महाराष्ट्रातील हादगा Vrishali Gotkhindikar द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

महाराष्ट्रातील हादगा

महाराष्ट्रातील भोंडला/हादगा

मुलींचा भोंडला

अश्विन शुद्ध प्रतिपदे पासून दसर्या पर्यंत हादगा खेळला जातो नवरात्रीच्या काळात महाराष्ट्रात मुली संध्याकाळी भोंडला खेळतात. भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात प्रचलित असलेला स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी भोंडला खेळतात.
काही ठिकाणी भोंडला नऊ दिवस, काही ठिकाणी सोळा दिवस खेळला जातो.

नवरात्रीच्या नऊ दिवसात हस्त नक्षत्राचे प्रतीक असलेल्या हत्तीची प्रतिमा काढून मधोमध ठेवली जाते आणि तिच्याभोवती मुली फेर धरतात.

पृथ्वीच्या सुफलीकरणाचा हा उत्सव मानला जातो म्हणून याचे महत्त्व विशेष आहे.

भोंडला हा बहु उंडल याचा अपभ्रंश आहे असेही मानले जाते.

हत्ती हा समृद्धीचे प्रतीक मानला जातो तसेच शक्तीचे प्रतीक म्हणूनही त्याकडे पाहिले जाते.

आश्विन महिन्यात हस्त नक्षत्राला सुरुवात होते आणि छोट्या – मोठ्या मुलींच्या आनंदाला उधाण येते. कारण त्या दिवसापासून त्यांच्या आवडत्या ह्दग्याची किंवा भोंडल्याची सुरुवात होते.

भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात प्रचलित असलेला स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे.

घटस्थापनेच्या दिवसापासून संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो

आश्विन महिन्यात हस्त नक्षत्राला सुरुवात झाली, कि त्या दिवसापासून पौर्णिमेपर्यंत मुली ‘हादगा’ खेळतात. याला ‘भोंडला’ असेही म्हणतात. हा सण मुलींचा विशेष आवडता आहे.

या साठी घराच्या भिंतीवर सोंडेत माळ धरलेल्या व समोरासमोर तोंड केलेल्या दोन हत्तींचे रंगीत चित्र टांगतात. त्याच्यावर लाकडाची मंडपी टांगून तिला निरनिराळ्या फळांच्या व फुलांच्या माळा घालतात. शिवाय धान्याने कींवा रांगोळीने पाटावर हत्ती काढतात.

रांगोळीच्या टीपक्यांनी त्यावर झूल काढतात.

रंगबेरंगी फुलांच्या माळा घालून त्याला सजवतात, त्याची पूजा करतात. त्याभोवती फेर धरुन मुली, व बायका भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात.जिच्या घरी भोंडला असतो, तिची आई खिरापत करते.

रोज वेगवेगळ्या घरी वेगवेगळी खिरापत असते.
खिरापत ओळखणे एक चढाओढीचा कार्यक्रम असतो .

वेगळी आणि न ओळखू येणारी खिरापत ठेवण्यासाठी महिलांचे पाककौशल्य जणू पणास लागते.

पहील्या दिवशी एक दुसर्या दिवशी दोन अशी सोळाव्या दिवशी सोळा खिरापती सुद्धा काही घरात केल्या जातात

त्याचप्रमाणेच पहील्या दिवशी एक दुसर्या दिवशी दोन अशी दसर्यापर्यंत सोळा गाणी म्हणली जातात.

रोज एक-एक गाणे वाढवले जायचे.

फेर धरताना एक छोट्या मुलींचा व १ मोठ्या मुलींचा. असे २ फेरे होतात.सर्वच मुली गाणी म्हणतात.

नवरात्रीच्या नऊ दिवसात हस्त नक्षत्राचे प्रतीक असलेल्या हत्तीची प्रतिमा काढून मधोमध ठेवली जाते आणि तिच्याभोवती मुली फेर धरतात.

घाटावरच्या कुमारिका पाटावर डाळ तांदूळाचा हत्ती मांडून त्याभोवती फेर धरून गाणे म्हणून पूजा करतात.याच भोंडल्याचे स्वरूप हादगा, भुलाबाई असे प्रदेशानुसार बदलते.

आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्रौत्सवाची सुरुवात होते. पण हस्त नक्षत्रात सूर्याने प्रवेश केला की दुसर्‍या दिवशी हादगा म्हणजेच, भोंडला, सुरू होतो. भोला म्हणजे शिवशंकर आणि म्हणून भुलाबाई म्हणजे उमा-पार्वती. त्यामुळे भोंडल्याला भुलाबाई असेही नाव आहे.

एलोमा पैलोमा गणेश देवा

माझा खेह मांडू दे करीन तुझी सेवा

ह्या गाण्यापासून सुरवात केली जाते .

सासु-सासरे-नणंद, भावजय, पती-दीर आणि माहेरच्या माणसांबद्दल गौरावाचे, स्तुतीचे बोल बोलणारी गाणी गाऊन स्त्रिया आनंद साजरा करतात.

पूर्वी चूल आणि मूल एवढंच क्षेत्र असणार्‍या स्त्रियांनाहा आश्विन महिना म्हणजे भोंडला हळदीकुंकू वगैरेमुळे विरंगुळा मिळे.

मने मोकळी होत असत आणि पुन्हा कामाला नवा उत्साह मिळे. आजही आधुनिक कामात वेगवान जीवन जगताना स्पर्धा-ताणतणाव यातून मुक्त होण्यासाठी आणि दोन घटका आनंद प्राप्तीसाठी 'पारंपरिक पद्धतीचा भोंडला' नव्या युगात तरुण स्त्रियांनाही आनंद देत असतो आणि म्हणून अनेक सार्वजनिक ठिकाणी भोंडला साजरा होत आहे.त्याला महाहादगा म्हणतात .

घटस्थापनेआधी संपूर्ण घराची आणि पर्यायाने सगळ्या वाड्याचीच स्वच्छता झाल्याने अतिशय प्रसन्न आणि मंगलमय वातावरण सभोवताली असते . घटस्थापनेपासून कोजागरी पौर्णिमेपर्यंत रोज एका कुटुंबाच्या अंगणात भोंडला खेळला जायचा

मुली, महिलांनी एकत्र येऊन साजरा केल्या जाणाऱ्या प्रथा-परंपरांमध्ये भोंडल्याचे नाव अग्रभागी घ्यावे लागेल.

लहान मुलींसाठी एकत्र येऊन, फेर धरून गाणी म्हणणे आणि खिरापत फस्त करणे हाच जणू भोंडला. त्यामुळेच त्यांना भोंडला हवाहवासा वाटतो.

ऐलमा पैलमा गणेशदेवा', 'अक्कण माती चिक्कण माती', या गाण्यांचा अर्थ चिमुकल्यांना नीटसा समजला नसला, तरी मोठ्या ऐटीत आणि चालीत ही गाणी त्या म्हणतात दिसतात.
'एक लिंबू झेलू बाई, दोन लिंबू झेलू',
'श्रीकांता कमळकांता अस्से कस्से झाले…'
'हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली',
'कृष्ण घालितो लोळण'
अशी अनेक गाणी गमतीशीर असल्याने त्यांची भलतीच आवडती असतात . मोठ्या बहिणीकडून ही गाणी शिकून घेणे आणि आजीकडून त्याचा अर्थ समजावून घेणे ही तर मोठी गंमतच असते .घरोघरच्या मोठ्या बायकांना अनेक मोठ मोठी गाणी तोंडपाठ असतात .

'कारल्याचा वेल लाव गं सुने',
'नणंदा भावजया दोघी जणी, घरात नव्हतं तिसरं कोणी, शिंक्यावरचं लोणी खाल्लं कोणी?'
यासारख्या गाण्यांतून नणंद, भावजय, सासू, सासरे, सून, दीर ही नाती छान उलगडलेली दिसतात.

कधी या नात्यांमधील ओलावा, प्रेम, दाखवत तर कधी हळूच चिमटा काढत ही गाणी मनोरंजन करतात. त्यामुळेच नात्यांची आणि पर्यायाने कुटुंबाची वीण घट्ट करण्यासाठी ते उपयोगी पडायचे. मनातील भावनांना मोकळी वाट करून दिली जायची. एकमेकांच्या अंगणात आळीपाळीने भोंडला केल्याने सगळ्या गल्लीत एकोप्याचे वातावरण निर्माण होई.

हत्तीचे चित्र काढताना कल्पकतेला वाव मिळे. कुणी रांगोळीचा वापर करून तर कुणी ओल्या खडूने सुरेख हत्ती रेखाटत. काही जणी तर रंगबिरंगी फुलांचा वापर करून हत्ती साकारत, तर काही ठिकाणी चक्क हत्तीची छोटी प्रतिकृती असल्यास तीच ठेवली जात असे.

कालानुरूप सण-समारंभ साजरे करण्याची पद्धत बदलली. भोंडल्यालाही आजकाल वेगळे स्वरूप आलेले दिसते. आजच्या वेगवान आयुष्यात काही क्षण आनंद, विरंगुळा मिळविण्यासाठी आणि मुख्य म्हणजे एकत्र येण्यासाठी भोंडला हे निमित्त ठरत आहे. भोंडल्याचे पूर्वीचे रूप आताशा काहीसे पालटले असले, तरी उत्साह मात्र तेवढाच दिसतो. इतर सण, उत्सवांप्रमाणेच भोंडल्यालाही आता उत्सवी स्वरूप आलेले दिसते.

राजकीय पक्षांतर्फे आजकाल तर थेट मैदानांवरच महाभोंडला आयोजित केला जातो. गल्ली, कॉलनीतील कुटुंबे जोडणारा हा खेळ आता व्यापक रूपात साजरा होऊन आणखी मोठा परिवार तयार होत आहे. 'हे विश्वचि माझे घर' या उक्तीची प्रचीती जणू यामधून येत आहे.

समाप्त