Mi jyotishi banto tyachi gosht books and stories free download online pdf in Marathi

मी ज्योतिषी बनतो त्याची गोष्ट

उद्धव भयवाळ
औरंगाबाद

मी ज्योतिषी बनतो त्याची गोष्ट
(विनोदी कथा)
वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी मी व्ही. आर. एस.च्या एका स्कीमखाली बँकेच्या नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि जणू काय स्वत:च्या पायावर दगडच पाडून घेतला असे मला झाले. खरे म्हणजे स्वेच्छानिवृत्तीची योजना आमच्या या राष्ट्रीयीकृत बँकेत लागू होणार हे बऱ्याच दिवसांपासून ऐकत होतो आणि त्या योजनेची आतुरतेने वाटही पहात होतो. कारण अलीकडे बँकेमध्ये कामाचा व्याप खूपच वाढला होता आणि अधूनमधून प्रकृतीच्या तक्रारीही उद्भवत होत्या. त्यामुळे स्वेच्छानिवृत्तीची योजना बँकेत आल्याबरोबर मी त्यासाठी अर्ज दिला. अर्ज दिल्यानंतर नियमाप्रमाणे तीन महिन्यानंतर मी सेवानिवृत्त झालो. माझ्याप्रमाणेच माझ्या काही सहकाऱ्यांनी देखील स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. वास्तविक घरच्या सर्वांशी-विशेषत: अर्धांगिनीशी विचारविनिमय करूनच मी हा निर्णय घेतला होता. निवृत्तीनंतरचे काही दिवस मी खूप आनंदात होतो. तसेच घरामध्येही सगळे आनंदात दिसत होते. सौ.सुद्धा नवनवीन पदार्थ करून मला खाऊ घालू लागली. पण स्वेच्छानिवृत्तीचा आपला निर्णय चुकला, असेच मला नंतरनंतर वाटू लागले. मला असे वाटण्याला अनेक कारणे होती. त्यातील पहिले कारण म्हणजे माझ्या बायकोकडून मला सतत ऐकावे लागणारे टोमणे.
तीस वर्षांपेक्षा जास्त काळ मी बँकेच्या म्हणजेच लोकांच्या सेवेमध्ये कार्यरत होतो. आता स्वेच्छानिवृत्तीनंतर जरा शरीराला आणि मनाला आराम द्यावा म्हणून मी सकाळी आलेले वर्तमानपत्र अगदी आरामात तास, दीड तास वाचू लागलो. त्याचप्रमाणे दुपारी जेवणावर, म्हणजेच सौ.ने केलेल्या नवनवीन पदार्थांवर यथेच्छ ताव मारून नंतर वामकुक्षी म्हणून दोनदोन तास झोपू लागलो. स्वेच्छानिवृत्तीनंतरचे काही दिवस असे मजेत गेले. पण नव्याचे नऊ दिवस संपले आणि नंतर मात्र सौ.च्या चेहऱ्यावरील नाराजी मला स्पष्ट दिसू लागली. स्वेच्छानिवृत्तीनंतरचा माझा नवा दिनक्रम तिला आवडलेला नाही हे मी समजून चुकलो. सुरुवातीला सौ.च्या चेहऱ्यावर दिसणारी नाराजी, नंतर कढईतल्या फुटाण्यांसारखी तिच्या तोंडातून बाहेर पडू लागली तेव्हा तर मला कळून चुकले की, काही तरी बिनसले आहे. जरा वर्तमानपत्र हातात घेतले की हिच्या तोंडाचा पट्टा सुरू. जरा दुपारी जेवून आडवा झालो की हिच्या तोंडाचा पट्टा सुरू.
"काय मेलं ते दिवसभर पेपरात तोंड खुपसून बसणं, नाहीतर ढाराढूर झोपणं. मी म्हणते असं नुसतं बसून राहण्यापेक्षा चार ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले तर बिघडणार आहे का काही. पण नाही. कधीही पहा, यांच्या चेहऱ्यावर नेहमी बारा वाजलेले असतात. बायको बोलली म्हणजे तिचं तोंड दिसतं. ते कुलकर्णी भावोजी पहा. बँकेतून व्हालंटरी घेतल्याबरोबर एका सहकारी पतसंस्थेत पाच हजार रुपये महिन्याने चिकटले. यांना तर कशाचंच काही वाटत नाही." अशावेळी मला तिचा खूप राग येई आणि वाटे की, तिच्यासमोर जावे अन् ठणकावून सांगावे की, जर पाच हजाराचीच नोकरी करायची होती तर चाळीस हजार रुपये महिन्याची बँकेची नोकरी काय मला डसत होती का?" पण भांडणाचे तोंड काळे म्हणून मी गप्प बसणेच पसंत करीत असे. पण पत्नीच्या अशा वारंवार बोलण्यामुळे मला डिप्रेशन यायला लागले.
असाच एक दिवस मी कपाळाला हात लावून विचार करीत बसलो असतांना माझा बालपणीचा मित्र भीमराव घरी आला. मला असा उदास बसलेला पाहून मला म्हणाला, "काय रे, काय झालं? असा का बसलास? कुणी काही बोललं का? "
"अरे दुसरं कोण बोलणार? तुझ्या वहिनीची वटवट ऐकून नुसता उबग आलाय. असं वाटतं, कुठं तरी दूर निघून जावं. नकोच तीच ती रोजची कटकट. म्हणे कुठे तरी नोकरी करा." मी म्हणालो.
"अरे, वहिनींचं बोलणं असं मनाला लावून घेऊ नकोस. आणि कुठं तरी दूर निघून जाण्याचा विचारसुद्धा मनात आणू नकोस."
"मग मी काय करू?" मी विचारले.
"माझ्याकडे बघ. मी कसा बिनधास्त आहे." भीमराव पुढे बोलू लागला, "माझी बायको तर मला सतत पाण्यात पाहते पण मी आपला निगरगट्ट. कुठल्याही बाईला आपल्या नवऱ्याचे वागणे नेहमीच चुकीचे वाटत असते. कुणीतरी म्हटलंय ना, बहुदा मीच म्हटलंय की, आपल्याकडून चूक झाल्यावर कबूल करतो त्याला माणूस म्हणतात आणि चूक झालेली नसतांनाही कबूल करतो त्याला नवरा म्हणतात. चालायचंच. वहिनींचं बोलणं इतकं मनाला लावून घेऊ नकोस. बर ते जाऊ दे. तुला खरोखरच स्वत:ला कुठेतरी गुंतवून घ्यावंसं वाटत असेल तर माझ्याकडे पुष्कळ आयडिया आहेत."
"खरं सांगू का? आता कुठलीही आयडिया ऐकायच्या मनस्थितीत नाहीय मी." मी भीमरावला म्हटले.
तरी भीमराव काही माझा पिच्छा सोडीचना. "माझी आयडिया तर ऐक." असे सारखे तो म्हणू लागला.
शेवटी नाईलाजाने त्याच्या आयडिया ऐकण्यास मी तयार झालो.
"सांगून टाक एकदाच्या तुझ्या आयडिया अन् हो मोकळा." मी वैतागून म्हणालो.
"अरे, अरे, ऐक जरा. तू ठेकेदार होऊ शकतोस." भीमराव बोलला.
"कसा काय मी ठेकेदार होऊ शकतो? मी काय इंजिनियर आहे का?" मी जरा नाराजीनेच विचारले.
"अरे ठेकेदार होण्यासाठी इंजिनीअर असण्याची गरज नाही. महापालिकेत वशिला लावून परवाना मिळवायचा. मग कामे मिळत राहतात. ज्याचा त्याचा हिस्सा ज्याला त्याला दिला की झाले. कामाची क्वालिटी कोण पाहतो? बिले निघाली की, पैसाच पैसा. काय?" भीमराव म्हणाला.
" हे बघ भीमराव, वो मेरे बस की बात नही. मी आपला साधा सरळ माणूस आहे. असे भलतेसलते सल्ले मला देऊ नकोस." मी त्याला जरा जोरातच बोललो.
"बरं ते विसरून जा. पण असा चिडू नकोस. मी काय म्हणतो ते एकदा नीट समजून तर घे. माझी दुसरी आयडिया तुला नक्कीच आवडेल. हे बघ, तीस, बत्तीस वर्षांपूर्वी तू बँकेत नोकरीला लागण्याआधी एका जिल्हा परिषद प्रशालेत माध्यमिक शिक्षक होतास आणि गणित शिकविण्यात तुझा हात कुणी धरू शकत नव्हते, हे मला माहित आहे. त्या तुझ्या गणिताच्या ज्ञानाचा उपयोग करून तू आजही आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ट्युशन्स घेऊ शकतोस. म्हणजे तुझा वेळही कारणी लागेल, पैसाही हाती खेळेल आणि मग वहिनींची कटकट बंद होईल. नाही का?" भीमरावने त्याची आयडिया माझ्या गळी उतरविण्याचा प्रयत्न केला. पण "दहावीच्या गणितामध्ये मागील तीस वर्षांमध्ये अनेक बदल झालेले आहेत त्यामुळे, मी एकेकाळी गणितात स्कॉलर होतो हे मान्य केले तरी, आता मला गणित शिकविणे जमणार नाही. त्यामुळे तुझी ही आयडिया कुचकामी आहे." असे म्हणून मी त्याची ती आयडिया धुडकावून लावली. तेव्हा भीमराव पुढे बोलू लागला,
"बरे ते जाऊ दे. तू एक चांगला लेखक आहेस हे मलाच काय सर्वांनाच माहित आहे. एक छंद म्हणून तू मागील अनेक वर्षांपासून बँकेतील कामाचा व्याप सांभाळून एकापेक्षा एक सुंदर अशा कथा, कविता लिहिल्यास. तुझ्या कथांना तसेच कवितांना स्पर्धांमधून अनेकदा पुरस्कारदेखील मिळालेले आहेत. महाराष्ट्रातील विविध दर्जेदार दिवाळी अंकांमधून, नियतकालिकांतून तुझ्या कथा, कविता प्रसिद्ध होत असतात. बरोबर?" भीमराव म्हणाला.
"हो, खरे आहे ते." मी म्हटलं.
"तर माझी आयडिया अशी आहे की, तू इतक्या दिवस जे छंद म्हणून करीत होतास, ते इथून पुढे व्यवसाय म्हणून कर. म्हणजेच तू आता प्रोफेशनल रायटर हो. तुझ्या कथा आणि कवितांची दोन तीन पुस्तके प्रकाशित कर. प्रकाशन समारंभास मोठमोठी साहित्यिक मंडळी बोलाव. साहित्यक्षेत्रातील लोकांसोबत तुझी उठबस वाढव."
"म्हणजे काय होईल?" मी विचारले.
"पुढे तुझी पुस्तके शासकीय पुरस्कारांसाठी जातील तेव्हा तुझ्या पुस्तकांना शासनाचे पुरस्कार नक्की मिळतील, याची मला खात्री आहे. कारण तुझं लिखाण दर्जेदार असतं. याचा परिणाम असा होईल की, तुझ्या पुस्तकांची विक्री वाढेल आणि हळूहळू तुझ्याकडे पैशांचा ओघ सुरू होईल. त्यानंतर वेगवेगळे प्रकाशक तुझे साहित्य आनंदाने प्रकाशित करतील. त्याबद्दल तुला रॉयल्टीही मिळेल. वहिनींना हेच तर हवे आहे." भीमराव म्हणाला.
"तसं काही नसतं. दर्जेदार लिखाणाचा आणि त्या पुरस्कारांचा पुष्कळ वेळा काहीच संबंध नसतो. काय लिहिले आहे यापेक्षा कुणी लिहिले आहे? प्रकाशक कोण आहे? हेच पाहिले जाते. त्याच त्या प्रकाशकांची आणि त्याच त्या लेखकांचीच तिथे अनेकवेळा वर्णी लागलेली असते. दुसरे म्हणजे मी साहित्यिक लोकांच्या कुठल्याही गटातटात किंवा कंपूशाहीमध्ये नाही. त्यामुळे तू म्हणतोस तसे होणे शक्य नाही. तू काही म्हण, तुझी ही आयडियासुद्धा काही माझ्या पचनी पडत नाही. तू एक काम कर. इथे आलाच आहेस तर एक कप चहा घे आणि चालू लाग. पुरे कर आता तुझे हे आयडिया पुराण." मी जरा वैतागूनच भीमरावशी बोललो. माझ्या अशा बोलण्यामुळे भीमराव थोडा वेळ गप्प बसला. दरम्यान मी घरामध्ये जाऊन सौ.ला चहा करण्यास सांगून आलो. पण मला पटवण्याचा प्रयत्न सोडील तो भीमराव कसला. थोडे थांबून पुन्हा तो बोलू लागला.
"हे बघ, असा निराश होऊ नकोस. तुला आता माझ्या बोलण्याचा कंटाळा आला आहे हे मला समजले आहे. पण माझी एक शेवटची आयडिया सांगतो अन् मी जातो. तुला जास्त त्रास देत नाही."
"बोल पटकन. राहुसारखा माझ्या खनपटीला बसू नकोस. " मी म्हणालो.
लगेच भीमराव म्हणाला, "हेच, हेच. तू आत्ता मला काय म्हणाला "राहुसारखा." बरोब्बर. तुला आठवतं का? बँकेच्या नोकरीत असतांना तू वेळात वेळ काढून एक छंद म्हणून ज्योतिषशास्त्राचा भरपूर अभ्यास केलास. ज्योतिषशास्त्राची कुठलीशी परीक्षाही तू उत्तीर्ण झालास. तेव्हा माझ्या घरी तू पेढेही आणून दिले होतेस. आठवतं?
"हो, आठवतं." मी म्हणालो.
"मग आता ठरलं तर. तू तुझं एक ज्योतिष कार्यालय सुरू करून लोकांच्या पत्रिका पहायच्या आणि त्यांचं भविष्य सांगायचं. त्याबद्दल लोक तुला दक्षिणाही देतील. तुझाही टाईमपास होईल आणि वहिनीही खुश होतील. पुन्हा हे सर्व घरच्या घरी. समोरच्या हॉलमध्ये तुझे ज्योतिष कार्यालय. कशी वाटली आयडिया?" भीमराव म्हणाला.
"अरे हो, खरंच की. मला इतके दिवस कसं सुचलं नाही? छंद म्हणून मी बँकेमधील अनेक मित्रांच्या आणि सहकाऱ्यांच्या जन्म कुंडल्या मागायचो आणि त्यावरून त्यांचे भविष्य कथन करायचो. मी सांगितलेल्या भविष्यातील गोष्टी खऱ्या ठरल्या की, त्यांना खूप आनंद व्हायचा. एकदा तर माझ्या साहेबांचे त्यांच्या प्रमोशनसंबंधी मी सांगितलेले भविष्य इतके तंतोतंत खरे ठरले की, खुश होऊन त्या दिवशी त्यांनी मला एका हॉटेलमध्ये पार्टी दिली; आणि वर म्हणालेसुद्धा की, 'जोशी, तुम्ही फारच बिनचूक भविष्य सांगता. तुम्ही जसे सांगितले तसेच घडले बघा.' भीमराव, ही तुझी आयडिया मला एकदम पसंत पडली बघ. मी आता ज्योतिषीच बनणार. हाच माझा संकल्प.."
माझे आणि भीमरावचे असे बोलणे चालू असतांना सौ.ने चहाचे कप आमच्या हातात दिले तेव्हा लगेच हा माझा संकल्प मी सौ.ला सांगितला. हा माझा संकल्प ऐकून तीसुद्धा खूपच खूश झाली.
नंतर एक चांगला मुहूर्त पाहून मी माझ्या ज्योतिष कार्यालयाचे उद्घाटन केले. हळूहळू लोकांची गर्दी वाढू लागली. खिशात पैसाही खुळखुळू लागला. माझी भविष्यवाणी खरी ठरू लागल्याचे कळल्यामुळे राजकारणी लोकांचीही माझ्याकडे ये-जा सुरू झाली. अगदी महापालिकेच्या नगरसेवकापासून तर आमदार, खासदार यांच्या गाड्या माझ्या दारी उभ्या राहू लागल्या. त्यामुळेच माझी स्वत:चीही एक "मर्सिडीज" गाडी आता माझ्या दारासमोर दिमाखात उभी आहे. एका स्थानिक वर्तमानपत्रातून माझे "आठवड्याचे भविष्य" हे सदरही सुरू झाले. तसेच टी.व्ही. वर माझे कार्यक्रमही होऊ लागले. टी.व्ही चॅनेलवरचे माझे ज्योतिषशास्त्रावरील कार्यक्रम पाहून अमेरिकेतील महाराष्ट्रमंडळाने मला सपत्नीक अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले.
मित्रांनो, नुकताच मी सपत्नीक, अमेरिकेत जाऊन आलो. तिथेही माझ्या कार्यक्रमांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तिथे अनेक पर्यटन स्थळांनाही भेटी दिल्या. त्यामुळे माझी बायको माझ्यावर जाम खूश आहे. ती खूश म्हणून मी खूश. एकंदरीत काय तर तिच्या सहवासात माझे भविष्य सुरक्षित आहे!
*****

उद्धव भयवाळ
१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी
गादिया विहार रोड
शहानूरवाडी
औरंगाबाद ४३१००९
मोबाईल: ८८८८९२५४८८
email: ukbhaiwal@gmail.com

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED