मला स्वर्ग दोनच बोटे उरला. कारण आता योगासनांसाठी माझ्यामागे तिची कटकट राहणार नव्हती. तरीही मी तिच्या या बोलण्यामुळे मला झालेला आनंद महत्प्रयासाने लपवून, शक्य तेवढा निर्विकार चेहरा ठेवीत तिला विचारले, " पण उद्याच जाणे आवश्यक आहे का तुला?"

" हो ना. मला उद्याच गेलं पाहिजे. दादा वाट बघतोय माझी तिकडे."

मीसुद्धा मग पडत्या फळाची आज्ञा घेत तिला म्हणालो, "ठीक आहे. जा तू उद्याच. मी नेऊन सोडीन तुला बसस्टँडला."

दुसऱ्या दिवशी पहाटेच तिला जायचे होते. त्यामुळे तिने योगासने चालू ठेवण्याबद्दल मला बऱ्याच सूचना केल्या.

"मी काय म्हणते, तुम्ही तर योगासनांमध्ये खाडा करूच नका. पण मुलांनाही तुमच्यासोबतच उठवून त्यांच्याकडूनही न चुकता योगासने करून घेत जा." तिच्या सूचना चालूच होत्या. मीसुद्धा 'हो, हो' करीत तिच्या सर्व सूचना ऐकल्यासारखे केले.

एरव्ही योगासनांकरिता लवकर उठायचा अति कंटाळा करणारा मी, दुसऱ्या दिवशी पहाटेच उत्साहाने पटकन उठलो आणि सगळे आवरून सौ.ला बस स्टँडवर सोडून आलो. माझे नशीब त्या दिवशी बलवत्तरच होते असे वाटते. कारण सोलापूरची बस तिथे उभीच होती. बसमध्ये सौ.ला बसवून, तिला 'टाटा' करून पटकन् मी घरी आलो आणि रामदेव बाबांची क्षमा मागून, डोक्यापर्यंत पांघरूण घेऊन त्या पांघरुणात गडप झालो.

उद्धव भयवाळ

१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी

गादिया विहार रोड

शहानूरवाडी

औरंगाबाद ४३१००९

मोबाईल: ८८८८९२५४८८

email: ukbhaiwal@gmail.com

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED