Majhya prembhangachi kahani books and stories free download online pdf in Marathi

माझ्या प्रेमभंगाची कहाणी

माझ्या प्रेमभंगाची कहाणी 
 
एक तरुण मुलगा. नाव दीपक नगरकर. आई वडिलांना एकुलता एक. गोरा गोमटा, सहा फूट उंचीचा अन् बऱ्यापैकी देखणा. त्याचं वय आहे २८ वर्षे आणि तो एका मल्टी नॅशनल कंपनीमध्ये सॅाफ्टवेअर इंजिनीअर असून त्याचं पॅकेज आहे वर्षाला चोवीस लाख रुपये! वडिलांचाही मोठा बिझनेस आहे. आणि विशेष म्हणजे अजून हा दीपक अविवाहित आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे तो लग्नाळू आहे. अशा 'स्थळावर' वधुपित्यांच्या उड्या न पडल्या तरच नवल! नाही का?
वाचक मित्रांनो, वर मी ज्याचं वर्णन केलेलं आहे, तो तरुण दुसरा तिसरा कुणी नसून मीच आहे बरं. चकित झालात ना! कारण कुणी स्वत;चं असं वर्णन स्वत:च करील का? असा प्रश्न तुम्हाला पडला  असेल. पण हो, माझं हे वर्णन मीच करीत आहे. मी तरी काय करू? तशी वेळच आली आहे माझ्यावर.
तर सांगायचा मुद्दा म्हणजे उपवर मुलींच्या वडिलांनी आमच्या घरी रांगाच लावल्या. खरे म्हणजे माझी नवीन नोकरी असल्यामुळे मी इतक्यातच लग्न करण्याच्या मूडमध्ये नव्हतो. नोकरीमध्ये स्थिरस्थावर झाल्यावर लग्नाचे बघू असे मी घरी सांगितलेसुद्धा. पण आईने फारच हट्ट धरल्यामुळे तिच्यापुढे मला मान तुकवावी लागली. मग मी आईवडिलांच्या आग्रहानुसार नोकरीतून अधून मधून रजा काढून एखाद्या मित्राला सोबत घेऊन मुलगी पाहण्यासाठी म्हणून जाऊ लागलो. अर्थातच मी मुलगी पाहण्याआधी माझे आई-वडील तिथे जाऊन आलेले असत. कारण मी आईला आणि वडिलांना आधीच सांगून ठेवले होते की, "मला अशा कामासाठी कंपनीतून वारंवार रजा घेता येणार नाही. तुम्ही दोघे मुलगी बघून या आणि तुम्हाला सर्व दृष्टीने ती पसंत असेल तरच नंतर मी मुलगी बघायला जाईन." त्यांनाही माझे म्हणणे पटले. अनेक मुली मला सांगून आल्या. त्यापैकी अर्ध्या अधिक मुली तर माझ्या आई वडिलांनी परस्परच नाकारल्या. कारण माझ्या बाबांचा जन्मकुंडलीवर पक्का विश्वास. कधी एखाद्या मुलीची अन् माझी पत्रिका जुळत नसे तर कधी एखादी मुलगी उंचीने किंवा शिक्षणाने माझ्यापेक्षा खूपच कमी असे. मग काय बाबाच परस्पर नकार कळवून मोकळे होत. आईने जेव्हा मुलीबद्दलच्या माझ्या अपेक्षा मला विचारल्या तेव्हा मी आईला माझ्या अपेक्षा सांगून टाकल्या. मुलगी रंगाने गोरी, नाकीडोळी नीटस, कमीतकमी साडेपाच फूट उंचीची आणि किमान इंजिनियरिंगचा डिप्लोमा घेतलेली तरी असावी अशा माझ्या साध्या आणि सोप्या अपेक्षा होत्या. या सर्व अटींमध्ये बसणारी मुलगी आई-बाबा आधी पाहून येत. त्यांनी हिरवा कंदील दाखविल्यावर मी मुलगी पाहायला जात असे. पण का कोण जाणे, सर्व काही ठीक असूनही मला ती मुलगी क्लिक होत नसे. मग अर्थातच थोडे दिवस थांबून मुलीकडच्यांना आमच्याकडून नकार कळवला जाई. यामुळे झाले असे की, माझ्यामध्ये अन् बाबांमध्ये एक अदृश्य भिंत उभी राहिली. एकदा बाबांचे अन् आईचे संभाषण माझ्या कानावर पडले. संभाषण कसले! ते बाबांचे भाषणच होते. आई निमूटपणे ऐकत होती. 
"आपल्या राजकुमाराला एकही मुलगी पसंत पडेना. आता याला कुठली राजकुमारी किंवा परी हवी  आहे कोण जाणे. आपण सगळे पाहूनच मुलगी पसंत करतो ना, मग हे महाराज चक्क नकार देऊन कसे काय मोकळे होतात? समजवा जरा त्यांना." यावेळी बाबांचा आवाज चढलेला होता.
 माझ्यामध्ये अन् बाबांमध्ये आईचे बिचारीचे सँडविच होत असे. त्या दोघांनी पसंत केलेल्या मुलीला मी नकार दिला की आई खूप हिरमुसली होऊन जायची. पण माझाही इलाज नव्हता. मला मुलगी क्लिकच होईना, तर मी तरी काय करू?
 मी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये असल्यामुळे सारखा बिझी असायचो. तिथे रिकामा वेळ मिळणे खूप कठीण असे. तरीही मी वेळात वेळ काढून कधी कधी सोशल साईट्सवर थोडा वेळ रमत असे. फेसबूक ही तर माझी आवडती सोशल साईट. त्यामुळे माझे बरेच फेसबूक फ्रेंड्स मी केले. त्यामध्ये ज्याप्रमाणे मुले होती, त्याचप्रमाणे मुलीही होत्या. मात्र फ्रेन्डशिप रिक्वेस्ट देण्याआधी मी समोरच्याचा प्रोफाईल आधी वाचून घेत असे. फेसबूक फ्रेंड्सच्या स्टेटसना मी कधी लाईक करू लागलो तर कधी त्यावर कॉमेंट्स लिहू लागलो. कधी कधी तर एखाद्याशी चॅटिंग करण्यामध्ये वेळ कुणीकडे निघून जाई ते कळतही नसे. 
काम संपवून घरी गेलो की, कोणत्या तरी मुलीचे वडील आमच्याकडे येऊन, मुलीचा फोटो आणि जन्मपत्रिका ठेवून गेल्याचे आईकडून कळायचे. तसेच ते गृहस्थ न चुकता मुलगी पाहायला येण्याचे निमंत्रण देऊन गेलेले असायचे. माझे बरेच विकेंड हे मुली पाहण्यातच खर्च व्हायचे.
मी दर गुरुवारी दिवसभर कडकडीत उपवास करायचो आणि रात्री घरी आल्यावरच उपवास सोडायचो. ऑफिसमध्ये गुरुवारी फक्त चहाच घ्यायचो. असंच एका गुरुवारी मी लंच ब्रेकच्या वेळी काही खायचं नसल्यामुळे माझ्या केबीनमध्ये एक कप कॉफी मागवून कॉफीचे घोट घेत घेत लॅपटॉपवर फेसबूक उघडून बसलो असतांना माझ्या अकाऊंटवर एक अत्यंत सुंदर सुविचार दिसला. 
"मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागवणे जास्त श्रेष्ठ..."
'वा! क्या बात है!!' माझ्या तोंडून सहज उद्गार बाहेर पडले.
तो सुविचार मला खूपच आवडला. सुविचार कुणी टाकला ते बघितले तर कुणी कमला गेवराईकर नावाच्या मुलीने तो पोस्ट केला होता. उत्सुकतेपोटी मी त्या कमलाचे प्रोफाईल वाचले अन् एकदम इम्प्रेस झालो. कमलाने नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून एम. ए. मराठी केले होते. वय होते २७ वर्षे आणि प्रोफाईल फोटो म्हणून करीना कपूरचा फोटो तिथे झळकत होता. एकदम भारल्यागत मी तिला फ्रेंडशिप रिक्वेस्ट टाकली अन् काही वेळातच कमलाने माझी मैत्री स्वीकारलीसुद्धा. मला खूप आनंद झाला. नंतर जेव्हा जेव्हा मला वेळ मिळत असे तेव्हा तेव्हा मी फेसबुकवर माझे पेज उघडून तिच्या पोस्ट वाचू लागलो. मला तो एक छंदच जडला. पुढे एकदा तीसुद्धा फेसबुकवर आहे असे पाहून मी चॅटसाठी तिला इन्व्हाईट केले; आणि काय आश्चर्य लगेच आमचे चॅटिंग सुरू झाले.
" मी तुला अगं, तूगं केलं तर चालेल ना?"
" हो हो. चालेल नाही, आवडेल. आणि मीसुद्धा तुला अरेतुरेच करणार आहे."
 " ओके. ओके. नो प्रॉब्लेम. बाय द वे, तू काय करतेस?"
" मी घरीच असते. मला कविता करण्याचा छंद आहे."
"गूड. तू तर माझा बायोडाटा वाचला असशीलच. मी एका कंपनीत इंजिनिअर आहे."
"हो, माहित आहे मला. मी अगोदरच तुझ्याविषयी सगळं वाचून ठेवलंय"
" अरे वा! हे कशामुळे?"
" तू मला खूप आवडलास.."
" मला न पाहताच?"
'' तुझा प्रोफाईलवरचा फोटो कित्ती छान आहे म्हणून सांगू. तू राजबिंडा आहेस हे मी लगेच ओळखले."
" अरे वा! छानच झाले हे तर. तू फेसबूकवर तुझा फोटो का नाही टाकला?"
"माझ्या बाबांना नाही आवडत म्हणून नाही टाकला."
"घरी कोण कोण असतं?
" मी, माझे बाबा आणि आई"
" बाबा काय करतात?"
" ते एका सरकारी नोकरीतून निवृत्त झालेत. घरीच असतात."
"ओ.के. भेटू पुन्हा."
" हो. पण लवकर लवकर भेटत जाऊ."
"बSSरं बाई, तू म्हणशील तसं."
फेसबुकवरच्या पहिल्याच भेटीत आम्हा दोघांमध्ये इतकी जवळीक निर्माण होईल असे मला वाटले नव्हते. पण कमला खूपच गोड आणि सुंदर मुलगी असावी हे मी कल्पनेनेच ताडले.
 फेसबूकवर का होईना पण कमलाला भेटल्याशिवाय मला चैन पडेना. दिवसेदिवस आमचे चॅटींग जोरात होऊ लागले. तिला न पाहताही कमला मला आवडू लागली. मी तिच्या प्रेमातच पडलो म्हणा ना! मी एक दिवस तिच्याशी चॅटींग करतांना माझ्या घरच्या पत्त्यावर तिला तिचा फोटो पाठवण्याची विनंती केली. तेव्हा "काही तरीच तुमचं" असे म्हणून ती लॉग आउट झाली. यावेळी ती किती आणि कशी लाजली असेल याची मी मनोमन कल्पना केली. तिने मला वेडच लावले होते जणू.
स्त्रीच्या नकारातच होकार असतो हे मी कुठे तरी वाचले होते म्हणून ती मला तिचा फोटो नक्की पाठवील असे वाटले होते. "आता लग्न करायचे तर हिच्याशीच" असेच माझे मन म्हणू लागले. त्यामुळे इतर मुली बघण्यात मला स्वारस्य वाटेना. माझ्या स्वभावातील बदल कदाचित आईच्या लक्षात आला असावा म्हणून ती मला मुलगी पाहायला जाण्याचा आग्रह करेनाशी झाली. वडिलांनाही तिने तसे सांगितले असावे. कारण वडील जेव्हा तिला म्हणाले की, "चिरंजीव मुली पाहण्यामध्ये इंटरेस्ट दाखवीत नाहीत. काय गोष्ट आहे?"  तेव्हा आई म्हणाली," अहो, कामापुढे त्याला काहीच दिसत नाही. अजून कुठे त्याचे एवढे वय झाले? " मी जेव्हा त्यांचा हा संवाद ऐकला, तेव्हा मला आनंद झाला. चांगली संधी पाहून मी माझ्या मनातील गोष्ट त्यांना सांगणारच होतो. 
कमलाने फोटो पाठवलाच नाही. त्यामुळे एक दिवस तिच्याशी चॅट करतांना तिला मी तिचा मोबाईल नंबर मागितला आणि तिने तो त्वरेने दिला. माझा पण मोबाईल नंबर मी तिला दिला. पुढे एक दिवस मी तिच्या मोबाईलवर संपर्क साधला तेव्हा तिचा मंजुळ आवाज ऐकून तर माझ्या कानात जणू घंट्याच  वाजल्या. मी त्यावेळच्या माझ्या मनस्थितीचे शब्दांमध्ये वर्णन करूच शकत नाही. इतका गोड आणि मंजुळ आवाज असू शकतो एखाद्याचा? वा रे वा! मला जेव्हा कधी कामातून थोडीशीही फुरसत  मिळाली की मी तिच्याशी मोबाईलवर बोलत बसे. मला खूप आवडायचा तिचा आवाज. तिच्या आवाजाने मी वेडा झालो होतो. तिला कधी भेटतो असे झाले मला. तिला मी एक दिवस तिच्या घराचा पत्ता विचारला तर काही न बोलता तिने फोन बंद केला. मी पुन:पुन्हा प्रयत्न केला पण व्यर्थ. पुढे फेसबूकवरही ती दिसेना. मी कासावीस होऊ लागलो.तशातच एक दिवस रविवारी सकाळी घरी वर्तमानपत्र चाळू लागलो तेव्हा अचानक एका कवितेवर माझे लक्ष गेले. कवितेचे नाव होते, "अंतरीचे गूढ". मी कविता वाचू लागलो.
 
तुझ्या माझ्या नात्याला मी काय नाव देऊ 
मला असे झाले सख्या, कुठे तुला ठेवू

तुझ्या माझ्यामध्ये ही कुठली भिंत आली
मीलनाच्या आधीच कशी ताटातूट झाली 

माझ्या मनीची वेदना कशी तुला दावू 
मला असे झाले सख्या, कुठे तुला ठेवू 

मला तुझी, तुला माझी, ओढ खूप लागे
नवरी होऊन चालावेसे वाटे तुझ्या मागे 

पण अंतरीचे गूढ एक कसे तुला दावू 
मला असे झाले सख्या, कुठे तुला ठेवू 

कवितेच्या खाली नाव वाचून मी तर पागलच झालो. नाव होते, कमला गेवराईकर. ही कविता वाचून कधी तिला भेटतो असे झाले मला. माझी पक्की खात्री होती की कमलाने ही कविता माझ्यासाठीच लिहिली होती. पण मग कवितेमध्ये ही ताटातुटीची भाषा कशासाठी? आणि अंतरीचे गूढ कोणते ? मला तर काहीच सुचेना. मी तिला त्वरित फोन लावला पण तो स्वीच ऑफ येऊ लागला. काय करावे काही कळेना. मग एकदम माझ्या लक्षात आले की, या वर्तमानपत्राच्या कार्यालयात माझा बालपणीचा मित्र भीमराव काम करतो. रविवार पुरवणीचे काम तोच बघायचा. बरेच दिवस झाले, त्याच्याशी माझा संपर्कच नव्हता. त्याचा फोन नंबरही माझ्याकडे नव्हता. त्याला प्रत्यक्ष भेटल्यावरच मला कमलाचा पत्ता मिळू शकेल अशी मला खात्री होती. म्हणून मी त्या वृत्तपत्राच्या ऑफिसमध्ये फोन लावून भीमरावविषयी विचारणा केली. त्याची ड्यूटी दुपारी चारनंतर होती. त्यामुळे मी चार वाजेपर्यंत कसाबसा दम धरला आणि चार वाजता त्या वर्तमानपत्राच्या ऑफिसचा रस्ता धरला.
त्या वर्तमानपत्राच्या कार्यालयात पोचल्यावर थोड्याच अवधीत भीमरावशी माझी भेट झाली. एकमेकांना भेटून आम्हा दोघांनाही खूप आनंद झाला. त्याने मला तिथल्या कॅन्टीनमध्ये चहासाठी नेले. त्याने चहाची ऑर्डर दिल्यानंतर आम्ही एकमेकांची ख्यालीखुशाली विचारली.  दरम्यान चहा आला. चहा घेत घेत त्याने मला असे अचानक येण्याचे कारण विचारले. मीसुद्धा इतका वेळ मोठ्या प्रयासाने मनामध्ये दाबून ठेवलेला प्रश्न त्याला विचारला. शक्यतो नॉर्मल चेहरा ठेवत मी त्याला म्हटलं, "आजच्या अंकातली 'अंतरीचे गूढ' ही कविता खूपच छान आहे. त्या कवयित्रीचा पत्ता मला हवा होता, म्हणून मी आलो."
" तुला कशाला हवा तिचा पत्ता?" भीमरावने विचारले. मग मी त्याला मागील काही दिवसात घडलेला सर्व वृत्तांत थोडक्यात सांगितला. मी त्याला म्हटलं,
" माझ्या आईवडीलांच्या आग्रहाखातर मी अनेक मुली बघितल्या. तरी मला आता या कमलाशीच लग्न करायचे आहे, तिने माझ्यावर काय जादू केली ते मला माहित नाही. तिला मी प्रत्यक्ष पाहिलेसुद्धा नाही. पण माझा आता ठाम निर्णय झाला आहे. मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. तिला प्रत्यक्ष भेटल्यानंतर माझ्या आईबाबांना मी माझा हा निर्णय सांगणारच आहे."
मी भीमरावला हे सर्व सांगत असतांना त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचत होतो. सुरुवातीला त्याच्या चेहऱ्यावर कुतुहलाचे आणि नंतर आश्चर्याचे भाव दिसले आणि माझे बोलणे पूर्ण होण्याच्या आतच तो एकदम मोठ्याने हसायलाच लागला. त्यामुळे मी त्रस्त झालो. तो का हसतोय हे मला काहीच कळेना. 'कदाचित कमला विवाहित तर नसेल? किंवा तिचे लग्न तर ठरले नसेल? असे नानाविध प्रश्न त्या दोन क्षणात माझ्या मनात येऊन गेले. मी त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहू लागलो. त्याचे हसणे पूर्ण झाल्यावर त्यानेच बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला, "ऐक दीपक, तू माझा बालपणीचा मित्र आहेस. तू मला आत्ता जे काही सांगितलं, ते मला सगळं समजलं. तुझ्या भावनाही कळल्या. तू त्या कमलासाठी वेडा झाला आहेस, हे तुझ्या बोलण्यातून आणि देहबोलीतून मला समजलं. पण मी काय सांगतो, ते आता नीट ऐक. तुझ्या भावना मी दुखवू इच्छित नाही. पण वास्तव हे वास्तव आहे. दिल थामके बैठो मेरे दोस्त. तुला जिचा पत्ता हवा आहे, ती,"ती" नसून "तो" आहे, असं मी तुला सांगितलं तर?"
" म्हणजे? मी नाही समजलो." 
" अरे माझ्या राजा, मी ज्या भागात राहतो त्याच भागात तुझी ती कमला राहते. आमचे आणि गेवराईकर कुटुंबाचे अनेक वर्षांपासून चांगले संबंध आहेत. हरिहरराव गेवराईकर मागेच एका सरकारी नोकरीतून निवृत्त झालेत. त्यांचा हा कमलाकर नावाचा एकुलता एक पण एका अर्थाने पूर्णपणे वाया गेलेला मुलगा आहे. लहानपणापासून त्याचे वागणे पूर्णपणे स्त्रियांसारखेच आहे. त्याचा आवाजही बारीक आहे. लहानपणीसुद्धा तो मुलांमध्ये खेळण्याऐवजी मुलींमध्येच रमायचा. भातुकलीचे खेळ खेळायचा. हरिहररावांनी अनेक डॉक्टरांना दाखविले. थेट मुंबईपर्यंत जाऊन आले. पण याच्या वागण्यात काही फरक पडला नाही. शाळेत होता, छोटा होता, तेव्हा काही वाटले नाही. पण कॉलेजमध्ये गेल्यावर मुले चिडवू लागली. मुलीही त्याच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहू लागल्या. त्यामुळेच त्याच्या वडिलांनी त्याचे नाव कॉलेजमधून काढून टाकले. त्याने घरी बसूनच अभ्यास करून मुक्त विद्यापीठातून पदवी घेतली. तसा तो हुशार आहे. पण वागणूक सगळी अशी आहे. कधी स्वत:ला कमला म्हणवतो व दिवसभर साडी नेसून बसतो. तर कधी तो स्वत:ला कमलाकर समजतो आणि पुरुषासारखा वागू पाहतो. आपल्या गावाकडच्या भाषेत सांगायचं झालं तर "तो माणसात नाही" एवढंच मी सांगू शकतो. काय समजायचे ते समज आता. त्याचे आईवडील त्याच्या या अशा वागण्यामुळे खूप त्रस्त आहेत. त्यांचा भविष्यकाळ त्यांना अंध:कारमय वाटतोय. जे आहे ते सारं असं आहे. नकळत का होईना, तुझ्या भावनांशी तो खेळला. पण तू या सर्व भूतकाळातून लवकर बाहेर ये, अशी मी तुला एक मित्र म्हणून कळकळीची विनंती करतो. दॅट्स ऑल." भीमरावकडून हे सर्व ऐकतांना मला तर गरगरायलाच लागलं. नंतर नंतर तर जणू मला काही ऐकूच येईना, असं झालं. माझी मनस्थिती पाहून भीमरावने मला खूप धीर दिला, पिण्यासाठी पाणी दिले. पाणी प्यायल्यावर मला जरा बरे वाटले. हा धक्का माझ्यासाठी खूप मोठा होता. पण मीच मनाला समजावले की, "फेसबूकच्या आहारी गेल्यामुळे मी सारासार विचार करण्याची शक्ती हरवून बसलो आणि हा प्रसंग माझ्यावर स्वत:च ओढवून घेतला. याचा अर्थ, दोष इतर कुणाचाच नसून खरा दोषी मीच आहे." पण भीमरावचा निरोप घेऊन निघतांना एक ठाम निर्णय मात्र मी घेतला. तो म्हणजे, लवकरात लवकर या धक्क्यातून बाहेर पडायचे आणि आईवडील पसंत करतील त्या मुलीशी विवाहबद्ध व्हायचे. या विचारासरशी मला तरतरी आली आणि मी गाडीला किक मारून घरचा रस्ता धरला.
******** 
  


     उद्धव भयवाळ 
     १९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी 
     गादिया विहार रोड 
     शहानूरवाडी 
     औरंगाबाद ४३१००५ 
     मोबाईल: ८८८८९२५४८८
           email: ukbhaiwal@gmail.com 

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED