उद्धव भयवाळ
औरंगाबाद
सुधाकर आणि त्याची बायको
(विनोदी कथा)
आमच्या कॉलनीमधील सुधाकर आणि त्याची बायको मंदा हे दोघेही आता घटस्फोटाच्या किनाऱ्यावर उभे आहेत हे आमच्या कॉलनीतील लहान मुलापासून तर मोठ्या माणसापर्यंत आणि लहान मुलीपासून तर मोठ्या बाईपर्यंत सर्वांना कळून चुकले होते. त्यामुळे त्या प्रत्येकाला आणि त्या प्रत्येकीला आता असे वाटत होते की, सुधाकर आणि मंदा आता कोणत्याही क्षणी घटस्फोटासाठी अर्ज करून एकमेकांपासून विभक्त होतील. म्हणूनच अलीकडे कॉलनीमधील बायकांना तिसऱ्या प्रहरी एकत्र आल्यावर चघळायला हा अगदी हलवायाच्या कढईमधील गरमागरम जिलबीसारखा अगदी ताजा आणि खुसखुशीत विषय मिळाला होता.
सुधाकर आणि मंदा यांच्या लग्नाचा दहावा वाढदिवस नुकताच साजरा झाला होता; आणि त्याच्या काही दिवस अगोदरपासूनच दोघांमधील बेबनावाला धार चढली होती. मंदा जर 'चिंच' म्हणाली तर सुधाकर 'आंबा' म्हणायचा अन् सुधाकर "चिंच" म्हणाला तर ती "आंबा" म्हणायची. एकमेकांना पाण्यात पाहण्याची दोघांचीही सवय इतकी टोकाला गेली की, एकदा मंदाला आपण गरोदर असल्याचा भास झाला आणि तिने सुधाकरला ह्या भासाबद्दल काही न सांगता फक्त सांगितले की, "मला चिंचा खाव्याशा वाटतात" तर सुधाकरने चक्क आंबे आणून ठेवले! का कोण जाणे पण त्या दोघातील बेबनाव लग्नाच्या वाढदिवसापासून अधिकच तीव्र झाला.
अद्याप त्यांच्या संसारवेलीवर अपत्यरूपी फूल उमललेले नव्हते. याची त्या दोघांनाही अर्थातच खूप खंत होती. त्या दोघांनीही अनेक वेगवेगळ्या डॉक्टरांना आपली प्रकृती दाखवली होती. दोघांच्याहीमध्ये अपत्यप्राप्तीच्या दृष्टीने कुठलाही दोष नव्हता. तरीही त्यांना अद्याप अपत्यप्राप्तीचा आनंद उपभोगता येत नव्हता ही मात्र वस्तुस्थिती होती. याठिकाणी तुम्ही वाचक मंडळी आपल्या तर्काचे लेबल लावून " संतती नाही म्हणून ते दोघे एकमेकांना दोष देत असतील आणि त्यामुळेच या दोघांनी घटस्फोटाची वेळ स्वत:वर ओढवून आणली असेल" असे म्हणून मोकळे व्हाल. तसे लेबल लावण्यात तुम्ही काही चूक करताय असेही मी अजिबात म्हणणार नाही. कारण हा तर मनुष्य स्वभावच आहे, नाही का? त्यामुळेच तर आमच्या कॉलनीतील समस्त तथाकथित कामसू पण खऱ्या अर्थाने रिकामटेकड्या स्त्रीवृन्दासही प्रथमदर्शनी असेच वाटले होते. पण अशाच एका तिसऱ्या प्रहरी चकाट्या पिटत बसलेल्या स्त्रीवर्गास "सुधाकर आणि मंदा यांच्यातील बेबनावाचे कारण अपत्यप्राप्ती न होणे हे नसून पूर्णत: वेगळेच आहे" असे जेव्हा रमाबाईनी सांगितले तेव्हा "तुम्हाला ही नवीन बातमी कुठून कळली?" असे विचारण्याचे धाडस एकीनेही न दाखवता रमाबाईंच्या सांगण्यावर विश्वास दाखवून नुसत्या माना डोलावल्या. {रमाबाईंच्या गोष्टीवर विश्वास बसणे न बसणे ही गोष्ट अलाहिदा.} कारण त्यांना तसे विचारणे म्हणजे स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे होईल हे प्रत्येकीला ठावूक होते. रमाबाईंचा दराराच तसा होता. कारण त्यांना आमच्या कॉलनीतील सारेजण 'गुप्तहेर' म्हणायचे. रमाबाईंनी स्वत:ची जाणीवपूर्वक अशी प्रतिमा कॉलनीमध्ये तयार करून ठेवली होती. याचाच अर्थ, रमाबाईंनी कुठलीही बातमी सांगितली तरी त्या बातमीला काहीतरी "बेस" असतो, असा कॉलनीतील साऱ्यांनाच विश्वास ठेवावा लागत असे. त्यामुळेच रमाबाईंनी सुधाकर आणि मंदा यांच्यातील बेबनावाचे कारण 'वेगळेच' आहे, असे जेव्हा सांगितले तेव्हा कुणीही काहीही शंका घेतली नाही. तरीही मालतीबाईंनी जेव्हा हिय्या करून रमाबाईंना विचारले की,
"सुधाकर आणि मंदा यांच्यातील बेबनावाचे ते 'वेगळे' कारण कोणते?"
तेव्हा अगदी खऱ्याखुऱ्या, कसलेल्या गुप्तहेराप्रमाणे रमाबाई म्हणाल्या, "त्याचा शोध घेणे चालू आहे."
एवढे बोलून त्या तिथून निघून गेल्या. रमाबाई तिथून गेल्या आणि साऱ्याजणी एकमेकीकडे पाहून खरे कारण काय असावे याचा आपापल्या परीने अंदाज बांधू लागल्या.
देशपांडेबाई म्हणू लागल्या, " अहो, नुकताच मंदा आणि सुधाकर यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा झाला हे तर आपण साऱ्या जणी जाणतोच. सुधाकरने आपल्या संपूर्ण कॉलनीलाच निमंत्रण दिलं होतं. पण त्यादिवशी त्या वाढदिवसाला सुधाकरच्या ऑफिसमधली ती मिस पिंपळकर का कोण नव्हती का आली? तिच्यावरूनच या दोघांचे वाजले असेल असे मला वाटते."
"तुम्हाला असं का वाटतं बरं?" गाडेकरबाईंनी विचारले.
"अहो, ती नाही का किती नटूनथटून आली होती त्या दिवशी. आणि सारखी त्या सुधाकरकडे पाहून हसत काय होती, डोळे काय मिचकावीत होती. शी: बाई मला तर सारं विचित्रच वाटत होतं. कोणाचीही बायको असं सहन करील का हो? हे सगळं पाहून सुधाच्या रागाचा पारा चढला असेल. दुसरं काय!" देशपांडेबाईंनी खुलासा केला.
"शक्य आहे. असंही शक्य आहे." काळेबाई म्हणाल्या.
"मला तर दुसरीच शंका येते." गोळेगावकरबाई सांगू लागल्या, " लग्नाच्या वाढदिवसाच्या दहा बारा दिवस अगोदरपासून सुधाची छोटी बहिण मीरा त्यांच्याकडे आलेली होती. तिचा नवराही येणार होता मंदाच्या लग्नाच्या वाढदिवसाला. पण ऑफिसच्या कामामुळे तिच्या नवऱ्याचे येणे जमले नाही म्हणे. मेहुणी या नात्याने सुधाकरने मीराची काही खोडी काढली असेल म्हणा किंवा गंमत केली असेल म्हणा आणि ती गंमत मंदाला रुचली नसावी. मग काय१ केले असेल तिने महाभारत सुरू."
"कारण काहीही असो, पण त्या दोघांमधून सध्या विस्तवही आडवा जात नाही हे खरे." काळेबाई म्हणाल्या.
आमच्या कॉलनीतील स्त्रियांना मंदा आणि सुधाकरचा हा विषय चघळायला मिळाल्यापासून कॉलनीत जणू एक प्रकारचे चैतन्य निर्माण झाले होते. पण दोघांमधल्या धुसफुशीचे नेमके कारण माहित होईना म्हणून सगळ्या कॉलनीत एक प्रकारची अस्वस्थताही जाणवत होती. अधूनमधून ह्या बायका रमाबाईंना घेरून त्याविषयी विचारायचा प्रयत्न करीत होत्या पण तिकडूनही काहीही समाधानकारक उत्तर मिळत नव्हते. रमाबाईंचे एकच उत्तर ठरलेले असायचे, "कळेल, कळेल, लवकरच सारे कळेल. जोरात प्रयत्न चालू आहेत."
देशपांडेबाई, गोळेगावकरबाई, काळेबाई आणि इतर बायका एकमेकींना भेटल्या की, आशाळभूत नजरेने एकमेकींकडे पाहत असत आणि मंदा-सुधाकर या जोडप्यामधील पेल्यातील वादळाबद्दल काही नवीन माहिती मिळते का याची चाचपणी करीत असत.
" अहो, रमाबाईंसारख्या गुप्तहेराला अद्याप काही कळले नाही, तिथे आपण 'किस झाड की पत्ती?' खरे की नाही?" मालतीबाई विचारत्या झाल्या.
" हो, खरं आहे बरं हे. रमाबाईंची डाळ शिजेना तिथे आपणासारख्यांचे काय!" गोळेगावकरबाई म्हणाल्या.
असे अनेक दिवस गेले परंतु मंदा आणि सुधाकर यांच्यातील धुसफुशीचे कारण मात्र कुणालाच कळले नाही. त्यामुळे झाले असे की, आमच्या कॉलनीतील महिलांना अन्न गोड लागेना. टी. व्ही. वरील "सास-बहू" सिरीयल पाहण्यात मन लागेना. जराशा कारणावरून किंवा कधीकधी तर काही कारण नसतांना आमच्या कॉलनीतील प्रत्येक बाई स्वत:च्या नवऱ्यावर चिडचिड करू लागली, मुलांच्या पाठीत धपाटा घालू लागली. अशा परिस्थितीत कुण्या बाईचा नवरा जर तिला म्हणाला की, "उगीचच्या उगीच तू का परेशान होतेस? असेल त्या दोघांचे काही पर्सनल कारण." तर ती बाई लगेच मारक्या म्हशीसारखी आपल्या नवऱ्याकडे पाहू लागायची. या दरम्यान प्रत्येकीचे लक्ष रमाबाईंच्या हालचालीकडे असायचे. कारण त्यांच्यातील गुप्तहेरच मंदा आणि सुधाकर यांच्यातील बेबनावाचे खरे कारण शोधील असा प्रत्येकीला विश्वास होता.
आणि तो दिवस अखेर उगवला. रमाबाई दुपारच्या वेळी लगबगीने सुधाकरच्या घरातून बाहेर पडतांना कॉलनीतील महिलामंडळाने बघितले आणि साऱ्याजणी कोंडाळे करून रमाबाईंच्या भोवती उभ्या राहिल्या. "सांगा ना रमाबाई पटकन 'ती' गोड बातमी" काळेबाई विचारत्या झाल्या.
"तुम्ही सुधाकरच्या घरी का गेल्या होत्या?" गोळेगावकर बाईंनी विचारले.
"काय कळले तिथे?" मालतीबाईंनी उतावळेपणाने विचारले.
"झाला का त्या दोघांमध्ये समेट?" देशपांडेबाईंचा प्रश्न.
"अहो किती घाई कराल? त्यांना श्वास तर घेऊ द्या. मला कल्पना आहे की, आपण सर्वजणी उत्सुक आहोत 'त्या' बातमीसाठी. पण जरा दम धरा." गाडेकरबाईंनी पोक्तपणे सल्ला दिला. यानंतर या सर्वजणींचा रमाबाईंवरील प्रश्नांचा भडीमार थांबला आणि रमाबाईंनी साऱ्याजणींकडे एक सस्मित नजर फिरविली.
"ऐका आता." रमाबाईंनी बोलण्यास प्रारंभ केला आणि तिथे हजर असलेल्या प्रत्येकजणीने
'ती महत्त्वाची बातमी' ऐकण्यासाठी आपला सारा जीव आपापल्या कानात गोळा केला.
"बायांनो," रमाबाई पुढे बोलू लागल्या, " आता मी तुमची उत्सुकता जास्त ताणत नाही. ज्या गोष्टीची आपण साऱ्या जणी. म्हणजे अगदी मीसुद्धा, आतुरतेने वाट पाहत होतो, त्या गोष्टीची कोंडी अखेर आज फुटली आहे. मागील अनेक दिवस आपल्या कॉलनीतील मंदा आणि सुधाकर यांच्यामध्ये सुरू असलेल्या धुसफुशीचे खरे कारण मी आत्ताच थोड्यावेळापूर्वी शोधून काढले आहे. इतकेच नव्हे तर त्या दोघांमध्ये समेटही घडवून आणला आहे. तुम्हाला माहित आहे की, गेले अनेक दिवस मी या गोष्टीचा शोध घेत होते. माझ्यातील गुप्तहेर मला गप्प बसू देत नव्हता. आज आधी मी मंदाला एकटीला गाठले. ती काहीच सांगायला तयार होईना. पण मी माझे कौशल्य पणाला लावून तिला बोलते केले. नंतर सुधाकरला एका बाजूला घेऊन त्याचे म्हणणे समजून घेतले आणि मग नंतर त्या दोघांची एकत्रित मीटिंग घेऊन हा तिढा सोडवला. अर्थात बरेच कष्ट पडले मला हे सारे निपटायला. पण ते असो. तर त्या दोघांचे नेमके कशामुळे बिनसले होते ते प्रत्यक्ष मंदा आणि सुधाकर यांच्या तोंडूनच आपण ऐकू. मी त्यांना इकडेच बोलावले आहे. ते बघा आले ते दोघे." असे म्हणून रमाबाईंनी मंदा आणि सुधाकरला येतांना पाहून "या, या,' असे म्हटले तेव्हा साऱ्याजणी उत्सुकतेने त्या दोघांकडे पाहू लागल्या. मंदा आणि सुधाकर अगदी छानपैकी मूडमध्ये होते. एकमेकांचे हात हातात घेऊनच ते या महिलामंडळापाशी आले. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर रमाबाईंनी मूळ मुद्द्याला हात घातला. तेव्हा "तू आधी, तू आधी" असे त्या दोघांचे चालले. शेवटी सुधाकरने बोलायला सुरुवात केली.
" आमच्या लग्नाचा दहावा वाढदिवस आम्ही आत्ताच साजरा केला, हे सर्वांना माहीतच आहे. त्याअगोदर काही दिवस माझ्या डोक्यात एक विचार घोळत होता. तो विचार मी मंदाला बोलून दाखवला आणि तिलाही तो पटला. तो विचार म्हणजे आम्ही दोघांनी मागील दहा वर्षांमध्ये जर एखादी गोष्ट एकमेकांपासून लपवून ठेवली असेल तर ती या वाढदिवशी एकमेकांना सांगून टाकावी. तेव्हा मंदा म्हणाली, की, 'लग्नाच्या वाढदिवसाची कशाला वाट पाहायची? त्या आधीच सांगू की.'
मी म्हटले, 'ठीक आहे. उद्याच आपण या विषयावर बोलू.' दुसऱ्या दिवशी आम्ही एकत्र बसलो आणि मी सुरुवात केली. तिला मी म्हटलं, "मंदा, कॉलेजमध्ये असतांना माझे एका मुलीवर खूप प्रेम होते. आम्ही लग्नाच्या आणाभाकाही घेतल्या होत्या. पण तिच्या घरच्यांना हे पसंत नसल्यामुळे तो विषय तिथेच थांबला. तरीही पुढे काही दिवस आम्ही एकमेकांसाठी व्याकुळ होत होतो. पण दोघांनीही स्वत:ची समजूत घातली आणि आम्ही एकमेकांपासून दूर झालो. त्यानंतर माझे तुझ्याशी लग्न झाल्यावर तर मी तिला पूर्णपणे विसरूनही गेलो. आणि तू बघतेसच की मागील दहा वर्षांमध्ये आपला संसार किती छान चाललाय." तर मंदाने माझी ही गोष्ट अगदी खिलाडूपणाने स्वीकारली." सुधाकरचे बोलून झाल्यानंतर आता मंदा काय बोलते या गोष्टीकडे सर्वांचे लक्ष लागले.
मंदा बोलू लागली," सुधाकरने इतके दिवस माझ्यापासून लपवलेली ही गोष्ट ऐकून मला थोडा धक्का बसला पण तो तितक्यापुरताच. सुधाकरचे माझ्यावर किती प्रेम आहे हे मी जाणतेच. त्यामुळे त्याने सांगितलेल्या गोष्टीचे मला काही वाटले नाही. मी त्याची गोष्ट खिलाडूपणे स्वीकारली. पण मी त्याला माझे गुपित सांगितले मात्र आणि पुढे हे पेल्यातील वादळ सुरू झाले."
"असे काय गुपित सांगितलेस तू त्याला?" मालतीबाईंनी विचारले.
" मी त्याला म्हटले की, 'एकमेकांपासून लपवून ठेवलेली गोष्ट आज उघड करायची असे तूच ठरवले आहेस, तर ऐक आता माझी गोष्ट. 'तू लग्नाआधी आमच्या घरी मुलगी पाहायला आला होतास, त्यावेळी ज्या मुलीला तू पसंत केलेस ती मी नाहीच. ती माझी छोटी बहिण मीरा होती. तू जेव्हा मला बघण्यासाठी आमच्या घरी येणार होतास, तेव्हा तू दिसायला खूप स्मार्ट आहेस हे मला वडिलांकडून कळले होते. मी थोडी सावळी, उंचीलाही थोडी कमी असल्यामुळे तुझ्यासारखा देखणा मुलगा मला पसंत करील की नाही याची घरातील सर्वांनाच शंका होती. त्यामुळे आम्ही एक धाडस करायचे ठरविले. त्यामुळे मुद्दाम मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम संध्याकाळी ठेवला आणि चक्क माझ्यापेक्षा एक वर्षाने लहान असलेली पण रंगरुपाने माझ्यापेक्षा उजवी आणि माझ्यापेक्षा थोडी उंच असलेली माझी बहिण मीरा तुला दाखवली. तिची चेहरेपट्टी माझ्यासारखीच आहे, एवढेच काय ते साम्य. तू तिथेच तिला पसंत करून टाकलेस. मुलगी दाखवण्याचा तो कार्यक्रम आणि आपल्या लग्नाचा दिवस यामध्ये जवळजवळ सहा महिने अंतर होते. लग्न ठरल्यानंतर तुझे नि माझे बोलणे फक्त फोनवरच होत असे. आपली प्रत्यक्ष दृष्टभेट सरळ लग्नमंडपातच झाली. त्यामुळे तुला आम्हा दोघींमधला फरक लक्षात आलाच नाही.' माझे एवढे बोलणे ऐकले अन् साहेबांचा मूडच गेला. मग काय, लागले घटस्फोटाच्या गोष्टी करायला. मागील दहा बारा दिवसांपासून हा ताण मी सहन करीत होते. या दहा बारा दिवसात कधी कधी मलाही असे वाटायचे की, आपणही त्याची एकप्रकारे फसवणूकच केली आहे. पण बरे झाले, रमाकाकूंची भेट झाली अन् आमची गाडी मार्गी लागली."
"हो ना, " रमाबाई बोलू लागल्या, " मी या दोघांचे सर्व ऐकून घेतल्यावर दोघांचीही समजूत काढली आणि सुधाकरलाही समजावले की, बाह्य रंगापेक्षा बायकोचे अंतरंग बघ. मागील दहा वर्षांमध्ये तुम्ही इतक्या आनंदाने संसार करीत आहात. आम्ही बघतो ना, किती जीव लावता तुम्ही एकमेकांना; आणि इतक्या वर्षानंतर बायकोकडून एक गोष्ट समजली तर एवढी टोकाची भूमिका घ्यायची? उलट तिने ज्या प्रामाणिकपणे सारे सांगितले त्यामुळे तिचे कौतुकच करायला हवे. असे सांगितल्यावर त्या दोघांमधील हे सारे समज, गैरसमज मिटले."
रमाबाईंनी हे सारे सांगितल्यामुळे सर्वांना हायसे वाटले. त्यानंतर सुधाकर म्हणाला, " हो ना, रमाकाकूंनी माझे डोळेच उघडले. बरं, आता आम्हा दोघांची तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे की, आपण सर्वजणी आत्ता आमच्या घरी चला आणि या आनंदाच्या क्षणी मंदाच्या हातचे शिरा-पोहे खाऊन आम्हाला आशीर्वाद द्या."
"सर्वांनीच यायचं बर का!" मंदा म्हणाली.
"हो, बरोबर आहे. ज्याचा शेवट गोड, ते सारेच गोड." देशपांडेबाई म्हणाल्या.
यावर साऱ्या महिलामंडळाने होकारार्थी माना डोलावल्या आणि सुधाकर आणि मंदाच्या विनंतीला मान देत सुधाकरच्या घराकडे मोर्चा वळवला..
*****
उद्धव भयवाळ
१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी
गादिया विहार रोड
शहानूरवाडी
औरंगाबाद ४३१००९
मोबाईल: ८८८८९२५४८८
email: ukbhaiwal@gmail.com