उद्धव भयवाळ
औरंगाबाद
माझा फर्स्टक्लासचा प्रवास
मी कसा आहे हे मीच आपल्याला सांगितले पाहिजे असे काही नाही. आमच्या कॉलनीतील कुणालाही तुम्ही माझ्याबद्दल माहिती विचारली तर ती ऐकून मी एक साधा नाकासमोर सरळ चालणारा मध्यमवर्गीय गृहस्थ आहे, याची तुम्हाला खात्री पटल्याशिवाय राहणार नाही. हे झालं माझ्या स्वभावाविषयी.
मी दिसतो कसा याविषयी सांगायचे झाले तर माझा चेहरा हा आमच्या कॉलनीत एक वादाचा- चर्चेचा विषय आहे. (आता कुणाचा चेहरा चर्चेचा विषय व्हावा ही खरोखरच दुर्दैवाची गोष्ट आहे. पण ही गोष्ट आमच्या नशिबी आली त्याला नाईलाज आहे.) कॉलनीतील सज्जन माणसे म्हणतात की, माझा चेहरा भोळा, प्रामाणिक वाटतो, तर कॉलनीतल्या पोरींना माझा चेहरा बावळट वाटतो. एवढी एक चेहऱ्याची गोष्ट सोडली तर माझ्या स्वभावाविषयी म्हणजेच प्रामाणिकपणा, साधेपणा, याबद्दल चाळीतील सर्वांचे एकमत आहे.
एका सरकारी ऑफिसात मी कारकून असून पगार बेताचाच आहे. नोकरीला आता जवळजवळ पंचवीस वर्षे झालीत. नोकरी लागल्यावर दुसऱ्याच वर्षी लग्न झाले. पुढे मुलेबाळे झाली. थोडक्यात काय तर आजच्या धकाधकीच्या जीवनात कसातरी संसाराचा गाडा रेटणारा, सरळमार्गी जीवन जगणारा मी प्राणी आहे. सुदैवाने बायकोही बिचारी साधीभोळी मिळाली.
अशा मला एका दुर्धर प्रसंगाला तोंड देण्याची वेळ कशी आली त्याची ही गोष्ट. अगदी नवीनच नोकरी लागलेली होती तेव्हाची.
कधी काळी प्रवास करायचा प्रसंग आला तर रेल्वेच्या जनता क्लासमधील गर्दी, धक्काबुक्की, लोटालोटी , दरवाज्याला लोंबकळणे, पोरांना खिडकीतून आत ढकलणे, दादा लोकांनी अडवून ठेवलेली डब्यातील जागा असहाय पण आशाळभूत नजरेने पाहणे, "यमे, फिरकीचा तांब्या घेतला का?", "काकासाहेब, गेल्यावर पत्र धाडा", "बब्या, जरा जपून जा, तिकीट सांभाळून ठेवलं ना?", हे आणि असे कित्येक मजेदार संवाद ऐकणे, हे सर्व दिव्य करावं लागतं, तेव्हा कुठे आपण आपल्या इच्छित स्थळी पोहोचतो. या सर्व गोष्टी माझ्या (आणि माझ्यासारख्या इतर अनेक जनता क्लासच्या लोकांच्या अंगवळणी पडल्या आहेत.)
पण एक दिवस अजब घटना घडली. मी सकाळी ठीक साडेदहा वाजता ऑफिसमध्ये गेलो.
अटेन्डन्स रजिस्टरमध्ये सही केली. ऑफिसमधले इतर बरेचसे सहकारी देखील आपापल्या खुर्चीवर स्थानापन्न झाले होते. सर्वांकडे सस्मित नजर फिरवित मी माझ्या टेबलकडे वळणार इतक्यात शेजारचे नाडकर्णी म्हणाले, "कुलकर्णी, बॉस तुमची आठवण करीत होते. काहीतरी महत्त्वाचं काम दिसतंय. ऑफिसमध्ये पाय ठेवल्याबरोबर 'कुलकर्णी आलेत का?' म्हणून विचारीत होते." हे ऐकताच मी माझ्या टेबलाकडे वळण्याऐवजी साहेबांच्या केबिनकडे वळलो. तेव्हा केबिनच्या दाराशी उभ्या असलेल्या सखाराम शिपायाने विशिष्ट तऱ्हेने डोळे मिचकावले आणि दारावरचा पडदा बाजूला सारून आत जाण्यासाठी मला रस्ता मोकळा करून दिला. मी आत गेलो. साहेब काहीतरी वाचण्यात गर्क होते. मी त्यांना नमस्कार करून माझ्या अस्तित्वाची जाणीव करून दिली.
"नमस्कार, या कुलकर्णी, मी तुमचीच वाट पाहत होतो. ऑफिसच्या एका महत्त्वाच्या कामासाठी तुम्हाला मुंबईला पाठवायचे आहे. तिथे दोन दिवसांचे काम आहे. आजच तुम्हाला रिलिव्ह करतो. हे वाचा म्हणजे तुम्हाला तुमच्या कामाचे स्वरूप कळेल." असे म्हणून साहेबांनी दोन-तीन कागद माझ्यापुढे सरकवले आणि साहेब पुढे बोलू लागले, "प्रवास रेल्वेच्या
फर्स्टक्लासमधून करायचा. प्रवासासाठी काय अडव्हान्स लागेल तो तुम्ही घेऊ शकता. मात्र फर्स्टक्लासच्या तिकिटांच्या मनीरिसीट्स आणायला विसरू नका म्हणजे झाले. कारण पुढे त्या रिसीट्स तुमच्या प्रवास बिलास (टी.ए.बील) जोडण्यास उपयोगी पडतील. ओ.के." असं म्हणून साहेबांनी कुठलीशी फाईल चाळण्यास सुरुवात केली. मी माझ्या हातात सर्व महत्त्वाचे कागद घेऊन केबिनच्या बाहेर पडलो व माझ्या टेबलापाशी येऊन बसलो. ऑफिसच्या कामासाठी परगावी जायला मिळतंय या गोष्टीपेक्षाही फर्स्टक्लासने प्रवास करायला मिळणार या गोष्टीमुळे माझा आनंद गगनात मावेना. माझ्या इतर सहकाऱ्यांनी माझ्याभोवती घोळका केला. मी फर्स्टक्लासमधून प्रवास करणार हे ऐकून सर्वांना खूप आनंद झाला. सर्वांनी माझे अभिनंदन केले. आमच्या ऑफिसातील स्टेनो कुमारी पिंपळे हिने तर कहरच केला. आजपर्यंत माझ्या बावळट (?) चेहऱ्याकडे कधी ढुंकूनही न पाहता बेलबॉटम प्यांट व चट्टेरीपट्टेरी बुश शर्ट घालणाऱ्या आणि केसांची झुलपे वाढवलेल्या पी. कुमारशी (या पी. कुमारचं खरं नाव पंढरीनाथ, पण त्याच्या पोशाखाला आणि केसांच्या ठेवणीला म्हणे ते नाव बरोबर वाटत नव्हतं म्हणून त्यानं पंढरीनाथचा पी. कुमार केलाय) लाईन मिळवत होती. पण मी फर्स्टक्लासने जाणार हे समजताच लचकत, मुरडत (तीन लचके आणि दोन मुरडे) माझ्यापाशी येऊन मला खेटून उभी राहिली आणि म्हणते कशी, "म्हटलं,फर्स्टक्लासनं प्रवास करतांना आम्हाला विसरू नका म्हणजे झालं."
एकेकाळी शरीराने धडधाकट असलेले पण दिवसातून पंधरा - पंधरा कप चहा ढोसून खप्पड झालेले आमचे हेडक्लार्क पेडगावकर यांना अशावेळी माझ्याकडून चहा उकळण्याची आयतीच संधी मिळाली. "हं, मग काय कुलकर्णी, तुम्ही फर्स्टक्लासने जाणार तर. चला मग चहा तरी मागवा." असं म्हणून त्यांनी तपकिरीची डबी उघडून दोन बोटांनी तपकिरीची चिमूट स्वत:च्या नाकात कोंबली. मीही मग झोकामध्ये शिपायाकरवी चहा मागवून सर्वांना खूष करून टाकलं.
प्रवासाची तयारी करणे आवश्यक होते म्हणून मी साहेबांची परवानगी घेऊन जरा लवकरच घरी आलो. मी ऑफिसच्या कामासाठी फर्स्टक्लासने मुंबईला जाणार ही आनंदाची बातमी मी सौ.ला सांगितली. तेव्हा ती इतकी खुश झाली की काही विचारू नका. एरव्ही ऑफिसातून संध्याकाळी घरी आल्यावर कपभर चहासाठी तासभर ताटकळत ठेवणारी माझी सौ. त्या दिवशी शिरा आणि पोह्यांनी भरलेल्या प्लेट्स घेऊन पंधरा मिनिटात समोर आली. पलंगावरच्या गादीवर असलेली मळकी चादर उगीचच साफ केल्यासारखी करीत ती म्हणाली,
"का हो, असं केलं तर नाही का चालणार?"
"कसं?" मी विचारलं.
"तुम्ही फर्स्टक्लासने जाणार आणि फर्स्टक्लासनेच परत येणार. म्हणजे एकूण फर्स्टक्लासची दोन तिकीटे लागणारच. मग असं करू या ना. मीही येते तुमच्यासोबत मुंबईला. दोघांची दोन तिकीटे काढू फर्स्टक्लासची. म्हणजे फर्स्टक्लासच्या प्रवासात किती मजा असते ते तरी कळेल मला. येतांना आपण स्वखर्चाने साध्या वर्गाच्या डब्याने परत येऊ. एरव्ही तरी तुमच्या ऑफिसतर्फे तुमचा जाण्यायेण्याचा फर्स्टक्लासचा खर्च तुम्हाला मिळणारच आहे. त्यामध्ये आपण दोघे फर्स्टक्लासने जाऊ. एकूण दोन तिकिटांचाच खर्च येणार. झालं."
अच्छा तर मघाच्या शिरा-पोह्यांचा हिसका मला आता कळला होता. जणू काय मी तिला मुंबईला नेणारच आहे असा भाव चेहऱ्यावर आणून मी विचारलं,
"पण मग आपल्या बंडूला आणि चिंगीला कोण सांभाळणार?" (बंडू वय वर्षे सात, चिंगी वय वर्षे पाच.)
"त्यांची तुम्ही नको काळजी करायला. दोन दिवस राहतील शेजारच्या यमूताईकडे. त्या नव्हत्या का आचार्य रजनीशांच्या दर्शनाला गेल्या पुण्याला तेव्हा त्यांच्या मंगलाला मी चांगलं चार दिवस सांभाळलं म्हटलं."
तिचे सगळे म्हणणे ऐकून घेतल्यावर मी तिला मुंबईला कसा घेऊन जाऊ शकत नाही हे सर्व समजावून सांगितल्यावर ती एका अटीवर घरी राहण्यास तयार झाली. ती अट म्हणजे तिला मुंबईहून सुंदरशी पर्स घेऊन येणे. मी या गोष्टीला एका पायावर तयार झालो.
रात्रभर आवराआवर करून सकाळी मी लग्नातला एकमेव सूट अंगावर चढवला आणि सौ.चा व मुलांचा निरोप घेऊन स्टेशन गाठले. एरव्ही तिकीटासाठी लांबच लांब रांगेत उभा राहिलो असतो पण त्या दिवशी सरळ आत जाऊन फर्स्टक्लासचे तिकीट घेतले. तिकीट घेऊन
प्लाटफॉर्मवर आलो तर आमच्या चाळीतले देशमुख भेटले. ( हे देशमुख रोज नोकरीसाठी शेजारच्या गावी रेल्वेने जाणे-येणे करतात.) मला पाहून ते म्हणाले,
"या कुलकर्णी, आपण एकाच डब्यात बसू."
मी नकारार्थी मान हलवीत त्यांना म्हटलं, "मी ऑफिसच्या कामासाठी फर्स्टक्लासने मुंबईला जात आहे." यावेळी 'फर्स्टक्लासने' हा शब्द उच्चारतांना मी उगीचच कॉलर ताठ केल्यासारखे केले.
आगगाडी स्टेशनात आल्यानंतर मी फर्स्टक्लासचा डबा शोधून आत जाऊन बसलो. डब्यात चार कॅबिन होते. त्यापैकी एका कॅबिनमध्ये मी जाऊन बसलो. कॅबिनच्या आतील भागातील शाही इतमाम पाहून 'फर्स्टक्लासचा डबा तो हाच' याची खात्री पटली. एरव्ही गर्दीमध्ये धक्काबुक्की करून जेमतेम एका पायावर उभा राहण्यास जागा जरी डब्यात मिळाली तरी खुश होणाऱ्या मला आज पूर्ण डबा रिकामा पाहून आश्चर्य वाटावे यात नवल ते कसले. समोरच्या बर्थवर गंजीफ्रॉक व चट्टेरीपट्टेरी पायजमा नेसलेला आणि टक्कल पडलेला एक वयस्कर गृहस्थ बसला होता. तो कसलेसे पुस्तक वाचत होता. हाच माझा त्या डब्यातील एकमेव सहप्रवासी होता. असा संपूर्ण डबा रिकामा पाहून क्षणभर असाही विचार मनात चमकून गेला की, पोराबाळांना व बायकोला आणून सर्वांना एकदमच असा बसून प्रवास घडवावा. कारण एरव्ही थर्डक्लासमध्ये (आताचा सेकंडक्लास ) नेहमी उभ्यानेच प्रवास करावा लागतो. पण गाडी चालू झाल्यामुळे आणि "हा डबा फर्स्टक्लासचा आहे तेव्हा पोराबाळांचे व बायकोचे फर्स्टक्लासचे भाडे आपणास परवडणार नाही" हे लक्षात आल्यामुळे मी तो विचार तिथेच सोडून दिला.
गाडी चालू झाल्यानंतर मी डब्याच्या आतील भागाकडे बारकाईने पाहू लागलो. आपल्या नेहमीच्या डब्यात आणि या फर्स्टक्लासच्या डब्यात काय फरक आहे हे मला पहायचे होते. दोन्ही डब्यांची तुलना मी मनातल्या मनात करू लागलो. फर्स्टक्लासच्या डब्यातील मऊ, नरम गाद्या, निळा नाईट }@he, सीटच्या बाजूला सिगरेटची थोटकं टाकण्यासाठी ठेवलेला अश् ट्रे, मासिकं, वर्तमानपत्र ठेवण्यासाठी असलेला शेल्फ, या सर्व गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या. मी हपापल्यासारखं सर्व काही पाहत होतो. गाडी चाललीच होती. माझ्यासमोर बसलेल्या त्या गंजीफ्रॉकवाल्या माणसानं का कोण जाणे, स्वत:च्या हातातील पुस्तक बाजूला ठेवून मला विचारलं, "कुठं जाणार आपण?" मी म्हटलं, "मी मुंबईला चाललोय."
"तिकीट दाखवा आपलं." तो म्हणाला. कदाचित माझा बावळट चेहरा (आमच्या कॉलनीतल्या पोरींच्या म्हणण्याप्रमाणे) आणि हपापल्यासारखे इकडे तिकडे पाहणे यामुळे त्याला शंका आली असावी. हा 'जनता क्लास'चा माणूस चुकून फर्स्टक्लासच्या डब्यात बसला की काय असे त्याला वाटले असावे.
एरव्ही मी थर्डक्लासच्या डब्यात {म्हणजे आताचा सेकंड क्लास} बसलो असतांना कुणीही मला माझे तिकीट विचारले असते तर त्याला तिकीटचेकर समजून मी नम्रपणे तिकीट काढून दाखवले असते. पण यावेळी का कोण जाणे, (फर्स्टक्लासमध्ये बसल्यामुळे असेल कदाचित) मी एकदम विचारले, 'आपण कोण मला तिकीट विचारणारे?' मी हे विचारताच त्या गृहस्थाने त्याच्या सूटकेसमधून दोन-तीन हिरव्या पिवळ्या रंगाची कार्डे काढून माझ्यापुढे टाकीत अगदी शांतपणे म्हटले, "मी खासदार आहे. या हिरव्या कार्डावर माझे ओळखपत्र आहे आणि या पिवळ्या कार्डावर रेल्वेने मला दिलेले अधिकारपत्र आहे. यानुसार मी आपणास तिकीट विचारू शकतो. मी मागच्या निवडणुकीत 'झुंबडगाव' मतदारसंघातून निवडून आलो आहे.
हे ऐकल्यावर मात्र मी त्या गृहस्थाला सर्व समजावून सांगितले आणि तिकीटही दाखविले. अगोदर अरेरावी केल्याबद्दल मी दिलगिरीही व्यक्त केली. नंतर त्याच्याशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यात वेळ कसा निघून गेला हे कळले देखील नाही. त्या गृहस्थाचे गाव आणि माझ्या धाकट्या भावाची सासुरवाडी एकच असल्याचे कळल्यामुळे गप्पा बऱ्याच रंगल्या. माझ्या भावाच्या श्वशुरांना तो गृहस्थ चांगले ओळखत होता. दरम्यान, त्या खासदाराने मला दिल्लीच्या त्याच्या निवासाचा पत्ता दिला आणि "काहीही अडचण असल्यास जरूर सांगा. तुमच्यासाठी मी जरूर प्रयत्न करीन." असेही तो म्हणाला. पुढच्या स्टेशनवर गाडी उभी राहिल्यावर आम्ही एकत्रच नाश्ता केला. चहा घेतला. दोन स्टेशन गेले की मुंबई येणार होती.
मध्यंतरी निसर्गाच्या हाकेला ओ देण्यासाठी मी आगगाडीतल्या शौचकुपात गेलो. थर्डक्लासच्या डब्यातील शौचकुपासारखेच हे फर्स्टक्लासमधील शौचकूप होते. काही विशेष फरक नव्हता. फक्त वरच्या बाजूला एक दीड-एक फूट लांबीची साखळी लोंबकळत होती. एरव्ही फ्लशच्या संडासात असते तशी ती साखळी असेल असा मी मनातल्या मनात अंदाज बांधला. सर्व विधी आटोपल्यावर मी 'शौचकूप स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने' ती साखळी ओढली. पाणी तर बाहेर आले नाहीच. उलट एका लयीत चालणारी आगगाडी एकदम थांबली. माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. ती साखळी धोक्याची होती. साखळीच्या बाजूला असलेल्या छोट्या पाटीकडे माझे लक्ष गेले. "विनाकारण साखळी ओढणारास पाचशे रुपये दंड आणि/ किंवा तीन महिने कैद." मी मटकन खालीच बसणार होतो. पण ते शौचकूप असल्यामुळे मी दार उघडून बाहेर आलो. पाहतो तर काय! माझ्या डब्यासमोर खूप गर्दी जमली होती. नुसता कल्लोळ माजला होता. तिकीटचेकर, गार्ड वगैरे रेल्वेचे अधिकारी डब्यात इकडून तिकडे फिरत होते. साखळी ओढणारा इसम याच डब्यात आहे याची त्यांना खात्री होती. डब्यात फक्त दोनच प्रवासी होते. एक ते खासदार आणि दुसरा मी. या डब्यात खासदारसाहेब बसलेले आहेत हे तर रेल्वे अधिकाऱ्यांना माहित होतेच.
या दरम्यान, तिकीटचेकर एका माणसास सांगत होता, 'कदाचित खासदारसाहेबांवर सुरीहल्ल्याचा प्रयत्न होत असावा आणि त्यासाठी त्यांनी साखळी ओढली असावी, असा माझा समज झाला. पण तसे काही नाही.'
मग सर्वांनी माझ्याकडे मोर्चा वळवला. काही बोलण्याअगोदर एका पोलिसाने माझ्या कपड्यांची झडती घेतली. "अगोदर तिकीट दाखवा" म्हणाला. मी त्याला आणि त्या तिकीटचेकरला तिकीट दाखविले तेव्हा तिकीटचेकरच्या चेहऱ्यावरील राग किंचित कमी झाल्यासारखा वाटला. तिकीटचेकरने मला थोड्या घुश्श्यातच साखळी ओढण्याचे कारण विचारले व त्याचा परिणाम काय होईल हे सांगितले. मला तर काहीच सुचेना. सारे जग जणू माझ्या भोवताली फिरत आहे असे वाटायला लागले. 'पाचशे रुपये दंड व तीन महिने कैद' हे शब्द सारखे माझ्या डोळ्यांपुढे नाचायला लागले. प्रेमळ बायकोची, गोजिरवाण्या मुलांची आठवण येऊ लागली. ऑफिसातले सहकारी आठवू लागले. फर्स्टक्लासच्या प्रवासाच्या धुंदीत त्या सर्वांना पाजलेला चहा आठवू लागला. पोलीसाने खिश्यातून डायरी काढून 'नाव काय तुमचं?' असं रागातच विचारलं, तेव्हा मी भानावर आलो. मी शक्य तितका केविलवाणा चेहरा करून खरी हकीकत सांगण्याचा प्रयत्न केला. (तितक्यात तिथे जमलेल्या 'पब्लिक' पैकी एकजण दुसऱ्यास सांगत होता, "फर्स्टक्लासच्या डब्यातील केविलवाण्या चेहऱ्याचा प्रवासी मी आयुष्यात आज प्रथमच पाहतोय.") पण का कोण जाणे, माझ्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. एव्हाना त्या डब्यातील खासदार तिथे आले होते. सारा प्रकार त्यांच्या लक्षात आला होता. मी मदतीच्या अपेक्षेने दीनवाण्या चेहऱ्याने त्यांच्याकडे पाहिले. तशाही स्थितीत काहीवेळेपूर्वीचे त्यांचे वाक्य मला आठवले, 'काहीही अडचण असल्यास अवश्य सांगा. तुमच्यासाठी मी जरूर प्रयत्न करीन.' इतक्या लवकर माझ्यावर अडचण येईल आणि त्यांची मदत घेण्याची माझ्यावर वेळ येईल असे मला वाटले नव्हते. पण दैवच फिरले तिथे काय इलाज?
त्या खासदारांनी तिकीट तपासनिसाला बाजूला नेऊन काहीतरी समजावून सांगितले आणि मलाही माझ्या चुकीबद्दल जरा रुबाबातच त्या चेकरसमोर व पोलिसासमोर समज दिली. तेव्हा कुठे ती सर्व मंडळी डब्यातून खाली उतरली व थोड्या वेळाने गाडी सुरू झाली. मी त्या खासदारसाहेबांचे खूप खूप आभार मानले आणि झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
त्यानंतर मात्र मुंबई कधी आली? मी कधी उतरलो? दोन दिवस मुंबईतील कामे कशी केली? हे माझे मलाच कळेना. गाडीतला तो प्रसंग सारखा डोळ्यापुढे येई. त्यामुळे परत येतांना मी सरळ रेल्वेस्टेशनवर जाऊन थर्डक्लास तिकीटवाल्यांच्या भल्यामोठ्या रांगेत सर्वांच्या पाठीमागे जाऊन उभा राहिलो आणि आपला नंबर कधी येतो त्याची वाट पाहू लागलो.
*******************
उद्धव भयवाळ
१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी गादियाविहार रोड शहानूरवाडी
औरंगाबाद ४३१००९
मोबाईल: ८८८८९२५४८८