April Fool books and stories free download online pdf in Marathi

एप्रिल फूल

उद्धव भयवाळ
औरंगाबाद
एप्रिल फूल
मागच्या मार्च महिन्यातल्या शेवटच्या आठवड्यातली ही गोष्ट. माझ्या ध्यानीमनी नसतांना आमच्या "गुलकंद कट्टा गँग"चे एक सदस्य रामभाऊ चित्रे एका संध्याकाळी माझ्या घरी आले. त्यांना असे अचानक, फोन वगैरे न करता आलेले पाहून मी थोडा चकितच झालो. कारण आमच्या 'गुलकंद कट्टा गँग'च्या सदस्यांची रोजची भेटण्याची वेळ म्हणजे पहाटे सहा ते साडेसात आणि भेटण्याचे स्थळ म्हणजे अल्फा हॉस्पिटलच्या पाठीमागील मोकळे मैदान. याला फक्त अपवाद रविवारचा. कारण फक्त दर रविवारी सुटी घ्यायची असं सर्वानुमते आम्ही ठरवलं.
अरे हो! तुम्हाला एव्हाना प्रश्न पडला असेल की, आमची ही 'गुलकंद कट्टा गँग' म्हणजे काय भानगड आहे? आधी ते सांगतो. ही भानगड बिनगड काही नाही. आम्ही साधारणपणे पन्नाशी ओलांडलेले { आणि त्यातील दोन तीन जण तर साठी ओलांडलेले } असे दहा बारा लोक मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने अल्फा हॉस्पिटलच्या पाठीमागच्या मैदानावर रोज सकाळी भेटतो. सुरुवातीला प्रत्येकजण आपापला स्वतंत्रपणे त्या मैदानावर फिरायला यायचा. कुणी तिथे आल्यावर योगासने करायचा, कुणी व्यायाम करायचा. पुढे तेच चेहरे रोज सकाळी त्या ठिकाणी दिसतात म्हटल्यावर हळूहळू प्रत्येकजण दुसऱ्याची ओळख करून घेऊ लागला; आणि पुढे ओळखीचे रूपांतर मैत्रीमध्ये झाले. थोड्याफार फरकाने सर्वजण जवळजवळ सारख्या वयाचे असल्यामुळे आणखी जवळीक निर्माण झाली. त्या मैदानाच्या एका बाजूला एक छोटासा ओटा बांधलेला आहे. सर्वांचा व्यायाम, योगासने, मैदानात चकरा मारणे वगैरे झाल्यावर आम्ही सर्वजण त्या ओट्यावर बसून थोडावेळ गप्पा मारू लागलो. वेगवेगळ्या व्यवसायातील, वेगळ्या नोकरीमधील आम्ही दहा बारा जण या निमित्ताने एकत्र आलो. त्या ओट्यावरच एक दिवस आम्ही आमच्या या समूहाचं "गुलकंद कट्टा गँग" हे नामकरण केलं. तेव्हापासून ही झाली आमची 'गुलकंद कट्टा गँग'. त्या दिवशी मग कट्टा गँगच्या नामकरणाच्या निमित्ताने आमच्यातील ज्येष्ठ स्नेही सरदेशमुख यांनी जवळच असलेल्या चहाच्या टपरीवर नेऊन सर्वांना चहा आणि बिस्किटांची पार्टी दिली. चार पाच वर्षांपूर्वी ते एका सरकारी कार्यालयामधून हेडक्लार्क या पदावरून निवृत्त झालेले आहेत. त्या दिवसापासून रोज सकाळी व्यायाम आणि गप्पाटप्पा संपल्यावर आमच्यापैकी कुणी न कुणी काही ना काही निमित्त काढून कधी चहा, कधी वडापाव, तर कधी सामोसे अशी ट्रीट देऊ लागले. हे सारे मागील दीड ते दोन वर्षांपासून रविवारची सुटी वगळता नियमित चालू आहे. पण यालाही एक अपवाद आहेच.
म्हणतात ना, नियमाला अपवाद असतोच म्हणून. आमच्या या गँगमधील हरीभाऊ घाटपांडे हे खाण्याच्या बाबतीत सदैव आघाडीवर असतात. आज कोण काय ट्रीट देतो, याकडे त्यांचं सारखं लक्षच असतं. मागच्याच वर्षी ते माझ्या घराजवळील ज्ञानमंदिर शाळेतून मुख्याधापक या पदावरून निवृत्त झालेले आहेत. माझ्या घराजवळच त्यांची शाळा असल्यामुळे अधूनमधून आमचे 'हाय! हॅलो' होत असे. आमची गुलकंद कट्टा गँग तयार होऊन दीड दोन वर्षे झालीत पण या घाटपांडेंनी या दीड दोन वर्षांच्या काळात अद्याप स्वत:च्या खिशात मात्र कधी हात घातला नाही. ते असो.
तर अशा या आमच्या गँगमधील रामभाऊ चित्रे यांना संध्याकाळच्या वेळेस माझ्याकडे आलेले पाहून मी त्यांना विचारले.
" काय रामभाऊ, कुणीकडे? नाही म्हणजे माझ्या घरी तुमचे स्वागतच आहे. पण असे अवेळी अन् तेही न कळवता आलात, म्हणून सहज विचारले."
" तुमचे म्हणणे बरोबर आहे. पण कसं असतं, काही गोष्टी एकान्तातच बोलाव्या लागतात. म्हणून मुद्दाम तुमच्याकडे आत्ता आलो. नाहीतरी सकाळी रोजच्या ठिकाणी भेट झालीच असती." रामभाऊ म्हणाले.
" एकांतात म्हणजे? तसं काही विशेष आहे का?" मी विचारले.
" माझ्या डोक्यात एक नवीन आयडिया आली. ती तुम्हाला सांगावी म्हणून आलो." रामभाऊंचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
रामभाऊंच्या डोक्यात नेहमी काही ना काही विचित्र आयडिया येत असतात, हे आम्हा सर्व मित्रांना माहित आहे. म्हणूनच आमच्यापैकी काहीजण त्यांच्या माघारी त्यांचा उल्लेख रामभाऊ चित्रे असं न करता 'रामभाऊ विचित्रे' असा करतात.
मी त्यांना म्हटलं, " ठीक आहे. सांगा तुमची नवीन आयडिया."
"आता असं बघा. मागील जवळजवळ दोन वर्षांपासून अगदी न चुकता आपण पहाटे त्या मैदानावर एकमेकांना भेटतो आणि एकमेकांना बाय बाय करण्याआधी आपल्यापैकी कुणीतरी काहीतरी आपणा सर्वांना खाऊ पिऊ घालतो. पण घाटपांडेंनी कधी स्वत:च्या खिशाला खार लावला का?" रामभाऊ विचारते झाले.
" तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण त्याचं आता काय?" मी म्हटले.
"तेच तर म्हणतोय मी. दोन तीन दिवसांनी एप्रिल महिना लागतोय. तर एक एप्रिल रोजी धमाल उडवून द्यायची असं ठरवलंय मी. त्यात मला तुमची साथ पाहिजे." रामभाऊ म्हणाले.
" बोला ना." मी म्हटलं.
"माझ्याकडची आयडिया अशी आहे की, हरीभाऊ घाटपांडे यांना काहीही माहित न करता तुम्ही आणि मी एकतीस मार्चच्या संध्याकाळी इतर सर्व मेंबर्सना फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून सांगायचं की. उद्या एक एप्रिल रोजी हरीभाऊ घाटपांडे यांच्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस असून त्यांनी आपल्या गँगमधील सर्वांना उद्या संध्याकाळी पार्टीसाठी त्यांच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले आहे. पण आपल्यापैकी कुणीही याबद्दल घाटपांडे यांना काहीच ओळख न देता उद्या संध्याकाळी सात वाजेदरम्यान त्यांच्या घरी जायचे आहे." रामभाऊ म्हणाले.
" त्याने काय होईल?" मी रामभाऊंना विचारले.
"अहो, तीच तर खरी मजा आहे. घाटपांडे यांच्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस कोणत्या दिवशी आहे हे मला माहित नाही. पण मध्यंतरी माझ्याशी एकदा बोलतांना त्यांनी लवकरच त्यांच्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस आहे असे सांगितल्याचे मला स्मरते. पण नक्की कधी आहे म्हणाले, हे मला आठवत नाही. पण एक एप्रिलला गंमत अशी होईल की घाटपांडे यांच्याकडे सर्वजण जातील अन् त्या सर्वांना मोठ्ठे एप्रिल फूल होईल. कारण घाटपांडे यांच्या लग्नाचा वाढदिवस पुढे कधीतरी असेल पण एक एप्रिल रोजी तर नक्कीच नसणार. अर्थात ती गंमत पाहण्यासाठी आपण दोघेही त्या सर्वांच्या सोबत असूच." रामभाऊ म्हणाले. मी रामभाऊंचे सर्व म्हणणे ऐकून घेतले अन् "ठीक आहे तुम्ही म्हणता ते. आयडिया आवडली मला तुमची. पण मी यावर जरा विचार करतो अन् उद्या सांगतो तुम्हाला." असे त्यांना सांगितले. पण कसचे काय!
"अहो असं काय करता? पटकन हो म्हणा. मजा येईल बघा." रामभाऊ उतावीळपणे म्हणाले. त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. त्यांच्या त्या उत्साहाकडे पाहून मी पण त्यांना बसवून ठेवले आणि थोडावेळ त्यांच्याशी चर्चा करून या "एप्रिल फूल"चे पक्के केले. एकतीस मार्चला संध्याकाळी मी रामभाऊ यांच्याकडे जाऊन तिथून साऱ्या मित्रांना फोनवर हे सांगायचे असे ठरले.
एकतीस मार्चच्या सकाळीच मला रामभाऊंचा फोन आला.
" काय! आहे ना लक्षात, आज संध्याकाळी माझ्याकडे यायचंय ते?"
"हो, हो, प्रश्नच नाही. ठरलं म्हणजे ठरलं." मी म्हणालो.
"जरा लवकरच या म्हणजे बरे होईल. पक्का प्लॅन करता येईल." रामभाऊ म्हणाले.
"ओके. ओके. लवकरच येईन. काळजी करू नका. अगदी फुलप्रूफ प्लॅन करू. " मी म्हणालो.
ठरल्याप्रमाणे मी रामभाऊंच्या घरी जरा लवकरच म्हणजे साडेचारच्या सुमारास गेलो. पण माझ्या मनातील फुलप्रूफ योजनेसाठी ज्ञानमंदिर शाळेतील सखाराम शिपायाला आधीच घरी बोलावून आमच्या योजनेची कल्पना दिली आणि त्यालासुद्धा रामभाऊ यांच्या घरी नेले. रामभाऊ अगदी आतुरतेने माझी वाट पाहात असावेत हे त्यांना बघताच मी ताडले. कारण मी तिथे गेलो तेव्हा ते त्यांच्या घराच्या बाहेरच उभे होते. मला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर जे स्मित झळकले ते पाहून मी काय ते समजलो. पण माझ्यासोबत सखारामला पाहून त्यांनी खुणेनेच मला विचारले. तेव्हा मी त्यांना म्हणालो, "हा सखाराम. ज्या ज्ञानमंदिर शाळेतून घाटपांडे निवृत्त झाले, त्या शाळेतला शिपाई. आज हा आपल्या कामाचा माणूस आहे."
"ते कसं काय?" रामभाऊंनी विचारले. तेव्हा मी त्यांना म्हटलं, "अहो, असं काय करता? घाटपांडे यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे निमंत्रण तुम्ही किंवा मी आपल्या इतर मित्रांना दिले तर त्यांना शंका नाही का येणार?"
"कोणती शंका?" रामभाऊंचा प्रश्न.
"सर्वजण म्हणतील की घाटपांडे यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे तर त्यांनी निमंत्रण देण्याऐवजी तुम्ही का देत आहात? सर्वांना निमंत्रण खरे वाटावे म्हणून घाटपांडे यांच्याच शाळेतल्या या सखाराम शिपायाला पटवून मी इथे आणले. तुम्ही त्याला सर्व फोन नंबर द्या. आपल्यासमोर तोच सर्वांना घाटपांडे यांच्या वतीने त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे फोनवर निमंत्रण देईल. म्हणजे सर्वांचा विश्वास बसेल. कारण आपल्या गँगमधील सर्वांनाच सखाराम माहित आहे." मी विस्ताराने रामभाऊंना सर्व सांगितले.
"वा! क्या बात है! मानलं तुम्हाला." रामभाऊ खुश होऊन मला म्हणाले.
"चला तर मग लागू या कामाला." मी म्हणालो.
रामभाऊंनी आम्हाला बघितल्याबरोबरच घरामध्ये चहाचे फर्मान सोडलेच होते. त्या चहाचा आस्वाद घेऊन आम्ही फोन नंबरची यादी सखारामकडे दिली. सखारामने आमच्या समोरच आमच्या सर्व मित्रांना फोन लावून घाटपांडे यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त उद्या एक एप्रिल रोजी सायंकाळी घाटपांडे यांच्या घरी येण्याचे अगदी आग्रह करून करून सांगितले. "घाटपांडे सरांनीच निमंत्रणाचे हे काम माझ्यावर सोपवले आहे" हेसुद्धा त्याने मनानेच ठोकून दिले. हे सर्व झाल्यावर "उद्या संध्याकाळी सर्व मित्रांना कसे एप्रिल फूल होईल" याची चवीने चर्चा करून मी आणि सखारामने रामभाऊंचा निरोप घेतला.
दुसऱ्या दिवशी म्हणजे एक एप्रिलला सकाळीच रामभाऊंचा मला फोन आला. ते म्हणाले, " सगळं झालं. पण एक सांगायचं राहिलं."
"कालच ठरलं ना सगळं. आता काय?" मी म्हटलं.
" अहो, आपण घाटपांडे यांच्याकडे जाऊ तर त्यांना काही गिफ्ट नको का न्यायला? " रामभाऊ म्हणाले.
"आता हे काय?" मी विचारलं.
"चिंता नका करू. माझ्याकडे एक फर्मास आयडिया आहे." रामभाऊ सांगते झाले.
" कोणती आयडिया?" माझा प्रश्न.
" आपण दोघांनी दोन कागदी पाकिटे घ्यायची आणि आपापल्या पाकिटामध्ये आपण एक एक चिट्ठी टाकायची. पाकिटात ती चिट्ठी टाकण्याआधी त्या चिट्ठीवर लिहायचे, 'कसे बनवले सर्वांना एप्रिल फूल!!' आणि मग ती चिट्ठी पाकिटात टाकून पाकीट बंद करायचे. घाटपांडे यांच्या घरी जेव्हा सर्वजण घाटपांडेंना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपापले प्रेझेंट देतील तेव्हा घाटपांडे यांच्या हातात आपण दोघांनीसुद्धा आपापले पाकीट देऊन टाकायचे. कशी वाटली ही आयडिया?" रामभाऊंनी एका दमात त्यांची आयडिया सांगून टाकली.
मी म्हटलं,"रामभाऊ, तुम्ही खरंच ग्रेट आहात. छान आहे आयडिया. मला खूप आवडली. घाटपांडे यांच्या घरी कुठलाच कार्यक्रम नाही, हे कळल्यावर मात्र सर्वांची तोंडे पाहण्यासारखी होतील."
"ती तोंडेच तर आपल्याला पाहायची आहेत. हेच तर त्या सर्वांना एप्रिल फूल आहे. हॅSS हॅSS हॅSS" असे सात मजली हास्य करीत रामभाऊंनी फोन ठेवला.
सायंकाळी साधारणपणे सातच्या सुमारास मी आणि रामभाऊ मिळूनच घाटपांडे यांच्या घरी गेलो. पाहतो तर काय, आमच्या गँगमधील इतर सर्वजण आधीच येऊन बसले होते आणि प्रत्येकाच्या हातात फराळाच्या प्लेट्स होत्या. सर्वजण हरीभाऊ घाटपांडे यांच्या प्लेट्सवर अगदी तुटून पडले होते. इतरही काहीजण होते. म्हणायला त्या फराळाच्या म्हणजेच अल्पोपहाराच्या प्लेट्स होत्या. पण हरीभाऊ स्वत:च्या हातांनी सर्वांना आग्रहाने पुन्हापुन्हा वाढीत होते. म्हणजे अल्पोपहार म्हणता म्हणता प्रत्येकाचे पोटभर जेवणच होत होते. हे सर्व दृश्य पाहून मी आणि रामभाऊ, दोघेही सर्दच झालो. हा काय प्रकार आहे, हे आम्हा दोघांनाही काहीच कळेना. आमच्याकडे लक्ष गेल्यावर घाटपांडेंनी आमचे हसून स्वागत केले.
"या. या. नाडकर्णीसाहेब. रामभाऊ चित्रे तुमचेही स्वागत आहे." आमच्या चेहऱ्यावरील आश्चर्याचे भाव पाहून घाटपांडे यांनी अगोदर त्यांच्या पत्नीला खुणेनेच अलीकडे बोलावून घेतले. कुमुदवहिनी घाटपांडेंच्या जवळ येऊन उभ्या राहिल्या आणि सस्मित नजरेने त्यांनी आमचे स्वागत केले. घाटपांडे सांगू लागले,
" आमच्या लग्नाचा आज पंचविसावा वाढदिवस आहे. पण मी ठरवलं होतं की, वाढदिवस वगैरे साजरा करायचा नाही.. फारतर दोघांनी मिळून एखाद्या मंदिरात जाऊन देवाचे दर्शन आणि आशीर्वाद घ्यायचे. पण कसचे काय नी कसचे काय!! आमचे चिरंजीव आणि सूनबाई, तसेच गावातच असलेली आमची कन्या आणि जावईबापू या सर्वांनी आम्हाला खबर लागू न देता आमचा वाढदिवस घरच्या घरी आणि फक्त जवळच्या नातेवाईकांना बोलावून साजरा करायचा असे परवाच ठरविले म्हणे. आज सकाळीच मला आणि कुमुदला हे कळले. म्हटलं, ठीक आहे. मुलांच्या उत्साहाला कशाला मोडता घालायचा. त्यादरम्यान आमच्या शाळेचा सखाराम शिपाई घरासमोरून जातांना दिसला. त्याला या कार्यक्रमाच्या संबंधाने काही काम सांगावे म्हणून बोलावले तर माझे काही ऐकण्याआधी तोच चाचरत, चाचरत म्हणू लागला, "सर, माझ्याकडून एक चूक झाली." असे म्हणून त्याने कालचा तुमचा तो निमंत्रणाचा किस्सा मला सांगितला. मी त्याला म्हटलं, 'एवढंच ना, मग घाबरतो कशाला. जे मला सुचलं नाही ते तू केलंस. छानच झालं.' बर ते जाऊ द्या. आपल्या गुलकंद कट्टा गँग मधील बाकी सारे आले. तुम्हा दोघांची मी वाटच पाहात होतो. तुम्हीसुद्धा आता या कार्यक्रमात सहभागी होऊन अल्पोपहराचा मनसोक्त आस्वाद घ्या."
असे म्हणून घाटपांडे पलीकडे गेले. मी आणि रामभाऊ खजील होऊन एकमेकांकडे पाहू लागलो. दरम्यान कुणीतरी आमच्या समोर आणून ठेवलेल्या अल्पोपहाराच्या प्लेट्सकडे हात जाण्याऐवजी आम्हा दोघांचेही हात खिशात आणलेल्या रिकाम्या पाकिटांकडे गेले आणि आम्ही जास्तच खजील झालो.

उद्धव भयवाळ
१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी
गादिया विहार रोड
शहानूरवाडी
औरंगाबाद ४३१००५
मोबाईल: ८८८८९२५४८८
email: ukbhaiwal@gmail.com

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED